Author
निमंत्रित संपादक
मा. सुप्रिया सुरेंद्र देवस्थळी
Indian Civil Accounts Service (ICAS)

निमंत्रित संपादक

मा. सुप्रिया सुरेंद्र देवस्थळी

Indian Civil Accounts Service (ICAS)

शुभेच्छा. करिअर कट्टाच्या वाचकांना मनःपूर्वक नमस्कार आणि

ह्या अंकाची अतिथी संपादक म्हणून तुमच्यापुढे काही विचार मांडताना मला अतिशय आनंद होतो आहे. करिअरची निवड हा तरुण वयातला खूप महत्वाचा निर्णय असतो. ह्या निर्णयाचे परिणामही दूरगामी असतात. त्यामुळे करिअरची निवड आणि निवडलेल्या करिअरसाठी असणारा मार्ग, त्यावरची वाटचाल ह्या गोष्टी तरुण-तरुणींसाठी अतिशय महत्वाच्या आहे. ह्या टप्प्यावर जर करिअर निवडीसाठी उत्तम मार्गदर्शन मिळालं तर करिअरमध्ये यश मिळवणं सोपं जातं. करिअर कट्टा सारखा उपक्रम हा एकाच वेळी हजारो तरुण-तरुणींपर्यंत पोहचून त्यांना करिअर संदर्भात व्यापक आणि सर्वसमावेशक मार्गदर्शन करत आहे. ह्या मध्ये लेखन करणारे लेखक आणि निवडले जाणारे विषय ह्यांची व्याप्ती पाहता उमेदवारांना खूपच फायदा होत असणार हे नक्कीच.

भारताची स्वतंत्र देश म्हणून वाटचाल समाजवादाचा आदर्श समोर ठेवून झाली. सर्वसाधारणतः १९९१ मधल्या आर्थिक सुधारणांच्या टप्प्यापर्यंत शिक्षण, आरोग्य, दळण-वळण, संपर्काची साधने, बँकिंग, देशांतर्गत व्यापार, आतंराष्ट्रीय व्यापार अशा सर्वच महत्वाच्या सेवा सरकारने पुरवण्यावर भर दिला होता. त्यामुळे अर्थातच सरकार किंवा शासन हा नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारा महत्वाचा घटक होता. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं ही राष्ट्रीय गरज आहे. सरकारी नोकरीचे काही फायदे आहेत जे सर्वाना माहीतच आहेत. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे नोकरीतली सुरक्षितता. नफा कमावणे हे मुख्य उद्दिष्ट असणाऱ्या खाजगी क्षेत्रात नोकरीची सुरक्षितता नसते. त्यामुळे सरकारी नोकरीकडे वळण्याचा मार्ग निवडणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढलेलीच दिसते.

सरकारी नोकरीतील प्रवेश हा वेगवेगळ्या यंत्रणांनी किंवा संस्थांनी घेतलेल्या स्पर्धात्मक परिक्षेतूनच होतो. मग ती संघ लोकसेवा आयोग घेत असलेली नागरी सेवा परीक्षा असो किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने घेतलेली राज्य सेवा परीक्षा असो, नॅशनल डिफेन्स ऍकॅडमीने घेतलेल्या परीक्षा असो किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनने घेतलेल्या परीक्षा असो. प्रवेश परीक्षेशिवाय सरकारी नोकरीत प्रवेश शक्य नाही. बहुतेक सर्व प्रवेश परीक्षा दोन ते तीन टप्प्यांमध्ये होतात. लेखी परीक्षा आणि मुलाखत/शारीरिक क्षमता चाचणी असे त्याचे दोन भाग आपण करू शकतो. स्पर्धा परीक्षा कोणतीही असो त्याच्या तयारीची आणि त्या परीक्षेत यश मिळवण्याची काही तत्व असतात. त्या तत्वांचा आपण पालन केलं तर यश अशक्य नाही, आज मी तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भात काही गोष्टी सांगणार आहे. ह्या गोष्टी स्पर्धा परीक्षा कोणतीही असो तुम्हाला मार्गदर्शनपर होतील असा मला विश्वास आहे.

करिअर निवडीचा निर्णय कधीच घाईघाईत घेऊ नये. कुठचाही विद्यार्थी साधारणतः आठवी नववीत आला की त्याला सगळे जण विचारायला लागतात, मग आता पुढे काय करायचा विचार आहे?' अनेकवेळा असं होतं की, त्या मुलाने किंवा मुलीने पुढे काय करायचं ह्याचा विचारच केलेला नसतो. कधीकधी खूप विचारांनी डोक्यात गोंधळ घातलेला असतो आणि नक्की काय करावं हे त्या मुलांना कळत नसतं. आई वडिलांकडून पण वेळोवेळी काय काय सांगितलं जात असतं, माहितीतल्या किंवा नात्यातल्या मुलांची उदाहरणं दिली जात असतात. 'तो बघ कसा आय आय टी मधून शिकला आणि कसली भारी नोकरी मिळाली आहे त्याला.' 'ती बघ कशी जोरदार अभ्यास करून यूपीएससी ची परीक्षा पास झाली, आयएएस झाली ती. काय रुबाब आहे तिचा' मुलांच्या माहितीतही कोणीतरी दादा ताई असतात, त्यांच्यासारखं आपण व्हावं अस मुलांना वाटत असतं. एकूण काय तर गोंधळ, अशावेळी मुलांनी स्वतःलाच परत परत प्रश्न विचारावा, 'मला नक्की काय करायचं आहे? मला लोकांशी संपर्क असणारं करिअर आवडेल का? ज्या कामात खूप आकडेमोड इत्यादी आहे ते काम मला आवडेल का? मला कला संस्कृती ह्या संबंधी काम करायला आवडेल का? मला नोकरी करायला आवडेल की व्यवसाय करायला आवडेल? मला आर्थिक पाठबळ कुठून मिळू शकेल?' ह्या प्रश्नांची उत्तर हळूहळू मिळायला लागतात. त्यासाठी आपण आजूबाजूच्या लोकांशी बोललं पाहिजे, त्यांचं काम जर आपल्याला समजून घेता येत असेल तर ते समजून घेतलं पाहिजे. ह्यामुळे आपली समज वाढायला मदत होऊ शकते. सरकारी नोकरीचा पर्याय जेव्हा उमेदवार निवडतो तेव्हा त्याने ती नोकरी बदल्या होणारी आहे का नाही हे बघितलं पाहिजे. नंतर बदल्या व्हायला लागल्या की चिडचिड करून उपयोग होणार नाही. राज्य सेवा असेल तर बदल्या फक्त महाराष्ट्रातच होतात पण यूपीएससीची परीक्षा देऊन जेव्हा वेगवेगळ्या सेवांमध्ये निवड होते तेव्हा भारतभर बदल्या होऊ शकतात. त्यासाठी मनाची तयारी पाहिजे.

करिअरची निवड एकदा झाली म्हणजे सगळं झालं असं नाही. ट्रेकिंग करून एखाद्या शिखरापर्यंत पोचायचं असेल तर बेस कॅम्प महत्वाचा असतो. करिअरची निवड हा बेस कॅम्प म्हणता येईल. एकच एक करिअर ठरवून चालणार नाही. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येकच क्षेत्रात स्पर्धा आहे. कधीकधी ती स्पर्धा जीवघेणी असते. त्यामुळे पर्यायी करिअरचा विचार उमेदवारांनी करून ठेवलाच पाहिजे. (ऑप्शन बी / प्लॅन बी). एखाद्या करिअरच्या मागे तरुण वयातली अनेक वर्ष जाऊ शकतात आणि तरीही मनासारखं यश मिळालं नाही तर अनेक प्रश्न उमेदवारापुढे उभे राहू शकतात. त्यामुळे एखाद्या करिअरमध्ये खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर दुसऱ्या वाटेवर चालायला सुरुवात केलीच पाहिजे. हा मुद्दा एमपीएससी किंवा यूपीएससीच्या बाबतीत विशेष महत्वाचा आहे. ह्या परीक्षा अनेकवेळा देता येत असल्यामुळे उमेदवार प्रयत्न करत राहतात. कधीकधी वयाची तिशी / पस्तिशी उलटली तरी उमेदवार परीक्षा देतच असतात. म्हणजे उमेदीची बरीच वर्ष ह्या परीक्षांमागे जातात. अनेकवेळा ह्या उमेदवारांना घरी किंवा गावी परत जायची लाज वाटायला लागते कारण अनेक वर्ष प्रयत्न करूनही परीक्षेत यश मिळालेल नसत. लग्न करावं म्हणून घरची मंडळी मागे लागलेली असतात. तीस पस्तीस वय झाल्यावर दुसऱ्या कुठच्या क्षेत्रात नव्याने काही करणं सोपं नसतं त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत उमेदवारांनी स्वतःसाठी ठरवावं की किती वर्ष आपण ह्या परीक्षांसाठी देऊ शकतो. दोन तीन प्रयत्नांमध्ये यश आलं तर उत्तमच पण नाही आलं तर आयुष्याची उमेदीची किती वर्ष पणाला लावायची ह्याचा विचार करून ठेवला पाहिजे. प्लॅन बी अमलात आणायची वेळ आलीच तर काय करायला पाहिजे हेही उमेदवारांनी लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराने एम. ए. केलेलं असेल आणि नेट सेट सारख्या परीक्षा पास झालेल्या असतील तर त्याला शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो. स्पर्धा परीक्षा देणारे काही उमेदवार, स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्षेत्रात उतरतात हाही प्लॅन बी म्हणायला हवा.

करिअरची निवड आणि प्लॅन बी चा विचार नक्की झाला की सुरु होणार खरे ट्रेकिंग. आपण करिअरच्या ज्या शिखराची निवड स्वतःसाठी केली असेल तिथपर्यंत पोचण्याचा प्रवास. ह्या प्रवासात आपण काय काय बरोबर ठेवलं पाहिजे ? सर्वात पहिली असली पाहिजे इच्छा शक्ती यशाच्या शिखरापर्यंत पोचण्याची दुर्दम्य इच्छा असली पाहिजे. here there is a will there is a way. इच्छा शक्ती बरोबर येतो उत्साह. यशाच्या शिखरापर्यंत पोचण्याचा प्रवास आपण उत्साहाने केला पाहिजे. उत्साह असेल तर मेहनत करण्याचा त्रास होत नाही. उत्साह असेल तर छोट्या छोट्या गोष्टींनी वाईट वाटत नाही. ह्या संपूर्ण प्रवासात आपण आपल्या बरोबर चालू शकणारेपण जोडले पाहिजेत. स्पर्धा परीक्षा देत असाल तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या इतर काही उमेदवारांच्या संपर्कात आपण राहीलं पाहिजे. ह्याचा अभ्यासात फायदा होतोच पण मनावरचा ताण दूर करण्यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो. अभ्यास करून कंटाळा आला किंवा प्रिलिम्सचा रिजल्ट निगेटिव्ह आला तर मन मोकळं करता येईल असे मित्र मैत्रिणी असले पाहिजेत. अभ्यासाची प्रेरणा देणारे, सकारात्मक विचार करणारे मित्र मैत्रिणी नेहेमीच जोडले पाहिजेत. सकारात्मक विचार हा एकूणच आयष्यातला महत्वाचा आधार आहे. अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी ह्यांचा आपल्याला आयुष्यात वेळोवेळी सामना करावा लागतो. हा सामना प्रभावी पद्धतीने करायचा असेल तर सकारात्मक विचार खूप साथ देतात. करिअरच्या प्रवासात कधी उदास आणि हताश वाटलं तर आपल्या मनातले विचार/भावना आपल्या मित्र मैत्रिणींशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी शेअर करण्यात कमीपणा कधीच मानू नये. प्रत्येकाचं माणसाला कुठच्या ना कुठच्या टप्प्यावर उदास, हताश वाटतच. पण म्हणून सर्व कहाणी संपलेलं असत असं नाही. कोणाशी बोलल्याने मन हलकं होत, नवीन मार्ग दिसतात आणि लढण्याची प्रेरणा मिळते.

मानसशास्त्राच्या भाषेत आपली सपोर्ट सिस्टम असली पाहिजे.

आपल्या प्रवासात आपण वेळोवेळी अलर्ट राहील पाहिजे. ट्रेकिंगची टर्मिनॉलॉजी वापरायची म्हटली तर आपला रस्ता चुकत नाहीये ना? हवामान वेगाने बदलत नाहीये ना? आपला श्वास ठीक चालू आहे ना? आपल्याला जास्त दमायला होत नाहीये ना? ह्याबद्दल अलर्ट राहावं लागत. तसंच स्पर्धा परीक्षांचा किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी आपला अभ्यास ठीक चालू आहे ना? आपण योग्य रिसोर्सेस वापरतो आहे ना? आपण लिखाणाचा सराव करतो आहे ना? ह्याबद्दल अलर्ट राहिलं पाहिजे. ह्यामुळे एक फायदा होतो की आपलं काही चुकत असेल तर ते सुधारण्याची संधी आपल्याला मिळू शकते आणि आपली तयारी अधिक प्रभावी करता येते.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीत अनेकवेळा दुर्लक्ष होणारी गोष्ट हणजे फिटनेस. शारीरिक आणि मानसिक फिटनेस खूप आवश्यक असतो. दिवसाचे १०/१२ तास अभ्यास करायचा असेल तर शरीर आणि मन तंदुरुस्त राहणं आवश्यक आहे. तुमचा दिवस कितीही बिझी असला तरी मनाला विरंगुळा मिळेल अशा गोष्टी करण्यासाठी थोडासा वेळ राखून ठेवला पाहिजे. उमेदवार अभ्यास करत असतात तेव्हा त्यांना सेलेब्रेशनसाठी वेळ नसतो, कुठे नातेवाईकांकडे जाण्यासाठी वेळ नसतो. पण आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट रोज थोडा वेळ का होईना पण केली पाहिजे. कोणाला म्युझिक ऐकायला आवडत असेल तर ते ऐकावं. कोणाला नाचायला आवडत असेल तर नाचण्यासाठी थोडासा वेळ राखून ठेवावा. ही वेळ आपल्या अभ्यासाच्या वेळापत्रकातच ठरवावी. म्हणजे काय ? रोज रात्री दहा ते साडे दहा मी म्युझिक ऐकेन किंवा रोज संध्याकाळी ६ ते ७ मी फुटबॉल खेळेन. विरंगुळा हा सुद्धा आपल्या वेळापत्रकाचा भाग असेल तर तोही चुकणार नाही. शारीरिक तंदुरुस्ती पण महत्वाची आहे. थोडासा व्यायाम हा सुद्धा वेळापत्रकाचा भाग असला पाहिजे. रोज संध्याकाळी किंवा रात्री छोटासा वॉक घेता येईल. एखादा मित्र मैत्रीण सोबत येऊ शकत असेल तर सोबत आणि गप्पाही होऊ शकतात. Sound Mind Lives In Sound Body हे आपल्याला माहीतच आहे. ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. एकूण फिटनेस चांगला राहण्यासाठी नियमित आणि पुरेशी झोपही महत्वाची असते. झोपण्याची वेळ रोज शक्यतोवर एकच ठेवावी म्हणजे शरीराला आणि मनालाही ठराविक वेळी झोपण्याची सवय लागते. पुरेशी झोप नसेल तर चिडचिड होऊ शकते, अभ्यासात एकाग्रता होत नाही. परीक्षेच्या दिवसात तर पुरेशी झोप घेणं खूपच आवश्यक असतं.

स्पर्धा परीक्षा कुठचीही असो त्यात शिस्त, सातत्य, योग्य मार्गदर्शन ह्या गोष्टी खूपच महत्वाच्या असतात. करिअर कट्टाच्या वाचकांना योग्य मार्गदर्शन मिळतच आहे. त्यांनी आता आपल्या प्रयत्नांमध्ये शिस्त आणि सातत्य ठेवलं तर यशाच्या शिखरावर पोचायला त्यांना वेळ लागणार नाही.