संपादकीय
मा. यशवंत शितोळे
अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र
दीपावलीच्या या पावनपर्वावर, करिअर कट्टा या मासिकाच्या संपादकीय मंडळाकडून, माझ्याकडून आणि संपूर्ण करिअर कट्टा परिवाराकडून सर्व वाचकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. आयुष्यातील अंधकार दूर करून समृद्धीचा प्रकाश घेऊन येणाऱ्या य उत्सवाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील नव्या पहाटेची दीपोत्सवाची सुरुवात घडावी ही अपेक्षा आणि सदिच्छा..
'करिअर कट्टा मासिक' हे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या संयुक्त उपक्रमातून विकसित झालेले एक वैचारिक व्यासपीठ आहे, जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरते. हे मासिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टशंशी सुसंगत माहिती देणारं आहे. या धोरणानुसार शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून, कौशल्य विकास, मूल्यशिक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा समन्वय असावा ही भूमिका मासिकाच्या प्रत्येक अंकात अधोरेखित होत असते. प्रत्येक अंक विशिष्ट विषयांवर केंद्रित असतो या महिन्याचा अंक हा महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्याहेतूने निमंत्रित संपादकीय लेख, यशस्वी उद्योजकीय लेख याप्रमाणे स्त्रियांच्या कार्याचा अमीट ठसा जो समाजापुढे आहे त्याविषयीची विश्लेषणात्मक माहिती या मासिकाच्या माध्यमातून आपणास देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या ज्ञानपूर्ण मासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ माहिती मिळते असे नव्हे तर, करिअरला योग्य दिशा, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, यशोगाथेतून प्रेरणा आणि प्रसंगी आत्मभान देखील मिळते. शिक्षण आणि करिअर यांचा संबंध आर्थिक यशाशी जोडण्यासोबतच संवेदनशील, विचारशील आणि सामाजिक दृष्ट्या जागरूक राहण्याची शिकवण हे मासिक परोपरीने करून देते आणि म्हणूनच अगदी अलीकडे झालेल्या मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे समाजमन ढवळून निघाले. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होऊन एक आपत्ती वाढलेली आहे असे विदारक चित्र आपल्यापुढे उभे आहे. मराठवाडा जो गेले कित्येक वर्ष दुष्काळाचा सामना करत होता त्यांनी पहिल्यांदाच पुरग्रस्तपरिस्थिती अनुभवली, अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्तेचे आणि पिकांचे नुकसान झालेलं आहे. ज्या शेतीमध्ये पीक घेतलं जातं त्या पिकासाठी आवश्यक असणारी माती पूर्णपणे वाहून गेल्यामुळे पुन्हा कित्येक वर्ष ही शेती टिकाऊ होण्यासाठी जाणार आहे याचा अंदाज बांधणे कठीण आहे. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा रोजगारक्षम झाला पाहिजे कौशल्याधिष्ठित झाला पाहिजे आणि त्याला त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी साधन उपलब्ध झालं पाहिजे यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे, आपत्तीग्रस्त बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हा विचार करत असताना, आपणही आपल्या वतीने तिथल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊ शकतो का? हा हेतू डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण करिअर कट्टा परिवाराने पुढे येऊन मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा निश्चय केला आणि इथून सुरू झाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रवास..
करिअर कट्टाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व तरुणांना एक संवेदनशील आवाहन या दरम्यानच्या कालावधीमध्ये करण्यात आले होते. या आवाहनाला स्वीकारत राज्यभरातील करिअर कट्टा या उपक्रमाशी जुळलेल्या प्रत्येकाने अर्थातच, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा समन्वयक, प्राचार्य प्रवर्तक, अनेक समितीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, करिअर संसदचे पदाधिकारी या सर्वांनी समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची मोहीम राबवून चांगला मदत निधी उभा केला आणि या माध्यमातून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास खंडित होऊ नये यासाठी शैक्षणिक किट तयार करण्यात आली. यापुढेही हा उपक्रम कौशल्य विकासाच्या माध्यमातून आणि ज्या मुलांना नोकरीसाठी स्थलांतरित व्हायचे आहे अशा मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून चालू ठेवण्याचा मानस करिअर कट्टाचा आहे. या सगळ्यांच्याप्रती याप्रसंगी मी याच व्यासपीठावरून कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो.
हे एक चित्र एका बाजूला असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे वेगवेगळे प्रयोग महाराष्ट्रभर सुरू असताना, उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्याबाबत कमालीची निराशाही एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. विशिष्ट महाविद्यालयांमध्ये अनाकलनीय पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढत आहे तर अनुदानित महाविद्यालयांमध्ये लागलेली गळती ही चिंताजनक बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली पाहिजे त्यांना करिअरची योग्य दिशा मिळाली पाहिजे या उद्देशाने चालू असलेले आपले प्रयत्न शासन आणि विद्यापीठाच्या सहकायनि सर्व दूर पोहोचलेले आहेत विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून या सर्व यंत्रणांनी कामं करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने हे काम सुरू आहे पण काही वैयक्तिक स्वार्थापोटी ह्या प्रवासात अडथळे निर्माण केले जात असल्याचे चित्र आपल्यासमोर आज आहे. आज महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातल्या शेवटच्या तरुणांपर्यंत स्पर्धा परीक्षेचे हे सर्व प्रशिक्षण रोजगाराच्या संधी याविषयीची माहिती करिअर कट्टा घेऊन जात आहे. ही एक अत्यंत सकारात्मक बाब लक्षात घेता, करिअर कट्टा उपक्रमाच्या माध्यमातून या महिन्यापासून बिजनेस क्लब आणि फायनान्स क्लबच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झालेली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि आपण सगळे निश्चितच याही उपक्रमांना भरघोस प्रतिसाद देणार आहातच ही खात्री बाळगतो.
करिअर कट्टा मासिकाच्या अंतरंगाचा विचार करीत असताना, सन्माननीय सुप्रिया देवस्थळी मॅडम यांनी निमंत्रित संपादक या नात्याने विद्यार्थ्यांसाठी 'करिअरची निवड' हा मार्गशनपर लेख लिहिला आहे. राज्याचे उच्च शिक्षण संचालक सन्माननीय डॉ. शैलेंद्र देवळाणकर सर यांनी 'भारत ब्रेन ड्रेन रोखणार कसा?' या लेखाच्या माध्यमातून भारतातील ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे गुणवत्तापूर्ण संधी निर्माण करणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि प्रतिभावंत तरुणांना देशातच सन्मान व प्रगतीची खात्री पटवून देणे असे अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय योजना विशद केल्या आहेत. मा. डॉ. तुषाबा शिंदे सर (आय. आर. पी. एस.) यांनी 'संरक्षण सेवांमधील करिअर संधी' या लेखाच्या साह्याने अत्यंत विस्तृतपणे माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. मा. डॉ. राजीव नंदकर सर (अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक यशदा, पुणे.) यांनी 'युवकांमधील ताणतणाव व्यवस्थापन' या लेखाच्या शीर्षकाखाली युवकांमध्ये ताणतणाव व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते मानसिक आरोग्य, शैक्षणिक यश आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी मूलभूत भूमिका बजावते हे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. त्याचप्रमाणे मा. डॉ. अमित भोळे सर (संचालक, महसूल विभाग, वित्त मंत्रालय भारत सरकार) यांनी 'वेळेचं नियोजन' या लेखाच्या साह्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करताना शिस्त, प्राधान्यक्रम आणि आत्मपरीक्षण या तीन स्तंभावर भर द्यावा, योग्य नियोजनामुळे अभ्यास अधिक परिणामकारक आणि मानसिक दृष्ट्या सुसंगत होतो असे उद्बोधनपर विचार मांडले आहे. तसेच, गर्जे मराठी ग्लोबल अमेरिका या उपक्रमाचे अध्यक्ष मा. आनंद गानू सर यांनी 'इनोव्हेशन, आयडीएशन आणि डिझाईन थिंकिंग' या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैचारिक दालन उघडे करून दिलेले आहे. एक यशस्वी उद्योजिका सौ. रक्षा रमेश बागे यांनी 'पापडातून उभा राहिलेला आत्मसन्मानाचा प्रवास' हा लेख ग्रामीण स्त्रियांच्या उद्यमशीलतेचा आणि आत्मनिर्भरतेचा प्रेरणादायी दस्ताऐवज आहे, तो केवळ आर्थिक संघर्ष नव्हे तर, सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानाच्या पूर्णरचनेची कहाणी सांगणारा लेख लिहिलेला आहे. प्राचार्या डॉ. शरयू तायवाडे मॅडम यांचा 'उच्च शिक्षण विभागांमध्ये करिअर कट्टा कडून संपन्न झालेले उपक्रम' यासंबंधीचा सखोलपणे आढावा घेणारा लेख आहे. मा. प्रा. दिनेश पवार सर यांचा वनविभागाच्या अंतर्गत सरळ सेवा पद्धतीने 'वनरक्षक भरती संपूर्ण अभ्यासक्रम व स्वरूप' हा माहितीपूर्ण लेख आहे. डॉ. मिथिला दळवी यांचा विद्यार्थ्यांसाठी नकारात्मक भावना हाताळता येणं त्यांना सामोरे जाणं हा आनंदी समाधानी असण्याचा एक मोठा भाग आहे असा 'आनंदाची वाट' हा उपदेशपर लेख आहे. तर मा. डिंपल मित्तल यांचा फायनान्स क्लब याविषयीची माहिती देणारा लेख आहे. तसेच डॉ. श्रीकांत इंगळे यांचा 'चालू घडामोडी' हा लेख तर प्रा. संदेश कासार यांनी तयार केलेली प्रश्नमंजुषा या अंकात घेण्यात आलेली आहे.
या अंकासाठी ज्या मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ देऊन लेख लिहिला त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो.
अशाप्रकारे संपादकीय मंडळाच्या सहाय्याने या ऑक्टोबर महिन्याचे करिअर कट्टा मासिक विद्यार्थ्यांसाठी निश्चितच वाचनीय आणि तितकेच फलदायी ठरणार आहे असे वाटते.
करिअर कट्टा मासिकाने विद्यार्थ्यांच्या मनात नवे प्रश्न रुजवले, नवे मार्ग दाखवले आणि आत्मचिंतनाची दिशा दिली.
या मासिकात असलेल्या प्रत्येक लेख केवळ माहिती देणारेच नाही, तर विचारांची मशागत करणारे ठरणार आहे. मासिकातल्या प्रत्येक पानावरून उमटणारा आशय म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवा आकार देणारं एक शब्दचित्र आहे. मार्गदर्शकाच्या अनुभवांनी, तज्ञांच्या दृष्टिकोनाने आणि विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू प्रवृत्तीने मिळून एक विचारमंच या करिअर कट्टा मासिकाच्या माध्यमातून साकारलं आहे. संपादकीय लेखाचा समारोपाच्या या क्षणी आपण एकत्रितपणे समाजाशी असलेली एक सर्जनशील बांधिलकी समजून शिक्षण हे केवळ ज्ञानाचे साधन नाही, तर मूल्यांची आणि संवेदनाची शिदोरी आहे असे सांगत असताना आपण सगळ्यांनी मिळून पुढे येऊ या आणि एकजुटीने कार्य करू या..
असे विचार मांडून थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र !