सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार करिअर कट्टा या व्यासपीठाच्या माध्यमातून निमंत्रित संपादक या नात्याने लेख लिहिताना मला अतिशय आनंद होतो आहे. आज भारताच्या विकासाचा वेग केवळ औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही; तर शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा व्यवस्थेकडेही देश वेगाने वाटचाल करीत आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोतांना सक्षम पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र विशेषतः सौरऊर्जा, आज देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासातील महत्त्वाचा घटक ठरत आहे. या क्षेत्राच्या वाढत्या विस्तारामुळे तरुणांसाठी रोजगाराबरोबरच उद्योजकतेच्या असंख्य नव्या संधी निर्माण होत आहेत. सौरऊर्जा ही केवळ वीज निर्मितीची व्यवस्था नसून, भविष्यातील रोजगार, कौशल्यविकास आणि उद्योजकतेचे एक मोठे क्षेत्र आहे, हे अधोरेखित झाले.
'पारंपरिक ऊर्जेला सक्षम पर्याय'
भारतामध्ये विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दीर्घकाळ कोळसा आणि थर्मल पॉवरवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागले. मात्र कोळसा उत्खननापासून ते औष्णिक वीज निर्मितीपर्यंतच्या प्रक्रियेमुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर सौरऊर्जा ही प्रदूषणमुक्त, नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक ऊर्जा म्हणून अधिक महत्त्वाची ठरत आहे.
पूर्वी सौरऊर्जा प्रकल्प म्हणजे मोठ्या क्षेत्रावर उभारले जाणारे महाकाय प्रकल्प, अशीच सर्वसाधारण कल्पना होती. मात्र तंत्रज्ञानातील प्रगती आणि बदलत्या शासकीय धोरणांमुळे आज घराच्या छतावरही सौरऊर्जा निर्मिती शक्य झाली आहे. त्यामुळे ऊर्जा निर्मितीचे केंद्रीकरण कमी होऊन 'जिथे गरज, तिथे निर्मिती' ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे.
'स्वस्त आणि सुलभ ऊर्जेकडे वाटचाल'
सौरऊर्जा क्षेत्रातील तांत्रिक प्रगती आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे विजेच्या निर्मितीचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. एकेकाळी सौरऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या एका युनिट विजेची किंमत सुमारे १५ रुपयांपर्यंत होती. आज मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारणी आणि उत्पादनक्षमता वाढल्यामुळे ही किंमत साधारण तीन ते साडेतीन रुपयांपर्यंत, तर काही ठिकाणी त्याहूनही कमी झाली आहे.
ही केवळ आकडेवारीतील घट नाही, तर भारताच्या ऊर्जा व्यवस्थेत घडणाऱ्या मोठ्या परिवर्तनाचे प्रतीक आहे. स्वच्छ ऊर्जा अधिक परवडणारी होत असल्याने उद्योग, व्यवसाय आणि सामान्य नागरिकांसाठीही तिचा वापर सुलभ होत आहे.
सौरऊर्जेची आणखी एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे 'डिस्ट्रिब्युटेड जनरेशन' पारंपरिक पद्धतीत वीज एका मोठ्या केंद्रात निर्माण करून ती लांब अंतरावर वाहून न्यावी लागते. त्याउलट सौरऊर्जेच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणीच वीजनिर्माण करून तिचा वापर करता येतो. त्यामुळे भविष्यात ऊर्जा व्यवस्थेचे स्वरूप अधिक विकेंद्रित आणि लोकाभिमुख होण्याची शक्यता आहे.
'सोलर पॅनेलच्या पलीकडे करिअरच्या संधी'
सौरऊर्जा क्षेत्र म्हटले की केवळ सोलर पॅनेल बसविण्याचे काम डोळ्यासमोर येते. प्रत्यक्षात मात्र या क्षेत्राची व्याप्ती अत्यंत व्यापक आहे. मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीपासून ते घरगुती रूफटॉप सोलरपर्यंत विविध स्तरांवर प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
प्रकल्पासाठी जागेचे सर्वेक्षण, इंजिनिअरिंग, डिझाईन, प्लॅनिंग, तांत्रिक व्यवस्थापन, प्रकल्प संचालन आणि देखभाल अशा अनेक क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. सौर पॅनेलची नियमित साफसफाई, देखभाल आणि दुरुस्ती यांसारख्या कामांमधून स्थानिक पातळीवरही रोजगारनिर्मिती होत आहे.
इतकेच नव्हे तर सौर प्रकल्पांसाठी जमीन भाडेतत्त्वावर देणे, प्रकल्प मालक आणि वीज खरेदीदार यांच्यातील करार, कायदेशीर प्रक्रिया यांसारख्या बाबींमध्ये कायदेविषयक क्षेत्रातील तज्ज्ञांसाठीही संधी आहेत. म्हणजेच सौरऊर्जा क्षेत्र हे विज्ञान-तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसून व्यवस्थापन, कायदा, वित्त, मार्केटिंग आणि सेवा क्षेत्रालाही जोडणारे व्यापक क्षेत्र आहे.
'पीएम सूर्यघर' मुळे वाढलेली गती'
केंद्र सरकारच्या 'पीएम सूर्यघर' योजनेमुळे घरगुती रूफटॉप सोलरला मोठी चालना मिळाली आहे. घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नागरिकांना सुलभ प्रक्रिया आणि आर्थिक सहाय्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज, अधिकृत इन्स्टॉलरची निवड आणि बँक वित्तपुरवठा यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे सामान्य नागरिकांसाठीही सौरऊर्जा अधिक सहज उपलब्ध होत आहे.
गावापासून शहरापर्यंत रूफटॉप सोलरचा विस्तार होत असताना त्यासोबत अनेक पूरक व्यवसायही विकसित होत आहेत. होलसेल ट्रेडिंग, डिस्ट्रीब्युशन, रिटेल विक्री, मार्केटिंग, सिव्हिल वर्क, इन्स्टॉलेशन, देखभाल-दुरुस्ती आणि बँकिंग व वित्तपुरवठा अशा विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.
'नोकरीच्या शोधापासून उद्योजकतेकडे'
आजच्या तरुणांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःला सक्षम करणे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात हे आव्हान संधीमध्ये रूपांतरित करण्याची मोठी क्षमता आहे. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, मॅनेजमेंट, कॉमर्स, लॉ किंवा मार्केटिंग अशा विविध शैक्षणिक पार्श्वभूमीच्या तरुणांना या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करता येऊ शकते.
म्हणूनच तरुणांनी केवळ 'नोकरी कुठे मिळेल?' या प्रश्नाचा विचार न करता 'या क्षेत्रात मी कोणती सेवा देऊ शकतो ?' हा प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक आहे. डिस्ट्रीब्युटर, इन्स्टॉलर, सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा सोलर सोल्युशन उद्योजक म्हणून स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी या क्षेत्रात आहे. अशा प्रकारे स्वतः साठी रोजगार निर्माण करण्याबरोबरच इतर तरुणांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करता येतील.
'भविष्याची ऊर्जा, भविष्याचे करिअर'
अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचा विस्तार हा केवळ पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, तर भारताच्या ऊर्जा सुरक्षा, आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीनेही अत्यंत निर्णायक आहे. सूर्यप्रकाशासारख्या नैसर्गिक स्रोताचा प्रभावी वापर करूनभारत स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
या बदलत्या प्रवाहाकडे तरुणांनी केवळ ग्राहक म्हणून न पाहता करिअर आणि उद्योजकतेची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. तंत्रज्ञान आत्मसात करा, आवश्यक कौशल्ये विकसित करा आणि नव्या संधींचा शोध घ्या. कारण भविष्यातील करिअरच्या वाटा केवळ पारंपरिक क्षेत्रांत नसून, त्या आज सूर्याच्या किरणांसोबत नव्या दिशेने विस्तारत आहेत.
इन्फ्रास्ट्रक्चरच्या या विस्तारामुळे विजेच्या किमती जरी आटोक्यात आल्या असल्या, तरी एकेकाळी सूर्य मावळल्यानंतर किंवा हवामान खराब असताना वीज कशी मिळणार, हा एक मोठा तांत्रिक प्रश्न होता. मात्र, उच्च क्षमतेच्या अत्याधुनिक बॅटरीजच्या विकासामुळे हा अडथळा आता पूर्णपणे संपुष्टात आला आहे. दिवसा तयार होणारी अतिरिक्त वीज या प्रगत बॅटरीजमध्ये साठवून ठेवणे शक्य झाल्यामुळे, आता रात्रीच्या वेळी किंवा सूर्यप्रकाश नसतानाही अखंडित वीजपुरवठा मिळू लागला आहे. सौरऊर्जेचा हा २४ तास वापर शक्य झाल्यामुळे या तंत्रज्ञानावरील सर्वसामान्यांचा आणि उद्योजकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
सौर ऊर्जेच्या सध्याच्या वापरामध्ये ग्रामीण भागात याचा जास्त चांगला उपयोग होऊ शकतो कारण तिचा सूर्यप्रकाश नियमित उपलब्ध आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे सौर ऊर्जा हे डिस्ट्रीब्यूटर जनरेशन जिथे हवा तिथे वीज निर्माण करणारी यंत्रणा आहे साधारणपणे शेतामध्ये ज्या विजेच्या गरजा आहेत त्या पूर्ण दिवस असतीलच असं नाही त्यामुळे तशा प्रकारचं सौर ऊर्जा आधारित सिस्टीम तिथं लावायला हवी यामुळे सध्याची वीज दूरध्वराज ग्रामीण भागात नेणे व त्यावर होणारा खर्च वाचवणे शक्य होईल याशिवाय ज्या ठिकाणी शेतात पिक हे एकाच हंगामात घेतल्या जातं आणि उष्ण किंवा उन्हाळ्यात शेतात काही पिकवणे शक्य होत नाही अशा ठिकाणी ऍग्रो सोलर म्हणजे शेती मधून उत्पादन आणि सोलर पासून उत्पादन अशी जोड उभारणी करणं काळाची गरज आहे कारण जेव्हा शेतात पीक नसेल तेव्हा ते शेत निष्पर्ण पाहायला मिळतं आणि हा काळ सुद्धा चार ते पाच महिन्याचा असतो तर ऍग्रो सोलरच्या माध्यमातून या अशा नॉन प्रॉडक्टिव्ह काळात सुद्धा तिथं विजेचे उत्पादन करता येईल जे त्या शेतकऱ्यांना आणखीन एक उत्पन्नाचा स्त्रोत होऊ शकतं.
याशिवाय सोलर कॉन्सन्ट्रेटर टेक्नॉलॉजी ज्यामध्ये साधारणतः घमेल्याच्या सारख्या व्यवस्था करून त्यात सोलर ग्लास लावून त्याचा रिफ्लेक्शन एका ठिकाणी संपादित करून तिथं तापमान वाढवता येतं याच्याकडे अजून आपला हवा तितका उपयोग वाढायचा आहे असं जे उष्ण केंद्र तयार होतं ते आपल्या घरात वापरणाऱ्या इंडक्शन किंवा गॅस सारखं असतं त्यामुळे अशा प्रकारच्या फोकस ना ग्रामीण भागात किंवा शहरात वापर वाढवून त्यावर चहापासून तर सगळा स्वयंपाक करण्याची व्यवस्था ही काळाची गरज आहे याला आपण गमतीने द्रौपदीची थाळी पण म्हणू शकतो कारण ही सुविधा आपल्याला सूर्यप्रकाश असेपर्यंत जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत मिळेल याशिवाय याचा आणखीनही काय उपयोग करता येईल याच्यावर आपल्या तरुण पिढीने लक्ष केंद्रित करायला हवे आणि त्यातून आपण जे फॉसिल फ्युएल वापरतो त्याचा वापर कमी करणे शक्य होईल.
या सर्व धोरणात्मक बदलांचा आणि गावोगावी पसरत असलेल्या या जाळ्याचा थेट सकारात्मक परिणाम देशाच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर आणि ऊर्जा स्वातंत्र्यावर होत आहे. दुर्गम भागात विजेची शाश्वत सोय करण्यासाठी सोलर पंप आणि मिनी ग्रीडसारखे प्रकल्प वरदान ठरत असून, पारंपारिक वीजेवरील ग्रामीण भागाचे परवलंबित्त्व आता संपुष्टात येत आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच स्थानिक पातळीवर आर्थिक समृद्धी आणि रोजगाराचे नवे मार्ग उघडणारे हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र भारताला भविष्यात जागतिक स्तरावर ऊर्जा महासत्ता बनवण्यात मोलाची भूमिका बजावेल यात शंका नाही आणि म्हणूनच माझं आजच्या तरुणांना या करिअर कट्टा च्या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगायचे आहे की, आपण या संधीचे सोनं नक्कीच करू या..