कल्पना करा...
तो २४ तास काम करतो.
उद्यापासून तुमच्या व्यवसायात एक नवीन कर्मचारी रुजू होतो. त्याला पगार द्यावा लागत नाही. तो कधी रजा मागत नाही. तो जाहिराती लिहितो, ग्राहकांना उत्तर देतो, पोस्टर तयार करतो, व्यवसायाच्या नवीन कल्पना सुचवतो, खर्चाचा अंदाज देतो आणि नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदतही करतो. ऐकायला अशक्य वाटते? पण आज हे शक्य झाले आहे. या नव्या कर्मचाऱ्याचे नाव आहे AI (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता.
अनेकांना वाटते की AI ही फक्त मोठ्या कंपन्यांसाठी आहे. पण वास्तव अगदी वेगळे आहे. आज AI चा सर्वाधिक फायदा छोटा व्यापारी, ग्रामीण उद्योजक, महिला बचत गट, शेतकरी, दुकानदार आणि सेवा व्यवसाय करणारे लोक घेऊ शकतात. आज प्रश्न असा नाही की AI येणार का ? AI आपल्या आयुष्यात आधीच आले आहे.
प्रश्न एवढाच आहे की त्याचा फायदा सर्वात आधी कोण घेणार ?
AI म्हणजे नेमके काय ?
AI म्हणजे असा डिजिटल सहाय्यक जो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो, माहिती शोधून देतो, लेखन करतो, कल्पना सुचवतो, फोटो तयार करतो, भाषांतर करतो आणि अनेक कामे काही मिनिटांत पूर्ण करतो. जसे कॅल्क्युलेटरने गणित सोपे केले, तसे AI अनेक बौद्धिक कामे सोपी करत आहे. AI विचार करत नाही, पण तुमचा विचार अधिक वेगवान आणि परिणामकारक बनवतो.
AI तुमच्या व्यवसायात कोणकोणती कामे करू शकतो ?
१. मार्केटिंग मॅनेजर
तुमच्या उत्पादनाची जाहिरात लिहिणे, सोशल मीडिया पोस्ट तयार करणे, सणासुदीच्या ऑफर्स सुचवणे, ग्राहकांना पाठवण्यासाठी आकर्षक संदेश तयार करणे ही सर्व कामे AI काही मिनिटांत करू शकतो.
२. विक्री सहाय्यक
ग्राहक काय विचारू शकतो, त्याला कसे उत्तर द्यावे, विक्री कशी वाढवावी, कोणत्या ग्राहकांना पुन्हा संपर्क करावा अशा अनेक गोष्टी AI सुचवू शकतो.
३. डिझायनर
आज सुंदर पोस्टर, बॅनर, फ्लेक्स किंवा उत्पादनाचे फोटो तयार करण्यासाठी मोठ्या एजन्सीकडे जाण्याची गरज नाही. योग्य AIसाधनांच्या मदतीने आकर्षक डिझाईन्स तयार करता येतात.
४. लेखनिक
पत्र, अर्ज, प्रस्ताव, कोटेशन, WhatsApp संदेश, ई-मेल, भाषण, जाहिरात अशी अनेक लेखनाची कामे AI काही क्षणांत तयार करू शकतो.
५. संशोधन सहाय्यक
'माझ्या तालुक्यात कोणता व्यवसाय चालेल?', 'माझ्या उत्पादनासाठी नवीन बाजारपेठ कोणती?' किंवा 'ग्राहकांची नवीन गरज काय आहे?' अशा प्रश्नांची दिशा AI देऊ शकतो.
६. भाषांतरकार
मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये माहिती रूपांतरित करणे आज अत्यंत सोपे झाले आहे.
कोणत्या व्यवसायांना AI चा सर्वाधिक फायदा होऊ शकतो ?
खरे तर प्रत्येक व्यवसायाला.
१. मसाले तयार करणारी महिला.
२. दुग्धव्यवसाय करणारा शेतकरी.
३. किराणा दुकान.
४. मोबाईल दुरुस्ती केंद्र.
५. शिवणकाम व्यवसाय.
६. फुलांचा व्यवसाय.
७. डेअरी.
८. हॉटेल.
९. टुरिझम.
१०. ऑनलाईन सेवा केंद्र.
११. कोचिंग क्लास.
सर्वांना AI चा उपयोग होऊ शकतो.
* AI वापरायला संगणक अभियंता असणे आवश्यक आहे का?
बिलकूल नाही.
जसे WhatsApp वापरण्यासाठी संगणक अभियंता असावे लागत नाही, तसेच AI वापरण्यासाठीही विशेष तांत्रिक शिक्षणाची गरज नाही.
गरज आहे ती उत्सुकतेची आणि शिकण्याची.
आज बहुतेक AI साधने मोबाईलवर सहज वापरता येतात.
प्रत्येक उद्योजकाने ओळखून ठेवावीत अशी काही AI साधने
> ChatGPT - प्रश्न विचारण्यासाठी, लेखन, व्यवसाय कल्पना, मार्केटिंग, ग्राहक संदेश.
> Canva Al - पोस्टर, सोशल मीडिया डिझाईन्स, ब्रोशर.
> CapCut AI - छोट्या व्हिडिओंचे संपादन.
> Perplexity - माहिती शोधण्यासाठी.
> Gamma - सादरीकरणे (Presentations) तयार करण्यासाठी.
या साधनांची संख्या महत्त्वाची नाही. महत्त्वाचे म्हणजे योग्य वेळी योग्य साधन वापरणे.AI ला योग्य प्रश्न विचारणे हीच खरी कला
AI कडून चांगले उत्तर मिळवण्यासाठी योग्य प्रश्न विचारणे महत्त्वाचे असते.
उदाहरणार्थ-
'मी सोलापूर जिल्ह्यात घरगुती मसाल्याचा व्यवसाय सुरू करत आहे. माझे ग्राहक ग्रामीण आणि शहरी महिला आहेत.
कमी खर्चात पुढील ३० दिवसांचा मार्केटिंग प्लॅन तयार करून द्या.'
किंवा-
'११ लाख भांडवल गुंतवणुकीत माझ्या गावात सुरू करता येतील असे १० व्यवसाय सुचवा.'
किंवा-
'माझ्या दुकानासाठी ग्राहकांना पाठवण्यासाठी आकर्षक WhatsApp संदेश लिहा.'
जितका स्पष्ट प्रश्न, तितके उपयुक्त उत्तर.
पण AI सर्व काही करू शकतो का ?
नाही.
AI तुमचा सहाय्यक आहे, मालक नाही. तो कल्पना देऊ शकतो. माहिती देऊ शकतो.
लेखन करू शकतो.
डिझाईन तयार करू शकतो.
पण ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे, गुणवत्तेची उत्पादने तयार करणे, प्रामाणिकपणे व्यवसाय करणे आणि योग्य निर्णय घेणे हे काम माणसालाच करावे लागते.
AI मेहनतीची जागा घेत नाही.
तो मेहनत अधिक परिणामकारक बनवतो.
पुढील सात दिवसांत काय कराल ?
जर तुम्ही हा लेख वाचत असाल, तर पुढील सात दिवसांत तीन गोष्टी करा.
१. पहिली - तुमच्या मोबाईलवर एखादे AI साधन वापरून पहा.
२. दुसरी - तुमच्या व्यवसायाशी संबंधित किमान पाच प्रश्न AI ला विचारा.
३. तिसरी - AI ने दिलेल्या एका कल्पनेवर प्रत्यक्ष काम सुरू करा.
फक्त वाचू नका. वापरून पाहा. कारण अनुभव हा कोणत्याही पुस्तकापेक्षा मोठा शिक्षक असतो.
निष्कर्ष
ज्या प्रकारे वीज, मोबाईल आणि इंटरनेटने व्यवसाय करण्याची पद्धत बदलली, त्याच प्रकारे AI पुढील काही वर्षांत प्रत्येक व्यवसायाचा अविभाज्य भाग होणार आहे. मोठ्या कंपन्या आधीच AI वापरत आहेत. आता वेळ आहे ग्रामीण उद्योजकांनीही या नव्या तंत्रज्ञानाला स्वीकारण्याची. आज तुमच्याकडे मोठे कार्यालय नसले तरी चालेल. मोठी टीम नसली तरी चालेल. मोठे भांडवल नसले तरी चालेल. पण शिकण्याची तयारी असली पाहिजे. कारण भविष्यात स्पर्धा मोठ्या आणि छोट्या व्यवसायांमध्ये होणार नाही. स्पर्धा AI चा योग्य वापर करणाऱ्या उद्योजक आणि AI कडे दुर्लक्ष करणाऱ्या उद्योजकांमध्ये होणार आहे. आजच सुरुवात करा. कदाचित तुमचा पुढचा कर्मचारी आधीच तुमच्या मोबाईलमध्ये तुमची वाट पाहत असेल.
> ग्रामीण उद्योजकांसाठी एक आवाहन
ग्रामीण महाराष्ट्रात उद्योजकतेची प्रचंड क्षमता आहे. मात्र अनेक वेळा योग्य मार्गदर्शन, नेटवर्क, तंत्रज्ञान, वित्तपुरवठा आणिबाजारपेठेचा अभाव जाणवतो. ही दरी भरून काढण्यासाठी शासन, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि उद्योजक यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.
याच उद्देशाने RECI - Rural Entrepreneurship Connect Initiative ही चळवळ ग्रामीण उद्योजकांना शिक्षण, वित्त, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ (EFTM) यांच्याशी जोडण्याचे काम करत आहे. ग्रामीण भागातील युवक, महिला, शेतकरी आणि लघुउद्योजकांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम, मार्गदर्शन सत्रे, नेटवर्किंग आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबविले जात आहेत.
जर तुमच्याकडे व्यवसायाची कल्पना असेल, व्यवसाय वाढवायचा असेल किंवा आपल्या गावात रोजगार निर्माण करण्याची इच्छा असेल, तर या चळवळीचा भाग व्हा.
"कारण, ग्रामीण महाराष्ट्र बदलला, तर महाराष्ट्र बदलेल."
अधिक माहितीसाठीः
www.sagarbabar.com
www.RECIIndia.com
www.GlobalEntrepreneurs Forum.com