Author
" आनंदी स्त्री ऊर्जेचे गमक "
मा. डॉ. मैथिली सावंत
Feminine Energy Coach

प्रिय सखी,

आजची तुझी सकाळ नेहमीसारखीच होती का ?

अलार्म वाजला, तू डोळे चोळत उठलीस, लगेच फोन चेक केलास आणि सुरू झाली तुझी धावपळ !

कॉलेजचे असाइनमेंट्स, ऑफिसचे डेडलाईन्स, सोशल मीडियाचे ट्रेंड्स आणि त्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. हो ना?

आपण सगळ्याच जणी सध्या एका अशा जगात वावरतोय जिथे 'Hustle culture' आहे.

सतत कामात राहणं आणि कोणापेक्षा तरी पुढे जाणं यालाच यश मानलं जातंय.

पण या सगळ्या धावपळीत, कधीतरी रात्री आरशासमोर उभी राहिल्यावर तुला असं वाटलं आहे का, की तू स्वतःला कुठेतरी हरवून बसली आहेस? तुझं वागणं खूप रुक्ष झालं आहे? तुला थकवा जाणवतोय, पण तो शारीरिक नाही तर मानसिक आहे?

जर तुझे उत्तर 'हो' असेल, तर तुला कदाचित तुझ्या आयुष्यात 'Feminine Energy' ची कमतरता जाणवत आहे.

आता तुला प्रश्न पडला असेल की ही 'Feminine Energy' नक्की काय आहे?

हे उलगडून सांगण्यासाठी एक छोटी गोष्ट सांगते.

कल्पना कर. एक नदी आणि एक पर्वत आहे. पर्वत हा स्थिर आहे, कणखर आहे, तो बदलायला तयार नसतो. ही आहे 'Masculine Energy' (पुरुषी ऊर्जा). दुसरीकडे आहे नदी. ती वाहती आहे, ती वळण घेते, ती लवचिक आहे, ती सृजनशील आहे आणि ती जीवन शक्ती आहे. ही आहे 'Feminine Energy'.

आपल्या प्रत्येकामध्ये या दोन्ही ऊर्जा असतात. जेव्हा आपण काहीतरी साध्य करण्यासाठी कष्ट करतो, शिस्त पाळतो, तेव्हा आपण आपल्या Masculine Energy मध्ये असतो. पण जेव्हा आपण आनंद घेतो, विश्रांती घेतो, नवीन काहीतरी तयार करतो आणि आपल्या भावनांशी जोडले जातो, तेव्हा आपण आपल्या Feminine Energy मध्ये असतो.

आजच्या नव्या पिढीतील मुली नव्या विचारांच्या आहेत व पुर्वीच्या स्त्रियांच्या तुलनेत सर्वच क्षेत्रात त्यांनी नक्कीच खूप प्रगती केली आहे, पण 'यशस्वी' होण्याच्या नादात तुमच्यातील त्या सुंदर, मृदू आणि शक्तिशाली स्त्रीत्वाला तुम्ही मागे तर नाही ना सोडले ? हे तुम्ही वेळोवेळी तपासून पाहायला हवे असे फेमिनीन एनर्जी कोच या नात्याने मी सुचवीन.

आजकाल 'Dark Feminine' आणि 'Light Feminine' असे शब्द तुम्ही सोशल मीडियावर ऐकले असतील. 'Light Feminine' म्हणजे तिची मायाळू, काळजी घेणारी आणि कोमल बाजू. तर 'Dark Feminine' म्हणजे तिची स्वतःची किंमत जाणणारी, सीमारेषा (Boundaries) निश्चित करणारी आणि अत्यंत आत्मविश्वासू बाजू.

स्त्रीत्व म्हणजे फक्त 'गोड बोलणं' नव्हे. स्त्रीत्व म्हणजे स्वतःच्या भावनांचा आदर करणं. जेव्हा तुम्ही स्वतःचं सत्य लोकांसमोर न घाबरता शांत शब्दात मांडता, जिथे नकार द्यावासा वाटतो तिथे 'नाही' म्हणायला शिकता, तेव्हा तुम्ही तुमच्यातील इंन्ट्युशन शक्तीचा वापर करत असता.

लव्ह रिलेशनशिपमध्ये सुद्धा आपल्यातील ही Feminine Energy खूप महत्त्वाची आहे.

आजच्या डेटिंग च्या जगात 'Golden Retriever' बॉयफ्रेंड हवा किंवा 'Black Cat' एनर्जी असलेली मुलगी बना असे सल्ले तुम्ही सोशल मिडियावर ऐकले असतील. हे ट्रेंड्स फक्त गंमत म्हणून नाहीत, तर ते ऊर्जेचा खेळ आहेत.

लव्ह रिलेशनशिप मधे फेमिनीन व मॅस्क्युलिन एनर्जी बॅलन्स खूप महत्वाचा असतो. तो जपण्यासाठी स्त्रीने मॅस्क्युलिन न बनता तिच्या फेमिनीन एनर्जी मधे राहाणं फार गरजेचं आहे.

जेव्हा आपण नात्यात सतत 'कंट्रोल' करायचा प्रयत्न करतो, सगळं नियोजन आपणच करतो, समोरच्या व्यक्तीला बदलायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण Masculine Energy मध्ये असतो. यामुळे स्त्रियांना स्वतःलाच थकवा येतो आणि नात्यातील समोरच्या व्यक्तीलाही स्त्रीचा भार वाटू लागतो. याउलट Feminine Energy मध्ये असणे म्हणजे 'Receiving' मोडमध्ये असणं. प्रेम स्वीकारणे, मदत स्वीकारणे आणि स्वतःला व समोरच्याला मोकळं सोडणं. जेव्हा स्त्री स्वतःच्या शांततेला एन्जॉय करत असते, तेव्हा ती पुरूषाला अधिक 'Magnetic' (आकर्षक) वाटतेस. तिला कोणाच्या मागे धावण्याची गरज पडत नाही तर गोष्टी आपोआप तिच्याकडे चालून येतात.

प्रिय सखी,

जर तुला वाटत असेल की तुझं आयुष्य खूप 'Machine' सारखं झालं आहे, तर खाली सुचवलेले हे काही छोटे बदल करून बघ.

१. स्वतःच्या शरीराशी संवाद साधणे. जिममध्ये जाऊन तासनतास धावणे ही एक गोष्ट झाली, पण कधीतरी संथ गाण्यावर डान्स करून बघ. शरीराच्या हालचालींमध्ये एक प्रकारची नजाकत येऊ दे.

२. निसर्गाच्या सानिध्यात राहा. मातीचा वास, फुलांचे रंग, वाहत्या पाण्याचा आवाज हे सर्व तुला तुझ्या मूळ ऊर्जेशी जोडतात.

३. तुझ्यातील क्रिएटिव्हिटीला वाव दे. चित्र काढणं, डायरी लिहिणं, जेवण बनवणं किंवा अगदी घराची साफसफाई करुन घर सजवणं. ज्या कामात तुला वेळेचं भान राहत नाही, ते काम म्हणजे तुझ्या स्त्रीत्वाचा आविष्कार आहे.

४. विश्रांतीचा आनंद घेणं. 'गिल्ट-फ्री' (Guilt-free) विश्रांती घेणे तुला स्वतःला शिकवावं लागेल. सतत कामात राहायला हवं, सतत काहीतरी केलंच पाहिजे, हा विचार मनातून काढून टाक. कधीतरी फक्त शांत बसून चहा पिणे हे सुद्धा एक प्रकारचे मेडिटेशन आहे.

५. लक्षात ठेवं. 'Soft' असणं हा तुझा कमकुवतपणा नाही, तर ताकद आहे. आपल्याला नेहमी शिकवलं जातं की जगात टिकायचे असेल तर "Hard' व्हावे लागेल. पण विचार कर, हिरा हा कडक असतो म्हणून तो तुटू शकतो, मात्र पाणी हे मऊ असतं आणि त्यामुळे मोठ्या मोठ्या दगडांनाही चिरून आपला रस्ता ते शोधतं.

तुझं संवेदनशील असणं, तुला लोकांची काळजी वाटणं, तुझं रडणं किंवा तुझ हसणं हा तुझा कमकुवतपणा नाही. ती तुझी शक्ती आहे. या जगात जिथे सगळे एकमेकांशी स्पर्धा करत आहेत, तिथे तुझी शांतता आणि तुझं सौजन्य तुला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल.

आणखी एक छोटी गोष्ट आठवणीत ठेव.

कल्पना कर, तू एका सुंदर बागेत आहेस. तुला एक फुलपाखरू पकडायचे आहे. तू त्याच्या मागे धावलीस, तर ते उडून जाईल. तू थकून जाशील. पण जर तू शांतपणे एका जागी बसलीस, स्वतःला सुंदर सजवले आणि स्वतःच्या सुगंधात मग्न झालीस, तर ते फुलपाखरू स्वतःहून येऊन तुझ्या खांद्यावर बसेल.

तुझं आयुष्यही असंच आहे. जेव्हा तू तुझ्या Feminine Energy मध्ये स्थिर होतेस, तेव्हा तुला हव्या असलेल्या गोष्टी (यश, प्रेम, शांती) तुझ्याकडे आकर्षित होतात. तुला त्यांच्या मागे धावण्याची गरज पडत नाही.

माझ्या प्रिय मैत्रीणींनो,

तुम्ही कोणतीही नोकरी करत असाल, कोणत्याही शहरात राहत असाल, तुम्ही तुमचा 'Softness' हरवू नका. जगाला आज रूढ अर्थाने यशस्वी असलेल्या कणखर हातांपेक्षा, प्रेमाने स्पर्श करणाऱ्या हातांची आणि द्वेषापेक्षा मायेने विचार करणाऱ्या मनांची जास्त गरज आहे.

तुमच्या आत असलेल्या त्या अथांग ऊर्जेला ओळखा. तुम्ही एक शक्ती आहात, एक प्रेरणा आहात. फक्त स्वतःला थोडा वेळ द्या आणि बघा, तुमचं आयुष्य किती सुंदर आणि अर्थपूर्ण होतं ते.

तुम्ही उच्च मुल्य जपणारी स्त्री आहात आणि तुमची सर्वात मोठी ओळख म्हणजे तुमच्यातील खेळकर, हसरी, आनंदी चैतन्यमयी अशी 'Feminine Energy' आहे.

मी आशा करते की हा लेख वाचून तुम्ही तुझ्यातील चैतन्यमयी स्त्री उर्जेला जागृत करण्याचा व तिला जपण्याचा प्रयत्न नक्की कराल.

विश्वास ठेवा तुमच्यातील चैतन्यमयी स्त्री शक्तिमध्ये जग सुंदर बनवण्याची ताकद आहे.

शुभेच्छा…!