सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार,
आतापर्यंत आपण स्पर्धा परीक्षांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसे मिळवायचे...? त्या अन्वय एक उत्तम करिअर घडविण्यासाठी आपला काय प्रयत्न हवा या सर्व विषयांवर सखोल चर्चा केली आहे.हे सर्व करत असताना, आपण एक लार्जर पिक्चर (मोठं चित्र) म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की स्पर्धा परीक्षा हा फक्त एक मार्ग आहे आपलं ध्येय, एक चांगलं करिअर, चांगलं जीवन घडविणे हे असते. तर, सहाजिकच हा एक प्रश्न आपल्याला पडायला हवा की स्पर्धा परीक्षा द्वारा आपल्याला काय फायदा होतो..? किंवा या लार्जर पिक्चर मध्ये स्पर्धा परीक्षेचा रोल काय आहे किंवा त्याची नेमकी काय भूमिका आहे आणि हे जाणून घेतलं तर समग्रतेने आपल्याला स्पर्धा परीक्षेला सामोरे जाता येईल आणि मग त्यामध्ये यथोचित यश मिळवून आपल्याला एक चांगलं जीवन, चांगलं करिअर घडवता येईल याबद्दल संदेह नसावा.
स्पर्धा परीक्षांची तयारी ही केवळ अभ्यासाची तयारी नसते तर ती मन, बुद्धी आणि व्यक्तिमत्व घडविणारी एक सखोल तत्त्वज्ञानात्मक साधना असते. स्पर्धा परीक्षेतील या प्रवासात आपण पुस्तकांमधील माहिती शिकतो पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपण स्वतः बद्दल देखील शिकतो याचाच विचार करायचा झाला तर आपण स्वतःबद्दल काय शिकतो आपली मर्यादा काय आहे, आपली क्षमता काय आहे, आपली भीती काय आहे, आपल्यात एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी जिद्द किती आहे, आणि आपली स्वप्नांची खरी किंमत काय आहे हे आपल्याला यामुळे कळू शकतं. स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव किंवा खेळ नसून, ती जीवनातील अनिश्चिततेची सामना करण्याची, अपयशाला स्वीकारण्याची आणि हरल्यावर पुन्हा एकदा उभे राहण्याची जिद्द शिकवणारी एक शाळा आहे.
या प्रक्रियेत आपण जाणतो की यश हे एका दिवसात मिळणारे फळ नाही तर सतत प्रयत्नांची, शिस्तीची आणि आत्मविश्वासाची हळूहळू पिकणारी फळझाडं आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण वेळेचे महत्त्व समजतो प्रत्येक मिनिटांची किंमत कळते कारण प्रत्येक मिनिट, सेकंद आपल्याला आपल्या ध्येयजवळ नेऊ शकतो किंवा त्यापासून दूरही करू शकतो. वेळेचे नियोजन म्हणा आणि आपल्यासाठी प्राथमिकता काय आहे हे ठरवणे म्हणा आणि स्वतःला सतत सुधारण्याची एक सवय म्हणा ही सारी कौशल्य केवळ परीक्षेसाठीच नाही तर, संपूर्ण करिअर साठी जीवनासाठी आवश्यक असतात जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हीच कौशल्य आपल्याला पुढे नेत असतात याबद्दल साशंकता नसावी. त्यामुळे स्पर्धा परीक्षा म्हणजे करिअरच्या द्वाराची किल्लीच नाही तर; संपूर्ण व्यावसायिक आयुष्याची, संपूर्ण वैयक्तिक आयुष्याची पायाभरणी करणारी एक प्रक्रिया आहे.
या प्रवासात आपण अपयशाला नव्या नजरेने पाहायला शिकतो पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही तर, मन खचते पण अपयश सर्वांना मोठा धडा देणारा असतो आणि हा धडा आपल्याला कोणत्याही पुस्तकात वाचून कळत नाही, कोणाही कडून ऐकून कळत नाही तर तो स्वतःच स्वतःला शिकवावा लागतो यामध्ये आपल्याला कळतं की अपयश हे म्हणजे शेवट नाही तर;नव्या सुरुवातीची एक संधी आहे. प्रत्येक चुकीतून आपण अधिक मजबूत होतो अधिक सजग होतो हीच मानसिकता पुढे जीवनातही उपयोगी पडते कारण कोणत्याही क्षेत्रात किंवा कोणताही प्रोजेक्ट हा एक आव्हानात्मक प्रसंग असतो त्या आव्हानाला सामोरे जाताना स्पर्धा परीक्षेची तयारी केलेला विद्यार्थी अजिबात घाबरत नाही प्रसंगी अशा आव्हानांना सामोरे जातो आणि त्यातून शिकत पुढे जातो.. तर एकंदरीत स्पर्धा परीक्षा आपल्याला एकाग्रतेचे सामर्थ्य शिकवते.
आजच्या जगात मन विचलित करणाऱ्या बाह्य घटकांची संख्या प्रचंड आहे मोबाईल, सोशल मीडिया, बाह्य तणाव हे सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ध्येयापासून, आपल्या जीवनापासून, आपल्या स्वतःपासून दूर नेऊ पाहतात या सर्वांवर मात करून जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेच्या तयारीत तल्लीन होतो तेव्हा मनाची शक्ती किती प्रचंड आहे हे जाणवते यामुळे आपल्या आंतरिक द्वंद्वाचे, आपल्या अंतर्मनाचा खरा कल जो आहे तो कळतो हीच एकाग्रता पुढे कामाच्या ठिकाणी किंवा जीवनामध्ये वेगवेगळे निर्णय घेताना वेगवेगळे प्रोजेक्ट्स पार पाडताना आणि नेतृत्वात उपयोगी पडते एकाग्र मनच मोठी कामे करू शकते आणि स्पर्धा परीक्षा ही एकाग्रतेची सर्वोत्तम साधना आहे यात शंकाच नाही.
स्पर्धा परीक्षेच्या अशा या प्रवासात आपण स्वतःला ओळखायला शिकतो कोणत्या विषयात आपण मजबूत आहोत, कोणत्या विषयात कमकुवत आहोत, कोणत्या परिस्थितीत आपण तणावाखाली असतो आणि कोणत्या क्षणी आपण स्वतःला पुन्हा उभे करू शकतो हे सर्व आपण स्वानुभवातून शिकतो यालाच आत्मपरीक्षण नाही तर काय म्हणायचे, मुळात आपण असं म्हणू शकतो का? की, आत्मपरीक्षण करायचे असेल तर स्पर्धा परीक्षा हा एक बॅलन्सड पर्याय आहे. अस मी का म्हणतो ह्याच कारण अस की, जर तुम्ही एखाद्या संतांना, किंवा साधूंना विचारलं की आत्मपरीक्षण कसे करावे तर ते तुम्हाला दहा मार्ग सांगतील की आत्मपरीक्षण करायला नाम चिंतन करावं, अमुक करावं, ध्यान करावं पण या सगळ्या गोष्टी आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना करत नाही का तर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण हे सगळं करीतच असतो सांगण्याचा मुद्दा असा आहे की, आपण आपल्या करिअरसाठी एक मार्ग निवडतो आणि त्या क्षणी कळत नकळतपणे आपण स्वतःला घडविण्यासाठी सुद्धा तोच मार्ग निवडतो आणि जेव्हा आपण हे सजगपणे करतो तेव्हा त्याचा परिणाम हा जाज्वल्य असतो. स्पर्धा परीक्षेमध्ये यश येणं किंवा अपयश येणं हा एक वेगळा मुद्दा झाला पण स्वतःला पारखून एक चांगलं आनंदी जीवन घडवणे हे आपल्या सर्वांचच ध्येय नाही आहे का...? मग हे ध्येय जर स्पर्धा परीक्षांची तयारी द्वारा होत असेल तर का नाही कॉल ऑफ टाईम जर आपण बघितलं तर स्पर्धा परीक्षा ही सर्वत्र प्रत्येक ठिकाणी आहे करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर आहे तुम्ही एक करिअर निवडा अथवा दुसरे करिअर निवडा प्रत्येक ठिकाणी स्पर्धा ही अटळच आहे मग असं करत असताना आपण स्वतःला हरवून न घेता स्वतःचा शोध घेऊन स्वतःला आनंदी बनविण्यासाठी प्रयत्न केले तर त्यात काही वावगं नाही आणि जर ही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आपण हे करू शकत असू तर का नाही करायची.
स्पर्धा परीक्षा आपल्याला बरच काही शिकवते त्यामध्ये विनम्रता देखील शिकवते आपण किती नम्र रहावे हेही शिकवतेच कितीही अभ्यास केला कितीही तयारी केली तरी काही प्रश्न आपल्याला अडचणी टाकतात एक क्षण आपल्याला आठवण करून देतात की ज्ञानाचा प्रवास कधी संपत नाही ही विनम्रता पुढे व्यावसायिक आयुष्यात आणि वैयक्तिक आयुष्यातही महत्त्वाची ठरते कारण ती आपल्याला सतत शिकत राहण्याची प्रेरणा देते आणि आपण सदैव एक विद्यार्थी आहोत याची आपल्याला आठवण करून देते शेवटी स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचा मार्ग नाही तर; स्वतःला अधिक सक्षम, संयमी, अधिक दूरदृष्टी असलेला आणि परिपक्व असलेला व्यक्ती बनवण्याची प्रक्रिया आहे.
या प्रवासात आपण केवळ करिअर घडवत नाही तर, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही घडवतो म्हणून स्पर्धा परीक्षा ही एक तत्त्वज्ञानात्मक यात्रा आहे असं मला वाटतं. ही यात्रा आपल्याला शिकवते की यश म्हणजे केवळ लक्ष गाठणे नव्हे तर, त्या लक्षाकडे जाणाऱ्या प्रत्येक पावलात स्वतःला अधिक चांगले सक्षम बनवत जाणे हे होय.
या प्रवासात आपण अपयशाला संधी म्हणून पाहायला शिकतो, वेळेचे महत्व जाणतो, एकाग्रतेचे सामर्थ्य आत्मसात करतो आणि विनम्रतेने सतत शिकत राहतो यश मिळो वा न मिळो या तयारीतून आपण अधिक सक्षम, संयमी आणि परिपक्व व्यक्ती बनतो म्हणूनच खरे जिंकणे हे फक्त निकालात नसून; स्वतःला अधिक चांगले बनविण्याच्या प्रवासात आहे स्पर्धा परीक्षा ही आत्मपरीक्षणाची, आत्मविकासाची आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोणाने पाहण्याची प्रेरणादायी यात्रा आहे.
धन्यवाद.