Author
ताण आणि समाधान
मा. डॉ. मिथिला दळवी
भावनिक बुद्धिमत्ता ट्रेनर

अक्षयला परीक्षेत मार्क चांगले मिळतात. पण त्याची एक स्टाईल आहे, तो सगळं सबमिशन, सगळा परीक्षेचा अभ्यास शेवटच्या दोन दिवसात करतो, त्यासाठी तो जागरण करतो, दिवस रात्र एक करतो पण, दिलेलं काम संपवतोच. अक्षय नेहमी म्हणतो, मला आधीपासून काम सुरूच करावासंच वाटत नाही. 'आणि होतंय ना शेवटच्या दोन दिवसात करून माझं, मग कशाला आधीपासून सुरू करायचं? आधीचा सगळा वेळ मी मला हवा तसा, हव्या त्या गोष्टींसाठी वापरू शकतो. आणि आता तर मला पुरेसा आत्मविश्वास पण आहे की दोन दिवस आधी सुरू करून मी सगळं संपवू शकतो, मग मुळात करायच कशाला आधीपासून !
सोनियाची कथा ही थोडी अक्षयसारखीच आहे. ती ही सगळं काम शेवटी करणारी मुलगी. असं ही नाही होत की तिला मार्क कमी मिळतात किंवा सबमिशन आटपतच नाही. पण ती "लास्ट मिनिटतक" पंथातली. अर्थात शेवटच्या दोन दिवसात काम आटपेपर्यंत तिला भयंकर टेन्शन येतं आणि तिच्या आईच्या भाषेत ती तेव्हा सगळं घर डोक्यावर घेते. आई नेहमी तिच्या मागे राहते की वेळेत काम सुरु कर. नाहीतर शेवटी शेवटी घराचा जो माहोल असतो, तो घरातल्या सगळ्यांनाच नकोसा होतो. यावर सोनियाचं ठरलेलं उत्तर आहे, की पुरेसं प्रेशर बिल्ड होत नाही ना तोपर्यंत मला काम करावेसंच वाटत नाही. मी "अण्डर प्रेशर परफॉर्मर" आहे. असं नेहमीच्या स्थितीत होत नाही माझ्याकडून काम ! आणि मिळतात ना मला मार्क्स चांगले आणि होतं ना काम, मग कशाला आधीपासून करायचं काम !!
असे अनेक अक्षय, सोनिया आपल्या आसपास पाहायला मिळतात. कदाचित आपणच अक्षय किंवा सोनिया असू शकतो. शेवटाला काम ठेवणारी मंडळी काम आटपतं तेव्हा कोणती भावना अनुभवतात? "हुश्श झालं बाबा एकदाचं काम!".. असा सुटकेचा निःश्वास असतो तो !! खूपदा त्या सुटकेच्या निःश्वासापुढे काम पूर्ण झालं, छान
झालं, असा समाधानाचा भाव कुठेतरी पार मागे पडलेला असतो.
आता या सगळ्यात आणखी एक गंमत असते, अक्षय म्हणतो की शेवटच्या क्षणी काम करून तो तसं काम आटपू शकतो याने त्याला खूप आत्मविश्वास ही वाटतो आणि त्याच्यासाठी हा आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. अक्षयचे शेवटचे दोन तीन दिवस कसे जातात ते जरा बघूया. त्या दिवसात तो किती मित्रांना फोन करतो, किती मेसेजेस करतो, आणि कुठून कुठून गोष्टी शोधतो!! युद्धभूमीसारखा तो अनेक आघाड्यांवर लढत असतो. त्यात मग बऱ्याचदा तो एक-दोन रात्री झोपतच नाही. आणि काम आटपल्यावर अख्खा दिवस तो झोपून काढतो. सतत जर असं होत असेल तर याचा शरीरावर नक्कीच ताण येतो. सोनियाला तर कामं आटपण्यासाठी स्वतःवर आधी खूप स्ट्रेस बिल्ड करावा लागतो, आणि पुरेसा ताण आला नाही तर काम होत नाही असं तीच सांगते. आता गंमत बघूया, आपलं कर्तव्य फक्त काम होण्याशी आहे की, ते काम करताना आपण कोणत्या कोणत्या भावना अनुभवतो त्याच्याशी पण आहे?
सोनियाला तर पुरेसा ताण बिल्ड झाला नाही तर कामच करता येत नाही म्हणजे स्वतःकडून काहीही काम करून घ्यायचं असेल तर तिच्या शरीर आणि मन दोन्हींना ताणाला सामोरे जावं लागतं. ताण (स्ट्रेस) चा एक फार इंटरेस्टिंग पैलू आहे, एका मयदिपर्यंत ताण वाढत गेला की आपला परफॉर्मन्सही सुधारत जातो. हा युस्ट्रेस (Eustress) - उपयुक्त किंवा सकारात्मक ताण, याच्यामुळे आपल्याला मोटिव्हेशन मिळतं, काम करायला एनर्जी मिळते. आणि असं काम आटपल्यावर समाधान, आत्मविश्वास ही मिळतो.

अनेकदा अवघड परिस्थितीतून पार पडल्यावर आपलं आपल्यालाच नवल वाटतं ना, की अरे कसं आपण हे सगळं पार पाडलं, कसं जमलं सगळं! अशी भावना असते ना, तेव्हा आपण प्रत्यक्षात युस्ट्रेस अनुभवलेला असतो. काही वेळा मात्र ताण वाढत वाढत गेला की आपला परफॉरमंस घसरत जातो, कोलमडल्यासारखं होतं, असह्य, हताश भावना येते आणि त्याने ताण आणखीनच वाढतो, हा डिस्ट्रेस (Distress)- नकारात्मक ताण.
ताण मॅनेज करणं हे एक तंत्र असतं, आपल्याला उपयुक्त ताणाच्या झोनमध्ये राहता येणं, आणि आपली एनर्जी पुरते आहे ना, काम करायला उत्साह वाटतोय ना, याचं भान ठेवणं, हा त्यातला कळीचा मुद्दा असतो. कामाच्या ताणाला आपण सामोरं कसं जाणार आहोत, त्यानुसार आपण वेळेचं साधनांचं प्लॅनिंग कसं करणार आहोत, हे सगळं त्यात आलं. थोडक्यात युस्ट्रेसमध्ये परिस्थितीवर आपले बऱ्यापैकी नियंत्रणात असते. इथे आपण सबमिशन्स आणि परीक्षा अशा मर्यादित स्वरुपात ही उदाहरणं घेतो आहोत. इथे बरेचसे फॅक्टर्स आपल्या आवाक्यातले आहेत.
अक्षबला युस्ट्रेस मध्ये राहणं जमतही असावं. पण सोनियाचं काय! ती घर डोक्यावर घेते, असं आई म्हणत असेल तर तिला ते जमत नाही आहे. ती बऱ्याचदा डिस्ट्रेस मध्ये असते आहे, असा त्याचा अर्थ. आणि म्हणून काम आटपतं तेव्हा सोनियासारख्या व्यक्तींना त्याचं समाधान फारसं वाटत नाही. ती केवळ एक सुटकेची भावना असते का? काम आटपल्यानंतर ती एक सुस्कारा सोडते आणि एक रिलॅक्स, मोकळेपणाची भावना तिला अनुभवता येते? तिला त्यातून आनंद मिळतो का? कदाचित सोनिया या काही सुखावह भावना अनुभवत असेलही. पण त्यासाठी सोनिया स्वतःवरचा ताण वाढवत नेते. स्वतःवर ताण वाढवत नेऊन आपण केलेल्या कामाचं पुरेसं समाधान आनंद मिळू शकतो? सोनिया-अक्षय सारखी माणसं काम होण्याकडे लक्ष देतात पण काम होण्यापूर्वीचे दोन दिवस ते किती ताणातून जातात याच्याकडे बघत नाहीत. एकंदर शरीर आणि मनाला ते किती स्वास्थ्य देतात हा खरंच कळीचा मुद्दा असतो.
मुळात आपल्या शरीर आणि मनाला आपण रिलॅक्स
फिलिंगचा किती वेळा अनुभव देतो? आपण वेळेबरोबर मारामारीच करायला लावतो आणि आधीचे सगळे दिवस जेव्हा सोनिया आणि अक्षय त्यांचा सबमिशन परीक्षेचा अभ्यास करत नसतात तेव्हा काय करतात? तेव्हा काय प्रकारच्या भावनांचा त्यांना अनुभव येतो? त्या भावना खूप छान असतात का? त्या भावनांमध्ये समाधान असतं का? आनंद असतो का? का इथे तिथेच त्यांचा असाच वेळ गेलेला असतो, हे यात फार महत्वाचं असतं.
समाधानाचं, आनंदाचं गणित मांडायला बसलं ना, की तुम्ही काळ-काम-वेगाची गणितं कशी करता, किती काम साठवून ठेवता, आणि मग किती घाई घाई करून ती आटपून टाकता हे फार महत्त्वाचं असतं. छोट्या छोट्या कामातून मज्जा घ्यायची असेल, आनंद घ्यायचा असेल तर छोट्या छोट्या अचिवमेंट्सचं खूप मोल आहे. दिलेला सगळा वेळ, हाताशी असलेला सगळा वेळ नीट प्रकारे वापरता येणे आणि त्यातनं शरीर आणि मन दोन्हींना रिलॅक्सेशनचा अनुभव देणे हे फार महत्त्वाचं असतं.
शेवटच्या क्षणासाठी काम ठेवले जातं, तेव्हा त्याच्यात सुधारणेला फारसा वाव नसतो. काही नवं सुचलं, काही वेगळं करून पहावसं वाटलं, तर त्याला बाब राहत नाही. अशावेळी एखादी गोष्ट करण्याची प्रोसेस आणि त्या प्रोसेस मधली मज्जाच घेता येत नाही. म्हणायला काम झालेलं असतं पण त्यात मजा येत नाही. हल्लीच्या काळात झालेले आनंद आणि समाधानावरचं संशोधन काय सांगतं ते बघूया. "छोट्या छोट्या टप्प्यातूनं झालेल्या, छोट्या छोट्या नियमित अचिवमेंट्समधून जास्त टिकाऊ स्वरूपाचं समाधान आनंद मिळत जातो", हे या संशोधनातून ठळकपणे समोर आलं आहे. हे एकदा लक्षात घेतलं की आपलं समाधान आपण कसं मिळवायचं, हे आपलं आपल्याला तर ठरवता येतंच, पण गटासोबत, समूहात काम करताना आपण इतरांचा ताणही त्यातून कमी करु शकतो. अक्षय, सोनिया हे टीम मेम्बर्स, म्हणून गटातले सहकारी म्हणून कसे असतील याची कल्पना करता येऊ शकते आपल्याला.
आपल्या आजूबाजूला असा एखादा अक्षय असेल, किंवा अशी एखादी सोनिया असेल, तर सांगाल का त्यांना हे?