मराठवाड्याच्या हृदयात वसलेले संभाजीनगर हे शहर म्हणजे इतिहासाची जिवंत दास्तानचं जणू ! या भूमीवर प्राचीन वैभव, मध्ययुगीन शौर्य आणि मराठा साम्राज्याची झळाळी एकवटली आहे. या ऐतिहासिक मातीत जन्माला आलेली जिच्या मुखमंडलावर तेज, डोळ्यांत आत्मविश्वास आणि कृतीत जिद्द दिसते ती खऱ्या अर्थाने तेजस्वी स्त्री, आणि नावाप्रमाणेच आपलं कर्तृत्व गाजविणाऱ्या आणि आपल्या कुटुंबाचं नावलौकिक करणाऱ्या आदरणीय तेजस्वी देशपांडे मॅडम. त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया रैंक ९९ मिळवून देशभरात आपले नाव उज्ज्वल केले आहे. हा त्यांचा तिसरा प्रयत्न होता, आणि या वेळेस त्यांनी यश संपादन केले. त्यांनी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज मधून अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या वडिलांचे नाव डॉ. प्रसाद देशपांडे असून ते वैद्यकीय क्षेत्रात आहेत, तर आई डॉ. गौरी देशपांडे दंतवैद्य (Dentist) आहेत.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील युवकांना योग्य दिशा देण्याकरिता या मासिकाच्या माध्यमातून मा. तेजस्वी देशपांडे मॅडम यांची मुलाखत येथे शब्दबद्ध करीत आहोत. सदर मुलाखत मा. यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र) यांनी घेतली आहे. या मुलाखती घेण्यामागील उद्देश्य हाच की, संपूर्ण महाराष्ट्रातील ५००० महाविद्यालयांतील इच्छुक विद्यार्थी UPSC सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहत असताना योग्य वेळेत, योग्य दिशा आणि मार्गदर्शन यांची सांगड घातल्यास यश संपादन करणे शक्य आहे. चला तर मुलाखतीला सुरुवात करुयात.......
मा. यशवंत शितोळेः संभाजीनगरमध्ये असताना UPSC च स्वप्न पडावं असं वातावरण होते का? सोबतच या क्षेत्रात येण्यामागील नेमकं कारण काय ?
मा. तेजस्वी देशपांडेः माझे १२ वी पर्यंतचे शिक्षण हे संभाजीनगरला झाले आणि त्यानंतर माझ्या आवडत्या इकॉनॉमिक्स या विषयामध्ये पुढील शिक्षणाला दिल्लीला जायचे हे माझे ठरलेले होते. नववी ते दहावी यादरम्यान थोडीफार माहिती UPSC संदर्भात होती की यामध्ये प्रशासकीय सेवेत जाऊ शकतो पण असा ठोस विचार किंवा ठाम निर्णय नव्हता. परंतु जेव्हा दिल्ली येथे इकॉनॉमिक्स या विषयात प्रवेश घेतला आणि करिअरच्या दृष्टीने खोलात गेले तेव्हा UPSC हा पर्याय करिअरकरिता समोर आला. दिल्ली येथे शिक्षणाला असल्यामुळे तिथे या परीक्षांचा नाद पाहायला मिळतो आणि तेथील वातावरणाचा सुद्धा या क्षेत्रात येण्यामागे योगदान आहे.
मा. यशवंत शितोळेः संभाजीनगरवरून अर्थशास्त्र या विषयात दिल्लीतील प्रसिद्ध महाविद्यालयात पदवी शिक्षणाला पाठवण्याचा निर्णय किंवा पाठबळ आईवडील यांनी घेतलं यापाठीमागे काही कारण असं होतं का? या विषयात आपली आवड असल्यामुळे, दिल्लीकडे आपली सुरुवातीपासूनच ओढ होतीच परंतु, आपल्या कुटुंबातील असे कोणी या क्षेत्रात कार्यरत आहेत का ? किंवा असे कोणते पाठबळ की तुमच्या आई वडील यांनी तुम्हाला दिल्लीला पाठविण्याचे एवढे मोठे धाडस केले.
मा. तेजस्वी देशपांडेः हे अतिशय महत्वाचे होते, सुरुवातीला माझ्या आईवडील यांनासुद्धा मला दिल्लीला पाठवायला संकोच होताच. सोबतच आमच्या कुटुंबातील कोणीही या प्रशासकीय सेवेत नाही आहेत आणि आईवडील दोघेही डॉक्टर आहेत. परंतु त्यांच्या पाठबळामुळे मी दिल्लीला आले आणि माझ्या करिअरला सुरुवात केली.
मा. यशवंत शितोळेः आईवडील दोघेही डॉक्टर असताना आपल्यावर सुद्धा त्यांनी डॉक्टर होण्याचा दबाव टाकला नाही का? प्रत्येक आई-वडीलांचं स्वप्न असतं आपला वारसा आपल्या मुलांनी चालवावा, असे काही आपल्या बाबतीत घडले का ?
मा. तेजस्वी देशपांडेः नाही. अशा प्रकारचा कुठलाही दबाब मला माझ्या कुटुंबाकडून झाला नाही. सोबतच मी एकटीच असल्यामुळे त्यांनी मला माझं क्षेत्र निवडण्याचं पूर्णपणे स्वतंत्र दिलं होतं. परंतु, त्यांचे एकच सांगणे होते, जे पण करशील नौट व्यवस्थित आणि मन लावून करशील! त्यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास होता.
मा. यशवंत शितोळेः तुम्ही अर्थशास्त्र विषयाच्या शिक्षणाकरिता दिल्लीला नामवंत महाविद्यालयात पोहोचलात. आपण, फक्त महाराष्ट्रातील मुलांसाठी काय सांगाल की, महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था आणि दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेमध्ये काय फरक आहे आणि मुलांनी शिकत असताना कसं जगलं पाहिजे ?
मा. तेजस्वी देशपांडेः फरक असा आहे की, दिल्लीमध्ये संपूर्ण राज्य भरातून मुलं-मुली शिकायला येतात. नवनवीन विचारधारा आणि कल्पना यांना दिशा मिळते. येथे भरपूर काही शिकायला मिळाले. स्पोर्टस्मध्ये आवड असल्यामुळे पुर्वी कधीतरी आठ ते दहा दिवस बाहेर राहिले. परंतु, दिल्लीत प्रथम एकटं राहायला शिकले आणि सोबतच जबाबदाऱ्यापण समजायला लागल्यात.
मा. यशवंत शितोळे: UPSC परीक्षेच्या तयारीकरिता आपण सुरुवात कधी केली होती? आपण, पदवीला असताना केली की पदवी शिक्षण झाल्यानंतर. सोबतच UPSC परीक्षेच्या तयारीकरिता कोचिंग सेन्टरची आपणास किती प्रमाणात मदत झाली ?
मा. तेजस्वी देशपांडे: UPSC परीक्षेची तयारी पदवीनंतरच चालू केली. माझं पदवी शिक्षण हे २०२१ मध्ये झालं आणि हा नेमका कोरोना काळ होता त्यामुळे माझं शिक्षण हे घरूनच ऑनलाइन पद्धतीने झाले. यांनतर, माझा योग्य प्रवास UPSC परीक्षेची तयारी या दिशेने लागला. UPSC परीक्षेच्या तयारीकरिता कोचिंग सेन्टरकडून मुख्यतः टेस्ट सिरीजची खूप मदत झाली. सोबतच मॉक आणि मुख्य मुलाखतीकरिता सुद्धा याची भरपूर प्रमाणात मदत झाली.
मा. यशवंत शितोळे या तयारीच्या कालावधीमध्ये आपण तिसऱ्या प्रयत्नांमध्ये यश संपादन केले आणि पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये आपण प्राथमिक परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली नव्हती. मग, अशावेळी आपल्या डोक्यात सोडून देण्याचा विचार आला होता का? सोबतच आपल्याला फुटबॉल या खेळाची आवड सुरुवातीपासूनच आहे, मग त्याचा यावेळी आपणास काही फायदा झाला का?
मा. तेजस्वी देशपांडेः हो, विचार सतत येतच होते. त्यातही प्राथमिक परीक्षा सुद्धा उत्तीर्ण न होणे म्हणजे आपण या स्पर्धेत टिकणार की नाही ही शंकाच आणि हे सर्व अतिशय दुःखद होते. परंतु, अशा प्रसंगी आई-वडिलांचा नेहमीच असणारा पाठिंबा आणि विश्वास खूप महत्त्वाचा ठरला. आर्थिकदृष्ट्या मला कुठलाही त्रास यादरम्यान झाला नाही. आईवडील जेव्हा म्हणायचे की येणाऱ्या सहा प्रयत्नांपर्यंत आम्ही तुला पूर्णपणे पाठिंबा देऊ. मात्र, त्यावेळी मला भयंकर राग यायचा. कारण, माझा स्वतःला प्रश्न होता की मला एवढे प्रयत्न करावे लागतील का? अशा परिस्थितीत जेव्हाही मला खूप वाईट वाटायचे, निरुत्साही आणि आत्मविश्वास खचल्यासारखे जाणवायचे त्यावेळी मी माझ्या आवडत्या खेळात गुंग होऊन जायचे. याचा मला फायदा असा झाला की, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सबळ राहण्यास मदत झाली आणि याचा उपयोग मी माझ्या तिसऱ्या प्रयत्नांच्या वेळी खूप जास्त प्रमाणात केला. या खेळात गुंग होत असताना मला आतून शांतता जाणवायची आणि खचलेलं मन सांगायचं की, परीक्षेच्या व्यतिरिक्तसुद्धा जीवन जगविणाऱ्या भरपूर गोष्टी असतात. डिप्रेशनच्या काळात स्पोर्टस् हे माझ्यासाठी मेडिसिन बनले. खेळ हा माझ्या आयुष्याचा अतिशय महत्वाचा भाग असून दिल्ली येथे स्पोर्टस्च्या माध्यमातूनच माझा प्रवेश झाला होता.
मा. यशवंत शितोळे: UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्याथ्यांची दैनंदिनी कशा प्रकारे असावी? सोबतच GS बाबतची आपली रणनीती कशा प्रकारे होते? मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका याचा नेमका या तयारीकरिता काय फायदा झाला? सोबतच यादरम्यान वारंवारता तपासण्याकरिता आणि माहिती एकत्र करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जसे CHAT GPT, मोबाइलचे इतर टूल्स यांचा तुम्हाला फायदा झाला का?
मा. तेजस्वी देशपांडेः आपली दैनंदिनी हे आपण कोणत्या टप्प्यावर आहोत यावर अवलंबून असते. म्हणजेच प्रिलिम्स आणि मेन्स या परीक्षा जवळ असताना त्याचे योग्य नियोजन असणे गरजेचे असते. प्रत्येक विषयाला योग्य वेळाची सांगड घालता यायला पाहिजे. जसे की प्रिलिम्स में मध्ये असेल तर जानेवारीपासून त्या दिशेने वाटचाल व्हायला पाहिजे. सोबतच त्यातील आवश्यक घटकांवर आपलं लक्ष आणि सर्वांत महत्वाचा असतो. त्यानंतर जूनपासून मेन्स मधील क्रिटिकल थिंकिंग, अंडरस्टॅण्डिंग आणि जास्तीच जास्त पार्टवर लक्ष केंद्रित करणे. GS संदर्भात सांगायचे झाल्यास मी सर्वप्रथम यापूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित हाताळल्या, त्यावरून स्वतःच्या प्रत्येक विषयांच्या टॉपिक वर बेसिक नोट्स तयार करायचे. यामध्ये त्याची प्रस्तावना, मुख्य भाग आणि त्याचे पैलू, उदाहरणार्थ पीक नमुना यावर माझी नोट असायची ज्यात पूर्वी आलेले प्रश्न त्याचे पैलू त्यात नमूद केलेले राहायचे. It's all about self-notes making आणि दुसरे महत्वाचे म्हणजे सराव. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अतिशय महत्वाच्या असतात. याला 'गोल्डन रुल' पण म्हणता येईल. कारण परीक्षेमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होत नाही, परंतु विषय तेच राहतात आणि हेच समजून घेणं ही या परीक्षेच्या तयारीची पहिली पायरी आहे. यादरम्यान CHAT GPT चा मला चालू घडामोडी संदर्भातील नवीन प्रश्न तयार करण्याकरिता खूप उपयोग झाला. जसे की माझ्झा ऑपशनल विषय हा इकॉनॉमिक्स होता मग त्यासंदर्भातील चालू घडामोडी करीता प्रश्न निर्माण करायचे. फ्लो चार्ट तयार करण्याकरिता Napkin Al सारखे टूल्स सुद्धा मेन्स करीता वापराता येतात.
मा. यशवंत शितोळेः इकॉनॉमिक्स या विषयाचा आपणास UPSC परीक्षेकरिता किती प्रमाणात उपयोग झाला ? सोबतच तिसऱ्या प्रयत्नात आपण प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यामध्ये सर्वात जास्त गुण प्राप्त केलेत. या संपूर्ण प्रक्रियेला सामोरे जात असताना यावेळी आपली मानसिक स्थिती आणि आपली तयारीची रणनीती यावर काय मार्गदर्शन कराल ? मुलाखतीकरिता महाराष्ट्रातील अधिकारी सुद्धा तयारीकरिता मदत करीत असतात. मा. महेश भागवत सर हे नेहमीच महाराष्ट्रातील मुलांसाठी मार्गदर्शन करीत असतात. तर, आपणास सुद्धा अशी कोणती मदत लाभली का ?
मा. तेजस्वी देशपांडेः माझा ऑपशनल पेपर हा इकॉनॉमिक्स असल्यामुळे त्याचा नक्कीच फायदा झाला. माझं पदवी शिक्षण याच विषयात झाल्यामुळे याचा सुद्धा तयारीकरिता फायदा झाला, सोबतच GS मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात या विषयावर विचारल्या जाते. Essay आणि Ethics करीता सुद्धा हा विषय अतिशय महत्वपूर्ण ठरला. तिसऱ्या प्रयत्नाच्या वेळी प्राथमिक परीक्षेच्या पूर्वी भरपूर MCQ आणि Objective संबंधित प्रश्न सोडविले आणि सततचा सराव, आत्मविश्वास हे कौशल्य प्राथमिक परीक्षेला उत्तीर्ण करणारा मंत्र आहे. यादरम्यान शांत आणि संयोजित राहणे अत्यंत महत्वाचे असते. त्यानंतर मुख्य परीक्षेकरिता सराव अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये लिखाण सराव आणि वाचन हे केंद्रबिंदू आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुलाखत याकरिता स्वतःची जागरूकता हे कौशल्य असणे अत्यंत गरजेचे असते. आतापर्यंत आपण जे काही लाइफ जगलो आहोत, सर्वचदृष्ट्या आणि या सर्वांची समज आणि आपल्यातील आत्मविश्वास, अस्सलपणा, प्रामाणिकपणा मुलाखती करीता कामात येते. यादरम्यान आईवडील यांची सुद्धा खूप मदत झाली. मुलाखतीमधी दरम्यान जेवढे तुम्ही स्वतःला मोकळं ठेवाल, तेवढ्याच प्रभावीप्रमाणे तुम्ही या तयारीदरम्यान सर्व प्रश्न-उत्तरांना सामोरे जाल. हो, नक्कीच. मा. महेश भागवत सर यांची मदत आणि मार्गदर्शन सतत लाभले.
मा. यशवंत शितोळेः या मुलाखतीमध्ये सामोरे जात असताना आपल्यासमोर असा प्रश्न होता का IAS की IPS आणि आपण जे क्षेत्र निवडले त्यामागील उद्देश्य काय होता? या सेवेतील वरिष्ठ अधिकारी यांच्या अनुभवातून असे म्हटले जाते की ही परीक्षा पास होणे म्हणजे नवीन परीक्षेची सुरुवात असते तर LBSNAA च्या प्रशिक्षणामध्ये हे जाणवतंय का?
मा. तेजस्वी देशपांडेः IPS ला माझे दुसरे प्राधान्य होते. सुरुवातीला थोडी विचारांच्या बाबतीत कोंडी होती की IAS च चांगला पर्याय आहे किंवा इतर पोस्टच्या बाबतीत तुलनात्मक विचार पण मला आता तसे वाटत नाही. मी निवडलेल्या क्षेत्रामध्ये सामाजिक दडपण याची संभाव्यता असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु सुरुवातीपासून मी एक खेळाडू व्यक्तिमत्व असल्यामुळे आणि बाहेरील कामात सक्रिय असल्यामुळे मी माझ्या आवडत्या क्षेत्राला प्राधान्य दिले. सोबतच मला डिटेक्टिव्ह मालिका पाहायला सुद्धा आवडतात. सर्वात महत्वाचे म्हणजे माझा निकाल जाहीर झाल्यानंतर माझ्या एका मैत्रिणीने तिच्या स्लॅम बुकचा फोटो पाठविला की, ज्यात मी लिहिले होते मला IPS अधिकारी आणि गुप्तहेर अधिकारी व्हायचे आहे आणि ही गोष्ट मी तिसरी इयत्तेत असतानाची आहे. ते स्वप्न आज सत्यात उतरले याचा मला अत्यंत आनंद होत आहे. नियतीचा खेळ असतो याप्रमाणे ती गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली. जोपर्यंत आपण परीक्षा पास होत नाही तोपर्यंत आपल्याला हेच सर्वकाही वाटते. परंतु एकदा का परीक्षा पास झालो की एका नव्या वेगळ्याच जबाबदारीची सुरुवात आणि नवीन अध्यायाला सुरुवात होते हे मी अनुभवते आहे आणि ही जबाबदारी माझी वैयक्तिक नसून इतरांची माझी जबाबदारी आहे. सतत शिकत राहल्यास आपल्यात बदल होत राहतात आणि हे खरंच महत्वाचे आहे.
मा. यशवंत शितोळेः सहाव्या प्रयत्नात सुद्धा आपण ही परीक्षा पास झाला नसता, तर आपला प्लॅन B काय होता.
मा. तेजस्वी देशपांडेः हो, नक्कीच. माझं ठरलं होते की तिसऱ्या प्रयत्नात सुद्धा आपल्याला यश आले नाही तर आपण नोकरी करावी. परंतु, या सर्व कालावधीमध्ये मला माझ्या आईवडील यांचा पूर्ण पाठिंबा होता.
मा. यशवंत शितोळेः महाराष्ट्रातील तरुण या क्षेत्रात येत असताना त्याचा नेमका उद्देश्य काय असावा, असे आपल्याला वाटते ?
मा. तेजस्वी देशपांडेः या क्षेत्रात येत असताना 'का म्हणून आपण या क्षेत्रात येत आहोत?' हा प्रश्न पडणे नक्कीच महत्वाचे आहे. ही प्रक्रिया लांब चालणारी आहे दोन वर्षाच्यावर कालावधी याच्या तयारीला लागू शकतो, समर्पण आणि सातत्यता अतिशय महत्वाची असते. या क्षेत्रात उतरत असताना कशासाठी? कोणते क्षेत्र? पुढील दृष्टिकोन या सारखे प्रश्न पडणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे आपला स्वतःवरील विश्वास.
मा. यशवंत शितोळेः काही तरुण प्रेरक चित्रपट पाहून प्रेरित होतात आणि UPSC कडे वळतात हा तात्पुरता प्रभाव घेऊन प्राथमिक परीक्षेला सामोरे जातात आणि निकाल न आल्यास भीतीपोटी माघार घेत नाहीत अशा तरुणाला काय मार्गदर्शन कराल. सोबतच आर्थिक परिस्थितीचा या तयारीकरीता कितपत परिणाम होतो? सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना कसा करावा लागतो ?
मा. तेजस्वी देशपांडे: या क्षेत्रात येत असताना आपला ठाम निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरतो. कोणी म्हणते म्हणून, तात्पुरत्या प्रभावाने आपला मोलाचा वेळ वाया घालवण्याचा निर्णय तरुणाने घेऊ नये. पूर्णतः या परीक्षेची माहिती घेऊनच आणि ठोस उद्देश्य घेऊनच या क्षेत्रात उतरावे. माझे आईवडील हे डॉक्टर असल्यामुळे मला आर्थिक परिस्थितीच्चा कुठलाही त्रास झाला नाही. आपण दिल्ली सारख्या ठिकाणी शिकत असताना किंवा UPSC ची तयारी करीत असताना तेथे राहण्याचा, जेवणाचा खर्च सोबतच आवश्यक कोचिंग क्लासेसचा खर्च आणि इतर किरकोळ खर्चासाठी पैशांची गरज भासतेच. परंतु ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध सामग्री आणि सोचतच या क्षेत्रात कार्यरत अधिकारी यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करता आल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.
मा. यशवंत शितोळेः विद्यार्थ्यांना तयारीकरीता आपण कोणत्या पुस्तकांचा संदर्भ देऊ इच्छिता.
मा. तेजस्वी देशपांडेः मी या तयारीदरम्यान NCERT (Geography, History, आर्ट & Culture) या मूळ पुस्तकांचा वापर केला. सोबतच राजकारण या विषयाकरिता लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेतला होता. सोबतच ऑनलाइन साधने यात YouTube चॅनेल्स वरील Cut the Clutter हे चॅनेल करंट अफेअर्सकरीता अत्यंत महत्वपूर्ण ठरले. त्यानंतर काही मॅगझीन, काही पिंक शॉट, पॉडकास्ट या सर्वांचा उपयोग यावेळी मला झाला.
मा. डॉ. योगिता चौधरीः महाराष्ट्रातील तरुणांना इंग्रजी भाषेचा अडसर असतो. या भाषेवर जास्त प्रमाणात प्रभुत्व आणि तसा आत्मविश्वास नसल्यामुळे या तयारीदरम्यान काही अडचण निर्माण होते का ?
मा. तेजस्वी देशपांडेः तसा कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. कारण, मुलाखतीकरिता आपण आपल्या सोयीची भाषा निवड करू शकतो. परंतु, इंग्रजीभाषा बोलता यावी याकरिता English Newspaper वाचनाचा नक्कीच फायदा होतो. ऑनलाइन साधनांपासून सुद्धा आपण हळू हळू सुरुवात करून चांगल्या प्रकारे सराव केल्यास इंग्रजी सहज बोलू शकतो. इंग्रजी भाषा येणे तसे गरजेचंच असतं, कारण आपल्या सभोवताली असणारे वातावरण त्यानुसार आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणणे गरजेचे असते.
मा. यशवंत शितोळेः आपल्याला शेवटी एवढंच विचारायचे आहे की, या तयारीदरम्यान मेंटॉरशिप अतिशय महत्त्वाची असते आणि महाराष्ट्रातील तरुण हा या स्पर्धेत उतरत असताना आपल्याकडून ती मेंटॉरशिप मिळेल का ? सरते शेवटी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी तुमचा काय संदेश असेल ?
मा. तेजस्वी देशपांडेः हो केव्हाही. कारण मला सुद्धा या मेंटॉरशिपचा अतिशय फायदा झाला आहे. प्रशासकीय सेवेत येणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांना एकच सांगते की Don't Give Up. तुमचं ठरलंय ना की UPSC करायचंच तर त्यावर ठाम रहा. जिद्द सातत्य आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करीत रहा..... यशाचा मार्ग नक्कीच आपल्याकरिता खुला होणार आहे आणि एक दिवस आपल्या सुद्धा कर्तृत्वाचा नावलौकिक सर्वत्र गाजू द्या.
मा. यशवंत शितोळेः संभाजीनगर ते दिल्लीपर्यंतचा प्रवास त्यानंतर LBSNAA प्रशिक्षणापर्यंतचा प्रवास आपल्या सर्वांकरिता अभिनास्पद आहे. आपला आम्हा सर्वानी सार्थ अभिमान आहे. यापुढे आपल्या कार्यातून उत्कृष्ट कार्य घडत देश सेवेत गौरवाचा ठसा उमटत जावो ह्या आमच्या सर्वांकडून सदिच्छा. महाराष्ट्रातील तरुणांना जेव्हाही आपल्या मार्गदर्शनाची गरज भासेल त्यावेळी आपण नक्कीच साद द्याल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. सरतेशेवटी या मुलाखतीचा शेवट करीत सर्वांचे आभार मानतो.
धन्यवाद !