Author
"जागतिक युवा कौशल्य दिन व करिअर संसद शपथविधी "सक्षम, कौशल्यसंपन्न आणि नेतृत्वक्षम युवा घडविण्याचा संकल्प" "
प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर
अध्यक्ष, राज्यस्तरीय करिअर संसद समिती

'आजचा युवक हा उद्याच्या भारताचा शिल्पकार आहे.' युवकांच्या अमर्याद ऊर्जेला योग्य दिशा, आवश्यक कौशल्ये आणि प्रभावी नेतृत्वाची जोड मिळाली तर राष्ट्राच्या विकासाला नवी गती प्राप्त होईल. संयुक्त राष्ट्रसंघाचा '१५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन' म्हणून घोषित करण्यामागील उद्देशही हाच आहे की, प्रत्येक युवकाला रोजगार, उद्योजकता आणि नेतृत्वासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त व्हावीत.

आज शिक्षणासोबत संवादकौशल्य, निर्णयक्षमता, नेतृत्व, संघभावना, डिजिटल साक्षरता, वेळेचे नियोजन, समस्या सोडविण्याची क्षमता आणि उद्योजकीय दृष्टीकोन ही कौशल्ये तितकीच महत्त्वाची ठरली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना अशा कौशल्यांच्या विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने राज्यभर राबविण्यात येणारा करिअर कट्टा आणि करिअर संसद हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रभावी मार्ग ठरत आहे.

करिअर कट्टा ही केवळ करिअर मार्गदर्शनाची संकल्पना नसून, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व, सामाजिक जाणीव, रोजगारक्षमता आणि उद्योजकता विकसित करणारी चळवळ आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवाद, अधिकारी, उद्योगपती, यशस्वी उद्योजक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव होते. स्पर्धा परीक्षा, उद्योग-व्यवसाय, स्टार्टअप, संशोधन, कौशल्य विकास, संवादकौशल्य, आर्थिक साक्षरता आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध विषयांवर सातत्याने मार्गदर्शन मिळाल्यामुळे व त्यांना प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ होतो.

'करिअर संसद' हा या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग आहे. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, राष्ट्रनिर्मिती, जबाबदारीची भावना, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि संघटन कौशल्य विकसित करण्यासाठी करिअर संसद प्रभावी माध्यम ठरते. संसदेमधील विविध पदांवर कार्य करताना विद्यार्थी नियोजन, समन्वय, संघभावना, सार्वजनिक संवाद, कार्यक्रम व्यवस्थापन आणि समस्या सोडविण्याची कला आत्मसात करतात. यामुळे ते केवळ नोकरीसाठीच नव्हे तर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सक्षम नेतृत्व करू शकतात.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर कट्टाद्वारा आयोजित करण्यात आलेला करिअर संसद शपथविधी सोहळा हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून जबाबदार, प्रामाणिक, राष्ट्रभिमानी आणि समाजाभिमुख नेतृत्व घडविण्याचा प्रेरणादायी क्षण आहे. शपथ घेताना विद्यार्थी स्वतःच्या विकासाबरोबरच, समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प करतात. प्रामाणिकपणा, शिस्त, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण, संविधानिक मूल्यांचा आदर आणि राष्ट्रसेवेची भावना या मूल्यांचा स्वीकार करून ते युवा पिढीला सक्षम नागरिक म्हणून घडविण्याचा निर्धार करतात.

आज भारत हा जगातील सर्वात मोठ्या संख्येचा युवा देश म्हणून ओळखला जात आहे. ही लोकसंख्यात्मक ताकद देशासाठी मोठी संधी आहे. मात्र या संधीचे सामर्थ्यात रूपांतर करण्यासाठी कौशल्य विकास, नवोपक्रम, उद्योजकता आणि नेतृत्वाची जोड आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानेही कौशल्याधारित शिक्षण, अनुभवाधारित शिक्षण आणि रोजगाराभिमुखतेवर विशेष भर दिला आहे. करिअर कट्टा आणि करिअर संसद हे उपक्रम या धोरणाची प्रभावी अंमलबजावणीकरणारे माध्यम ठरत आहेत.

आजचा विद्यार्थी फक्त नोकरी शोधणारा नसून रोजगार निर्माण करणारा उद्योजक व्हावा, संशोधक व्हावा, प्रशासकीय अधिकारी व्हावा, वैज्ञानिक, शिक्षक, सामाजिक उद्योजक किंवा जबाबदार लोकप्रतिनिधी व्हावा, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी आवश्यक असलेली जिद्द, नेतृत्व, सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण कौशल्य विकास हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे.

राज्यस्तरीय करिअर संसद अध्यक्ष म्हणून मला विश्वास आहे की, करिअर संसद या माध्यमातून राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात नेतृत्वक्षम, आत्मविश्वासपूर्ण, आत्मनिर्भर आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार विद्यार्थ्यांची नवी पिढी तयार होईल. प्रत्येक विद्यार्थी आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करेल आणि स्वतःच्या यशाबरोबरच समाजाच्या प्रगतीतही मोलाचे योगदान देईल.

यावर्षीचा करिअर संसद शपथविधी सोहळा संपूर्ण राज्यभर १५ जुलै २०२६ रोजी सेंट झेविअर महाविद्यालय मुंबई येथून एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने पार पडेल. प्रत्येक महाविद्यालयामध्ये झेविअर महाविद्यालयाच्या संसदेसोबत करिअर संसद पदाधिकारी शपथ घेतील. ह्या सोहळ्याला महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे महसूल खात्याचे अतिरिक्त सचिव मा. विकास खरगे (मुंबई महानगरपालिका आयुक्त), मा. आश्विनी भिडे संसद पदाधिकाऱ्यांचे बळ वाढविण्याकरिता उपस्थित राहतील.

या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना एकच संदेश द्यावासा वाटतो.

'मोठी स्वप्ने पाहा, सातत्याने कौशल्ये विकसित करा, अपयशाला घाबरू नका, नवीन संधींचा स्वीकार करा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करा. शिक्षण, कौशल्य, उद्योग, संस्कार आणि नेतृत्व या पाच आधारस्तंभांवर उभा राहिलेला युवकच विकसित भारताचे स्वप्न साकार करू शकतो.'

चला, जागतिक युवा कौशल्य दिनाच्या प्रेरणेने आपण सर्वजण एकत्रितपणे असा संकल्प करूया की, प्रत्येक विद्यार्थी कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम, उद्योजक, संवेदनशील आणि राष्ट्रहितासाठी कार्य करणारा जबाबदार नागरिक बनेल. करिअर कट्टा आणि करिअर संसद ही केवळ योजना नसून, युवकांच्या उज्ज्वल भविष्याची, सक्षम नेतृत्वाची आणि विकसित भारताच्या निर्मितीची परिवर्तनकारी चळवळ आहे. या चळवळीत प्रत्येक विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग हेच आपल्या राष्ट्राच्या समृद्ध भविष्यासाठी सर्वात मोठे योगदान ठरेल.