महाविद्यालयीन जीवनात असणारा जोश हा कर्तृत्व निर्माण करणारा असतो, या काळात कोणतीही गोष्ट जर मनापासून केली तर ती लवकर साध्य होते. प्रत्येक तरुणास वाटते की, आपण काही तरी वेगळं करावं यामुळे आपला नावलौकिक व करिअर होईल. तसे पाहिले गेले तर हे वय म्हणजे योग्य निर्णय घेण्याचे ठिकाण असते. भरपूर संधी यावेळी उपलब्ध असतात, फक्त एक महत्वाचे असते की आपल्या अंगी नेमकं कोणतं कौशल्ये आहेत, ते ओळखून एकच मार्ग धरून त्यात पुढे-पुढे वाटचाल करणे गरजेचे असते. बरेच विद्यार्थी काही काळ एक मार्ग पकडतात तो मध्येच सोडतात, परत कुणाच्या तरी सांगण्यावरून पुन्हा दुसरा मार्ग निवडतात, तोही पुढे अर्धवट राहतो, या खेळात कशी वेळ व कसं वय निघून जाते ते समजतच नाही, मग शेवटी नशिबाला आपण दोष देत राहतो, तर असे न करता कोणताही मार्ग निवडत असताना त्याची संपूर्ण माहिती घेणं गरजेचे असते व हे आपल्याला शक्य आहे का? हा स्वतःला प्रश्न विचारून मग पुढे यश मिळेपर्यंत धरलेला मार्ग बदलायचा नसतो.
असाच एक महत्वपूर्ण आणि तरुणांच्या पसंतीचा यशाचा मार्ग याविषयी आपण या लेखात सविस्तर माहिती घेणार आहोत, तो मार्ग आहे MPSC यालाच मराठी मध्ये "महाराष्ट्र लोकसेवा आयोग" असे म्हणतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission (MPSC) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ ची पदे भरली जातात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी)
आयोगाविषयी माहिती
आयोगाची संरचना: कलम ३१६ अनुसार करण्यात आली आहे
घटनात्मक तरतूद :
विविध स्तरांवरील प्रशासनाच्या यशस्वी कामकाजात लोकसेवकांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे लोकसेवकांची भरती, प्रशिक्षण, वित्तलब्धी, सेवाशर्ती, पदोन्नतीचे धोरण इत्यादी बाचींना महत्व प्राप्त होते. लोकसेवकांशी संबंधित या सर्व बाबी निःपक्षपणे पार पाडण्यासाठी एका स्वतंत्र व तज्ज्ञ प्राधिकारी यंत्रणेची आवश्यकता असते तिला लोकसेवा आयोग म्हणतात. भारतात केंद्र स्तरावर संघ लोकसेवा आयोग तर राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद घटनेत केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे जी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ नुसार स्थापन केलेली महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यकारी पदासाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून देऊन त्यांना सेवा व सुलभकार्यक्षमता प्रदान करते आणि विविध सेवाविषयक बाबींवर सल्ला देतात.
२. आयोगाची संरचना: कलम ३१६ अनुसार
आयोगाचे कार्य व अधिकार :
राज्य लोकसेवांमध्ये नियुक्ती करण्याकरीता परीक्षा घेणे. आयोग पुढील बाबींमध्ये राज्यसरकारला सल्ला देते. नागरी सेवामध्ये व नागरी पदांमध्ये भरती करण्याच्या पध्दती नागरीसेवांमध्ये व पदांवर नियुक्ती करतांना आणि बडत्या देतांना एका सेवेतून दुसऱ्या सेवेत बदल्या करतांना राज्य सरकारला सल्ला देणे.
राज्यपालांनी आयोगाकडे विचारार्थ पाठविलेल्या अन्य कोणत्याही बाबींवर सल्ला देणे.
भरती व सेवा शर्ती, नागरी सेवकास बडतर्फ, पदावरून दूर करणे व पदावतन करणे,
एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा खालील प्रमाणे :
१. महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा (Maharashtra State Services Examination)
२. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब परीक्षा
(Maharashtra Subordinate Non-gazetted Gr. B service Exam)
३. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- क परीक्षा
(Maharashtra Subordinate Non-gazetted Gr. C service Exam)
४. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
(Maharashtra Forest Services Examination)
५. महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा
(Maharashtra Agricultural Services Examination)
६. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ परीक्षा
(Maharashtra Engineering Services Gr-A Examination)
७. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब परीक्षा
(Maharashtra Engineering Services Gr-A Examination)
८. सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक परीक्षा
(Asstt. Motor Vehicle Inspector Exam)
९. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
(Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam)
१०. सहाय्यक अभियंता (विद्युत) श्रेणी-२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-च
(Assist. Engineer (Electrical) Gr II, Maharastra Electrical Engg. Servives,B)
MPSC परीक्षा देण्यासाठी असणारी पात्रता व वयोमर्यादा खालील प्रमाणे :-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली समतुल्य अर्हता
पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेस पात्र. परंतु मुख्य परीक्षेस पात्र ठरण्यासाठी मुख्य परीक्षेपूर्वी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा १८ वर्षं पूर्ण (काही पदासाठी किमान वयोमर्यादा १८ तर काही पदासाठी १९) खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादा ४३ आहे.
MPSC ची परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक.
काही महत्वाची पदे व परीक्षेचे स्वरूप :-
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा (गट 'ब' व गट 'क')
गट ब पदे
१) पोलीस उपनिरीक्षक (PSI)
२) राज्य कर निरीक्षक (STI)
३) सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)
४) दुय्यम निबंधक श्रेणी १ (Sub Registrar Grade 1) किंवा मुद्रांक निरीक्षक (Inspector of Stamps)
गट क पदे
१) कर सहाय्यक (Tax Assistant)
२) दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (ESI)
३) उद्योग निरीक्षक (Industrial Inspector)
४) लिपिक टंकलेखक (Clerk-Typist)
५) तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय (Technical Assistant, Directorater of insurance)
परीक्षा टप्पे
१) पोलीस उपनिरीक्षक (PSI)
एकूण परीक्षा टप्पे - ४
१) पूर्व परीक्षा- १०० गुण
२) मुख्य परीक्षा - ४०० गुण
३) शारीरिक चाचणी - १०० गुण
४) मुलाखत - ४० गुण
पोलीस उपनिरीक्षक (PSI साठी १०० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते, ही चाचणी अर्हताकारी Qualifying करण्यात आली आहे, यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ७०% गुण म्हणजे ७० गुण आवश्यक आहे, त्यानंतर पात्र उमेदवारांची ४० गुणांची मुलाखत घेतली जाते.) यामध्ये पुरुषासाठी - गोळा फेक (७.२६० कि.ग्रॅ) - १५ गुण, पुलअप्स २० गुण, लांब उडी १५ गुण, ८०० मीटर धावणे ५० गुण असे १०० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते. तर महिला उमेदवारांकरीता गोळा फेक (४ कि. ग्रॅ.) - २० गुण, धावणे ४०० मीटर ५० गुण, लांब उडी ३० गुण अशी एकूण १०० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते )
इतर सर्व पदे -
एकूण टप्पे - २
१) पूर्व परीक्षा- १०० गुण
२) मुख्य परीक्षा ४०० गुण
अभ्यासक्रम-
पूर्व परीक्षा (सामान्य क्षमता चाचणी) १०० प्रश्न, १००
गुण, वेळ - एक तास
माध्यम मराठी / इंग्रजी
परीक्षा स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
१) इतिहास - आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्र इतिहास
२) भूगोल - विशेष महाराष्ट्र भूगोल, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी
३) अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा
आणि राजकोष नीती इत्यादी
शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी
४) सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, आरोग्यशास्त्र
५) चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील
६) राज्यशास्त्र
७) अंकगणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इतर
८) बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे
विचार करू शकतो हे अजमवण्यासाठी प्रश्न
या परीक्षेसाठी नकारात्मक गुणदान पध्दत लागू असेल - प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५ % (१/४) गुण
एकूण गुणांमधून वजा किंवा / कमी करण्यात येतात.
मुख्य परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम-
पेपर क्रमांक १- मराठी व इंग्रजी- १०० प्रश्न २०० गुण ( मराठी ५० प्रश्न, १०० गुण, इंग्रजी ५० प्रश्न, १०० गुण) वेळ - १ तास, स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
पेपर क्रमांक २- सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी १०० प्रश्न, २०० गुण, वेळ १ तास, मध्यम मराठी व इंग्रजी स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
राज्यसेवा परीक्षा-गट अब गट-ब
गट - अ मधील पदे
१) उपजिल्हाधिकारी
२) पोलीस उपअधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त
३) उपसंचालक / प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) श्रेणी - १
४) सहाय्यक राज्य कर आयुक्त
५) उपनिबंधक, सहकारी संस्था
६) उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी
७) अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क
८) शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेबा प्रशासन शाखा
९) सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा
१०) मुख्याधिकारी नगरपालिका / नगरपरिषद
११) तहसीलदार
१२) सहाय्यक कामगार आयुक्त
१३) सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार व उधोजकता
१४) बाल विकास प्रकल्प अधिकारी
१५) उद्योग उपसंचालक तांत्रिक
इतर महत्वाची पदे
गट - ब मधील पदे
१) कक्ष अधिकारी मंत्रालय विभाग
२) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
३) लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा
४) उपशिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशासन शाखा
५) सहाय्यक गट विकास अधिकारी
६) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था
७) उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क
८) सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क
९) नायब तहसिलदार
१०) उद्योग अधिकारी तांत्रिक
इतर महत्वाची पदे
ही परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते (नवीन बदललेल्या स्वरूपानुसार)
१) परीक्षेचे नाव -
महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा - ४०० गुण
२) राज्यसेवा स्वतंत्र मुख्य परीक्षा - १७५० गुण
३) मुलाखत २७५ गुण
पहिला टप्पा - पूर्व परीक्षा
एकूण पेपर - २
१) सामान्य अध्ययन (GS) माध्यम मराठी व इंग्रजी वेळ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २०० गुण १०० प्रश्न दोन तास स्वरूप-
प्रश्न ८० गुण २) नागरी सेवा कल चाचणी (CSAT) २००, माध्यम मराठी व इंग्रजी वेळ २ तास, स्वरूप -वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
( हा पेपर अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान ३३ % गुण मिळवणे आवश्यक राहील.)
मुख्य परीक्षा स्वरूप -
राज्यसेवा स्वतंत्र मुख्य परीक्षा १७५० गुणांची असेल
परीक्षा स्वरूप वर्णनात्मक
एकूण पेपर - ९
१) भाषा पेपर १ मराठी ३०० गुण
२) भाषा पेपर २ इंग्रजी ३०० गुण (हे दोन्ही भाषा पेपर अर्हताकारी असून यात २५% गुण आवश्यक आहे.)
गुणवत्ता यादीकरिता खालील विषय विचारात घेतले जातात
१) निबंध - मराठी किंवा इंग्रजी माध्यम -
२५० गुण
२) सामान्य अध्ययन - एक -
२५० गुण
३) सामान्य अध्ययन - दोन-
२५० गुण
४) सामान्य अध्ययन तीन-
२५० गुण
५) सामान्य अध्ययन- चार-
२५० गुण
६) वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक २५० गुण
७) वैकल्पिक विषय क्रमांक दोन-२५० गुण
तिसरा टप्पा व्यक्तिमत्त्व चाचणी (मुलाखत) -२५० गुण
अंतिम निवडीसाठी एकूण गुण मुख्य परीक्षा १७५० गुण व मुलाखत २७५ गुण असे मिळून २०२५ गुण विचारात घेतले जातात.
वैकल्पिक विषयाकरीता खालील विषयातून एका विषयाची निवड करणे आवश्यक राहते.
१) इतिहास २) भूगोल ३) कृषी ४) भौतिक शास्त्र ५) वनस्पती शास्त्र ६) रसायनशास्त्र ७) पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान ८) मानववंश शास्त्र ९) भूविज्ञान १०) राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध ११) विधी १२) मानसशास्त्र १३) लोकप्रशासन १४) समाजशास्त्र १५) सांख्यिकीशास्त्र १६) प्रणिशास्त्र १७) मराठी वाङमय १८) व्यवस्थापन १९) गणित २०) यांत्रिकी अभियांत्रिकी २१) वैद्यकीय विज्ञान २२) तत्वज्ञान २३) स्थापत्य अभियांत्रिकी २४) वाणिज्य व लेखा २५) अर्थशास्त्र २६) विद्युत अभियांत्रिकी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना योग्य नियोजन व सातत्य फार महत्त्वाचे आहे, अभ्यास किती केला यापेक्षा अभ्यास कसा केला फार महत्त्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्याला कोणती परीक्षा द्यायची हे निश्चित करावे, त्यानंतर त्याची संपूर्ण माहिती घेऊन आपल्या दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक बनवणे गरजेचे आहे, एकदा सुरुवात केली की त्यात खंड पडता कामा नये, भरपूर अभ्यास, सराव यासाठी महत्वाचा आहे. कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता सर्व व्यवस्थित समजून योग्य अभ्यासाची दिशा तुम्हाला यशापर्यंत नेऊ शकते, यासाठी तुमचे महाविद्यालयायीन जीवन हे यश मिळवण्यासाठी योग्य आहे, चला तर मग, योग्य विचार करून योग्य निर्णय घ्या आणि सुरुवात करा. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हा! तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा !