Author
" स्टार्टअप आणि इन्क्युबेशनद्वारे युवा उद्योजक घडविण्यासाठी करिअर कट्टाचा राज्यव्यापी उपक्रम "
प्राचार्य डॉ. संजय अस्वले
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा प्राचार्य प्रवर्तक, करिअर कट्टा, धाराशिव जिल्हा सदस्य, राज्यस्तरीय स्टार्टअप समन्वय समिती

आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या निर्माण करणारे युवा उद्योजक घडविण्याची गरज अधिक आहे. स्टार्टअप म्हणजे एखाद्या नाविन्यपूर्ण कल्पनेवर आधारित, समाजातील एखाद्या समस्येवर प्रभावी उपाय देणारा आणि वेगाने वाढण्याची क्षमता असलेला उद्योग किंवा व्यवसाय.

तर इन्क्युबेशन म्हणजे अशा नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्ष उद्योगात रूपांतरित करण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, तज्ज्ञांचे समुपदेशन, प्रकल्प अहवाल तयार करणे, भांडवल उभारणी, कायदेशीर प्रक्रिया, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि उद्योग उभारणीसाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहाय्य उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया होय.

मात्र पारंपरिक महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विधी (Law) आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी तसेच अनेक प्राध्यापकांना नाविन्यपूर्ण कल्पना (Idea Generation) कशा निर्माण कराव्यात, त्या कशा विकसित कराव्यात, त्यांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर कसे करावे आणि इन्क्युबेशनची प्रक्रिया काय असते याची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे उत्कृष्ट कल्पना, ज्ञान आणि कौशल्य असूनही त्या प्रत्यक्ष उद्योग-व्यवसायात रूपांतरित होत नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता विकसित करणे, त्यांना Idea Generation पासून Startup आणि Incubation पर्यंतचा संपूर्ण प्रवास समजावून सांगणे आणि त्यांच्या कल्पनांना उद्योगाचे स्वरूप देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.

याच उद्देशाने महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत स्वतंत्र राज्यस्तरीय स्टार्टअप समन्वय समिती स्थापन केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता विकसित करणे, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे संकलन करणे आणि त्या कल्पनांचे यशस्वी उद्योग-व्यवसायात रूपांतर करून युवा उद्योजक निर्माण करणे हा करिअर कट्टाचा प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमाच्या उद्दिष्टपूर्तीचा कृती आराखडा पुढीलप्रमाणेः

पहिला टप्पा : प्राध्यापकांसाठी सहा दिवसीय FDP

स्टार्टअप आणि इन्क्युबेशन विषयाची सखोल माहिती महाविद्यालयीन समन्वयक व प्राध्यापकांना मिळावी यासाठी २७जुलै ते ०१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सहा दिवसीय Faculty Development Programme (FDP) आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात स्टार्टअपची संपूर्ण प्रक्रिया, इन्क्युबेशन, नवकल्पना विकसित करण्याच्या पद्धती, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कौशल्य तसेच विविध शासकीय योजना याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. या प्रशिक्षणानंतर प्रत्येक महाविद्यालयातील प्रशिक्षित प्राध्यापक विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप व इन्क्युबेशनबाबत जनजागृती करून त्यांना उद्योजकतेकडे प्रेरित करतील.

दुसरा टप्पा : जिल्हास्तरीय स्टार्टअप इन्क्युबेशन व आविष्कार पूर्वतयारी कार्यशाळादुसऱ्या टप्प्यात करिअर कट्टा सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालयांमध्ये जिल्हास्तरीय स्टार्टअप व इन्क्युबेशन कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. या कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना Idea Generation, Design Thinking, समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्याची पद्धत, Business Model Canvas, Startup आणि Incubation याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल.

तसेच २०२६ मध्ये विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेची जिल्हास्तरीय फेरी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणार असल्याने, विद्यार्थ्यांची प्रभावी पूर्वतयारी व्हावी या उद्देशाने २१ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत करिअर कट्टाच्या वतीने जिल्हास्तरीय आविष्कार पूर्वतयारी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. या कार्यशाळांमध्ये संशोधन विषयाची निवड, नावीन्यता आणि उपयोगिता याची मांडणी, संशोधन प्रस्ताव तयार करणे, प्रकल्प लेखन, पोस्टर सादरीकरण, पॉवरपॉईट सादरीकरण, परीक्षकांसमोर प्रभावी सादरीकरणाची कौशल्ये तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आविष्कार स्पर्धेत अधिक सक्षमपणे सहभाग घेता येईल. त्यामुळे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाचे आविष्कार स्पर्धेत उत्कृष्ठ प्रतिनिधित्व करतील.

तिसरा टप्पा : विभागीय स्तरावरील आयडियाथॉन कार्यशाळा

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात आयडियाथॉन कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. महाविद्यालय आणि जिल्हास्तरीय कार्यशाळांमधून स्टार्टअप व इन्क्युबेशनची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थी या कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडतील. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्या कल्पनांचे परीक्षण करून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या जातील.

या त्रिस्तरीय उपक्रमातून राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे संकलन करून त्यांना उद्योजकतेसाठी सक्षम बनविण्याचे धोरण समितीने निश्चित केले आहे.

अशा प्रकारे यापुढील टप्प्यात आयडियाथॉन स्पर्धा, उत्कृष्ट कल्पनांची निवड, तज्ज्ञांचे समुपदेशन, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगासाठी आवश्यक भांडवल उभारणी, विविध शासकीय योजनांशी जोडणी, इन्क्युबेशन सेंटरमध्ये प्रवेश, ब्रँडिंग, मार्केटिंग, बौद्धिक संपदा हक्क (IPR), उद्योग नोंदणी तसेच उत्पादनाचे व्यापारीकरण यांसारख्या सर्व बाबींमध्ये विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

करिअर कट्टाच्या या राज्यव्यापी उपक्रमातून महाराष्ट्रातील पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नोकरी शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे युवा उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास करिअर कट्टा आणि राज्यस्तरीय स्टार्टअप समन्वय समिती मधील आम्हा सर्व सदस्यांना वाटतो आहे.