Author
उच्च शिक्षण विभागामध्ये करिअर कट्टाकडून संपन्न झालेले उपक्रम
मा. डॉ. शरयू व. तायवाडे
प्राचार्या, तायवाडे कॉलेज महादुला कोराडी

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी करिअर कट्टा अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ२५ ऑक्टोबरला संपन्न झाला. या कार्यक्रमात निसर्गाप्रती जाणीव जागृतीच्या प्रतिकात्मक रूपात रोपांना जल अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. त्यानंतर सिंधुदुर्ग येथील प्राचार्य प्रवर्तक डॉ. स्मिता सुरवसे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माननीय श्री. यशवंत शितोळे यांनी या कार्यशाळेचे सुतोवाच करताना त्यामागील भूमिका स्पष्ट केली. या कार्यशाळेचे उद्घाटन के.एम.एस.पी. येथील कुलगुरू, माननीय श्री अरविंद शिरसाट यांनी केले. मुंबई विभागाचे विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. अतुल साळुंखे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या उद्घाटनपर कार्यक्रमाचे आभार प्रा. अजित कानशिडे यांनी मांडले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अजित दिघे यांनी केले.
त्यानंतर विषय पत्रिकेनुसार झालेल्या चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थी संवाद उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थी संवाद दौऱ्याचा तसेच पुढील वर्षी कोणत्याप्रकारे विद्यार्थी संवाद दौरा हा अधिक प्रभावी ठरू शकेल याविषयी चर्चा करण्यात आली. त्या चर्चेनुसार विद्यार्थी संवाद दौऱ्याचे स्वरूप ठरविण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, त्यांचा कौशल्य विकासः आणि उद्योजकता यासंदर्भात शिक्षण प्रशिक्षण देणारा Career Katta Induction Week हा दि. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट, २०२६ पर्यंत संपूर्ण राज्यभर एकाच वेळी आणि एका समान स्वरूपात राबविण्यात येईल. हा कार्यक्रम विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांप्रती समायोजित स्वरूपाचा असेल.
तसेच ९ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबर, २०२६ या काळात विद्यार्थी संवाद दौरा आयोजित केला जाईल. या दौऱ्यात सकाळपासून दुपारी १:३० वाजेपर्यंत विद्याथ्यांशी संवाद साधला जाईल. त्यानंतर दुपारी १:३० वाजता नंतर करिअर संसदेची कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. शेवटी एक तास नोडल ऑफिसर आणि प्राचार्य यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल. या चर्चेत महाविद्यालयीन समन्वयकांची नियुक्ती करताना दोन समन्वयकांपैकी एक महिला समन्वयक असावी असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्याध्यांचा या उपक्रमातील सहभाग वाढविण्यासाठी करिअर कट्टा अॅप्लीकेशनच्या माध्यमातून Two-Way Communication वर भर देण्यात यावा, असे ठरविण्यात आले. त्यानंतर यावर्षीच्या नोंदणीकृत करिअर संसदेचा आढावा घेऊन करिअर संसदीय विद्यार्थ्यांची करिअर कट्टा सोबतची संलगता कशी वाढवता येईल याविषयी चर्चा करण्यात आली. त्याचवेळी दरवर्षीप्रमाणे १५ जुलै रोजी राज्यस्तरीय करिअर संसदेचे उद्घाटन होईल. तसेच दर महिन्याला करिअर संसदेतील एका मंत्र्याला त्याच्या पदानुसार Activity दिली जाईल जी त्याने पूर्ण करणे अनिवार्य असेल, या माध्यमातून त्याला करिअर संसदेतील त्याचे कार्य समजणे सुलभ होईल. सोबतच करिअर संसदेतील पदाधिकान्यांची करिअर डायरी समन्वयांकडून तपासण्यात यावीच, असा याप्रसंगी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
दिनांक २५ ते ३० नोहेंबर २०२५ रोजी दिल्ली दौरा यशस्वी करण्यासाठी दिल्ली दौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्याथ्यांची नावे घोषित करण्यात आली. या विद्यार्थ्यांना निवडण्यामागील निवड प्रक्रिया व भूमिका स्पष्ट करण्यात आली. त्यात ज्या जिल्ह्यांना पूर्वी प्रतिनिधित्व मिळाले आहे त्याव्यतिरिक्त त्या विभागातील इतर जिल्ह्यातील प्रतिनिधी विद्यार्थी निवडले जातील. जर योग्य प्रतिनिधी उपलब्ध नसेल तर तो निर्णय विभागीय प्राचार्य प्रवर्तक व विभागीय समन्वयकांद्वारे घेण्यात येईल असे ठरविण्यात आले. त्यानंतर राज्यस्तरीय करिअर संसदेच्या अधिवेशनासाठी विद्यार्थी निवडीसाठीच्या निकषांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार करिअर अंतर्गत पुढील कालावधीत एक आठवड्याचे दहा तासांचे प्रशिक्षण घेण्यात येईल यामध्ये कमीत कमी ५०% उपस्थिती असणारे विद्यार्थी पात्र राहतील. तसेच राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशन व विभागीय अधिवेशन यासाठी करिअर संसद पदाधिकारी यासाठी पाठविण्यात येणारे करिअर संसद पदाधिकारी सारखेच असल्यामुळे दोन्ही वेळेस पाठविण्यास थोडी अडचण येत असल्यामुळे यावर्षीचे विभागीय अधिवेशन सर्वानुमते निर्णय घेऊन रद्द करण्यात आले. या चर्चेत विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी 'AI Teacher' या विषयावरील शिक्षक विकास कार्यक्रमाच्या (FDP) नियोजनाविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांसमवेत येणाऱ्या प्राध्यापकांना या FDP मध्ये उपस्थित राहता येईल. यासाटी प्रथम नोंदणीकृत ११० प्राध्यापकांना प्राधान्य देण्यात येईल, असे ठरविले आहे.
या अधिवेशनामध्ये देण्यात येणाऱ्या आधुनिक सावित्री पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली. या पुरस्कारासंबंधित निकषांवर चर्चा झाली. तसेच या पुरस्कारासाठी प्राप्त अर्जामधून पात्र असणाऱ्या एकूण ११ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये करिअर कट्टा अंतर्गत महिला प्राचार्य प्रवर्तक किंवा जिल्हा समन्वयिका असे ६ व्यक्ती व याव्यतिरिक्त अन्य कार्यक्षेत्रातील ५ व्यक्तींना पुरस्कृत करण्यात येईल. यावेळी बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी जिल्हानिहाय अपेक्षित विद्यार्थी उपस्थिती संख्येविषयी अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यात एकूण अंदाजे उपस्थिती ९८५ असण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
या चर्चेमध्ये करिअर कट्टा अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या तीन क्लबविषयी माहिती देण्यात आली. करिअर कट्टा अंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या इमोशनल इंटेलिजन्स क्लब, फायनान्स क्लब आणि बिझनेस क्लब यांची रचना कशी असावी याविषयी चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा रस वाढवणारे नवीन कंटेंट समाविष्ट करून तपशीलवार SOP निर्मितीवर चर्चा झाली. या चर्चेनुसार असे ठरले की, इमोशनल इंटेलिजन्स क्लब हा प्रथम प्राधान्याने सुरु
करण्यात येईल. फायनान्स क्लबः हा ६ महिन्यानंतर २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत द्वितीय प्राधान्याने सुरुवात करण्यात येईल. तर बिझनेस क्लबः हा सेंटर ऑफ एक्सलन्स असणाऱ्या महाविद्यालयांसाठी आणि ज्या महाविद्यालयांनी पूर्वीच या क्लबसाठी नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी मर्यादित करण्यात येईल. तिन्ही क्लबचे कार्य स्पष्ट करणारी विस्तृत अशी माहिती सगळ्यांसाठी पाठविण्यात यावी. अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली.
या चर्चेनंतर 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व महाविद्यालयाची भूमिका' या विषयावर चर्चासत्र पार पडले. यात प्राचार्य डॉ. मोहन खताळ, (प्राचार्य प्रवर्तक नांदेड), प्राचार्य डॉ. संजय खरात, (प्राचार्य प्रवर्तक पुणे), प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर, (विभागीय प्राचार्य प्रवर्तक अमरावती), प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, (प्राचार्य प्रवर्तक सिंधुदुर्ग) आणि प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, (विभागीय प्राचार्य प्रवर्तक) पुणे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स निवड प्रक्रिया व विद्यार्थी नोंदणी आढावा घेण्यात आला. त्यात सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालयांच्या निवड प्रक्रियेची पुनर्बाधणी करणे आणि सेंटर ऑफ एक्सलन्स मधून बाहेर असणाऱ्या महाविद्यालयांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना बांधणी करणे याविषयी चर्चा करण्यात आली.
यानंतर कौशल्य विकास विभाग आणि CSR यांच्या मदतीने कौशल्य विकास उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेद्वारे पुढील निर्णय घेण्यात आलेः
CSR Project अंतर्गत मोटार ड्रायव्हिंग गाडीचे रजिस्ट्रेशन करिअर कट्टाकडे होईल. या गाडीचा वापर झाला नाही तर दुसऱ्या महाविद्यालयास ती हॅन्डओव्हर करण्यात येईल. यासाठीचे CSR Fund Proposal महाविद्यालयाच्या नावाने असेल, त्यामुळे यामध्ये अपयश आल्यास जबाबदारी कॉलेजकडे राहील, करिअर कट्टा यामध्ये केवळ समन्वय (Coordination) करेल.
कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमध्ये (योजनांमध्ये) मागील अनुभव बघता करिअर कट्टा सहभागी होणार नाही हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
कुटुंबासमवेत कार्यशाळा या उपक्रमांतर्गत प्रतिवर्षी नियमितपणे होणारी प्राचार्य प्रवर्तक व जिल्हा समन्वयक यांच्या कुटुंबासमवेतील निवासी कार्यशाळा पुढील वर्षी २५, २६ आणि २७ डिसेंबर २०२६ रोजी जळगाव विभागात आयोजित करण्याविषयी सर्वानुमते ठरवण्यात आले. या कार्यशाळेचा शेवट सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत उपस्थितांसमोर सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राची पारंपारिक लोककला कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाने करण्यात आला.
प्रस्तुत कार्यशाळेच्या समारोप दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ ला दुसऱ्या दिवशी पार पडला. या समारोप सत्रासाठी मा. रवींद्र साठे, सभापती (राज्यमंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ महाराष्ट्र शासन हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यांसमवेत मा. श्री. यशवंत शितोळे अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, विभागीय प्राचार्य प्रवर्तक मा. डॉ. अतुल साळुंखे, प्राचार्य प्रवर्तक डॉ. स्मिता सुरवसे, सहविभागीय समन्वयक डॉ. बबन सिनगारे, प्राचार्य डॉ. समीर तारी प्राचार्य शिरगाव महाविद्यालय आणि जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेविषयी कु. साक्षी सिद्रुक या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रा. डॉ. भागवत परकाळ जिल्हा समन्वयक अहिल्यानगर यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्राचार्य प्रवर्तक डॉ. मोहम्मद इलियाज फाजील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रमुख अतिथी मा. रवींद्र साठे यांनी खादी उद्योग आणि मधुमक्षिका पालन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत सिंधुदुर्ग प्राचार्य प्रवर्तक डॉ. स्मिता सुरवसे यांनी व्यक्त केले. त्यानंतर प्रा. डॉ. बबन सिनगारे यांनी आभार प्रदर्शन केले. या समारोप सत्राचे सूत्रसंचालन कु. पर्जन्या अंजुटगी यांनी केले.
रील स्पर्धा आयोजन
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या विधायक कार्यासाठी करावा, यासाठी करिअर कड्डा अंतर्गत विविध विषयाच्या अनुषंगाने रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा प्राप्त व्हाव्यात यासाठी पंधरा हजार रुपये आणि ट्रॉफी हे प्रथम पारितोषिक; १२ हजार रुपये आणि ट्रॉफी द्वितीय, १० हजार रुपये ट्रॉफी तृतीय, ७ हजार ५०० रुपये व ट्रॉफी चौथे आणि ५ हजार रुपये व ट्रॉफी हे पाचवे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. करिअर कट्टा संसद, उद्योजकता विकास, नवीन शैक्षणिक धोरण, सामाजिक बांधिलकी आणि स्पर्धा परीक्षा इत्यादी विषयावर ही रील स्पर्धा संपन्न होणार आहे. वा स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील ज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कौशल्य विकसित करण्यास विशेष मदत होणार आहे.