करिअर संसद पदाधिकाऱ्यांसाठी दर रविवारी सकाळी १०:०० वाजता ऑनलाइन 'पदाधिकारी प्रशिक्षण' घेतले जाते. राज्यभरातील महाविद्यालयांच्या करिअर संसदेचे पदाधिकारी यामध्ये सहभागी होतात. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष सन्मा. यशवंत शितोळे सर एक विषय निवडून त्यावर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्यानंतर आठवडाभरासाठी विद्यार्थ्यांना एक टास्क दिला जातो. शेवटची दहा मिनिटे प्रश्नोत्तरे होतात. पुढील आठवड्यामध्ये प्रशिक्षणाच्या सुरुवातीला मागील आठवड्यात दिलेला टास्क पूर्ण केलेले विद्यार्थी त्यांचे मनोगत व्यक्त करतात. त्यानंतर शितोळे सरांचे मार्गदर्शन, नवीन टास्क व प्रश्नोत्तरे हे उपक्रम क्रमाने पूर्ण होतात. आत्तापर्यंत ५६ विविध विषयांवर 'पदाधिकारी प्रशिक्षण' घेण्यात आले आहे. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा व्यक्तिमत्व विकास, वेळेचे नियोजन, अर्थकारण, तंत्रज्ञानाचा वापर, युवकांच्या क्षमता व सामर्थ्य, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, करिअरच्या वाटेवर प्राधान्यक्रमाचे महत्व आदी विविधांगी विषय हाताळण्यात आले. अतिशय शिस्तबद्धरित्या पदाधिकारी यामध्ये सहभागी होत असतात. बोलत असताना व्हिडीओ ऑन करणे, हॅन्ड रेज करून प्रश्न विचारणे या व इतर नियमांचे काटेकोर पालन पदाधिकारी करत असतात. नियमित प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा त्यांच्या वैयक्तिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनात झालेला दिसून आला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून ते वेळोवेळी मांडले. करिअर संसद पदाधिकाऱ्यांच्या वैचारिक सक्षमीकरणामध्ये महत्वाची भूमिका हे प्रशिक्षण पार पाडत असते.