मा. रक्षा रमेश वागे समृद्ध पापड उद्योग, रावगाव
"स्त्रीला जर संधी दिली, तर ती संपूर्ण समाज बदलू शकते." ही ओळ माझ्या जीवनाचा आधार बनली. आज रावगाव, मुरबाड येथे उभा राहिलेला 'समृद्ध उडीद पापड, उद्योग हा फक्त व्यवसाय नाही, तर ७२० महिलांच्या आयुष्याचा आधारस्तंभ ठरला आहे.
नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट सांगायची झाली तर, माझ्या मनात सतत एक विचार येत होता "आपल्या हाताला अवगत असलेली कसलीही कला वाया जात नाही, कलेला योग्य दिशा मिळाली पाहिजे." मी साधी गृहिणी होते, शिक्षण झाले होते, पण मनामध्ये नेहमीच काहीतरी करण्याची धडपड होती. सुरुवातीला गावामध्ये अनेक अडचणी होत्या रस्ते नव्हते, विजेची समस्या, वाहतुकीची कमतरता, बाजारपेठेशी संपर्क करणेही कठीण होते. पण एक विश्वास होता "जिद्द असेल तर मार्ग नक्की सापडतो."
मला महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाची योजना कळली. तिथून मला मिळालेले मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन हे माझ्यासाठी वरदान ठरले. सुरुवातीला फक्त आठ दहा महिलांना घेऊन मी लहानशा स्वरूपात पापड बनवायला सुरुवात केली. हाताने केलेली ही कामे हळूहळू वाढत गेली. सुरुवातीला गावातील लोक हसत होते "पापड बनवून कधी कोणाचं पोट भरलंय?" पण मी मात्र ठाम होते "पोट तर भरायचंयच, पण त्याचबरोबर आत्मसन्मानही उभा करायचाय."
थोड्याच दिवसांत आमच्या पापडाला चव, गुणवत्ता आणि स्वच्छतेमुळे बाजारपेठेत मागणी वाढली. ग्राहकांनी विश्वास दाखवला. लहानशा उद्योगाला पंख फुटले. आज आमच्या रावगाव, मुरबाड पापड युनिटमध्ये ७२० महिला एकत्र काम करतात. ही फक्त नोकरी नाही, तर त्यांच्यासाठी हा आत्मसन्मानाचा प्रवास आहे. या महिलांनी आपल्या कुटुंबाला आधार दिला, मुलांना शिक्षण दिलं आणि समाजात आत्मविश्वासाने उभं राहायला शिकवलं.
प्रत्येक महिलेला मी नेहमी सांगते "तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नाही, लहानशा प्रयत्नातूनही चमत्कार घडतो." आज आमच्या युनिटमध्ये काम करणाऱ्या महिला गावातील इतरांसाठी आदर्श ठरल्या आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतरही महिला छोटे मोठे व्यवसाय सुरू करत आहेत.
माझ्या प्रवासात अनेक वेळा अपयश आलं, कधी कच्चा माल महाग झाला, कधी बाजारपेठ मिळाली नाही, कधी वीज गेली. पण मी कधी हार मानली नाही. माझ्या डोळ्यांसमोर नेहमी एक चित्र असायचं "महिलांनी एकत्र येऊन उद्योग उभारावा, आणि आपलं भविष्य बदलावं."
आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मनात एकच विचार येतो "ही उंची माझी नाही, तर या ७२० महिलांची आहे." त्यांनी घाम गाळून, कष्ट करून, आत्मविश्वासाने हे यश घडवून आणलं आहे.
माझ्या मनात नेहमीच कबीरदासांची ओळ येत असते -"धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सींचे सौ घड़ा, ऋतु आये फल होय." संयम, सातत्य आणि धडपड यामुळेच पापड उद्योग आज या उंचीवर पोहोचला आहे.
आज 'समृद्ध उडीद पापड' हा ब्रँड फक्त चवीसाठी ओळखला जात नाही, तर हा स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा प्रतीक आहे.
आमच्या प्रत्येक पापडामध्ये एका आईचा, एका बहिणीचा आणि एका मुलीचा संघर्ष, श्रम आणि स्वप्नं गुंफलेली आहेत.
मी प्रत्येक महिलेला हेच सांगते -
"स्वतःवर विश्वास ठेवा. संकटं कितीही आली तरी हार मानू नका. तुमच्यात अपार शक्ती आहे. ती शोधा, ती उभारा, आणि तुमचं आयुष्य घडवा."
आज या उद्योगामुळे आमचं कुटुंब सुखी झालं, मुलांचे शिक्षण झालं, संसारात भरभराट आली. आणि महत्वाचं म्हणजे -
आमच्या पोटापूरता नव्हे, तर अनेक घरांमध्ये दिवा पेटला.
हा फक्त माझा प्रवास नाही तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेला संदेश आहे
"उद्योग ही फक्त पैशाची गोष्ट नाही, तो आत्मसन्मानाचा प्रवास आहे."