आयुष्यात आपण किती पुस्तके वाचतो यापेक्षा आपण परिस्थितीकडून आणि मिळालेल्या संधींमधून काय शिकतो, याला जास्त महत्त्व असतं. गेल्या काही महिन्यांत 'करिअर संसद', दिल्ली दौरा', 'जिल्हा नियोजन समिती', आणि आता सुरू असलेली 'इंटर्नशिप'... या करिअर कट्टा तर्फे मिळालेल्या सुवर्णसंधींनी माझ्या जगण्याला आणि विचार करण्याच्या पद्धतीला एक नवा आयाम दिला आहे. हा केवळ एक प्रवास नव्हता, तर ती माझी स्वतःची एक नव्याने झालेली ओळख आहे.
या संपूर्ण प्रवासाने मला काय दिले? मी काय शिकले ? तर
व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी आवश्यक कौशल्य
या प्रवासाची सुरुवात करिअर संसदेपासून झाली. सर्वप्रथम करिअर संसदेमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना टीमवर्क कशा पद्धतीने केले जाते, वेगवेगळी टास्क पूर्ण करणे, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणे अशा नवनवीन गोष्टी तेथे शिकायला भेटल्या. त्यानंतर दिल्ली दौऱ्याच्या माध्यमातून दिल्लीमध्ये मराठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी मिळाली त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली त्यामधून त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेतला. प्रशासन काय असतं, कसं काम करत ते खूप जवळून पाहता आलं. वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटत गेले, तसतसा माझा स्वतःवरचा विश्वास वाढत गेला. औपचारिकता कशी पाळावी, वक्तशीरपणाचे काय महत्त्व असते आणि संकटसमयी संयम कसा ठेवावा, या गोष्टी मी जवळून अनुभवल्या. केवळ कपडे किंवा दिसणे म्हणजे व्यक्तिमत्त्व नव्हे, तर तुमचे विचार आणि तुमचे वागणे यात असलेली प्रगल्भता म्हणजे खरा व्यक्तिमत्त्व विकास, हे मला या प्रवासाने शिकवले.
त्यानंतर पुढे जिल्हा नियोजन समितीत आल्यापासून जिल्हा नियोजन समितीच्या बैठका घेणे, वेळेवर उपस्थित राहणे, सर्वांपर्यंत संदेश पोहचवणे, शिस्त पाळणे या नवीन गोष्टी मी शिकत गेले. जिल्हा नियोजन समितीच्या संपर्कात आल्यापासून सर्वांशी संवाद साधने चर्चा करणे या गोष्टी वाढल्या यामुळे संवादाचे महत्त्व मला पावलोपावली जाणवले. आपले मत दुसऱ्यासमोर प्रभावीपणे कसे मांडायचे, योग्य शब्दांची निवड कशी करायची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समोरच्याचे म्हणणे शांतपणे कसे ऐकून घ्यायचे, हे कौशल्य मी इथे शिकले. संवाद म्हणजे फक्त बोलणे नव्हे, तर तो विचारांची देवाणघेवाण करणारा पूल असतो, हे सत्य मला या प्रवासात उमजले.
आता सुरू असलेल्या इंटर्नशिपच्या माध्यमातून मला प्रत्यक्ष काम कसे चालते, याचा अनुभव येत आहे. नियोजन करणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच त्याची अचूक अंमलबजावणी (Execution) करणे गरजेचे असते. कोणतीही अडचण आल्यावर थांबून न राहता 'काम कसे पूर्ण करायचे', हा दृष्टिकोन माझ्यात रुजला आहे. टीमवर्क, डेडलाईन्स पाळणे आणि कामाचा दर्जा राखणे या गोष्टी माझ्या दिनचर्येचा भाग बनल्या आहेत. त्याचबरोबर सतत कामाच्या थॉट प्रोसेसिंग मध्ये राहून काम करणे, या गोष्टीमुळे काम करणारी सोपं वाटत आहे.
थोडक्यात सांगायचे तर... करिअर संसदेने मला नेतृत्वाची दृष्टी दिली, जिल्हा नियोजन समितीने शिस्त शिकवली, दिल्ली दौऱ्याने माझ्या विचारांची क्षितिजे रुंदावली आणि आता इंटर्नशिप मला भविष्यासाठी सक्षम बनवत आहे.
हा प्रवास अजून संपलेला नाही, ही तर केवळ सुरुवात आहे. पण या प्रवासाने मला एका साध्या विद्यार्थ्याकडून एक जबाबदार आणि आत्मविश्वासी नागरिक बनवण्याच्या दिशेने नक्कीच पुढे घेऊन जात आहे. या सर्व संधीं मला उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल माझे कॉलेज, प्राचार्य आणि करिअर कट्टा यांचे मनापासून आभार !