Author
" संकल्प दिवस व स्थापना दिवस "
-
-

संकल्प दिवस व स्थापना दिवस

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकसाकरिता उपक्रम करिअर कट्टा.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करिअर कट्टा नेहमीच नवीन उपक्रम आणि विविध नावीन्यपूर्ण संकल्प घेऊन आपल्यासमोर येत असतो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विविध कौशल्यांची रुजुवणुक विद्यार्थ्यांमध्ये होणे ही आज काळाची गरज असून करिअर कट्टा सारखे उपक्रम यामध्ये आपली मोलाची भूमिका निभावतात. आदरणीय शितोळे सर करिअर संसद पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेत असताना त्यांना आवर्जून सांगतात की युवा हा कसा असायला हवा तर वायूच्या वेगाने धावणारा. प्रत्येक संकटाला आणि आव्हानांना सामोरे जाणारा.

युवक आपल्या भारत देशाची संपत्ती असून त्याचा योग्य तो वापर केल्यास भारत देश प्रत्येक क्षेत्रात उंची गाठल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या कलागुणांना संधी देण्याकरिता विविध उपक्रम महाविद्यालयीन स्तरावर होणे आवश्यक आहेत, त्यातीलच एक उपयुक्त उपक्रम म्हणजे विद्यार्थी करिअर संसद. हा उपक्रम मा. यशवंत शितोळे सर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र दौरा चालू असताना आला. ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्रिमंडळ मध्ये पदाधिकारी विविध पदावर कार्यरत असतात त्याचप्रमाणे या विद्यार्थी करिअर संसद पदाधिकाऱ्यांचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येते, १५ जुलै हा सर्वत्र जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात येत असून जगाला आज अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, त्यापैकी अनेकांचा परिणाम तरुणांवर होतो. हिंसक संघर्ष शिक्षण आणि स्थिरतेत व्यत्यय आणतात, ध्रुवीकृत ऑनलाइन वातावरण नकारात्मकतेला चालना देतात आणि सततची आर्थिक असमानता संधी मर्यादित करते. या समस्यांमुळे केवळ वैयक्तिक भविष्यच नव्हे तर समाजाच्या एकूण स्थिरतेलाही धोका निर्माण होतो. सर्वांसाठी अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी शांततेची संस्कृती वाढवण्यासाठी, जबाबदार जागतिक नागरिकांचे पालनपोषण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तरुणांना आवश्यक कौशल्ये सुसज्ज करणे महत्त्वाचे आहे, समृद्ध आणि शाश्वत भविष्यासाठी योगदान देण्यासाठी कौशल्य आणि संधी प्रदान करण्यासाठी हा दिवस साजरा होत असून याच दिवशी आपल्या विद्यार्थी करिअर संसदेची स्थापना संपूर्ण महाराष्ट्र भर स्थापन करण्याचा संकल्प मा. यशवंत शितोळे यांनी घेतला असून विविध कौशल्यांची रुजवणुक यामार्फत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये करून घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली आणि त्यानुसार त्यांची वाटचाल सुद्धा चालू आहे. महाराष्ट्रातील महाविद्यालयांमधी १५ जुलै रोजी या विद्यार्थी करिअर संसद ची स्थापना करण्यात येते आणि सोबतच त्यांचा शपथविधी सुद्धा मोठ्या थाटात आयोजित करण्यात येतो. या मंत्रिमंडळात विविध पदाधिकारी खालील हुद्द्द्यावर निवडण्यात येतात

मुख्यमंत्री, नियोजन मंत्री, कायदे व शिस्त पालन मंत्री, सामान्य प्रशासन मंत्री, माहिती व प्रसारण मंत्री, उद्योजकता विकास मंत्री, रोजगार स्वयंरोजगार मंत्री, कौशल्य विकास मंत्री, संसदीय कामकाज मंत्री, सदस्य आणि मा. यशवंत शितोळे सर प्रत्येक आठवड्यात रविवारी होणाऱ्या प्रशिक्षणात त्यांची कार्ये समजावून सांगतात आणि सर्व पदाधिकारी यांना विविध काम नेमून देऊन त्याचा आढावा पण ते तेवढ्याच उत्साहाने घेतात.

१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतनिमित्त सर्वत्र युवक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिनाचे औचित्य साधून मा. शितोळे सर यांच्या विचारातून करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांकरीता हा संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येण्याचा विचार त्यांनी सर्वांसमोर मांडून त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. बारामती येथे या संसदेच्या पदाधिकाऱ्यांकरिता दोन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात येते, महाराष्ट्रभरातून आलेल्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय निवासी व्यवस्था आणि सोबतच कौशल्यपूर्ण आणि अत्यावश्यक अश्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बारामतीचे महाविद्यालय आणि राज्यस्तरीय करिअर संसद समिती आपली मोलाची भूमिका निभावतात. सरते शेवटी मी मा. यशवंत शितोळे सर यांचे सर्वांच्या वतीने आभार मानते कारण विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता त्यांनी चालू केलेली ही चळवळ नक्कीच एका उंच ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जाणार. धन्यवाद !

प्रा. ममता सुरेश पळसपगार

अमरावती जिल्हा समन्वयक, करिअर कट्टा