शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकांसाठी सन्मान व प्रेरणा देणारा हा दिवस !
-५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण
'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतो. यावरही वेगवेगळी मतमतांतरे आणि चर्चा आहेत; त्या थोड्याशा बाजूला ठेवून, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला आत्मचिंतनातून परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा हा शिक्षक दिन ठरावा, या उद्देशाने मी आजची लेखाची मांडणी करतो आहे.
करिअर कद्याअंतर्गत करिअर मॅपिंगच्या कार्यशाळेच्या निमित्ताने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई असा विस्तीर्ण कार्यक्षेत्राचा पसारा असणाऱ्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत, तसेच पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील, शिक्षणाचे माहेरघर, विद्येचे माहेरघर मानले जाणारे, 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' म्हणून ओळखले जाणारे पुणे विद्यापीठ येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याचा योग आला. विद्यार्थ्यांबरोबरचा हा संवाद दरवेळी नवनवीन गोष्टी आपल्याला शिकवत असतो. या करिअर मॅपिंगच्या कार्यशाळेच्या निमित्ताने मी थोडा वेगळा प्रयत्न केला तो म्हणजे मुलांच्या भौतिक स्वप्नांची आणि त्यांच्या कौशल्यांची सांगड घालत असताना नेमकं काय चुकतंय, काय सुटतंय, हे शोधण्याचा प्रयत्न.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, ज्याचा मासिक खर्च ५०० रुपयांपासून ५००० रुपयांपर्यंत आहे, आणि शहरी भागातील विद्यार्थी, ज्याचा मासिक खर्च १५०० रुपयांपासून पंधरा-अठरा हजारांपर्यंत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असताना दोन प्रकारची कुटुंबे दिसली, एकीकडे १५ हजार रुपयांत महिन्याचा संपूर्ण खर्च भागवणारे कुटुंब, तर दुसरीकडे ७५ हजार ते दीड लाख रुपये महिन्याचा खर्च असणारे कुटुंब या दोन्ही कुटुंबांतील विद्यार्थी आपल्या आर्टस्, कॉमर्स, सायन्सच्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत.
या विद्यार्थ्यांच्या भौतिक स्वप्नांचा जेव्हा आढावा घेतला, तेव्हा असे लक्षात आले की, साधारणतः १५-२० लाखांपासून दोन ते अडीच कोटींपर्यंतच्या चारचाकीचे स्वप्न आपले विद्यार्थी बघतात; पन्नास लाखांपासून दोन-अडीच कोटींपर्यंतच्या स्वतःच्या घराचे स्वप्न बघतात; एक अत्यंत चांगली लाइफस्टाईल मिळेल, असे स्वप्न बघतात आणि ही स्वप्ने बघताना आपण त्यांना शिकवतो की, स्वप्ने फक्त भौतिक असू नयेत; स्वप्ने दर्जेदार जीवन जगण्याची असावीत हे तात्विक दृष्ट्या बोलणे जितके गरजेचे आहे, तितकेच मला महत्त्वाचे वाटते की, आजूबाजूची परिस्थिती बदललेली आहे. जिथे असण्यापेक्षा दिसणे महत्त्वाचे मानले जाते, जिथे सोशल मीडियावर चांगली लाइफस्टाईल दाखवण्याचा प्रयत्न जास्त केला जातो हे सर्व चित्र आपल्या आजूबाजूला असताना हे विद्यार्थी अशा प्रकारची स्वप्ने घेऊन जगत आहेत.
या समाजाच्या संदर्भात मी असा प्रयत्न केला की, अशा प्रकारची लाइफस्टाईल आपल्याला अपेक्षित असेल, तर योग्य वयात तुमच्या करिअरची सुरुवात होणे गरजेचे आहे, योग्य ठिकाणी तुम्ही थांबणे गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर हेही महत्त्वाचे आहे की, आयुष्यात ही चार-पाच कोटी रुपये भौतिक साधनांसाठी लागणार असतील, दरमहा लाखभर रुपये भविष्यात तुमच्या खर्चासाठी लागणार असतील, तर हे उत्पन्न मिळवण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य तुम्हाला आता जे शिक्षण घेत आहात, त्यामधून मिळतेय की नाही, याचा अवलंब तुम्ही करावा आणि हा प्रश्न जेव्हा मी विद्यार्थ्यांना विचारला, तेव्हा मिळालेले उत्तरआपल्या सर्वांनी आत्मचिंतन करावे, असे मला वाटते. भेटलेल्या विद्यार्थ्यांपैकी आश्चर्यकारकरीत्या ८० ते ८५ टक्के विद्यार्थ्यांचा नकार होता 'आम्ही घेत असलेल्या शिक्षणातून आम्हाला स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, ती रोजगारक्षमता, ती कार्यकुशलता प्राप्त होत नाही' असे या विद्यार्थ्यांचे प्रामाणिक मत होते.
व्यवस्थेच्या सोबत काम करत असताना व्यवस्थेवर टीका करणे, ही भूमिका मी आजपर्यंत कधीच घेतलेली नाही आणि भविष्यातही घेणार नाही. पण आपण सर्वांनी या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे, असे मला वाटते. जो विद्यार्थी आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघून करिअरच्या सुरुवातीलाच किमान लाखो रुपये दरमहा मिळाले पाहिजे, अशी स्वप्ने बघतो मी 'ब्रँडेड' स्वप्ने असा शब्द वापरत असताना त्या कार्यक्षम विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर अजिबात शंका घेत नाही. ती क्षमता, ती ताकद त्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांवर आहे, ज्यामुळे ते दरमहा लाख-दीड लाख रुपये कमवू शकतील, असा विश्वास त्यांना वाटतो. पण हा आत्मविश्वास आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकू का ?
संविधानाला अपेक्षित असणाऱ्या संधीच्या समानतेचा विचार करताना अनुदानित विनाअनुदानित, शहरी-ग्रामीण, व्यावसायिक-अव्यावसायिक आणि पारंपरिक अशा ज्या काही वर्गीकरणांच्या भिंती आपण उभ्या केलेल्या आहेत, या भिंतींच्या पलीकडे जाऊन तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा समान अधिकार उपलब्ध व्हावा, यासाठी माझ्या कामाच्या नियमावलीच्या पलीकडे जाऊन वास्तवतेचा विचार करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना आणि कौशल्याला वाट देत असताना, समाजातील बदलत्या परिस्थितीचा विचार करून येणाऱ्या स्पर्धेत टिकण्यासाठी खंबीर आणि सक्षमपणे उभा राहील, असा तरुण घडवण्यासाठी आपण कोणकोणते उपक्रम वेगळे करत आहोत? असा प्रश्न या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकमेकांना विचारू या.
निश्चितच, करिअर कट्टा हा प्रयोगशील, सृजनशील, कार्यतत्पर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या लोकांचा एक समुदाय बनलेला आहे. त्यामुळे या चिंतनाच्या माध्यमातून AI च्या युगात स्वतःला अपडेट करणे, विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांची स्वप्ने आणि वास्तव यांच्यातील अस्पष्टता दूर करणे, स्वप्ने आणि वास्तव यांच्यातील दरी कमी करण्यासाठी योग्य ठिकाणी स्वप्नांची वास्तवता त्यांना दाखवून देणे आणि योग्य ठिकाणी आवश्यक कौशल्यविकासासाठी त्यांना प्रेरणा आणि संधी उपलब्ध करून देणे हे आपल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे, असे मला वाटते.
या लेखाच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना हे आवर्जून सांगावेसे वाटते की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून अत्यंत चांगले प्रयोग राबवले जात आहेत. त्यातील अनेक अडचणींवर मात करत आपण सर्वजण ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आज झगडत आहोत. वर्गातली विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात कमी झालेली उपस्थिती, पारंपरिक महाविद्यालयांमध्ये झालेली प्रवेशांची गळती या सर्वांचा दोष केवळ आणि केवळ कोव्हिडनंतर विद्यार्थ्यांच्या बदललेल्या मानसिकतेला देऊन चालणार नाही. जगभरात जे नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत, जगातील अनेक शैक्षणिक पद्धतींचे आकर्षण आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना पडलेले आहे अशा पद्धतींचा आपण येथे अभ्यास करणे आवश्यक आहे. स्वतःमध्ये बदल करणे आणि आपली व्यवस्था सक्षम, विद्यार्थीभिमुख आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी ठरेल, यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी करावा, असे मला वाटते.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून आपले होणारे गोड कौतुक ही आपण केलेल्या मेहनतीबद्दल आणि त्यांच्याविषयी करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. पण या कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांनी आपल्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरून त्यांचा भविष्यातील मार्ग सुखकर व्हावा, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे आपण सर्वजण समाजातील स्वच्छ, निरभ्र आकाशात स्वकर्तृत्वावर उभा राहणारा चमकणारा एक तारा म्हणून आपला विद्यार्थी उभा राहील, यासाठीचा ध्यास नेहमीच आपल्या अंगी असणाऱ्या सर्व गुरुजनांना या शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
करिअर कट्टा मासिकाच्या या अंकात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार आणि अनुभव विद्यार्थ्यांसाठी मांडले आहेत. या अंकाचे निमंत्रीत संपादक सन्माननीय प्रफुल्ल पाठक सर (अध्यक्ष, सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया) यांनी 'सूर्य उर्जेच्या किरणांतून करिअरच्या नव्या संधी' या लेखातून पर्यावरणपूरक ऊर्जा क्षेत्रातील करिअरच्या संधींचा वेध घेतला आहे.सन्माननीय रवींद्रजी साठे (सभापती, राज्यमंत्री दर्जा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ) यांनी 'मधमाशांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपनः काळाची गरज' या लेखातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा दाखवली आहे.
मा. राजीव नंदकर सर (अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक, यशदा, पुणे) यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर 'अभ्यासाची योग्य पद्धत' हा लेख लिहिला आहे.
माननीय प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी 'उच्च शिक्षण विभागामध्ये करिअर कट्टा च्या वतीने आयोजित उपक्रम' या लेखातून उपक्रमांचा आढावा घेतला आहे.
मा. मिथिला दळवी मॅडम यांनी भावनिक बुद्धिमत्तेवर आधारित 'हरखणं, भारावून जाणं आणि बरच काही..' या लेखातून विद्यार्थ्यांना अंतर्मुख होण्याची प्रेरणा दिली आहे.
मा. सागर बाबर सर यांनी 'व्यवसायाची कल्पना ते पहिला ग्राहक' या लेखातून खरी उद्योजकता बाजारपेठेच्या समजुतीतून सुरू होते हे अधोरेखित केले आहे.
मा. संकेत मुनोत सर यांनी 'टर्म इन्शुरन्स समज गैरसमज' या लेखातून आर्थिक सुरक्षिततेचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
मा. प्राचार्या डॉ. दीपा वर्मा मॅडम यांनी 'करिअर संधीचा महामेळावा' या विषयावर आधारित करिअर कट्टाच्या या उपक्रमाची माहिती विशद केली आहे.
कु. हर्षा राऊत हिचा 'करिअर कट्टाचा माझा प्रवास' तर, गणेश मोरे यांचा 'व्यासपीठ शोधताना स्वतःला शोधलं' आणि कु. साक्षी शिटुक हिचा 'करिअर कट्टाः स्वप्नांपासून यशापर्यंतचा प्रवास' हे लेख विद्यार्थ्यांच्या अनुभवांना उजाळा देतात.
शेवटी प्रा. संदेश कासार सर यांची प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांच्या ज्ञानपरीक्षणासाठी समाविष्ट करण्यात आली आहे.
हे मासिक अत्यंत अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि संदर्भ पुस्तक म्हणून उपयुक्त ठरावे, यासाठी लेख देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. तसेच, मासिकाचे कार्य वेळेत पूर्ण व्हावे यासाठी राज्यस्तरीय संपादकीय समितीने घेतलेल्या परिश्रमांचे मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो प्रसंगी आभार ही मानतो.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे मासिक निश्चितच उपयुक्त ठरेल, अशी खात्री आहे या खात्रीसह थांबतो.
धन्यवाद !
जय हिंद, जय महाराष्ट्र!