Author
स्त्री संघर्ष आणि महिला दिनाची पहाट
मा. दीपा देशमुख
adpisa@gmail.com / मोबाईल ९५४५५५५५४०

आज आपण ज्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, जिथे स्त्रिया अंतराळात झेप घेत आहेत, राजकारण, विज्ञान आणि अर्थकारण यांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत, त्यामागचा स्त्रीचा इतिहास रक्ताने आणि अश्रुंनी भिजलेला आहे. आपण प्रत्येक वर्षी आठ मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा करतो, तो दिवस केवळ एक सण किंवा एक सेलिब्रेशन नसून, तो शतकानुशतके चाललेल्या अन्यायाविरुद्ध पुकारलेल्या बंडाची आणि त्यातून स्त्रीला मिळालेल्या स्वातंत्र्याची आठवण आहे. या प्रवासाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून बघावं लागेल, जिथे क्लारा झेटकिन नावाच्या एका पोलादी स्त्रीने क्रांतीची पहिली ठिणगी टाकली होती.

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात औद्योगिक क्रांती झाली होती, पण त्याचा फायदा केवळ भांडवलदारांना मिळत होता आणि स्त्रिया कारखान्यात पुरुषांपेक्षा जास्त तास काम करूनही त्यांना अत्यंत तुटपुंजा पगार मिळत असे. मतदानाचा अधिकार नसलेल्या त्या काळात, क्लारा झेटकिन हिने ओळखलं होतं, की जोपर्यंत स्त्रिया संघटित होत नाहीत, तोपर्यंत त्यांना त्यांचे हक्क मिळणार नाहीत. १९१० मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या परिषदेत त्यांनी 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला गेला, ज्याचा उद्देश केवळ फुलं किंवा भेटवस्तू देणं नव्हता, तर स्त्रियांच्या राजकीय आणि आर्थिक हक्कांसाठी एक जागतिक व्यासपीठ तयार करणं हा होता.

क्लारा झेटकिन जेव्हा युरोपात स्त्रियांसाठी हक्क मागत होती, तेव्हा भारतीय स्त्रीची अवस्था कमालीची भीषण होती. 'स्त्री ही पुरुषाची दासी' या मानसिकतेने समाज पूर्णपणे ग्रासलेला होता. पतीच्या निधनानंतर पत्नीला जिवंत जाळणारी सतीची अमानवीय चाल असो, किंवा पतीच्या निधनानंतर स्त्रीचं नशीब संपलं असं मानून तिचे डोईवरचे संपूर्ण केस कापून, तिचं मुंडण करून, तिला विद्रूप करणारं केशवपन असो, त्या काळातील स्त्रीचं आयुष्य गुलामीचं एक भीषण चक्र होतं. मुलीला शिक्षणाचा अधिकार नाकारून तिचा बालविवाह लावून देणं, तिला परक्याचं धन मानणं आणि स्त्रियांनी शिकणं हे समाजाच्या पतनाचं कारण मानणं, अशा अनिष्ट प्रथांमुळे समस्त भारतीय स्त्रियांचं आयुष्य चूल आणि मूल इतक्याच मर्यादत अडकलं होतं. अनेकदा या सर्व अन्यायातून सुटका करून घेण्यासाठी स्त्रियांना विहिरीत आत्महत्या करण्यासारखा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागे, कारण सन्मानाने जगता येत नाही, तेव्हा त्यांना मरणाला जवळ करणं सोपं वाटायचं.

भारतीय स्त्रीच्या जीवनातील अंधार दूर करून तिला प्रकाशाकडे नेण्यात ज्या समाजसुधारकांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामध्ये राजा राममोहन रॉय, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. या महामानवांनी केवळ प्रथा-परंपरांना विरोध केला नाही, तर स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला.

राजा राममोहन रॉय यांनी १८ व्या आणि १९ व्या शतकातील अत्यंत क्रूर अशा 'सती प्रथे'च्या विरोधात लढा उभारला. स्त्रियांना जिवंत जाळणं ही प्रथा धर्माच्या नावाखाली चालवली जात असताना, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे १८२९ मध्ये सती बंदीचा कायदा झाला, ज्यामुळे भारतीय स्त्रीला जगण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा हक्क मिळाला. त्यांच्या याच कामामुळे त्यांना 'भारतीय प्रबोधनाचे जनक' असं म्हटलं जातं.

त्यानंतर महात्मा जोतीराव आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाईनी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली. त्याकाळी मुलींनी शिकणं हे पाप मानलं जात असे, त्यामुळे त्यांना समाजात प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं, पण त्यांनी हार मानली नाही. सावित्रीबाईनी केवळ स्वतः शिक्षिका बनून मुलींना शिकवलं नाही, तर त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह चालवून अनाथ मुलांना आणि विधवा स्त्रियांना आश्रय दिला. जोतीरावांनी विधवा विवाहाला प्रोत्साहन दिलं आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया भक्कम केला, ज्यामुळे स्त्रियांच्या विचारांना नवी दिशा मिळाली.

याच कार्यात राजर्षी शाहू महाराजांनी मोलाची भर घातली. कोल्हापूर संस्थानात त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कायदे केले. स्त्रियांना सन्मानाने जगता यावं म्हणून त्यांनी शिक्षणासह त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचाही विचार केला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी तर आपले संपूर्ण आयुष्य विधवांच्या शिक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी अर्पण केलं. 'अनाथ बालिकाश्रम' आणि 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठ' ही त्यांची स्त्रियांसाठी असलेली देणगी आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवला.

र. धों. कर्वे यांनी संतती नियमन आणि लैंगिक शिक्षणासारख्या अत्यंत पुरोगामी विषयांवर धाडसाने लेखन करून स्त्रीच्या शरीरावर तिची स्वतःची सत्ता असावी, हा विचार मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क दिले. मतदानाचा अधिकार आणि 'हिंदू कोड बिल'च्या माध्यमातून स्त्रियांना मालमत्तेतील हक्क आणि वारसा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देण्यापर्यंतची तयारी दाखवली. स्त्री ही केवळ कुटुंबाची धुरा वाहणारी व्यक्ती नसून ती समाजाचा एक स्वतंत्र घटक आहे, हे त्यांनी अधोरेखित केलं. या सर्व महान पुरुषांनी आणि स्त्रियांनी लावलेल्या त्या झाडाची फळं आज आपण चाखत आहोत.

या सर्व समाजसुधारकांच्या कार्याचं महत्त्व आजच्या युगात अनन्यसाधारण आहे. त्यांनी केवळ कायदे केले नाहीत, तर समाजाच्या विचारांत क्रांती घडवून आणली. आज स्त्री अंतराळात जातेय किंवा राजकारणात सर्वोच्च पदे भूषवतेय, त्यामागे या महापुरुषांनी पेरलेली शिक्षणाची आणि स्वातंत्र्याची बीजं आहेत. त्यांनी स्त्रीला केवळ चूल आणि मुलाच्या चौकटीतून बाहेर काढलं नाही, तर तिला स्वावलंबी बनवलं. जर आजची स्त्री शिक्षित, स्वतंत्र आणि सक्षम असेल, तर याचं पूर्ण श्रेय या समाजसुधारकांच्या दूरदृष्टीला आणि त्यांनी पत्करलेल्या संघर्षाला जातं.

साहित्यामध्ये देखील अशी काही स्त्री पात्रं आहेत, जी केवळ कागदावरची अक्षरं नसून ती प्रत्यक्ष जीवनातील धगधगत्या संघर्षाचे जिवंत उदाहरण आहेत. लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र एका अशा स्त्रीची गोष्ट सांगतं, जिचा पती (रेव्हरंड टिळक) सतत प्रवासात आणि ध्यानात मग्न असायचा. घरातील ओढाताण, गरिबी आणि पतीचा विचित्र स्वभाव असूनही लक्ष्मीबाईनी आपली संसाररूपी नौका मोठ्या धैर्याने हाकली. त्यांच्यातील विनोदबुद्धी आणि संकटांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हे त्यांच्या खंबीर व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवतात. तसंच लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्यावरील साहित्यात आपल्याला एक अशी स्त्री दिसते, जिने पतीच्या मृत्यूनंतर सती न जाता राज्य कारभाराची धुरा समर्थपणे वाहिली. आपल्यावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर बाजूला सारून, प्रजेच्या कल्याणासाठी सर्वस्व अर्पण करणारी अहिल्या ही खऱ्या अर्थाने खंबीर स्त्री प्रतिमा आहे. जागतिक साहित्यातील मॅक्सिम गॉर्की याचं 'आई' हे एक अत्यंत प्रभावशाली पुस्तक आहे. रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर, एका सामान्य गृहिणीचं रूपांतर एका क्रांतिकारी स्त्रीमध्ये कसं होतं, याचं वर्णन यात आहे. सुरुवातीला दबलेली आणि भित्री असलेली 'आई', आपल्या मुलाच्या अटकेनंतर अन्यायाविरुद्ध पेटून उठते. हे परिवर्तन वाचताना वाचकाला स्त्रीशक्तीच्या प्रचंड सामर्थ्याचा अनुभव येतो. झुलान (झुलान झुमा 'द कलर पर्पल' / अलाईस वॉकर) या कादंबरीतील 'सेली' हे पात्र शोषणाची पराकाष्ठा सहन करते. आफ्रिकन अमेरिकन समाजातील वर्णभेद आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार यांमधून जात असताना, तिने स्वतःला कसं सावरलं आणि एक स्वावलंबी स्त्री म्हणून उभी राहिली, ही तिची कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. हा संघर्ष शारीरिक नाही, तर मानसिक गुलामीतून मुक्त होण्याचा आहे.

स्त्री स्वातंत्र्याच्या या लढ्याला जागतिक स्तरावर वैचारिक दिशा देण्याचं काम सिमॉन द बोवा आणि बेट्टी फ्राइडन सारख्या विदुषर्षीनी केलं. सिमॉन द बोवा यांनी त्यांच्या 'द सेकंड सेक्स' या ग्रंथात मांडलेला विचार आजही क्रांतीकारक वाटतो. तिची काही वाक्य मनावर कोरली गेली आहेत. ती म्हणते, 'स्त्री जन्माला येत नाही, तर तिला घडवलं जातं.' याचा अर्थ असा की, समाज आणि संस्कृती स्त्रीवर विशिष्ट बंधनं लादून तिचं स्वतंत्र अस्तित्व नाकारते. तिने स्वतःला 'दुय्यम' न मानता स्वतःचं अस्तित्व स्वतः सिद्ध केलं पाहिजे, हा विचार तिने जगाला दिला. तसंच 'तिचे पंख कापले जातात आणि तिला उडता येत नाही असा आरोप तिच्यावर केला जातो' तिचं हे वाक्य विचारात पाडणारं आहे. स्त्रीवर अनेक बंधनं लादायची आणि त्यानंतर तिला तुला काहीच येत नाही, तुला काही कळत नाही अशी दुषणंही द्यायची. दुसरीकडे, बेट्टी फ्राइडन हिने अमेरिकेतील गृहिणींच्या मानसिक घुसमटीवर 'द फेमिनाईन मिस्टिक' हा ग्रंथ लिहून त्यामधून प्रकाश टाकला. केवळ घर सांभाळणं हेच स्त्रीचं अंतिम ध्येय असू शकत नाही, तर तिने आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे, असं तिने ठणकावून सांगितलं. या दोघींच्या या विचारांनी स्त्रियांना 'माणूस' म्हणून जगण्याची नवी दृष्टी दिली. साहित्यातून आलेल्या या सर्व स्त्री प्रतिमा आपल्याला हेच सांगतात की स्त्रीची शक्ती अफाट आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील मदर इंडिया, थप्पड, पिंक, इंग्लिशविंग्लिश, क्वीन, दंगल, छपाक, मिर्चमसाला, कहाणी, राझी, यासारखे अनेक चित्रपट स्त्रीचा संघर्ष, तिचा स्वाभिमान यावर भाष्य करतात. मदर इंडिया हा भारतीय चित्रप्टसृष्टीतला एक अजरामर चित्रपट मानला जातो. एक गरीब स्त्रीचा संघर्ष आणि स्वाभिमान यातून प्रेक्षकांसमोर येतो. तर तापसी पन्नू अभिनित चित्रपट घरगुती हिंसाचार ही केवळ शारीरिक जखम नसून तो स्त्रीच्या स्वाभिमानावर झालेला आघात आहे हे सांगतो. 'फक्त एक थप्पडच होती ना?' या मानसिकतेवर हा चित्रपट प्रहार करतो. तसंच पिंक हा चित्रपट तर 'नो मिन्स नो' हा संदेश देणारा असून स्त्रीच्या संमतीचं महत्व तो अधोरेखित करतो. आधुनिक काळातल्या स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि चारित्र्य यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समाजाला तो आरसा दाखवतो. श्रीदेवीचा इंग्लिशविंग्लिश हा चित्रपट एका स्त्रीच्या आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या स्त्रीचा आत्मविश्वास प्राप्त करण्याकडचा एक सुंदर प्रवास आहे. आपलं अस्तित्व आणि आपला आदर ती कसा प्राप्त करते हे या चित्रपटातून अतिशय सुरेखरीतीने उलगडलं आहे. तसंच लग्नाच्या आदल्या दिवशी फसवणूक झाल्यानंतर खचून न जाता, एकटीने प्रवास करणारी तरूणी स्वतःचा शोध कसा घेते हे क्वीन या चित्रपटात दाखवलं आहे. दंगलसारख्या चित्रपटामधून कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या जिद्दी मुलींची कहाणी दाखवली आहे. 'म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के?' हा संवाद स्त्री शक्तीचं प्रतीक बनला आहे. अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अगरवाल यांच्या जीवनावर आधारित 'छपाक' हा चित्रपट आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा स्त्रीचं आंतरिक धैर्य आणि तिची जगण्याची जिद्द किती मोठी असते, हे यात पाहायला मिळतं. मिर्च मसाला नावाचा स्मिता पाटील अभिनीत चित्रपट म्हणजे अन्यायाविरुद्ध एकत्र येणाऱ्या ग्रामीण स्त्रियांची ताकदवान कथा आहे. जेव्हा सर्व स्त्रिया एकत्र येतात, तेव्हा त्या बलाढ्य सत्तेलाही नमवू शकतात, हे या चित्रपटाचा शेवट प्रभावीपणे सांगतो.

आजही आपण पूर्णपणे मुक्त झालो आहोत का, असा प्रश्न पडतो तेव्हा आजही काही मानसिक भिंती पाडायच्या बाकी आहेत, हे प्रकर्षाने जाणवतं. पण ज्या गतीने आपण पुढे जात आहोत, ते पाहता दिवस लांब नाही जेव्हा स्त्री आणि पुरुष यातील भेद पूर्णपणे मिटून जाईल. आपली शक्ती ही इतरांच्या प्रमाणपत्रावर अवलंबून नाही, आपण स्वतः एक स्वतंत्र शक्ती आहोत. सावित्रीबाईच्या त्या शिक्षणाच्या दिव्याची ज्योत आपल्या हातात आहे आणि ती विझू न देता अधिक प्रखर करणे हीच खरी महिला दिनाची सार्थकता आहे. आपण स्वतःला हे वचन देऊया की, आपण केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार करणार नाही, तर आपल्या आजूबाजूच्या इतर स्त्रियांनाही सोबत घेऊन चालणार आहोत. कारण जेव्हा एक स्त्री उभी राहते, तेव्हा एक कुटुंब उभं राहतं आणि जेव्हा एक कुटुंब उभं राहतं, तेव्हा एक समाज घडतो.

आपण प्रत्येक वर्षी ८ मार्चला खूप उत्साहाने महिला दिन साजरा करतो, तेव्हा आपण लक्षात ठेवायला हवं, की आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य फुकट मिळालेलं नाही. हा दिवस केवळ एक तारीख नसून तो आत्मभान येण्याचं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं आणि आपल्या कर्तव्याची आठवण करून देण्याचं प्रतीक आहे. एका लोककथेत म्हटल्याप्रमाणे, स्त्री ही मातीसारखी मऊ असते जी जगाला धान्य देते, पण वेळ पडली तर ती त्या मातीचा अभेद्य गडकोटही बनू शकते. तिने विहिरीतील आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर पडून अंतराळातील ताऱ्यांपर्यंत मजल मारली आहे, हा तिचा प्रवास म्हणजे मानवी जिद्दीचा विजय आहे.

एका जुन्या लोककथेत असं सांगितलं जातं की, एकदा एका राज्याच्या विद्वानांमध्ये एक चर्चा रंगली 'जगातील सर्वात कठीण आणि मौल्यवान वस्तू कोणती?' कोणी म्हटलं हिरा, कोणी म्हटलं लोखंड, तर कोणी म्हटलं कठीण काळ. शेवटी एका वृद्ध स्त्रीने उत्तर दिलं, 'जगातील सर्वात कठीण आणि मौल्यवान वस्तू म्हणजे 'स्त्रीचं मन' आणि तिचं 'अस्तित्व' आहे.'

राजाला आश्चर्य वाटलं, त्याने विचारलं, 'ते कसं?'

तेव्हा ती म्हणाली, 'महाराज, स्त्री ही मातीसारखी मऊ आहे, जी स्वतःला सोसून जगाला धान्य देते. पण वेळ पडली तर ती त्या मातीचा गडकोटही बनू शकते, ज्याला शत्रूही भेदू शकत नाही. तिला तुम्ही कितीही खोल गर्तेत ढकललं, तरी ती तिथून पायऱ्या कोरत वर येते. विहिरीत उडी मारण्यापासून ते अंतराळात झेप घेण्यापर्यंतचा तिचा प्रवास हा केवळ तिचा नसून, तिने स्वतःच्या हाताने घडवलेला प्रयत्नांचा यशस्वी प्रवास आहे.'

ही लोककथा आपल्याला हेच सांगते की, क्लारा झेटकिनने पाहिलेलं स्वप्न असो किंवा सावित्रीबाईनी सोसलेला शेण-गोटांचा मार असो; या सर्वांनी स्त्रीला केवळ संकटातून बाहेर काढलं नाही, तर तिला तिची स्वतःची शक्ती ओळखायला शिकवलं. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण हेच लक्षात ठेवूया की, आपण कुणी 'अगतिक' अबला नाही, तर आपण त्या मातीचे वारसदार आहोत जिने इतिहासाला नवे वळण दिलं. जोपर्यंत आपल्या मनात कर्तृत्वाची ही ज्योत पेटती आहे, तोपर्यंत कोणताही अंधार आपल्याला रोखू शकणार नाही.