मा. डॉ. अमित भोळे
संचालक, महसूल विभाग, वित्त मंत्रालय भारत सरकार, पायाभूत सुविधा / प्रकल्प वित्त. SYDENHAM खाते नियंत्रक जनरल,
amitbhole10@gmail.com
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करीत असणाऱ्या माझ्या समस्त मित्र-मैत्रिणींना नमस्कार.
आज, आपल्या लेख शृंखलेमध्ये मी एका महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श करणार आहे आणि तो म्हणजे Time Management अर्थातच वेळेचे नियोजन. खरंतर कोणत्याही परीक्षेला सामोरं जाताना या सगळ्यामध्ये वेळेचे नियोजन किंवा टाईम मॅनेजमेंट ही एक मूलभूत प्रक्रिया असते. या संपूर्ण परीक्षेत वेळेचे मूल्य हा एक आपल्या परीक्षेच्या एकूणच तयारी संबंधीचा अविभाज्य घटक असतो. पण, जेव्हा आपण UPSC च्या सिव्हिल सर्विसबद्दल विचार करतो तेव्हा याचे महत्त्व काही औरच आहे. म्हणजेच अगदी हातात असलेला प्रत्येक दिवस, तास आणि मिनिट हा कसा उपयोगी आणायचा आणि तो कशासाठी उपयोगी आणायचा हे ठरवतं असत की आपण या परीक्षेमध्ये यशाच्या किती जवळ जाणार आहोत, तेव्हा आज या विषयाला स्पर्श करून मी आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक विचारतरंग आणू इच्छितो. वेळेच्या नियोजनाच्या संदर्भात बोलायचं झालं तर, ज्याचा फायदा आपल्याला या परीक्षेच्या तयारी करताना तर होणारच आहे आणि परीक्षेचा निकाल आल्यावर देखील निश्चितच होणार आहे.
टाईम, वेळ, समय कोणत्याही भाषेत म्हटलं तरी, याबद्दल एकच साम्य असतं ते म्हणजे तुम्ही कुठेही या परीक्षेचा अभ्यास करत असाल किंवा कुठे पण असू देत (क्षेत्रीय दृष्टिकोनातून) तुम्हाला तेवढाच वेळ मिळतो जेवढा इतरांना मिळतो म्हणजेच काय तर, आता जर एका उमेदवाराला हातात प्रिलियमच्या अभ्यासासाठी पुढचे सहा ते सात महिने असतील तर हा तेवढाच वेळ इतर सर्व उमेदवारांच्या हातात आहे म्हणजेच जो उमेदवार या वेळेचा चांगला सदुपयोग करून घेईल तो उमेदवार परीक्षेमध्ये आपलं चांगलं सादरीकरण करू शकेल आणि त्याची यश मिळवण्याची संभावना ही देखील जास्ती वाढलेली असेल.
शब्दांकन
प्रा. सायली लाखे पिदळी
सदस्य, राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती, करिअर कट्टा
अलीकडे एक पुस्तक माझ्या वाचनात आलं Outlier The Story of Success (Malcolm Glad Well) सन २००८ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं. त्यामध्ये लेखक Malcolm 10,000 hour's rules वाचकांना सांगतो. १०, ०००० तास rule किंवा नियम. या नियमात तो काय म्हणतो तर, जर आपण एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस किंवा सराव सतत दहा हजार तास केला तर आपण त्या गोष्टींमध्ये प्राविण्य मिळवू शकतो. If you happen to practice for 10000 hours you need to master in that particular topic or their particular subject.
आता बघा गेल्या वर्षीचा जर आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नोटिफिकेशनचा विचार केला तर ती आली. १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी आणि या परीक्षेचा निकाल जो लागला तो एप्रिल, २०२५ मध्ये साधारणतः ४५० दिवस हे होतात याला तुम्ही जर तासांमध्ये रुपांतरित केलं तर आपल्या अस लक्षात येईल की, ते जवळजवळ दहा हजार तासाच्या आसपास होतात म्हणजेच काय तर, जर तुम्ही सतत एखाद्या गोष्टीचा ध्यास पकडला तर तुम्ही यामध्ये या परीक्षेत देखील मास्टरी अर्थातच त्यात तुम्ही निपुण होऊ शकता आणि ह्यात देखील तुम्हाला यश संपादन करता येतं. तर आज आपण अशाच वेळेच्या नियोजनाबद्दल बोलणार आहोत आणि ते कसं करायचं आणि काय केल्याने परीक्षेत यश प्राप्त करता येईल आणि त्यासाठी स्वतःला काय नियम घालून दिले पाहिजे. याचा आपण सारासार विचार या लेखात करणार आहोत.
वेळेच्या नियोजनाबद्दल सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट लक्षात घ्यावयाची असल्यास ती ही की, याची सुरुवात कुठून आणि कशी करायची? तर ज्याप्रमाणे आपण दहावी किंवा बारावीचा अभ्यास करत असताना स्वतःला जसं एक वेळापत्रक घालून दिलं होतं किंवा जी शिस्त आपल्यामध्ये होती ती तशीच शिस्त जर आपल्यामध्ये आता नसेल तर ती आता आपल्याला सर्वप्रथम आणायला पाहिजे आणि ही शिस्त जेव्हा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये येते तेव्हा ती आपसूकपणे तुमच्या अभ्यासात तुमच्या नियोजनात आणि वेळेच्या सदुपयोगामध्ये देखील येते. तर सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे दिवसातील वेळेचे गणित मांडतो ते दिवसाच, स्वतःच्या कार्याचे जे कोष्टक मांडतो, त्यामध्ये कशाला किती वेळ दिला आहे, याचा एक सजगपणे विचार करणे फार गरजेचे आहे. जसं की पहाटे अमुक वेळ उठल्यावर तमुक वेळेपर्यंत चहा नाश्ता झाल्यावर, व्यायाम झाल्यावर आपण किती वाजता अभ्यासाला बसलो आणि किती वाजता आपण परत उठलो याचे एक गणित स्वतःला विचारावं आणि त्याचा एक ताळेबंद मांडावा. हा ताळेबंद मांडल्यावर आपल्या लक्षात येईल की, आपण कुठे वेळ घालवत आहोत किंवा कुठे आपल्याला वेळ कमी करायचा आणि कुठे जास्त करायचा आहे याचं आपल्याला एक गणित मांडता येईल. वेळेच्या नियोजनाच्या संदर्भात एक प्रसंग मला इथे आवर्जून नोंदवावा वाटतो की, माझा एक मित्र या परीक्षेची तयारी करीत होता तो या परीक्षेमध्ये यशस्वी झाला आता महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठित अधिकारी म्हणून नावारूपाला आहे. तो नेहमी म्हणायचा की, मी अभ्यास करीत असताना दुपारच्या बारा वाजेपर्यंत माझा कमीत कमी पाच तास अभ्यास व्हायला पाहिजे असं मी माझ्या वेळेच नियोजन केलं आहे आणि त्यावेळेला मला त्याचं फार नवल वाटत होतं आणि तसं मी देखील नेहमी करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही देखील असं वेळेच्या नियोजनाबद्दल करण्याचा किंवा असा नियम स्वतःला घालून दिला पाहिजे आणि मग बघा कसा काय चमत्कार होतो ते.
तुमच्या अभ्यासाच्या विषयाबद्दल ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला फार फायदेशीर सुद्धा होईल अजून एक दुसरा अधिकारी मित्र तो ज्या वेळेला दिल्लीत परीक्षेची
तयारी करीत होता त्यावेळेला त्याला भेटायला मी एकदा गेलो तेव्हा तो म्हणत होता की सकाळी मी आंघोळ करून येतो तेव्हा नेहमी घड्याळ बघतो घड्याळामध्ये दरवेळेस रोज ०८ वाजून ११ मिनिटे वाजलेले असतात आणि ते असले की मग माझा पुढचा दिवस एकदम व्यवस्थित अभ्यासात किंवा वेळेच्या योग्य नियोजनामध्ये जातो तर असे छोटे-छोटे नियम, टारगेट स्वतःला दिले पाहिजे जेणेकरून आपल्या वेळेच्या नियोजनाला एक दिशा प्राप्त होईल आणि एक परिपूर्णता येईल. अर्थात त्याचा परिणाम ही योग्य होतो. रात्री जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा एक संपूर्णतेची भावना आपल्यामध्ये असते किंवा आज अभ्यास पूर्ण झाला व्यवस्थित झाला असं सगळं स्वतःचं आपण विचार करीत असतो. आपला अभ्यास आपल्या परीक्षेच्या तयारीच्या नियंत्रणांमध्ये आहे आपली तयारी आपल्या ठरलेल्या वेळेच्या नियंत्रणामध्ये आहे. असा एक आत्मविश्वास आपल्या मनामध्ये येतो आणि हा विश्वास असणं फार गरजेचं आहे तसेच जेव्हा ही भावना आपल्या मनामध्ये असते ती भावना जेव्हा आपण शोधू पाहतो प्रत्येक गोष्टीमध्ये तेव्हा वेळेचं नियोजन म्हणा किंवा नंतर आपण प्रश्नपत्रिका लिहू तेव्हा प्रश्नपत्रिका सोडविण्याचा वेळेचं नियोजन म्हणा ही भावना फार महत्त्वाची आहे आणि हीच भावना शेवटी आपल्याला परीक्षेत चांगले गुण मिळवून देते अंततः चांगल यश प्राप्त करून देते.
दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे जसं आपल्याला वेळेच्या प्राधान्यक्रमतेबद्दल बोलायचं झाल्यास आपल्यात एक सजगता येणे गरजेचे आहे. तसंच आपण काय गोष्ट करतो आहोत आपण ज्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे त्या गोष्टी करतो आहोत का की नाही, याचा एक विचार या वेळेच्या नियोजनामध्ये होणं फार गरजेचे आहे. उदाहरण सांगायचं झाल्यास असे की, असे अनेक उमेदवार मी बघितले आहे ज्यांनी प्रचंड अभ्यास केलेला आहे, प्रचंड वाचन केलेल आहे, त्यांचं पाठांतरही चांगलं होतं आणि चालू घडामोडींच्या विषयीच अद्ययावत ज्ञान, अद्ययावत माहिती त्यांना होती पण हे सगळं असतानाही त्या उमेदवाराला आपल्या ज्ञानाच यशात रूपांतरण करता आलं नाही तर कुठे ना कुठे आपण ज्या गोष्टी करत आहोत त्या परीक्षेच्या दृष्टीने प्राधान्याच्या आहेत का? याचा एक सजगपणे विचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे या गोष्टीला मी तर म्हणेल खूपच टॉप प्रायोरिटीची गोष्ट असली पाहिजे आपल्या सगळ्यांच्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये आणि वेळेच्या नियोजनाचा हाच जर वैचारिक प्रवास आपण पुढे नेला तर आपल्याला परीक्षेत निश्चितच फायदा होईल.
माझ्या दृष्टीने तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट वेळेच्या नियोजनाबद्दल ही आहे की, कुठे थांबायचं आहे, याची आपल्याला एक जाण असायला हवी. थोडक्यात काय तर जेव्हा सगळे उमेदवार परीक्षार्थी असतात म्हणजे विद्यार्थी आणि परीक्षार्थी, परीक्षार्थी आणि विद्यार्थी यामध्ये अंतर असतं विद्यार्थी हा विद्या ग्रहण करत असतो तर परीक्षार्थी हा परीक्षेसाठी अभ्यास करीत असतो. त्या परीक्षा या पास होण्यासाठी अभ्यास करत असतो आणि जेव्हा हा अभ्यास करत असतो तेव्हा सगळ्याच गोष्टींचा कस लागतो तुम्ही किती अभ्यास केला आहे, म्हणजे तुमच्याकडे विद्या किती आहे, याचा तर कस लागतोच लागतो पण तुमचा त्या परीक्षेबद्दलचा दृष्टिकोन काय आहे याचा सुद्धा एक मोठा कस इथे लागलेला असतो आणि या स्पर्धेमध्ये जेव्हा एखादा उमेदवार समजा १४ तास अभ्यास करतोय अस आपण ऐकलं असेल तर त्याच्या इर्षेने दुसरा उमेदवार तेवढाच अभ्यास किंबहुना त्यापेक्षा एक तास पुढे जाऊन १५ तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत असतो सांगण्याचा तात्पर्य हेच आहे की, तुम्ही कितीही वेळ अभ्यास केला तरी तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास करणारा उमेदवार कुठे ना कुठेतरी असणार आहे आणि तोही अभ्यास करीत असणार आहे याचा अर्थ असा
आहे की, तो सिलेक्ट होईल किंवा तुम्ही सिलेक्ट होणार नाही असं नाही तर, आधी सांगितल्याप्रमाणे जसं एक परिपूर्णतेचा विचार किंवा एक संकल्पना परिपूर्णतेची आपल्या मनामध्ये जेव्हा दररोज रात्री झोपताना येईल तेव्हा आपला अभ्यास पूर्ण झाला आहे. आपल्या वेळेचे योग्य नियोजन झालं आहे असं आपण म्हणतो त्याचाच अर्थ काय की, तुम्ही किती अभ्यास करता याला महत्त्व नसून तुम्ही तो कसा अभ्यास करता, तुम्ही तो किती उपयोगाचा अभ्यास करत आहात हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळेच्या नियोजनामध्ये ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे की तुम्ही कुठे थांबलं पाहिजे जेव्हा तुम्हाला असं परिपूर्णतेची एक भावना येईल त्यावेळेस तुम्ही थांबलं पाहिजे मग ही प्रत्येकाच्या दृष्टीने मागेपुढे आणि कमी जास्ती असू शकते त्यामुळे आपली तुलना इतरांशी न करता आपल्या दृष्टीने आपल्या एक वेळेच कोष्टक मांडल पाहिजे. वेळेचा ताळेबंद मांडला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने या परीक्षेला सामोरे जायला पाहिजे.
आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रहो, या स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करायचे असल्यास वेळेचे नियोजन असलेलं बीजं हे उत्तमरीत्या आणि काळजीपूर्वक पेरलं तर, तेवढेच भरभरून यशाचं फळ आपल्याला मिळतं.
'वेळेचे नियोजन म्हणजे यशाचं आरंभस्थान नियोजनाशिवाय प्रयत्नही दिशाहीन असतात.'