Author
"करिअर कट्टाः जीवन समृद्ध करणारा प्रवास"
रामेश्वर परमेश्वर मोरे
राज्य समन्वयक, नियोजन समिती

करिअर कट्टा या उपक्रमामध्ये गेली चार वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली. बीड जिल्ह्यातील माजलगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये मी शिक्षण घेत होतो, तसं पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे जागृती तेवढ्या प्रमाणात आढळून येत नाही, विद्यार्थ्यांनी प्रवेश कुठल्या कोर्सला घेतला पाहिजे हे सांगणारे कोणी मिळत नाही. पारंपरिकतेप्रमाणे मी बी.ए ला ऍडमिशन घेतलं. आमच्या सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक डॉ. बिलास काळे सर यांनी मला करिअर संसदेविषयी माहिती दिली आणि मी रोज कॉलेजला येणारा विद्यार्थी आहे म्हणून कौशल्य विकास मंत्री या पदाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. संसदेत काय काम करायचं असतं याची फारशी माहिती मला नव्हती परंतु आमच्या सरांनी सांगितलं होतं की दर रविवारी मिटिंग असते त्या मिटींगला उपस्थित राहायचं. पहिल्याच मिटींगला मा. श्री. यशवंत शितोळे सरांचे मार्गदर्शन ऐकलं आणि लक्षात आले की यातून आपली प्रगती होणार आहे. प्रत्येक रविवारची मिटिंग अटेंड करत होतो आणि शितोळे सरांनी सांगितलेले टास्क पूर्ण करत होतो. या सत्राच्या माध्यमातून माझे एक वेगळे व्यक्तिमत्व निर्माण झालं, जगाकडे आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. स्वतःवरचा विश्वास वाढला आणि निर्भयपणे बोलायला लागलो. मला बोलण्याची ताकत करिअर कट्टाने दिली.

करिअर संसदेच्या माध्यमातून विविध अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या, महाविद्यालय स्तरावर विविध कार्यक्रम घेतले, महाविद्यालय परिसर धुम्रपान मुक्त केला यासारखे अनेक उपक्रम राबवले. विविध ठिकाणी बोलू लागलो आणि राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचा विजेता ठरलो हे श्रेय करिअर कट्टाचे आहे. मी केलेल्या कामाची पावती म्हणून करिअर संसदेचा उत्कृष्ट पदाधिकारी हा पहिला राज्यस्तरीय पुरस्कार मला मिळाला.

त्यानंतर माझी बीड जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून निवड झाली. त्यात अविरतपणे काम सुरू होतं. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुका लागल्या यामध्ये करिअर संसद विभागीय नियोजन समन्वयक म्हणून बहुमताने निवडून आलो. करिअर संसदेच्या तिनही अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळालं. अधिवेशनातून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. करिअर कट्टा मधील विविध जबाबदाऱ्यासांभाळण्याची मला संधी मिळाली.

संसदेतील कौशल्य विकास मंत्री या पदापासून ते जिल्हा नियोजन समितीचा राज्य समन्वयक या पदापर्यंत करिअर कट्टाने मला पोहोचवल. मुंबई येथे पार पडलेल्या करिअर कट्टा पाचवा वर्धापन दिन सोहळा या कार्यक्रमात माननीय मंत्री महोदयांसोबत व्यासपीठावर बसण्याचा मान करिअर कट्टाने मला दिला.

मा. श्री. यशवंत शितोळे सरांसोबत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाण्याचा योग येतो. सरांसोबत राहून वेळेचे व्यवस्थापन, संभाषण कौशल्य आणि नेतृत्वगुण या गोष्टी सुधारत गेल्या. आज राज्यभरातील विद्यार्थ्यांचे नेटवर्क हाताळत असताना अनेक अनुभव येत आहेत, या अनुभवातून माझे जीवन समृद्ध होत आहे. एक महाविद्यालयीन विद्यार्थी ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम. ए. मराठी पर्यंतचा प्रवास करिअर कट्टाच्या सोबतीने पूर्ण झाला. आज आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल मध्ये माझे लेख प्रकाशित होत आहेत, हा बदल करिअर कट्टा मुळे झाला. सध्या सुरू असणाऱ्या करिअर कट्टा इंटर्नशिपच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये वेगवेगळे बदल घडत आहेत आणि विविध प्रशासकीय कामाचा अनुभव येतो आहे.

मा.श्री यशवंत शितोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध गोष्टी शिकता आल्या. करिअर कट्टा मुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली, लाख मोलाची माणसं जोडली गेली, जीवनाला समृद्ध करणारा प्रवास करिअर कट्टाच्या माध्यमातून घडला. हा प्रवास अविरत सुरू राहील आणि मी कायम करिअर कट्टाच्या सोबत असेल.

या निमित्ताने मा. श्री. यशवंत शितोळे सरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि कायम युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमात सहभागी होण्याचे आव्हान युवकांना करतो.

मनःपूर्वक धन्यवाद..

जय हिंद, जय महाराष्ट्र ...