भावनांच्या जगात डोकावलं की एक गोष्ट नेहमी लक्षात येते, आपल्या सगळ्यांनाच छान आनंददायी भावना हव्याहव्याशा वाटतात आणि दुःखद त्रासदायक भावना आपल्याला अगदी नकोशा होतात.
आपण नेमकं काय करतो या त्रासदायक दुःखद भावनांचं ?
बऱ्याचदा आपण त्या मान्यच करत नाही. कधी कधी आपल्याला कळत असतं पण आपण त्या नकोशा भावनेला दडपून ठेवतो. त्याचा एक चोळामोळा बोळा करून खोलीच्या एका कोपऱ्यात फेकून द्यायचा प्रयत्न करतो, जिथे तो आपल्या दृष्टीला ही नाही पडणार ! कधी कधी आपण स्वतःला सांगतो की मी या त्रासदायक गोष्टींचा स्वतःवर परिणाम होऊ देत नाही, मी नेहमी पॉझिटिव्ह राहतो / राहते.
आपण कधीकधी बहिणाबाईसारख्यांचे दाखले देतो.
माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टाकलं माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडले. त्यामुळे मी फक्त आनंदाच्याच गोष्टी जगाला कळू देणार दुःखाच्या गोष्टी मी माझ्या माझ्याकडेच ठेवणार.
भावनांची तीव्रता कमी असेल तर कधी कधी हे जमूनही जातं. पण त्रासदायक भावना दीर्घकाळासाठी आपण अनुभवत असू किंवा या भावनांची तीव्रता खूप असेल, तर मात्र भावनांकडे दुर्लक्ष करणं, त्या झटकणं हा पुरेसा उपाय नसतो. त्यातून वेगळ्या प्रकारचे त्रास होऊ शकतात. मग ते कदाचित शरीराच्या पातळीवर आजार, दुखणी म्हणून जाणवतात, किंवा मनाच्या, वर्तणुकीच्या पातळीत जाणवतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भावनांना आपल्यापासून दूर लोटतो, त्यांच्यापासून पळ काढतो. अशा भावना आपल्या आत कुठेतरी जास्तच ठाण मांडून बसतात. आपली बरीच शक्ती त्यांना झटकण्यात जात असते. काहीतरी एक वेगळा जडपणा येत जातो आपल्याला.
या त्रासदायक भावनांचं काय करायचं याविषयी गेली पन्नास एक वर्ष अगदी हिरीरिने संशोधन सुरु आहे. हे संशोधन आपल्याला काय सांगतं ? भावना कितीही नकोशी असली, कुठल्याही तीव्रतेची असली, दीर्घकाळ पण ती अनुभवत असलो, तरी पहिलं म्हणजे ती भावना ओळखायची. आणि ती जशी आहे त्या स्वरूपामध्ये तिला स्वीकारायचा प्रयत्न करायचा. आता म्हणजे नेमकं काय करायचं ते पाहूया.
समजा मला व्यासपीठावर, चारचौघांसमोर बोलायची भीती वाटते. जेव्हा जेव्हा माझ्यावर प्रेझेण्टेशन करायची वेळ येते, तेव्हा तेव्हा मी ते टाळायचा प्रयत्न करते. बोलताना आपली काही चूक झाली, तर आपलं हसं होईल असं मला वाटतं. आणि चार चौघांमध्ये आपलं हसं होईल या कल्पनेनेच मला फार भीती वाटते. कदाचित असं काही माझ्याबरोबर आधी झालेलं असतं. मागे कधी मी चार चौघांमध्ये बोलले होते आणि माझं काहीतरी चुकलं आणि लोक हसले होते. ते हसणं अजून माझ्या मनामध्ये जिवंत आहे. मी त्याला अपमान म्हणून, एक लाजिरवाणा अनुभव पाहत आले आहे. आणि पुन्हा असं काही झालं तर पुन्हा त्या लाजिरवाण्या अनुभवाला सामोरं जायची करायला माझी तयारी नाही आहे, इतकी मला त्या अनुभवाची भीती वाटते. मग मी काय करते, तर प्रेझेण्टेशनचं काम गटात दुसऱ्या कोणाला तरी सांगते, काहीतरी सबबी सांगते, किंवा मग त्या दिवशी हजरच राहत नाही. इतरांना काही खोट्यानाट्या कथा रचून सांगते. पण मला भीती वाटते हे मी सांगत नाही. मला व्यासपीठावर बोलायचीभीती वाटते हे सांगायची मला लाज वाटत असते किंवा मला त्या भीतीची भीती वाटत असते. की इतरांना जर कळलं तर ते माझ्याबद्दल काय बोलतील, याची मला भीती वाटते. मी तो प्रसंग टाळते तेव्हा तेवढ्यापुरती ती भीती माझा पिच्छा सोटते असं मला वाटतं. पण असाच दुसरा प्रसंग आला की ती भीती दुप्पट जोमाने माझ्या दारात डेरेदाखल होते.
अशावेळी ती भीती स्वतःकडे मान्य करणे हा त्याच्यावरचा पहिला उपाय असतो. गंमत पहा भावना जितकी त्रासदायक तितकी ती दूर लोटण्याकडे आपला कल असतो त्या प्रोसेस मध्ये आपला भावनिक मेंदू आणि विचार करणारा मेंदू यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा ताण निर्माण होतो, ज्या क्षणी आपण ती भावना ओळखतो, त्या क्षणी आपला भावनिक मेंदू थोडा शांत होतो आणि भावनिक मेंदूमध्ये आणि विचार करणाऱ्या मेंदूमध्ये एक प्रकारची एकवाक्यता (हार्मनी) निर्माण होते, आणि त्यातून त्या नकोशा वाटणाऱ्या भावनेची तीव्रता थोडी कमी होऊ शकते. यावर झालेलं प्रचंड संशोधन पुन्हा-पुन्हा हीच बाब अधोरेखित करतं आहे. आणखी एक उदाहरण घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला असूया (जेलसी) वाटत असेल आणि आपण ते मान्यच करत नसू तर वेळी नव्या नव्या प्रसंगांमधून त्या असूयेची आपल्याला जाणीव होते, ती आपल्याला अस्वस्थ करून सोडते. अशा वेळी मला असूया वाटतेय, हे मान्य केलं तर त्या अस्वस्थतेपासून थोडीशी तसल्ली मिळू शकते.
कॅथरीन कीर्सान्स्की आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात एक प्रयोग केला. प्राणीसंग्रहालयात जाऊन तरॅन्टुला पाहणं, त्याच्या पिंज-यासमोर उभं राहणं असा तो प्रयोग होता. हा तरॅन्टुला हा भला मोठा महाकाय कोळी. त्याचं दर्शन जरा जास्तच भीतीदायकच असतं.
या प्रयोगात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे चार गट केले होते. पहिल्या गटातल्या व्यक्तींना त्यांची भीतीची भावना ओळखायला सांगितली होती. दुसऱ्या गटातल्या व्यक्तींना स्वतःला डिस्ट्रॅक्ट करायला सांगितलं होतं. म्हणजे नेमकं काय करायचं तर भीती वाटते हे मान्य न करता, आता उद्या मी काय करणार आहे किंवा माझ्या आयुष्यातल्या अन्य काही गोष्टींकडे स्वतःच लक्ष वेधायचं, या प्रकाराने स्वतःलाच डिस्ट्रॅक्ट करायचं होतं. तिसऱ्या गटातले व्यक्तींना तर्कबुद्धीने भीतीच्या भावनेकडे पाहायचं होतं. म्हणजे मी तर सेफ आहे, तो तरॅन्टुला तर पिंजऱ्यात आहे, त्यामुळे मी तसं घाबरायचं कारण नाही असं स्वतःचं स्वतःला समजावयाचं होतं. आणि चौथ्या गटातल्या लोकांना काहीही न करता केवळ त्या पिंजऱ्याकडे चालत जायचं होतं. या प्रयोगात सहभागी होणाऱ्या सगळ्या मंडळींचा ब्रेन स्कॅन केला गेला होता. एक आठवड्याने या सगळ्यांना पुन्हा एकदा तरॅन्टुलाच्या पिंजऱ्याकडे नेण्यात आलं. पहिल्या गटातल्या मंडळींनी, ज्यांनी स्वतःची भीती ओळखली होती आणि मान्य केली होती, त्यांच्या ब्रेन स्कॅन मध्ये या वेळेला भीतीची भावना खूप कमी प्रमाणात आली होती.
या संशोधनाने आपल्याला मोठाच दिलासा दिला आहे, आणि भावना ओळखण्यासाठी एक वेगळं प्रोत्साहन आपल्या हातात आणून दिलं आहे. चला तर मग सुरुवात करु या की... भावना कितीही नकोशी असो, ती ओळखूया, तिचा स्वीकार करुया आणि त्याची धार कमी करायला स्वतःलाच मदत करुया.