महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा 'करिअर कट्टा' हा उपक्रम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे. बदलत्या काळात शिक्षणासोबतच योग्य करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य आणि जागतिक स्तरावरील संधींची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे अत्यावश्यक झाले आहे. हीच गरज ओळखून 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी '५२ आठवड्यांची अखंड संवाद शृंखला' हा उपक्रम विशेष उल्लेखनीय आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा ठरला. मा डॉ. तुषाबा शिंदे (IRPS) यांचे सगळे संवाद विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणारेच नव्हे तर एक चांगला माणूस म्हणून जगतांना इतरांना खूश करण्यापेक्षा स्वतःच्या विवेकबुद्धीला आणि प्रामाणिकपणाला धरून जगणे कसे महत्त्वाचे आहे याचेही शिकवण देणारे असे होते.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता, जिद्द आणि कौशल्य दडलेले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मोठी स्वप्ने पाहतात; मात्र योग्य वेळी मार्गदर्शन, माहिती आणि प्रेरणा न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी योग्य संधींपासून वंचित राहतात. काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची अचूक माहिती नसते, तर काहींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या संधींबद्दल जागरूकता नसते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या संवाद शृंखलेची अत्यंत आवश्यकता होती. या संवाद शृंखलेतून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वप्ने पाहणे सोपी आहे पण त्यासाठी झोप उडवणे पण गरजेचे आहे हे सांगतांनाच त्यांना, "स्वप्न मोठी ठेवा, आणि मेहनत त्यापेक्षा मोठी ठेवा", "आयुष्यात काहीतरी नवीन, दिव्य आणि भव्य निर्माण करण्याची जिद्द स्वप्नांतूनच मिळते. हा कानमंत्र विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.
या संपूर्ण संवाद शृंखलेचे प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. तुषाबा शिंदे सर यांनी कोणताही खंड न पडू देता अत्यंत यशस्वीपणे ही शृंखला पूर्ण केली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि विद्यार्थ्यांविषयी असलेल्या आत्मीयतेमुळे ते महाराष्ट्रातील युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. जी व्यक्ती विचारांनी मोठी असते त्यांची उंची न सांगताच समजते त्यासाठी कुठल्याच सेंटीमीटर इंचाची गरजच पडत नाही याची जाणीव झाली ती बारामती येथे विद्यार्थ्यांची त्यांना भेटण्यासाठी झालेली मोठी उपस्थिती बघून. ही उपस्थिती त्यांच्या विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य दिशा देण्याची त्यांची पद्धत अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी आहे.
डॉ. तुषाबा शिंदे सरांचे मार्गदर्शन अत्यंत साधे, समजण्यास सोपे आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला अनुरूप होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात स्वतःमध्ये आवश्यक बदल कसे घडवून आणावेत, वेळेचे नियोजन कसे करावे, ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न कसे करावेत आणि अपयशातून शिकत पुढे कसे जावे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता जीवनातील यश, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचेदेखील महत्त्व समजावून सांगितले.
या ५२ आठवड्यांच्या संवाद शृंखलेअंतर्गत विविध महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला होता. करिअर क्षेत्रातील विविध संधी, प्रशासकीय सेवा, नागरी सेवा परीक्षा, रेल्वे विभागातील रोजगार, Banking आणि PSU क्षेत्र, भारतीय सैन्यदलातील करिअर, MPSC, SSC-CGL, CAPF आणि IFS परीक्षा, Artificial Intelligence आणि Cyber Security मधील रोजगार,आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि शिष्यवृत्ती, MBA प्रवेश परीक्षा, Corporate Career, Hospitality, Tourism, Public Relations, Startups आणि Freelancing यासारख्या अनेक विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय Strategic Dialogue Series अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांना प्रत्यक्ष अनुभवांमधून मार्गदर्शन करण्यात आले. UPSC, MPSC, आंतरराष्ट्रीय शिक्षण, शिष्यवृत्ती, Corporate Career, Social Media आणि Freelancing यांसारख्या विषयांवर झालेली प्रश्नोत्तर सत्रे विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरली. या संवादांमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या आणि त्यांना करिअरकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला.
विशेषतः 'संवाद शृंखला' विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रभावी ठरली. आपल्या २० वर्षांच्या अनुभवाच्या आधारे डॉ. शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना केवळ माहितीच दिली नाही, तर स्वतःच्या जीवनातील संघर्ष, आलेले प्रसंग, घेतलेले निर्णय आणि त्यातून मिळालेले धडे यांचे अनुभवही विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यामुळे प्रत्येक सत्र अधिक जिवंत, वास्तववादी आणि प्रेरणादायी ठरले. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाचे मार्गदर्शन न मिळता योग्य विचारप्रक्रिया, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास विकसित करण्याची प्रेरणा मिळाली.
प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असतो; तरीदेखील समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि विद्यार्थ्यांना घडविण्याची तळमळ डॉ. शिंदे सरांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून आली. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे असतो या जाणीवेतून आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी महाराष्ट्रातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योगदान दिले, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. यातूनच त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ दिसून येते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले की यशाचा प्रवास हा केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नसून सातत्य, संयम, योग्य दिशा आणि कठोर परिश्रम यांचा परिणाम असतो. त्यासाठी केवळ पुस्तकच नाही तर माणसही वाचता आली पाहिजे कारण त्यांचे अनुभव आपले विश्व समृद्ध होण्यास मदत करतात.
या प्रेरणादायी संवाद शृंखलेवर आधारित पुस्तक प्रकाशित होणे ही विद्यार्थ्यांसाठी आणि 'करिअर कट्टा' उपक्रमासाठी अभिमानाची बाब आहे. या पुस्तकामध्ये ५२ आठवड्यांतील विविध सत्रे, मार्गदर्शन, अनुभव आणि प्रश्नोत्तरांचा मौल्यवान ठेवा शब्दबद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हे पुस्तक भविष्यात विद्यार्थ्यांसाठी एक अमूल्य मार्गदर्शक ठरणार आहे. विविध करिअर संधी, स्पर्धा परीक्षा, आंतरराष्ट्रीय शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून कोणत्याही वेळी उपलब्ध होणार आहे. या पुस्तकातील प्रत्येक सत्र विद्यार्थ्यांना योग्य दिशा, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन देणारे ठरेल. बदलत्या काळातील स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची तयारी कशी करावी, संधींचा योग्य उपयोग कसा करून घ्यावा आणि ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न कसे करावेत, याची प्रेरणा हे पुस्तक सातत्याने देत राहील. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक एक प्रेरणादायी साथीदार ठरणार आहे. कारण, अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन मार्गदर्शन घेण्याची संधी मिळत नाही; अशा विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक ज्ञानाचा आणि प्रेरणेचा महत्त्वपूर्ण स्रोत ठरेल.
आज ही संवाद शृंखला पूर्णत्वास जात असली तरी तिचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहणार आहे. डॉ. तुषाबा शिंदे सरांनी दिलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर उपयुक्त ठरणारे आहे. त्यांच्या विचारांनी, अनुभवांनी आणि प्रेरणादायी शब्दांनी हजारो विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याची नवी दिशा दिली आहे. अनेकांच्या स्वप्नांना दिशा मिळणार आहे. हे पुस्तक केवळ संवादांचे संकलन नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ज्ञानसंपदा, मार्गदर्शक दीपस्तंभ आणि यशस्वी आयुष्याकडे नेणारी प्रेरणायात्रा ठरणार आहे. आयुष्य फार सुंदर आहे आणि ते जगण्यासाठी आयुष्याला दिशा मिळण्यासाठी चांगले करिअर असणे पण गरजेचे आहे. ही संवाद शृंखला नक्कीच विद्यार्थ्यांच्या करिअरचा राजमार्ग ठरेल याची खात्री आहे.
यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधीची ओळख महाराष्ट्रातील तरुनांना व्हावी यासाठी ११ मे पासून '५२ आठवड्यांची अखंड संवाद शृंखला' हा उपक्रमाचा पहिला संवाद सुरु झाला आहे. मा. राजीव नंदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक, राज्य नागरी विकास संस्था, यशदा पुढील ५२ आठवडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ही संवाद शृंखला सुद्धा विद्यार्थ्यांना आयुष्यातील टप्प्यावर मार्गदर्शन करणारी ठरेल, त्यांच्या आत्मविश्वासाला स्वप्नांची झालर लावतांनाच परिश्रम, चिकाटी, संयम आणि प्रचंड मेहनत यांची जाणीव करून देणारी यशस्वी संवाद शृंखला असेल.