एक प्रवास... स्वतःला घडवण्याचा, स्वप्नांना दिशा देण्याचा !
करिअर कट्टाबद्दल सांगायचे झाले, तर सुरुवातीला मला करिअर कट्टा नेमका काय आहे, याची फारशी माहिती नव्हती. एके दिवशी मला आमच्या कॉलेजमधून फोन आला आणि विचारण्यात आले, 'तुला करिअर कट्टा या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी व्हायचे आहे का?'
त्या वेळी माझ्या मनात अनेक प्रश्न आले. हे नेमके काय आहे? मी हे करू शकेन का? तिथून माझ्या करिअर कट्टा प्रवासाला सुरुवात झाली.
पहिली जबाबदारी आणि सुरुवातीचा प्रवास त्यानंतर करिअर कट्टासाठी ११ मंत्र्यांची निवड झाली आणि त्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगार मंत्री म्हणून माझी निवड झाली. त्या वेळी मी श्री मथुरादास मोहोता कॉलेज ऑफ सायन्समध्ये द्वितीय वर्षात शिकत होते. सुरुवातीला आमचे १४ दिवसांचे प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणामध्ये करिअर कट्टाची कार्यपद्धती, आपली जबाबदारी, टीममध्ये काम कसे करायचे आणि कामाचे नियोजन कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर १५ जुलै रोजी शपथविधी सोहळा झाला. त्या दिवशी आपली जबाबदारी अधिकृतपणे स्वीकारताना मला खूप आनंद झाला आणि त्याचबरोबर आपल्यावर एक जबाबदारी आहे, याची जाणीवही झाली. यानंतर इंडक्शन प्रोग्राम झाला. ऑगस्ट महिन्यापासून करिअर संधी महामेळावा सुरू झाला. या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या करिअरच्या संधी आणि माहिती पोहोचवण्याची संधी मिळाली. EQ Club ची मीटिंग, Class-1 अधिकाऱ्यांना भेट, स्टार्टअप समिट, मराठवाडा फंड कलेक्शन आणि 90 Days Activity अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होता आले. सुरुवातीला काही गोष्टी नवीन वाटत होत्या, पण हळूहळू त्याची सवय होत गेली आणि आत्मविश्वासही वाढत गेला.बारामती अधिवेशन अडचणी आणि त्यातून मिळालेला अनुभव
माझ्या करिअर कट्टा प्रवासातील एक महत्त्वाचा अनुभव म्हणजे करिअर संसद अधिवेशनासाठी बारामतीला जाणे. बारामतीला जाण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य सरांची आणि पालकांची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही दोन्ही ठिकाणी परवानगी घेतली. त्यानंतर ट्रेनच्या तिकिटांचा प्रश्न आला. आम्ही स्वतः रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकिटे काढली. आमची तिकिटे वेटिंगवर होती आणि आम्ही चार जण होतो. त्यामुळे आता काय करायचे, हा प्रश्न होता.
कमला नेहरू कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांना येता येणार नसल्याचे समजले. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि उपलब्ध जागा आम्हाला देण्याची विनंती केली. त्यासाठी आवश्यक पैसे देण्याचीही तयारी दर्शवली. अशा प्रकारे प्रयत्न करत शेवटी आम्ही बारामतीला पोहोचलो.
बारामतीला पोहोचल्यानंतर तिथले वातावरण पाहून मला खूप छान वाटले. विशेषतः शारदाबाई पवार महाविद्यालयातील वातावरण पाहून मनात विचार आला. इतक्या सुंदर आणि शिस्तबद्ध वातावरणात विद्यार्थी मोबाईलपासून दूर राहून अभ्यास कसा करतात ?
आज मोबाईल आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. पण तिथे विद्यार्थ्यांसाठी अशा सुविधा होत्या की अभ्यासासाठी मोबाईलची गरजच भासत नव्हती. कुटुंबाशी बोलण्यासाठी ठरावीक फोनची सुविधा होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाकडे राहावे, याला महत्त्व दिले जात होते. बारामतीमधील पाच दिवस माझ्यासाठी नवीन अनुभव देणारे होते. विशेषतः मुलींसाठी आयोजित केलेला 'स्वयंसिद्धा' हा उपक्रम मला खूप आवडला. या पाच दिवसांत अनेक गोष्टी पाहायला, समजून घ्यायला आणि शिकायला मिळाल्या.
जिल्हा नियोजन समिती आणि Internship
बारामतीहून परतल्यानंतर माझ्या प्रवासात आणखी एक संधी आली. जिल्हा नियोजन समिती. निवड प्रक्रिया सुरू झाल्यावर मी माझे नाव दिले आणि माझी निवड झाली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी Internship ची संधी उपलब्ध झाली. यासाठी ४० विद्यार्थ्यांमधून १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र, माझी त्या १० विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली नव्हती.
त्यावेळी सरांनी सांगितले की, 'ज्यांना या कामात interest आहे, त्यांनीही आपले नाव द्यावे.' मला या कामातून शिकायचे होते, म्हणून मी स्वतःहून माझे नाव दिले आणि Unpaid स्वरूपात काम सुरू केले. काम करताना Excel Sheet तयार करणे, Sorting, Filtering, माहिती व्यवस्थित मांडणे, मीटिंगचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि नवीन करिअर संसद सदस्यांना कॉल करणे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
काम करताना हळूहळू मला या गोष्टी समजू लागल्या आणि काम करण्याचा Confidence ही वाढला. माझे काम आणि शिकण्याची तयारी पाहून पुढे मला Unpaid Internship मधून Paid Internship मध्ये काम करण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. या अनुभवातून मला एवढे नक्की समजले की, आपल्याला एखादी संधी मिळाली नाही तरी आपण प्रयत्न करणे थांबवू नये.
दररोजची २५ मिनिटांची व्याख्यानमाला
करिअर कट्टातील मला आवडणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे दररोज सकाळी ६:५५ वाजता होणारी २५ मिनिटांची व्याख्यानमाला. दररोज वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे नवीन विषय समजले आणि माझ्या ज्ञानातही भर पडली. पूर्वी काही विषय फक्त ऐकलेले असायचे, पण या व्याख्यानमालेमुळे त्याबद्दल थोडे सविस्तर समजायला लागले. आज ही २५ मिनिटे माझ्या दिवसाचा एक महत्त्वाचा भाग झाली आहेत.
माझ्यात झालेला मोठा बदल Stage Fearमाझ्या या संपूर्ण प्रवासात माझ्यात झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे माझा Stage Fear कमी होणे. सुरुवातीला मला स्टेजवर बोलण्याची खूप भीती वाटायची. लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? माझ्याकडून काही चूक झाली तर ? लोक हसतील का? असे अनेक विचार मनात यायचे.
पहिल्यांदा स्टेजवर जाण्याची वेळ आली तेव्हा तर मनात फक्त एकच विचार होता. 'लोक काय म्हणतील ?'
करिअर कट्टा अधिवेशनानंतर आम्हाला Feedback द्यायचा होता. त्या दिवशीही मला खूप भीती वाटत होती. माझ्यासमोर एवढे लोक असताना मी व्यवस्थित बोलू शकेन का, माझ्याकडून काही चूक झाली तर काय होईल, असे विचार मनात येत होते. पण शेवटी मी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला थोडे बोलता आले आणि नंतर हळूहळू Confidence वाढत गेला. त्यानंतर वेगवेगळ्या मीटिंग्स, कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये बोलण्याची संधी मिळत गेली. आजही माझा Stage Fear पूर्णपणे गेलेला नाही. पण आता आधीसारखी भीती वाटत नाही. लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय शिकता येईल, याचा विचार करण्याची सवय लागली आहे.
या प्रवासामुळे माझ्या Communication Skills, Self-Confidence, Time Management, Teamwork, Leadership आणि Responsibility मध्येही सुधारणा झाली.
कोल्हापूर - एक सुंदर अनुभव
करिअर कट्टा प्रवासातील आणखी एक सुंदर अनुभव..
हा प्रवास माझ्यासाठी फक्त फिरण्याचा नव्हता. त्यासोबत काम, मीटिंग्स, जबाबदाऱ्या आणि नवीन लोकांशी संवाद साधण्याचा अनुभवही मिळाला. ट्रेनचे तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे आम्ही १३ तारखेला बसने नागपूरहून कोल्हापूरला निघालो आणि सकाळी साधारण ८:३० वाजता पोहोचलो. पहिल्याच दिवशी मा. शिवशाहीर डॉ. राजू राऊत सरांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाला मा. श्री. रवींद्र पडवळ सर आणि मा. शिवशाहीर डॉ. राजू राऊत सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच दिवशी सूर्यसेवा ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि YCAI स्टार्टअपसपोर्ट कंपनी यांच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होता आले. यानंतर झालेल्या मीटिंगमध्ये जिल्ह्यानुसार जबाबदाऱ्या देण्यात आल्या. विद्यार्थी संवाद दौरा, Career Katta पुढे कसा असावा आणि पाच वर्षांनंतर Career Katta कुठे असेल, यावर चर्चा झाली. सरांनी आमचे Future Goals आणि Vision जाणून घेतले. 'आपल्याला पुढे काय करायचे आहे?' हा प्रश्न मला स्वतःच्या भविष्याचा विचार करायला लावणारा ठरला.
Targets आणि Passport Stamps मुळे काम पूर्ण करण्याचा उत्साह वाढला. एकमेकांमध्ये Positive Competition देखील पाहायला मिळाली. या प्रवासात ज्योतिबा, राधानगरी, राऊतवाडी धबधबा आणि लक्ष्मी तलाव पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे कामासोबतच खूप सुंदर आठवणीही मिळाल्या.
माझ्या Career Goal ला मिळालेली दिशा
करिअर कट्ट्यात येण्यापूर्वी माझे Career Goal पूर्णपणे ठरलेले नव्हते. भविष्यात नेमके काय करायचे, याबाबत स्पष्टता नव्हती.
करिअर कट्ट्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी आणि उपक्रमांशी जोडले गेल्यामुळे Career Planning चे महत्त्व समजले.
आज माझ्या Career Goal ची दिशा स्पष्ट आहे. माझे पहिले लक्ष्य Graduation पूर्ण करणे आणि त्यानंतर Competitive Exams ची तयारी करून सरकारी क्षेत्रात Career करण्याचा प्रयत्न करणे हे आहे.एक प्रवास... जो अजून सुरू आहे !
माझ्यासाठी करिअर कट्टा म्हणजे फक्त एक उपक्रम नाही. या प्रवासात मला नवीन लोक भेटले, नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या आणि अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सुरुवातीला मला वाटायचे 'माझ्याकडून हे होईल का?' आज मला वाटते- 'एकदा प्रयत्न करून तर बघूया !' स्टेजची भीती वाटत असेल तर एकदा स्टेजवर उभे राहा. Career बद्दल स्पष्टता नसेल तर त्याबद्दल जाणून घ्यायला सुरुवात करा. एखादे काम जमत नसेल तर ते शिकण्याचा प्रयत्न करा. कारण सुरुवात केल्याशिवाय आपल्याला आपण काय करू शकतो हे कधीच कळणार नाही. आज मी अजून माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलेली नाही. पण आता मला कुठे जायचे आहे, याची दिशा नक्कीच समजली आहे. करिअर कट्टामुळे मला अनेक नवीन गोष्टी शिकता आल्या, नवीन लोक भेटले आणि स्वतःमध्येही काही बदल करता आले. अजून खूप काही शिकायचे आहे आणि हा प्रवास अजून पुढे चालूच आहे. या संपूर्ण प्रवासात मला मार्गदर्शन करणाऱ्या शितोळे सरांचे, माझ्या कॉलेजमधील अश्विनी मॅडम आणि संजीवनी मॅडमचे, किरण मॅडमचे, Intern Team चे आणि संपूर्ण करिअर कट्टा टीमचे मनापासून आभार. तुमच्या मार्गदर्शनामुळे मला स्वतःला एक संधी देण्याचा आणि काहीतरी नवीन करून पाहण्याचा आत्मविश्वास मिळाला.
हा माझ्यासाठी खूप सुंदर आणि शिकवण देणारा अनुभव आहे. आणि होः माझा करिअर कट्टाचा प्रवास अजून सुरूच आहे. धन्यवाद !