Author
" स्त्री सक्षमीकरण "
प्रा. सायली लाखे पिदळी
सदस्य, राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती, करिअर कट्टा

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फलाः क्रियाः ।। अर्थः ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो, पूज्य मानले जाते, त्या ठिकाणी देवताही आनंदाने वास करतात परंतु ज्या ठिकाणी स्त्रियांचा अपमान होतो, त्यांना योग्य मान मिळत नाही, तेथील सर्व कर्मे निष्फळ ठरतात...

मानवजातीच्या प्रगतीचा पाया स्त्री पुरुष समानतेत आहे. स्त्री ही केवळ घराची धुरिण नसून समाजाच्या घडणीतील महत्त्वाची शक्ती आहे तिच्या क्षमतांना संधी देणे, तिच्या आवाजाला महत्व देणे आणि तिच्या स्वप्नांना आकार देणे हाच महिला सक्षमीकरणाचा खरा अर्थ आहे.

अलीकडे स्त्री सक्षमीकरणाची चर्चा सर्वत्र जोरात सुरू असते त्या चर्चेमागे स्त्री विषयक सहानुभूती असते की केवळ पवित्र असतो हे आपण समजून घ्यायला हवे. खरे तर, आता स्त्रियांमधले शिक्षणाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले आहे त्यांचे आत्मनिर्भरतेचे प्रमाणही वाढले आहे. तिचं विश्व केवळ चूल आणि मूल एवढं सीमित राहिलं नाही. पुरुषाच्या बरोबरीने ती आज प्रत्येक क्षेत्रात वावरताना दिसते आहे तिने स्वतः आपले संकुचित क्षेत्र सोडून देऊन एका मोठ्या विश्वाकडे झेप घेतली आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री शक्तीला विशेष महत्त्व आहे ती आदिशक्ती, आदिमाता म्हणून ओळखली जाते या आदिशक्तीला आपण या विश्वाची निर्माणकर्ती म्हणून महत्त्व देतो, मान देतो. आपल्या पुराण संस्कृतीत सुद्धा या शक्तीला अतिशय महत्त्व दिलेले आहे पण पुढे मात्र काळाच्या प्रवाहात स्त्री ही पुरुषाच्या जीवनात दुय्यम घटक म्हणून मानली जाऊ लागली. त्यामागे तिच्यातील नैसर्गिक शारीरिक दुर्बलता, लिंगभेद आणि यातून तिच्या वाट्याला आलेली असुरक्षितता याचा प्रभाव सर्वत्र जाणवू लागल. पुरुषाशिवाय स्त्री ही दुय्यम असुरक्षित समजली जाऊ लागली तिच्यावर सामाजिक बंधने आली या बंधनाचेच रूपांतरण नंतर पारतंत्र्यात झाले केवळ सामाजिक नव्हे तर, लैंगिक परिप्रेक्ष्यात सुद्धा स्त्री ही परावलंबी समजली जाऊ लागली त्याचा परिणाम तिच्यावर लादलेली बंधने पारतंत्र्य या गोष्टीतच तिला आपली सुरक्षितता वाटू लागली तो पिंजरा सोन्याचा वाटू लागला आणि संपूर्ण मध्ययुगीन काळ तिच्या आणि तिच्याविषयीच्या या संकल्पनांनी बंदिस्त झाला आपण स्त्री स्वातंत्र्याच्या संबंधात उदाहरणे देताना वैदिक आणि वैदिक उत्तर काळातील गार्गी, मैत्री, लोपमुद्रा किंवा बुद्ध काळातील भिक्खूंची उदाहरणे देतो आपल्या वारकरी संप्रदायात महानुभाव संप्रदाय सुद्धा अशा काळची संत कवयित्रींची उदाहरणे आहेत म्हणून स्त्री मुक्ती झाली होती किंवा स्त्रीला तिचा आवाज प्राप्त झाला होता असे म्हणणे केवळ आपल्या समाधानापुरते ठरेल या स्त्रियांच्या संदर्भात प्रस्तुत उदाहरणे वेगळ्या पद्धतीने समजून घेता येईल एकटा चोखामेळा वारकरी संप्रदायात गेले म्हणून संपूर्ण दलित समाजाची उन्नती झाली असे ठरले नाही तसेच या काही ठराविक कवयित्री किंवा स्त्रिया त्या त्या संप्रदायात दिसत असल्या तरी सर्वसामान्य स्त्री मात्र अद्यापही त्याच बंदिस्त चौकटीत वावरत होती तिच्यावर तेव्हाही पुरुष सत्ताच कार्यरत होती तिचा उद्राता तारणहार पुरुष होता आणि त्याची अनेक उदाहरणे आपल्या धर्माग्रंथात पुराणग्रंथात दिसून येतात आणि आश्चर्य म्हणजे हे धर्मग्रंथ पुराण ग्रंथ तत्सम चालीरीती पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक प्रिय होते त्यासाठी ते आपल्या प्राण्याची सुद्धा आहुती देण्यास मागे पुढे पाहत नव्हत्या अर्थात त्यांची मानसिक जडणघडण तशीच करण्यात आली होती हेही त्यामागचे महत्त्वाचे कारण होते. अल्पशिक्षित, श्रद्धाळू भाबड्या, अविकसित बुद्धी आणि मन घेऊन मर्यादित वतुर्कात समाज मान्य संकेतांना शरण जात वावरणाऱ्या बहुसंख्य स्त्रिया आणि काही संवेदनशील प्रगल्भकवयित्री संत तसेच बुद्धिमान कार्यकुशल राजकारणी आणि युद्धपटू, विरांगणा अशा कर्तृत्ववान स्त्रिया शिवकाळापासून पेशवाईच्या अस्तापर्यंतच्या कालखंडाची स्त्री जीवनाच्या संदर्भात दर्शन अशा प्रकारचे आहे.

इंग्रजी अमलात इथे मिशनऱ्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या आणि १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत त्या शाळांमधून शिकणाऱ्या तुरळक मुली या मुख्यतः समाजाच्या तळामधून आलेल्या आणि अत्यंत हलाखीत कुटुंबांमधून आलेल्या मुली होत्या इंग्रजी शिक्षणाने नव्या ज्ञानविधानाची ओळख झाल्यानंतर स्त्री जीवनाचा विचार सहानुभूतीने करू लागलेल्या उच्चशिक्षित तरुण वर्गाने सुरू केलेल्या शाळा आणि बहुजन समाजाला ज्ञानी करण्याच्या तळमळीतून महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळा यांचा उदय १९ व्या शतकाच्या मध्यावर झाला आणि हळूहळू या शिक्षणाचा झिरपा मोठ्या प्रमाणावर होत गेला.

महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य भारतीय समाजाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरले आहे. ज्योतिराव फुले यांनी १८४८ साली पुण्यात भिडे वाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्यांचा विश्वास होता की शिक्षण हे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी अत्यावश्यक आहे. त्यांनी जातीभेद अस्पृश्यता आणि स्त्रियांच्या शिक्षणावरील बंधने याविरुद्ध लढा दिला त्यांच्या मते शिक्षणामुळे स्त्री आत्मनिर्भर होऊ शकतात आणि समाजात समानतेचा पाया रचला जाऊ शकतो तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःला समर्पित केले आणि समाजातील विरोधाला तोंड शिक्षणाचा प्रसार केला. स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वाभिमान आणि आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामध्ये शिक्षण स्त्रियांच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. एकीकडे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गोपाळराव आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांच्यासारखे इतरही श्रेष्ठ सुधारक विचारवंत आणि दुसरीकडे काशीबाई नवरंगे, काशीबाई हेर्लेकर, शांताबाई, जगु ताई जोशी यांच्यासारख्या कितीतरी बुद्धिमान शिक्षित स्त्री १९ व्या शतकाचे उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध यांनी गाजवला आहे. महात्मा फुले यांच्या कार्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तर स्त्री पुरुष तुलना यासारख्या विलक्षण परखड निबंध लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे, पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी, चिंतनशील उत्तम लेखिका काशीबाई कानिटकर, लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी आणि अशा आणखी कित्येक कर्तबगार स्त्रियांनी या काळात एकूण स्त्री जीवनाचे विकाससन्मुख दर्शन मोठ्या धैर्याने घडवले आहे या काळात स्त्री जीवनात बदल घडला तो शेकडो वर्षाचा इतिहास पाहता फार मोठा वेगवान आणि आमूलाग्र बदल होता केवळ कुटुंबाच्या परिघात वावरणाऱ्या स्त्रिया या काळात बाहेर पडल्या सार्वजनिक जीवनात वावरू लागल्या प्रारंभ काळात जरी शिक्षण आणि सुश्रुषा ही दोन क्षेत्र तिला मिळाली तरी हळूहळू इतरही सामाजिक क्षेत्रांमध्ये ती काम करू लागली अर्थाजन करू लागली तिने मतदानाचा हक्क मिळवला ती कायदेकॉन्सिल मध्ये प्रविष्ट झाली क्वचित क्रांतिकार यांच्या चळवळीतही शिरली. महात्मा गांधीजींनी सारा देश हलवला आणि प्रभात फेऱ्यांमधून सत्याग्रही तुकड्यांमधून गटागटांमधून खादीचा प्रचार करणाऱ्या समूहांमधून हजारो सर्व साधारण स्त्रिया बाहेर पडल्या तिने स्वतःची बंधने स्वतःच्या हिमतीने तोडली होती उदार सहृदयी सुधारक पुरुषांचा आधार घेत त्यांच्या मार्गदर्शनाने आणि मदतीने ती स्वतःच्या प्रगतीच्या वाटा चोखाळत होती सामाजिक टीका, बहिष्कार, छळ यांचा धैर्याने स्वीकार करत त्या काळातल्या स्त्रियांनी जे यश संपादन केले त्याचे मूळ त्यांनी दिलेली किंमत पाहता फार मोठ्या आहेत यात शंकाच नाही आणि म्हणूनच खऱ्या अर्थान त्याकाळी स्त्री शिक्षणाची पायाभरणी झाली आणि त्यातून त्या परंपरेला पुढे जोपासत आजच्या आधुनिक सावित्री त्यांच्या कर्तुत्वाने उभ्या झाल्यात.

'तिच्या डोळ्यात स्वप्न नवे, तिच्या पावलात गती, सशक्त होऊन उभी आहे ती नवीन युगाची तीच ज्योती'

महिला सक्षमीकरणाचा समाजावर खूप सकारात्मक परिणाम होतो हे परिणाम आर्थिक स्तर, सामाजिक स्तर, राजकीय स्तर, कौटुंबिक स्तर आणि सांस्कृतिक स्तर अशा विविध स्तरांवर दिसून येतात महिला सक्षमीकरणामुळे सशक्त आणि समतोल समाज निर्माण होतो महिलांचे योगदान कला, साहित्य आणि संस्कृती या सगळ्या क्षेत्रांमध्ये समाजाला नवीन दृष्टिकोन प्राप्त करून देतो.

महिला सक्षमीकरणाचे परिणाम

१) कुटुंबात समतोल वाढतो.

२) समाजात न्याय समता आणि प्रगती साध्य होते.

३) राष्ट्राच्या विकासात स्त्री-पुरुष दोघेही समान योगदान देतात. महिला सक्षमीकरण ही केवळ सामाजिक चळवळ नाही तर, मानवी मूल्यांची पुन्हा नव्याने स्थापना आहे. स्त्रीला तिच्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करण्याची संधी दिली असता ती समाजाला नव्या दिशेने नेऊ शकते. 'स्त्रीशक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती' हे विधान अधिक प्रभावीपणे जाणवते.

धन्यवाद..!