Author
" संसदेच्या पदाधिकाऱ्यांसाठी राज्यस्तरीय अधिवेशन "
-
-

दरवर्षी १२ जानेवारी, स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून करिअर संसद पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले जाते. पहिले अधिवेशन दि. ११ व १२ जानेवारी २०२४ रोजी शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शारदानगर, बारामती या ठिकाणी संपन्न झाले. यंदाचे दुसरे अधिवेशनही त्याच ठिकाणी दि. १२ व १३ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या अधिवेशनामध्ये राज्यभरातील महाविद्यालयांच्या करिअर संसदेचे जवळपास ४५० पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकूण नऊ सत्रांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये एसएसबी परीक्षा कार्यपद्धती व नोकरीच्या संधी, व्यवसायामध्ये आर्थिक वागणुकीची गरज, अपारंपरिक, ऊर्जा क्षेत्रामध्ये उद्योजकीय संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी व युवकांची मानसिकता, अर्थकारण आणि युवक, केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या आस्थापना आणि नोकरीच्या संधी आदी विषयांचा अंतर्भाव होता. तसेच चर्चासत्र व विभागवार सादरीकरणही घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी क्षेत्रभेट झाली. त्यानंतर मार्गदर्शनपर तीन सत्रे संपन्न झाली. शेवटी विद्यार्थ्यांची मनोगते होऊन अधिवेशनाचा समारोप झाला. यंदाच्या अधिवेशनामध्ये राज्यभरातून ७५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 'पदाधिकारी प्रशिक्षण' उपक्रमामध्ये नियमित हजर असणारे विद्यार्थी या अधिवेशनात सहभागी होत असतात. त्यामुळे 'महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांचे एक दर्जेदार अधिवेशन' अशी या उपक्रमाची ओळख निर्माण झाली आहे.

 

प्रा. संदेश कासार

राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती सदस्य, करिअर कट्टा