Author
" मधमाश्यांचे शास्त्रीय पध्दतील संगोपन : काळाची गरज "
मा. रवींद्र माधव साठे
सभापती, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई (राज्यमंत्री दर्जा)

आजच्या आधुनिक युगात शेती क्षेत्रात केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतीपूरक आणि जोडधंद्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामध्ये मधमाशी पालन अर्थात मधमाश्यांचे संगोपन (Apiculture) हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला आणि शाश्वत स्रोत म्हणून झपाट्याने पुढे येत आहे. मध आणि मेण मिळिवण्यापुरतेच मधमाश्यांचे महत्त्व मर्यादित नसून, निसर्गाचे संतुलन राखणे आणि शेती उत्पादन वाढविणे यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मधमाश्या विविध पिके, फळझाडे आणि फुलझाडांचे परागीभवन घडवून आणतात. मोहरी, सूर्यफूल, कलिंगड, सफरचंद, लिची तसेच विविध फळबागांमध्ये मधमाश्यांमुळे परागीभवनाची प्रक्रिया सुलभ होते. परिणामी फळधारणा आणि पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते. त्यामुळे व्यावसायिक शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालन हा केवळ पूरक व्यवसाय नसून शेतीच्या उत्पादकतेला चालना देणारा महत्त्वाचा घटक ठरत आहे.

मधमाशीपालन हा व्यवसाय किफायतशीर व लाभदायी असला तरी मधपेट्यांची म्हणजेच मधमाश्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे,. मधमाश्यांच्या वसाहती अधिक निरोगी असतील तर त्यातून चांगला दर्जेदार मध व इतर उत्पादनांची निर्मिती होईल.

सामान्यपणे निरोगी वसाहतीचे लक्षणे पुढीलप्रमाणे

१) वसाहतीतील मधमाश्यांचे काम नियमितपणे चालू असते. (त्यांची येजा)

२) मधमाशा मधपेटीच्या आसपास रेंगाळत चालत नाहीत.

३) मधपेटीच्या आसपास मृत आळ्या नसतात.

४) मधपेटीतील वसाहत जोमदारपणे काम करते.

५) आळ्या संगोपनासाठी पोळ्यावर खाद्याची कोणतीही कमतरता नसणे.

६) पोळीवरील सिलबुड व अळया एकसारख्या नियमितपणे असतात.

७) पोळ्यावरील अळ्यांचा रंग फक्त पांढराच असतो.

८) पोळ्यावरील अळयांचा कोणत्याही प्रकारचा वास येत नाही.

९) पोळ्यावरील षटकोनी घरात राणीमाशीनी टाकलेली अंडी एकसारखी नियमित असते.

वरील लक्षणापैकी इतर काणतेही विपरीत लक्षणे निदर्शनास आल्यास वसाहत रोगग्रस्त आहे असे समजावे व त्या दृष्टीने उपाय योजना करावी. बदलते हवामान, वाढते प्रदूषण, अनियंत्रित कीटकनाशकांचा वापर आणि पोळ्यांमध्ये निर्माण होणारी अस्वच्छता यामुळे मधमाश्यांच्या वसाहतींना विविध रोग आणि परोपजीवींचा धोका वाढण्याची शक्यता असते. ज्याप्रमाणे इतर पाळीव प्राणी किंवा पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव होतो, त्याचप्रमाणे मधमाश्यांनाही विविध रोगांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मधमाश्यांचे संगोपन करताना त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मधमाश्यांच्या वसाहतींमध्ये जिवाणू, विषाणू, बुरशी तसेच परोपजीवी यांमुळे विविध आजार उद्भवतात. अमेरिकन फाऊलब्रूड हा मधमाश्यांच्या अळ्यांना होणारा अत्यंत संसर्गजन्य जिवाणूजन्य रोग आहे. या रोगामध्ये अळ्या तपकिरी किंवा काळसर होऊन कुजतात आणिमृत अळीचा चिकट पदार्थ काडीने ओढल्यास ताणला जातो. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास संपूर्ण वसाहत नष्ट होण्याची शक्यता असते. युरोपियन फाऊलब्रूड हादेखील अळ्यांना होणारा जिवाणूजन्य रोग असून, या रोगामध्ये अळ्या अशक्त होऊन पिवळसर किंवा तपकिरी रंगाच्या दिसू लागतात. पोळ्याची स्वच्छता आणि वसाहतीचे योग्य व्यवस्थापन केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो.

नोजेमा हा प्रौढ मधमाश्यांच्या पचनसंस्थेशी संबंधित सूक्ष्मजीवी रोग आहे. या रोगामुळे मधमाश्या अशक्त होतात, त्यांची उडण्याची क्षमता कमी होते आणि पोळ्याच्या फळ्यांवर विष्ठेचे डाग दिसून येऊ शकतात. थंड आणि प्रतिकूल हवामानात या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. चाकब्रूड हा बुरशीजन्य रोग असून त्याचा प्रामुख्याने अळ्यांवर परिणाम होतो. संक्रमित अळ्या कडक होऊन पांढऱ्या किंवा करड्या रंगाच्या, खडूसारख्या दिसतात. पोळ्यातील जास्त दमटपणा आणि अपुरे वायुवीजन यामुळे या रोगाचा प्रसार वाढू शकतो. रोगांबरोबरच व्हारोआ माइट्ससारखे परोपजीवी मधमाश्यांच्या वसाहतींसाठी गंभीर धोका ठरू शकतात. हे परोपजीवी मधमाश्यांच्या शरीराला चिकटून त्यांच्यावर परिणाम करतात आणि वसाहतीची ताकद कमी करतात. संक्रमित वसाहतीमध्ये अशक्त किंवा विकृत पंख असलेल्या मधमाश्या आढळू शकतात. याशिवाय मेणकिडा, गांधीलमाश्या, मुंग्या तसेच काही मधमाश्या खाणारे पक्षी हे देखील मधमाश्यांचे प्रमुख शत्रू आहेत. मेणकिडा पोळ्यातील मेण आणि इतर अवशेषांवर वाढतो, तर गांधीलमाश्या आणि मुंग्या मधमाश्यांवर हल्ला करून पोळ्यातील मधाचे नुकसान करू शकतात.

मधमाश्यांना या रोगांपासून आणि शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मधमाश्यांच्या पेट्यांची नियमित तपासणी करून वसाहतीची स्थिती, राणी माशी, अळ्या, अन्नसाठा आणि मधमाश्यांची हालचाल यांचे निरीक्षण करावे. पेट्यांमध्ये मृत अळ्या, मेणाचे अवशेष किंवा इतर कचरा साचू देऊ नये. पेट्या आणि परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. तसेच पेट्या अतिउष्णता, अतिवृष्टी आणि दमट दमटपणापासून सुरक्षित अशा ठिकाणी ठेवाव्यात. पेट्यांमध्ये योग्य वायुवीजन राहील याची काळजी घ्यावी. फुलोरा कमी असलेल्या किंवा अवर्षणाच्या काळात नैसर्गिकरीत्या मकरंद उपलब्ध नसल्यास मधमाश्यांना आवश्यकतेनुसार पूरक खाद्य द्यावे, जेणेकरून वसाहतीची ताकद टिकून राहण्यास मदत होईल.

मधमाश्यांच्या संरक्षणामध्ये कीटकनाशकांच्या वापराचे योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना मधमाश्यांच्या उडण्याच्या वेळेचा विचार करावा आणि शक्यतो मधमाश्यांना कमी धोका निर्माण होईल अशा पद्धतींचा अवलंब करावा. फवारणीपूर्वी मधमाशीपालकांना माहिती देणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने केलेली कीटकनाशक फवारणी संपूर्ण मधमाशी वसाहतीसाठी घातक ठरू शकते. एखाद्या पेटीत रोगाची लक्षणे आढळल्यास ती पेटी तातडीने इतर निरोगी पेट्यांपासून वेगळी ठेवावी, जेणेकरून संसर्गाचा प्रसार होणार नाही. रोगाचा प्रकार निश्चित करण्यासाठी संबंधित कृषी किंवा मधमाशीपालन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि गंभीर संसर्गजन्य रोगांमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार करावेत.

वसाहतीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी निरोगी, कार्यक्षम आणि योग्य जनुकीय गुणधर्म असलेली राणी माशी असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. राणी माशीची कार्यक्षमता कमी झाल्यास किंवा वसाहत सातत्याने कमकुवत होत असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने राणी माशी बदलण्याचा विचार करावा. अशा प्रकारे नियमित निरीक्षण, स्वच्छता, योग्य पोषण, सुरक्षित वातावरण, रोगांचे वेळीच निदान आणि शास्त्रीय व्यवस्थापन यांचा अवलंब केल्यास मधमाश्यांच्या वसाहती निरोगी आणि मजबूत ठेवता येतात.

मधमाश्यांचे अन्य उपद्रवी घटक

मेणकिडा, पक्षी, अंजनी माशा, मुंग्या, मुंगळे, अस्वल हे मधमाश्यांचे प्रमुख शत्रु आहेत. या शत्रुपासून वसाहतींचे रक्षण करण्यासाठी व करावयाच्या उपाययोजनेविषयी मधपाळांना माहिती असणे जरूरी आहे.

मुंग्यापासून मधमाश्यांच्या वसाहतीचे संरक्षण-

मुंग्या किंवा मुंगळे हे मधमाश्यांप्रमाणेच वसाहती करून राहणारे कीटक आहेत. ते मधमाश्यांच्या वसाहतीवर मोठ्या संख्येने हल्ला करतात. आपल्या उष्ण कटिबंध प्रदेशात मुंग्यांचे अनेक प्रकार आढळतात. यापैकी काही फक्त विशेषतः जमिनीत राहणारे काळे मुंगळे व झाडाचे पानाचे घरटे बनवणारे तांबडे डोंगळे यांचा मधमाश्यांच्या वसाहतींना अधूनमधून उपद्रव होतअसतो. सशक्त वसाहती काही काळ मुंग्यांचा प्रतिकार करतात. मात्र अशक्त वसाहती या त्रासाला लवकर बळी पडतात व उठाव करू लागतात किंवा बाद होतात. मुंग्या मधमाश्यांनी साठवलेला मध, पराग व मधमाश्यांचा पिलावा याचा फडशा पाडतात. नवीन पकडलेली वसाहत मुंग्यांच्या थोड्याशा त्रासाने देखील बाद होते.

त्यामुळे मुंग्यांपासून बचाव करायचा असेल तर मधपेट्या स्टँड वर ठेवाव्यात. स्टँडच्या खाली खोलगट भाग करून त्यात पाणी टाकावे तसेच स्टँडला ऑईल किवा ग्रीस लावले तर मुंग्या / मुंगळे वर चढू शकणार नाहीत.

पक्षी

डोंम कावळा (किंग क्राऊज) डिक्रुरम मॅक्रो सेरकस, वेडा राघू (ग्रीन बी ईटर), मेलोप्स ओरिएटालिस हे पक्षी ढगाळ वातावरणात मधुबनावर फिरतात व मधमाश्यांना पकडून त्यावर आपली गुजराण करतात. हे पक्षी मधुबनाजवळील झाडांवर आणि टेलीफोनच्या तारांवर व विद्युत तारांवर बसतात व मधुबनात येणाऱ्या-जाणाऱ्या मधमाश्यांना हवेतच पकडतात. यासाठी शक्यतो उघड्या जागेवर पक्षांच्या नजरेस पडतील अशा ठिकाणी मधपेट्या न ठेवणे व प्रसंगी फटक्याचा आवाज करून पक्षांना हलवणे हे उपाय योग्य ठरतात.

अशक्त वसाहतीत झुरळे राहण्यासाठी शिरकाव करतात व मेणाची पोळी कुरूतडून टाकतात. तसेच मेग्नाचाईल डिसजुगंटा ही पाने कुरतडणारी माशी अशक्त वसाहतीत शिरून पोळी कुरतडून टाकते. बेड किडा (अॅक्रॉन्टीया स्टाईकल्स) हा कीटक रात्रीच्या वेळी मधपेटीत शिरून मध पितो. रक्त शोषून घेणारे कीटक, पाली, सरडा, साप, बेडूक, हे प्रवेशद्वाराजवळील मधमाशा पकडून खातात. पाईनमार्टीन्स हा प्राणी प्रथम दारात आपली शेपटी घालून माशा काढून खातो. उंदीर व ससे हिवाळ्यात साठविलेली पोळी व वसाहतीतील रिकामी पोळी कुरतडतात. ते मेलेल्या माशा व मध खातात. पांढऱ्या मुंग्या व टर्माईटसब (वाळवी) मधपेट्या व मधुबनातील इतर साहित्याच्या नाश करतात. या कीटकांचा प्रादुर्भाव भिंतीतील मधपेट्या व मातीची (चिखलाची) मधपेटी यांना झालेला आढळून येतो. या कीटकांच्या नियंत्रणाकरिता मधपेट्यांचे स्टॅण्ड सोलीग्नम औषधामध्ये भिजवून काढणे किंवा पेंटाक्लोरोफिनॉलचा पेंट (रंग) देणे हे उपाय आहेत. मात्र ही रसायने मधमाश्यांना आवडत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक याचा उपयोग करावा. वाळवीने वारूळ बनविलेले असते. ०.१ आल्ड्रिचे मिश्रण ओतून या कीटकांची घरटी नष्ट करता येतात.

अस्वलापासून वसाहतीचे संरक्षण

अस्वल हा शक्तिशाली जंगली प्राणी असून, मध हे त्यांचे आवडते खाद्य आहे. गेल्या काही वर्षापासून काही जंगली प्रदेशात भागात अस्वलांनी मधपेट्यांची नासधूस करण्यास सुरूवात केली आहे. अस्वला पासून संरक्षणासाठी मधपाळ काही उपाय करू शकतात. जसे की मधपेट्या टांगत्या ठेवणे, त्याची रखवाली करणे तसेच अलीकडच्या काळात सोलर झटका यंत्राचा वापरही उपयोगी ठरत आहे.

मधमाशीपालन यशस्वी होण्यासाठी निरोगी वसाहत ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. वसाहतीतील मधमाश्यांची हालचाल, आळ्यांची स्थिती, राणीमाशीची अंडी घालण्याची पद्धत, खाद्यसाठा आणि पोळ्यांची स्थिती यांचे नियमित निरीक्षण व परीक्षण केल्यास वसाहतीतील समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतात. त्याचबरोबर मुंग्या, पक्षी, कीटक, वाळवी आणि वन्यप्राणी यांच्यापासून मधपेट्यांचे योग्य संरक्षण केल्यास वसाहती सशक्त राहण्यास मदत होते. निरोगी व मजबूत मधमाशी वसाहत हीच चांगल्या मध उत्पादनाची गुरुकिल्ली असून, शास्त्रीय पद्धतीने संगोपन व योग्य संरक्षण केल्यास मधमाशी पालन हा मधपाळांसाठी अधिक फायदेशीर व शाश्वत व्यवसाय ठरू शकतो.

मधमाशीपालन हा पर्यावरणपूरक, शेतीपूरक आणि रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता असलेला व्यवसाय आहे. मधमाश्यांपासून मिळणारा मध आणि मेण यांसोबतच पिकांच्या परागीभवनामुळे शेतीच्या उत्पादनवाढीलाही मोठी मदत होते. त्यामुळे मधमाश्यांचे संगोपन म्हणजे केवळ एका व्यवसायाचे व्यवस्थापन नसून निसर्गाच्या महत्त्वपूर्ण चक्राचे संरक्षण करणे होय. मधमाशीपालकांनी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून मधमाश्यांच्या आरोग्याकडे काटेकोरपणे लक्ष दिल्यास हा व्यवसाय अधिक फायदेशीर होऊ शकतो. मधमाश्या सुरक्षित आणि निरोगी राहिल्या, तर शेती, पर्यावरण आणि मधमाशीपालकांचे भविष्यही अधिक समृद्ध होईल. म्हणूनच मधमाश्यांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे.