Author
संपादकीय
मा. यशवंत शितोळे
अध्यक्ष - महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र

करिअर कट्टाच्या वतीने मार्च महिन्याचा अंक हा 'जागतिक महिला दिन विशेषांक' म्हणून तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभीच, जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना मनः पूर्वक शुभेच्छा..

मार्च महिना हा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असतो आर्थिक ताळेबंद मांडणीचा हा महत्त्वपूर्ण महिना, या महिन्यांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुण्यस्मरण आणि याच महिन्यामध्ये जागतिक महिला दिन. अनेक संस्था, संघटना, शासन आर्थिक ताळेबंद मांडण्याच्या गडबडीमध्ये असतात, हे चित्र नवे नाही.

पाळण्याच्या दोरी पासून झेंड्याच्या दोरीपर्यंत अधिकार, जबाबदारी व कर्तव्य निभावणाऱ्या अनेक कर्तृत्वसंपन्न महिलांचा गुणगौरव सन्मान आणि जागतिक महिला दिनाचे मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणारे कौतुक सोहळे हे अत्यंत सकारात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. या सुखद चित्राची निर्मिती करण्यासाठी पहिल्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी ज्या कोऱ्या पाटीवर रेषा काढायला आणि अक्षर ओळख करायला शिकवलं त्या रेषांच सुंदर असं रेखाचित्र आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तयार झालेल आहे. प्रत्येकाने आपापल्या कार्यकर्तृत्वाने योगदान देऊन या चित्रात रंग भरण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये स्त्रियांची शैक्षणिक प्रगती, आर्थिक स्वातंत्र त्याचबरोबर त्यांना मिळालेल्या शिक्षणाच्या संधी यामुळे अनेकविध क्षेत्रामध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवणे हे ज्यांना ज्यांना शक्य झालं त्या प्रत्येक महिलेने आपल्या पाठीमागून येणाऱ्या पिढीसाठी आपल्या कार्यकर्तृत्वातून एक अत्यंत सुंदर असा आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक भान वाढीस लागण्याची संविधानाला अभिप्रेत असणारा भाग लक्षात घेऊन समाज बदलण्याच्या फार मोठ्या प्रक्रियेचा शुभारंभ हा स्वतः मध्ये बदल करून जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने महिला दिनाच्या उत्सवाचं सार्थक झालं असं मला वाटतं. महिलांचा सन्मान आणि कौतुक सोहळा ही फक्त एका दिवसाची बाब नसून ते आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनली पाहिजे आणि त्या बनण्याच्या प्रक्रियेची सुरुवात ही सामाजिक ताळेबंदांचा समतोल राखून करता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया.

या महिला दिन विशेषांकात सुप्रसिद्ध लेखिका सन्माननीय दीपा देशमुख मॅडम यांनी निमंत्रित संपादक या नात्याने 'स्त्री संघर्ष आणि महिला दिनाची पहाट' हा अत्यंत विचारगर्भ लेख लिहिलेला आहे. तर, प्राचार्या डॉ. शरयू तायवाडे मॅडम यांनी 'उच्च शिक्षण विभागांमध्ये करिअर कट्टा कडून संपन्न झालेले उपक्रम' याचा आढावापर लेख लिहिलेला आहे. सन्माननीय अमित भोळे सर (संचालक, महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार) यांनी 'मुलाखतीचा दिवसः आत्मविश्वास, तयारी आणि प्रसंगावधानता' या विषयावर अत्यंत मार्मिक विचार लेखाच्या माध्यमातून मांडलेले आहेत. सन्माननीय डॉ. तुषाबा शिंदे सर ह्यांचा 'महिला दिन विशेषः आधुनिक करिअरच्या नव्या वाटा' हा लेख आहे. विद्यार्थ्यांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून कायम प्रेरणा देणारे माननीय राजीव नंदकर सर यांनी 'युवकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, संधी, समस्या आणि आव्हाने' हा अभ्यासपूर्ण लेख लिहिलेला आहे. माननीय मिथिला दळवी मॅडम यांनी 'भावना आणि स्त्रिया' या लेखाच्या साह्याने स्त्रीला भावनांची जाणीव अंगभूत असते असं म्हणत असताना, त्याचा रोख तिने स्वतःकडे वळवणं ही सर्वात मोठी आवश्यक गोष्ट असल्याचे सांगितले आहे. माननीय दिनेश पवार (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त) यांनी महिला सबलीकरण ही फक्त स्त्रियांचीच नव्हे तर; संपूर्ण समाजाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे हे 'स्त्री समाजाच्या प्रगतीची एक शक्ती' या

लेखाच्या माध्यमातून विचार विशद केलेले आहे तसेच, माननीय मैथिली सावंत यांनी 'आनंदी स्त्री ऊर्जेचे गमक' या लेखाच्या माध्यमातून चिंतनशील विचार मांडलेले आहेत. मा. प्रणोती शितोळे यांनी 'स्त्री सक्षमीकरणासाठी स्व-जागृती आणि स्व-प्रेमाचे महत्त्व' अधोरेखित केलेले आहे. तर या अंकात माननीय डिंपल मित्तल यांचा लेख घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे, डॉ. श्रीकांत इंगळे सर यांचा चालू घडामोडी तर प्राध्यापक संदेश कासार यांनी लिहिलेली प्रश्नमंजुषा या मासिकात घेण्यात आलेली आहे.

करिअर कट्टाचे हे मासिक तयार करण्यासाठी ज्या ज्या मान्यवर मंडळींनी आपला अमूल्य वेळ देऊन लेख लिहिलेला

आहे त्या सगळ्यांच्याप्रति मी या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो.

हा अंक तयार करण्यासाठी संपादकीय समितीने जे परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानून थांबतो.

धन्यवाद..!