Author
" करिअर संसदेतील मुख्यमंत्री पदापासून इंटरनशिप पर्यंतचा माझा एक वर्षाचा प्रवास "
वेदिका संतोष थोरात
पुणे विभागीय जिल्हा नियोजन समिती, समन्वयक

एका साध्या विद्यार्थिनीपासून विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांपर्यंतचा माझा हा प्रवास "करिअर कट्टा" मुळे शक्य झाला. गेल्या एका वर्षात मला जे काही शिकायला मिळालं, ज्या संधी मिळाल्या आणि ज्या लोकांमुळे स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, त्या सगळ्यांचं श्रेय करिअर कट्टालाच जातं.

सुरुवातीला करिअर कट्टामध्ये सहभागी होताना फक्त नवीन गोष्टी शिकायच्या आणि स्वतःमध्ये बदल घडवायचा एवढाच विचार होता. पण हळूहळू हे व्यासपीठ माझ्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग बनत गेलं. विद्यार्थ्यांसोबत काम करताना, विविध उपक्रमांमध्ये सहभागी होताना आणि जबाबदाऱ्या सांभाळताना माझ्यातील नेतृत्वगुण विकसित होत गेले.

या प्रवासातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे "करिअर संसदेच्या मुख्यमंत्री" म्हणून काम करण्याची मिळालेली संधी. मुख्यमंत्री म्हणून काम करताना विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणं, टीमसोबत काम करणं, कार्यक्रमांचं नियोजन करणं आणि नेतृत्व करत निर्णय घेणं या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवता आल्या. त्या काळात प्रत्येक दिवस नवीन शिकवण देणारा होता.

त्यानंतर दिल्ली दौऱ्याची संधी मिळाली. सुरुवातीला दिल्ली दौऱ्यासाठी राज्यातील Top 12 मध्ये माझी निवड झाली होती. त्यानंतर दिल्ली दौऱ्यातील कामगिरी, सहभाग आणि केलेलं काम पाहून पुन्हा निवड करण्यात आली आणि माझं Top 3 मध्ये सिलेक्शन झालं. हा क्षण माझ्यासाठी खूप अभिमानाचा होता. दिल्लीमध्ये विविध ऐतिहासिक आणि प्रशासकीय स्थळांना भेट देता आली. देशाची प्रशासनव्यवस्था जवळून पाहण्याची संधी मिळाली. याच दौऱ्यात विविध उद्योजक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल ऐकताना एक गोष्ट खूप जाणवली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि सातत्य असेल तर यश मिळतंच.

याच काळात मला "आधुनिक सावित्री" यांच्या मुलाखती घेण्याची देखील संधी मिळाली. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधताना त्यांच्या संघर्षमय प्रवासातून खूप प्रेरणा मिळाली. विशेष म्हणजे, त्या मुलाखतींचं शब्दांकन करण्याची जबाबदारी देखील माझ्यावर होती. त्या मुलाखती करिअर कट्टाच्या मासिकामध्ये प्रकाशित झाल्या, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. या अनुभवामुळे लेखनकौशल्य, संवादकौशल्य आणि विचार मांडण्याची पद्धत अधिक विकसित झाली.

या संपूर्ण प्रवासात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे सर, करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक डॉ. सुनिल ओगले सर, करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. संजय खिलारे सर, अन्न तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक सुजाता पाटील मॅडम आणि करिअर कट्टा अध्यक्ष माननीय यशवंत शितोळे सर यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरलं. विशेषतः शितोळे सरांनी माझ्यावर विश्वास ठेवून अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्या जबाबदाऱ्या सांभाळताना आत्मविश्वास वाढत गेला आणि स्वतःमध्ये खूप सकारात्मक बदल जाणवू लागला.

या प्रवासात राज्यस्तरीय उत्कृष्ट करिअर संसद पदाधिकारी पुरस्काराने सन्मानित होण्याचा क्षण माझ्यासाठी खूप खास होता. या पुरस्कारामुळे माझ्या कामाची दखल घेतली गेली आणि पुढे अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर महाविद्यालयाने देखील लॅपटॉप खरेदीसाठी २५ हजार रुपये बक्षीस दिले. हा माझ्या कामावर ठेवलेला विश्वास होता.

त्यानंतर जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढे पुणे विभागीय विद्यार्थी समन्वयक आणि पुणे जिल्हा विद्यार्थी समन्वयक म्हणून जबाबदारी मिळाली. सध्या या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची, विविध उपक्रम राबवण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळत आहे.सध्या मी करिअर कट्टा Internship करत असून या माध्यमातून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत आहे. Internship मुळे कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. वेळेचं व्यवस्थापन, टीमवर्क, जबाबदारी आणि व्यावसायिकता या गोष्टी शिकायला मिळत आहेत.

याच काळात करिअर कट्टामुळेच मला घोडेगाव "Strawberry Processing Project" मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या प्रोजेक्टदरम्यान "Kapila Food" च्या CEO उद्योजिका गांधाली डिंडे मॅडम यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या उद्योजकीय प्रवासातून खूप प्रेरणा मिळाली. मुलाखतीनंतर त्यांनी माझं काम पाहून मला "Trainer" म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यानंतर शेतकऱ्यांना Strawberry Processing संदर्भात प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. विद्यार्थीदशेत असताना शेतकऱ्यांसमोर उभं राहून त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण देणं हा खूप वेगळा आणि आत्मविश्वास वाढवणारा अनुभव होता. या कामासाठी मला पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं. हा अनुभव माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आणि शिकण्यासारखा ठरला.

आज मागे वळून पाहताना एक गोष्ट नक्की जाणवते. करिअर कट्टाने मला फक्त व्यासपीठ दिलं नाही, तर स्वतःची एक नवी ओळख दिली. गेल्या एका वर्षात मिळालेल्या प्रत्येक संधीने मला घडवलं, शिकवलं आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. अजून खूप काही शिकायचं आहे, पण या प्रवासाने पुढच्या वाटचालीसाठी एक मजबूत पाया नक्कीच तयार केला आहे.

शेवटी, माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या करिअर कट्टा परिवाराचे मनापासून आभार. या व्यासपीठामुळेच मला स्वतःला सिद्ध करण्याची, शिकण्याची आणि नवीन संधी अनुभवण्याची ताकद मिळाली. पुढेही याच विश्वासाने आणि शिकण्याच्या वृत्तीने काम करत राहण्याचा प्रयत्न नक्कीच असेल.

धन्यवाद..!