नमस्कार मी गणेश मोरे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील विद्यार्थी दिनांक १० जुलै २०२४ हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या दिवशी करिअर कट्टा स्थापनेसाठी आमच्या महाविद्यालयाचे समन्वयक आमच्या वर्गात आले होते. त्यावेळी मी BCS प्रथम वर्षाला शिकत होतो. त्यांनी वर्गामध्ये येऊन आम्हाला करिअर कट्टा या उपक्रमाबद्दल सांगितले. करिअर संसदेमध्ये विविध पदे आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना या पदांवर काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी आपली नावे द्यावीत, असे त्यांनी सांगितले.
खरं सांगायचं झालं तर आम्हा विद्यार्थ्यांना या उपक्रमाची आधीपासूनच खूप आवड होती. नेतृत्व करणं किंवा एखाद्या कामात आपला हातभार लावणं हे मला खूप आधीपासूनच आवडायचं. त्याचबरोबर व्हिडिओ एडिटिंगमध्ये मला विशेष रस होता. त्यामुळे मी माहिती प्रसारण मंत्री हे पद निश्चित केलं आणि माझं नाव नोंदवलं. त्यानंतर १५ जुलै २०२४ हा माझ्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरला. करिअर संसदेचा माहिती प्रसारण मंत्री म्हणून महाविद्यालयात एका वर्षासाठी माझी निवड झाली. त्यानंतर अनेक मीटिंग, बैठका आणि करिअर कट्टाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होऊ लागलो.
पण काही दिवस काम केल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला आपण टेक्निकलचे विद्यार्थी आहोत आणि या उपक्रमामध्ये जास्त इन्व्हॉल्व होण्याची गरज नाही. हा कदाचित स्पर्धा परीक्षेचा प्लॅटफॉर्म आहे आणि आपला वेळ इथे जातोय, असा माझा गैरसमज झाला. त्यामुळे डिसेंबरपर्यंत मी हा वेळ तसाच ढकलत राहिलो आणि मग ती वेळ आली, जेव्हा करिअर कट्टाचे राज्यस्तरीय अधिवेशन बारामतीच्या सभागृहात होणार होते. आम्ही ३१ तारखेला कॉलेजमधून करिअर संसद म्हणून बारामतीला रवाना झालो. बारामतीला गेल्यानंतर अनेक मोठे मान्यवर, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आणि त्यांची मार्गदर्शनपर सत्रे ऐकण्याची संधी मिळाली. खरंच, त्या वेळी मनात प्रश्न पडला आपण नेमके कोणत्या क्षेत्रात आलो आहोत ? कारण तोपर्यंत गणेश मोरे उमरगा सोडून फार कुठे गेलेलाच नव्हता. आणि त्याच गणेश मोरेला करिअर कट्टामुळे बारामतीसारख्या शहरात जाण्याची, तज्ज्ञ व्यक्तींना भेटण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळत होती. दोन दिवसांचे ते अधिवेशन होते. अनेक गोष्टी पाहिल्या, ऐकल्या आणि शिकलो. अधिवेशन संपल्यानंतर करिअर कट्टाच्या जिल्हा नियोजन समितीचा फॉर्म ग्रुपवर आला. मी तो भरला आणि त्यानंतर कॉलेजच्या करिअर कट्टातून बाहेर पडून माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. कारण जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी असायची, त्यामुळे अभ्यासावर फारसा परिणाम होणार नाही, असं मला वाटलं.
त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठका सुरू झाल्या. त्या माध्यमातूनही अतिशय चांगला अनुभव मिळत गेला आणि अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. यानंतर करिअर संसदेचे तिसरे आणि माझे दुसरे अधिवेशन आले. यावेळी मला टीम लीडर म्हणून बारामतीसारख्या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या वेळी पाच दिवसांचे अधिवेशन होते. मागच्या वेळेस माझ्याकडून एक मोठी चूक झाली होती. मी माझ्या खुर्चीवर किंवा माझ्या सीटवर बसून जवळपास कोणाशीच बोललो नव्हतो. पण यावेळी तीच चूक पुन्हा करायची नाही, असं मी ठरवलं. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थी आले होते. त्यांच्याशी बोलायचं, संपर्क वाढवायचा, मैत्री करायची आणि मान्यवरांशी संवाद साधायचा, असं मी ठरवलं. मला 'शिवनेरी' टीम मिळाली. जवळपास ४० मुलं माझ्या टीममध्ये होती आणिमहाराष्ट्रातील वेगवेगळ्या तालुक्यांतून आणि जिल्ह्यांतून आलेली ही मुलं अतिशय प्रेमळ होती. आजही त्यांच्याशी माझा खूप चांगला बॉण्ड आहे. अधिवेशनामध्ये स्टेज कमिटीने ज्या पद्धतीने संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं, मान्यवरांचं स्वागत केलं आणि संपूर्ण कार्यक्रम सांभाळला, ते पाहून माझ्या मनात एक विचार आला आपणही या ठिकाणी असलं पाहिजे. आपल्यालाही स्टेजवर बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. माझ्या सहकाऱ्यांनी केलेलं सुंदर नेतृत्व आणि प्लॅनिंग पाहून मला खूप काही शिकायला मिळालं. आपणही या नियोजनाचा भाग झालं पाहिजे, असं मनापासून वाटायला लागलं. आणि याच काळात मला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांशी संपर्क साधता आला. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी माझे चांगले मित्र आहेत, याचं श्रेय त्या प्रवासाला आहे. या अधिवेशनानंतर माझ्यामध्ये खूप मोठा बदल झाला. करिअर कट्टाची जी आस मनामध्ये निर्माण झाली होती, ती निघणं आता शक्य नव्हतं. अधिवेशनानंतरची जवळपास कोणतीही करिअर कट्टाची मीटिंग मी सोडली नाही. कारण माझ्यात काहीतरी पूर्णपणे बदललं होतं. ज्याची स्वप्नं मी कधी पाहिलीही नव्हती, ती कुठेतरी या व्यासपीठाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात, असा विश्वास निर्माण झाला होता. आणि त्यासाठी मला एक मोठी सपोर्ट सिस्टम मिळाली होती.
प्रत्येक मीटिंगमध्ये बोलायला शिकलोः
अधिवेशन अतिशय उत्साहात पार पडलं. त्यानंतर मी प्रत्येक मीटिंगमध्ये बोलत गेलो. कारण एक गोष्ट मला समजली होती जो शांत राहतो, त्याचं काहीच होत नाही. मी जवळपास एक वर्ष करिअर कट्ट्यामध्ये होतो. पण या काळात मी अनेक स्पर्धा आणि अनेक संधी गमावल्या होत्या. कदाचित आपण शांत असाल, मीटिंगमध्ये बोलत नसाल, तर हा करिअर कट्टामधला तुमचा सर्वात मोठा लॉस असू शकतो. कारण करिअर कट्टाने मला बोलायला शिकवलं. म्हणून मी प्रत्येक मीटिंगमध्ये काही ना काही बोलायचं, असं ठरवलं. त्यामुळे सरांसोबतही माझा चांगला बॉण्ड तयार झाला. आणि मग आला २८ फेब्रुवारी २०२६ हा दिवस. त्या दिवशी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत सर तसेच इतर मंत्रीमहोदय आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत मला करिअर कट्टाचा स्टेट लेव्हल कंटेन्ट क्रिएटर अवॉर्ड जाहीर करून सन्मानित करण्यात आलं.
यानंतर एका मीटिंगमध्ये मेसेज आला की करिअर कट्टामधून इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. इंटर्नशिपपूर्वी काही टास्क देण्यात आले होते. त्यामध्ये जे विद्यार्थी टिकतील, त्यांनाच पुढे इंटर्नशिपसाठी घेण्यात येणार होतं. मी ही त्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालो आणि प्रत्येक टास्क पूर्ण करत राहिलो. शेवटी करिअर कट्टाच्या इंटर्नशिप मेंबर म्हणून माझी निवड झाली आणि टॉप १० विद्यार्थ्यांमध्ये येण्याची संधी मला मिळाली. आणि खरं सांगायचं झालं तर आयुष्याचा खरा प्रवास इथून सुरू झाला.
इंटर्नशिप आणि नव्या जबाबदाऱ्या
फेब्रुवारी आणि मार्च हा दोन महिन्यांचा ट्रेनिंग पीरियड होता. या काळात अनेक तास प्रशिक्षण घेतलं आणि खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या ट्रेनिंगदरम्यान माझी पहिली मोठी जबाबदारी आली. ९ मार्च २०२६ रोजी मला करिअर कट्टाच्या ऑफिशियल YouTube चॅनेलसाठी काम करण्याची संधी मिळाली. मी एडिटर म्हणून सुरुवात केली आणि आज संपूर्ण महाराष्ट्राच्या करिअर कट्टाच्या ऑफिशियल YouTube चॅनेलचं व्हिडिओ एडिटिंग तसेच सोशल मीडियाशी संबंधित विविध कामं करण्याची संधी मला मिळत आहे. यानंतर २०, २१ आणि २२ मार्च रोजी कोल्हापूरच्या हेड ऑफिसला म्हणजेच करिअर कट्टाच्या मुख्य कार्यालयात जाण्याची संधी मिळाली. तिथे संपूर्ण टेक्निकल टीम उपस्थित होती. पुढील नियोजनाबाबत अनेक चर्चा झाल्या आणि त्यातूनही खूप काही शिकायला मिळालं. ही माझ्यासाठी आणखी एक मोठी संधी होती.
यानंतर १ एप्रिल २०२६ रोजी माझ्या ११ महिन्यांच्या इंटर्नशिप प्रोग्रामला सुरुवात झाली. या इंटर्नशिपची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२७ निश्चित करण्यात आली. ही बातमी माझ्यासाठी खूप आनंदाची आणि उत्साहाची होती. कारण आमच्या डिपार्टमेंटमधून इंटर्नशिप मिळवणारा मी पहिला विद्यार्थी ठरलो. BCS सारख्या टेक्निकल फील्डमध्ये इंटर्नशिपला खूप महत्त्वआहे. आमच्या महाविद्यालयाच्या मागील अनेक वर्षांच्या इतिहासात सेकंड इयरमध्ये अशी संधी मिळवणारा विद्यार्थी नव्हता आणि हा बहुमान मला मिळाला. त्यामुळे माझ्या डिपार्टमेंटने आणि महाविद्यालयाने माझा सत्कार केला. चुका झाल्या, पण प्रत्येक चुकांनी शिकवलं. इंटर्नशिपच्या पहिल्या महिन्यात आम्ही कुठे आहोत आणि कुठपर्यंत जायचं आहे, याची दिशा मिळाली. प्रत्येकाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन सुरू झालं. आणि पहिल्याच महिन्यात माझ्याकडून अनेक चुका झाल्या. पण त्या चुकांमधून शिकत गेलो. कारण मला एक गोष्ट समजली चूक होणं हा प्रॉब्लेम नाही; चूक झाल्यानंतर त्यातून काहीच न शिकणं हा खरा प्रॉब्लेम आहे. यानंतर मे महिन्यामध्ये करिअर कट्टाच्या ऑटोनॉमस प्रोजेक्टच्या माध्यमातून मुंबईतील अनेक नामांकित स्वायत्त महाविद्यालयांना भेट देण्याची संधी मिळाली. त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव मिळाला.
खरं सांगायचं झालं तर आजपर्यंत मी काही महाविद्यालयांचे Science चे कट-ऑफ ९५ ते ९६ टक्के असल्याचं ऐकलं होतं. पण या प्रोजेक्टच्या माध्यमातून अशा महाविद्यालयांना भेट दिली, जिथे Commerce चा कट ऑफ ९८ टक्क्यांपेक्षा जास्त असतो. ज्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी घडतात, अनेक CA घडतात, त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली. हेही करिअर कट्टामुळेच शक्य झालं.
चार महिन्यांनंतर पुन्हा एकत्र येण्याची वेळः
करिअर कट्टाच्या इंटर्नशिपमध्ये प्रवेश करून आता आम्ही चौथ्या महिन्यात प्रवेश करत होतो. चार महिने आम्ही रोज रात्री ठीक ८ वाजता मोबाईलवर रिपोर्टिंग मीटिंगसाठी एकत्र यायचो. फक्त स्क्रीनवरून एकमेकांना पाहायचो. पण आता ती वेळ आली होती जेव्हा आम्ही प्रत्यक्ष एकत्र येणार होतो. १४, १५ आणि १६ ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या हेड ऑफिसमध्ये गेट-टुगेदर आणि ट्रेनिंगचं नियोजन करण्यात आलं होतं. १४ ऑगस्टला कोल्हापूरच्या प्रवासाला सुरुवात केली आणि दुपारी दोन वाजेपर्यंत ऑफिसमध्ये पोहोचलो. काही मंडळी आधीच आली होती, तर काही येत होती. त्या दिवशी पुन्हा चर्चा झाली करिअरच्या बाबतीत नेमकं काय करायचं? आपला Vision Clear असेल तर प्रवास करायला सोपा जातो, हा उद्देश शितोळे सरांनी त्या वेळी सांगितला. प्रत्येकाचं Vision समजून घेण्यात आलं आणि त्या Vision साठी लागणारी सपोर्ट सिस्टम उपलब्ध करून देण्याचा विश्वास सरांनी दिला. तो शब्द खरंच आत्मविश्वास आणि उत्साह वाढवणारा होता. या दोन-तीन दिवसांच्या ट्रेनिंगमध्येही अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
१५ ऑगस्ट २०२६ हा स्वातंत्र्यदिन करिअर कट्टाच्या हेड ऑफिसमध्ये साजरा करण्याचं भाग्य मला मिळालं. त्याच वेळी करिअर कट्टामधील प्रत्येक उद्योजकासाठी त्यांची स्वतःची Brand Website तयार करण्यासाठी YCAI सारख्या स्टार्टअप उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. खरं सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा मी कोल्हापूरच्या हेड ऑफिसला जातो, तेव्हा प्रत्येक वेळी मनात एकच विचार येतो आपण नेमके कुठे आलो आहोत? कारण तिथे बसल्यानंतर जाणवतं की जग किती पुढे चाललं आहे आणि आपण अजून किती शिकायचं आहे. मनात भीतीही वाटायची. आपण खूप खेडेगावातून आलो आहोत. पण आता आपल्यालाही कुठेतरी पुढे जायचं आहे. सर नेहमी मला एक वाक्य सांगतात, 'गणेश, जर तुला टिकायचं असेल तर तुला जगासोबत जुळवून घ्यावं लागेल आणि त्याच्यासोबत पुढे निघावं लागेल.' त्यांचं हे वाक्य मला नेहमी आठवतं.
प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्नः
इंटर्नशिपचा हा प्रवास आता पुढे चालू आहे. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवत आहे. आजपर्यंत करिअर कट्टा आणि MITSC साठी अनेक पेजेस तयार करण्याची संधी मिळाली. आमच्या टीम लीडरने माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या आणि त्या कामातून मी शिकत गेलो. खरं सांगायचं तर मी त्यांना नेहमी एकच म्हणायचो, 'मला काम द्या, मला काम द्या. मला काहीतरी Task द्या.' कारण काम केल्याशिवाय शिकता येत नाही, हे मला या प्रवासातून समजलं. करिअर कट्टातील प्रत्येक व्यक्तीने मला काही ना काही शिकवलं आहे. प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. तलमोड सारख्याखेडेगावातून आलेला मी मला आज संपूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याची संधी मिळत आहे. हा प्रवास माझ्यासाठी केवळ करिअरचा प्रवास नाही; हा स्वतःला घडवण्याचा प्रवास आहे.
मनःपूर्वक आभारः
सर्वप्रथम मला या इंटर्नशिपमध्ये येण्याची संधी ज्यांच्यामुळे मिळाली, त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या माध्यमातून मला या सर्व गोष्टी शिकण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली. त्यासोबतच करिअर कट्टाच्या माहिती प्रसारणमंत्री पदापासून आजच्या इंटर्नशिप मेंबरपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, असे आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. संजयजी अस्वले सर, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. पसरकल्ले सर, डॉ. कटके सर आणि डॉ. करे सर यांचे मनःपूर्वक आभार. या व्यासपीठावर माझं नाव देऊन माझ्या आयुष्याला खरी गती देण्याचं काम त्यांनी केलं. आणि ज्या व्यक्तींच्या माध्यमातून या प्रवासातील अनेक गोष्टी घडल्या, ते म्हणजे माझे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे सन्माननीय अध्यक्ष यशवंतजी शितोळे सर. करिअर कट्टाचा हा रथ संपूर्ण महाराष्ट्रभर चालवण्याचं काम ते करत आहेत. माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यावर विश्वास ठेवून त्यांनी माझ्यावर मोठ्या आणि विश्वासाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्या जबाबदाऱ्यांमधून मला शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सरांचे विशेष आभार. माझ्यावर टाकलेल्या या विश्वासाला पात्र ठरण्याचा आणि माझ्या जबाबदाऱ्या कर्तव्यपूर्वक पार पाडण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहीन. या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. या प्रवासामध्ये ज्यांनी मला मोलाची साथ दिली, वेळ दिला, मार्गदर्शन केलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला, त्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार.
शेवटी एकच गोष्टः
शितोळे सरांनी मला नेहमी एक गोष्ट सांगितली आहे. जंगलाला आग लागलेली असते. एक छोटी चिमणी आपल्या चोचीत पाणी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असते. ते पाहून एक हत्ती तिला म्हणतो, 'तुझ्या चोचीतल्या एवढ्याशा पाण्याने ही आग विझणार नाही. त्यामुळे जास्त कष्ट घेऊ नकोस.' तेव्हा ती चिमणी म्हणते, 'माझ्या चोचीतून टाकलेलं पाणी ही आग विझवेल की नाही, हे मला माहीत नाही. पण या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा मी आग लावणाऱ्यांमध्ये नाही, तर आग विझवणाऱ्यांमध्ये होते, एवढं समाधान मला नक्की असेल.' मलाही आता एवढंच करायचं आहे. आपण किती मोठं काम केलं यापेक्षा, आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे आपला खारीचा वाटा किती प्रामाणिकपणे दिला, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.
खेडेगावातून सुरू झालेला हा प्रवास मला महाराष्ट्रभर घेऊन आला. आणि हा प्रवास अजून संपलेला नाही. खरं तर तो आता सुरू झाला आहे.
धन्यवाद !