उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना 'पदवी मिळाल्यावर नोकरी मिळतेच' असा एक सर्वसामान्य विचार मनात होता. योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे पहिली ते बारावी जिथे शिकले, त्याच गावात राहून पारंपरिक पद्धतीने बी.कॉम. करण्याचे ठरवले. परंतु, महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी प्रा. अक्षता मोंडकर मॅडम यांनी वर्गात दिलेला एक मोलाचा सल्ला माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. 'तुम्ही जितके बाहेर पडाल, तितके ज्ञान, संधी आणि प्रगतीचे दरवाजे तुमच्यासाठी खुले होतील,' हे त्यांचे वाक्य माझ्या मनात पक्के घर करून गेले. या एका विचाराने प्रेरित होऊन मी महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्याचा आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा निश्चय केला.
द्वितीय वर्षात असताना मोंडकर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या 'करिअर कट्टा' या उपक्रमाची ओळख झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी देणाऱ्या या व्यासपिठावर मला 'उद्योजकता विकास मंत्री' ही जबाबदारी मिळाली. या माध्यमातून आम्ही 'शिका आणि कमवा' योजनेअंतर्गत मेणबत्ती व अगरबत्ती बनवण्याची प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित केली आणि विद्यार्थ्यांना रोजगाराची प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून दिली.
यानंतर करिअर कट्टातर्फे आयोजित सादरीकरण स्पर्धेत कोकणातील स्थानिक साधनसामग्री, विशेषतः नारळ आणि बांबू यांपासून रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील, यावर आम्ही संशोधन केले. मोंडकर मॅडम आणि सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन आम्ही प्रथम जिल्हा स्तरावर आणि नंतर विभागीय स्तरावर सादर केले. दोन्ही स्तरांवरआमच्या सादरीकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. या यशाच्या जोरावर बारामती येथील राज्यस्तरीय अधिवेशनात तब्बल १२०० विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. व्यासपीठावर उभे राहून केलेले ते सादरीकरण माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय क्षण होता.
तृतीय वर्षात आल्यानंतर करिअर कट्टामधील कामाचा अनुभव लक्षात घेऊन माझ्यावर 'मुख्यमंत्री' पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. या काळात दिल्ली अभ्यास दौऱ्याची संधी समोर आली. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ४९६ महाविद्यालयांमधून केवळ माझी निवड झाली होती. दिल्ली दौऱ्यादरम्यान वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या मुलाखती घेण्याची आणि त्यांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. या दौऱ्यात डॉ. तुषाबा शिंदे सरांचे वाक्य खूप महत्त्वाचे ठरले. 'अपेक्षा पूर्ण करायची असेल तर पहिले पाऊल तुमचे स्वतःचे असावे लागते.' दिल्ली दौऱ्याच्या शेवटी, महाराष्ट्रभरातून आलेल्या ११ उत्कृष्ट विद्यार्थ्यांमधून मला 'द्वितीय क्रमांक' मिळाला.
दिल्ली अभ्यास दौऱ्यातील उत्कृष्ट कामगिरी आणि सातत्यपूर्ण कामाची दखल घेऊन माझी 'मुंबई विभाग समन्वयक' तसेच 'सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य' म्हणून निवड करण्यात आली. या पदांवर काम करताना मला एक उत्तम आणि संवेदनशील टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली. एकमेकांच्या विचारांचा आदर करत एकत्र निर्णय घेणे, संघभावना जपणे आणि विविध कार्यशाळांचे नियोजन व व्यवस्थापन करणे यांसारखे अनेक नवीन अनुभव इथे मिळाले. या जबाबदारीमुळे माझ्या व्यक्तित्वाला एक वेगळा पैलू मिळाला असून माझा आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणअधिक दृढ झाला.
केवळ १५-२० हजारांची नोकरी शोधण्याच्या
विचाराने कॉलेजमध्ये पाऊल ठेवलेली साक्षी आज स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःला घडवत आहे. करिअर कट्टयाने मला केवळ नेतृत्व आणि भाषणकौशल्य शिकवले नाही, तर माझ्या स्वप्नांना पंख दिले.
या संपूर्ण प्रवासात मला मोलाचे मार्गदर्शन करणारेकरिअर कट्टा चे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे सर यांचे मी मनापासून आभार मानते. करिअर कट्टा हा उपक्रम माझ्या आयुष्यातील खरोखरच एक समृद्ध, स्वतःची ओळख निर्माण करणारा आणि यशाची उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहित करणारा ठरला आहे. धन्यवाद !