Author
"महाराष्ट्रातील तरुणांचे वर्दीचे स्वप्न आणि वास्तव"
डॉ. चेतन शेलोटकर
असिस्टंट कमांडंट, CRPF

Uniform is not just a piece of cloth; it is Responsibility, Pride, Honour and Courage.'

पहाटेचे चार वाजले आहेत. सूर्य उगवायचा आहे; महाराष्ट्रातील घराघरांत दिवे विझलेले आहेत. अजूनही अंधार दाटलेलाच आहे. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू व्हायचा आहे. पण गावाच्या बाहेरच्या माळावर, नदीकाठी, शाळेच्या मैदानावर किंवा डांबरी रस्त्यांवर काही तरुण तरुणी धावत आहेत. कुणाच्या पायात महागडे शूज नाहीत. कुणाच्या मनगटावर स्मार्टवॉच नाही. कुणाकडे अत्याधुनिक जिमची सुविधा नाही. अंगावर कदाचित अगदी साधा टी-शर्ट असेल; पण त्यांच्या डोळ्यांत मात्र एक तेज आहे, एक स्वप्न आहे. त्यांच्या श्वासांची लय त्यांच्या धावण्याच्या तालात मिसळली आहे, कारण त्यांच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय आहे... ते म्हणजे 'वर्दीचे स्वप्न.'

राष्ट्रसेवेची हाक, संघर्षाची वाट आणि अमर्याद संधी

'आपणही या समाजाचे काही देणे लागतो,' ही प्रांजळ भावना मनात बाळगून धडपडणारे, तळमळणारे आणि अथक प्रयत्न करणारे असे असंख्य तरुण संपूर्ण महाराष्ट्रभर दिसतात. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या असंख्य तरुणांच्या मनात लहानपणापासूनच एक स्वप्न रुजलेले असते एक दिवस आपल्या अंगावरही ही वर्दी चढावी आणि देशासाठी, समाजासाठी काहीतरी मोठे करण्याची संधी मिळावी. गावाच्या चौकातून एखादा पोलीस अधिकारी, सैनिक किंवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा जवान दिमाखात चालत जाताना दिसला की लहान मुलांच्या डोळ्यांत वेगळीच चमक निर्माण होते. नागरिकांच्या मनात आदरभाव निर्माण होतो. आई-वडील अभिमानाने म्हणतात, 'एक दिवस माझाही मुलगा अशीच वर्दी घालेल.' या एका वाक्यात स्वप्न असते, आशा असते आणि राष्ट्रसेवेची बीजे दडलेली असतात.

सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत घुमणारा पराक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजविलेला स्वराज्याचा विचार, संतांच्या शिकवणीतून जोपासलेली मानवता आणि समाजसुधारकांनी दिलेली न्यायाची प्रेरणा. या समृद्ध परंपरेत महाराष्ट्रातील तरुण घडत आला आहे. या भूमीने देशाला असंख्य सैनिक, पोलीस अधिकारी, भारतीय सेना, नौदल, वायुसेना, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतील शूर जवान, प्रशासकीय अधिकारी आणि समाजसेवक दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक युवक-युवतींच्या मनात एक स्वप्न कायम धगधगत असते वर्दी परिधान करून राष्ट्राची आणि समाजाची सेवा करण्याचे.

भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे. ही तरुणाई देशाची सर्वात मोठी ताकद मानली जाते. या तरुणांच्या मनात डॉक्टर, अभियंता, वैज्ञानिक किंवा प्रशासकीय अधिकारी होण्याची स्वप्ने असतात; परंतु त्यांच्यातील मोठा वर्ग भारतीय सैन्य, भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य पोलीस, तटरक्षक दल तसेच इतर वर्दीधारी सेवांमध्ये प्रवेश मिळवून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहतो. या स्वप्नामागे केवळ रोजगाराची अपेक्षा नसते; त्यामागे राष्ट्रभक्ती, पालकांच्या चेहऱ्यावर अभिमान पाहण्याची इच्छा आणि समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची जिद्द दडलेली असते. आज महाराष्ट्रातील गावागावांत पहाटेच्या अंधारात धावणारे युवक, मैदानी सराव करणाऱ्या तरुणी, पोलीस भरती किंवा सैन्य भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आणि केंद्रीय दलांमध्ये भरती होण्यासाठी घाम गाळणारे हजारो उमेदवार दिसतात. त्यांच्या डोळ्यांत केवळ नोकरीचे स्वप्न नसते; त्यात कुटुंबाचा अभिमान, स्वतःची ओळख आणि राष्ट्रसेवेची तीव्र इच्छा सामावलेली असते.महाराष्ट्राचा इतिहास हा शौर्य, स्वाभिमान आणि कर्तव्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करताना शिस्तबद्ध, लोकाभिमुख आणि जबाबदार लष्करी व्यवस्थेचे महत्त्व जगासमोर मांडले. पुढे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, समता आणि न्याय ही मूल्ये समाजात रुजविली. आणि याच परंपरेमुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात वर्दीबद्दल विशेष आदर आहे. वर्दी म्हणजे सत्ता नव्हे; ती लोकसेवा आहे. अधिकार नव्हे; ती जबाबदारी आहे. ही जाणीव या भूमीच्या संस्कारातून निर्माण होते. ते ध्येयवेडे तरुण धावत असतात तेव्हा ते केवळ शर्यत जिंकण्यासाठी धावत नसतात; ते आपल्या आई-वडिलांच्या कष्टांना अर्थ देण्यासाठी, आईच्या डोळ्यांतील अभिमानासाठी, आपल्या गावासाठी आणि महाराष्ट्रासाठी धावत असतात.

महाराष्ट्रात अशी हजारो स्वप्ने रोज पहाटे जागी होतात. साताऱ्याच्या डोंगरांत, कोल्हापूरच्या मैदानात, विदर्भाच्या लाल मातीत, मराठवाड्याच्या दुष्काळी खेड्यांत, कोकणाच्या सागरी वाऱ्यात आणि मुंबई-पुण्याच्या गर्दीत एकच दृश्य दिसते. खरे तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दररोज पहाटे एक दृश्य हमखास नजरेस पडते. पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून लाखो तरुण धावताना आणि भरतीसाठी सराव करताना दिसतात.

वर्दी म्हणजे केवळ खांद्यावरील स्टार, छातीवरील बिल्ला किंवा आकर्षक पोशाख नाही. वर्दी म्हणजे अशी शपथ 'माझ्या वैयक्तिक सुखापेक्षा माझ्या देशाची सुरक्षा मोठी आहे.' वर्दी म्हणजे संकटाच्या क्षणी स्वतः पुढे उभे राहण्याचे धैर्य. वर्दी म्हणजे संविधानावरील निष्ठा. वर्दी म्हणजे लोकांचा विश्वास. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना शिकवले की, पराक्रमाला लोककल्याणाची जोड नसेल, तर तो अपुरा आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात वर्दीचे आकर्षण हे केवळ शक्तीचे नसून सेवेचे आहे.

आज लाखो युवक महाराष्ट्र पोलीस, भारतीय सेना, भारतीय नौदल, भारतीय वायुदल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना हेही ठाऊक आहे की हा मार्ग फुलांनी सजलेला नाही; तो काट्यांनी भरलेला आहे. एका जागेसाठी हजारो उमेदवार स्पर्धा करतात. अनेक जण वर्षानुवर्षे तयारी करतात. पहाटे धावणे, दिवसभर अभ्यास, संध्याकाळी व्यायाम आणि रात्री पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या सरावाचे नियोजन हेच त्यांचे जीवन बनते. अनेकांना अपयश येते. काहींचे गुण कमी पडतात. काही जण शारीरिक चाचणीत मागे पडतात. तर काहींची वैद्यकीय तपासणीत निवड होत नाही. त्या क्षणी त्यांच्या समोर दोन मार्ग असतात स्वप्न सोडून देणे किंवा स्वतःला अधिक सक्षम बनवणे. इतिहास साक्षी आहे की दुसरा मार्ग निवडणारेच पुढे यशस्वी होतात.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे, 'स्वप्ने ती नसतात जी झोपेत दिसतात; स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.' वर्दीचे स्वप्न हे असेच अस्वस्थ करणारे स्वप्न आहे. परंतु निवड झाली म्हणजे संघर्ष संपतो का? अजिबात नाही. वर्दी मिळते त्या दिवशी स्वप्न पूर्ण होत नाही; त्या दिवशी एका नव्या जबाबदारीची सुरुवात होते. हिमालयातील उणे तापमान, राजस्थानचे तप्त वाळवंट, नक्षलग्रस्त जंगल, ईशान्य भारतातील दुर्गम डोंगर किंवा महानगरातील सुरक्षा देश जिथे उभे राहण्यास सांगेल, तिथे कोणतीही तक्रार न करता उभे राहणे, हाच वर्दीचा धर्म आहे.

वर्दीच्या मागील वास्तव : माझा प्रवास

असिस्टंट कमांडंट म्हणून मी कार्यरत असताना... झारखंड, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रातील गडचिरोली यांसारख्या संवेदनशील व नक्षलवादग्रस्त भागांत मला काम करण्याची संधी मिळाली. २०१७ मध्ये भारतीय सैन्यामध्ये कॅप्टन म्हणून सहा महिने सेवा करण्याचा बहुमान लाभला. राष्ट्रसेवेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आंतरिक सुरक्षा पदक, हाय अल्टिट्यूड मेडल आणि स्पेशल सर्व्हिस मेडल यांसह विविध सन्मानांनी गौरविण्यात आले. सध्या मी सीआरपीएफ अकादमी, गुरुग्राम येथे भावी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

मातृभूमीच्या सेवेसाठी आणि देशाच्या रक्षणासाठी एक तडफदार, कर्तव्यदक्ष तसेच संवेदनशील अधिकारी होण्याचा हा माझा प्रवास आहे. शिस्तबद्ध चौकटीत, नियमांनी बांधलेली ही नोकरी... आतंकवाद्यांविरुद्ध तसेच नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना... देशातील कठीण आणि अतिदुर्गम भागांत तैनात असताना... प्रत्येक क्षणी सज्ज राहावे लागते. पदोपदी जोखीम, सततचा तणाव आणि खांद्यावर मोठी जबाबदारी असते. हे सर्व सांभाळत असतानाही माझ्यातला 'चेतन' जो एक लेखक आणि वक्ता आहे -आणि माझ्यातील संवेदनशील मन जिवंत ठेवण्याची धडपड आजही सुरू आहे. हा संघर्ष कधीच संपत नाही. फोर्समधीलझगमगाट सर्वांना दिसतो; पण तो केवळ बाह्य आविष्कार असतो. जर आपण त्या झगमगाटाच्या आत डोकावून पाहिले, तर एक वेगळेच वास्तव दिसते. Challenging and Adventurous Service, Risky Life, Far Away from Home, Disturbed Family Life, Detached Social Life, Countless Sacrifices. ही केवळ इंग्रजीतील वाक्ये नाहीत; ती प्रत्येक वर्दीधारी जवानाच्या आणि अधिकाऱ्याच्या आयुष्याची सत्यकथा आहे.

CRPF मध्ये सहाय्यक कमांडंट म्हणून कार्यरत असताना देशाच्या विविध भागांत काम करण्याची, नक्षलविरोधी कारवायांमध्ये सहभागी होण्याची, प्रशिक्षण व्यवस्थापनाची आणि भविष्यातील अधिकाऱ्यांना घडविण्याची संधी मला लाभली. या प्रवासात हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे महाराष्ट्रातील अनेक तरुणांकडे अफाट जिद्द आहे. मेहनत करण्याची तयारी आहे; परंतु योग्य, एकत्रित आणि विश्वासार्ह मार्गदर्शनाचा अभाव आहे. काही विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात; पण MPSC किंवा UPSC CAPF मधील संधींची त्यांना पुरेशी माहिती नसते. काही उत्कृष्ट खेळाडू असतात तर कुणी अव्वल धावपटू असतात; पण लेखी परीक्षेत मागे पडतात. तर काही अभ्यासात अत्यंत हुशार असूनही शारीरिक तयारीकडे दुर्लक्ष करतात. ही विसंगती दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्वसमावेशक, अचूक व विश्वासार्ह मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी एक विस्तृत लेख लिहिण्याचा माझा प्रयत्न असेल.

वर्दीतील करिअरच्या असंख्य संधी

आजच्या काळात वर्दीतील करिअरची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई, SRPF, पोलीस चालक, MPSC PSI, MPSC DySP, भारतीय सेना, अग्निवीर, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, NDA, CDS, UPSC CAPF Assistant Commandant तसेच CRPF, BSF, CISF, ITBP, SSB आणि Assam Rifles यांसारख्या विविध सेवांमध्ये युवक-युवतींसाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध आहेत. या प्रत्येक सेवेची पात्रता, निवड प्रक्रिया, शारीरिक निकष, लेखी परीक्षा, मुलाखत, प्रशिक्षण, पदोन्नतीच्या संधी, वेतनश्रेणी आणि सेवेतील भविष्य यांचा सविस्तर ऊहापोह इथे मला लिहिणे कठीण आहे. प्रत्येक परीक्षेसाठी एक स्वतंत्र लेख लिहिण्याचा भविष्यात माझा प्रयत्न आहे.

बदलते राष्ट्रीय सुरक्षा वातावरण

आज राष्ट्रीय सुरक्षेचे स्वरूप मोठ्या वेगाने बदलत आहे. पारंपरिक युद्धाबरोबरच सायबर हल्ले, ड्रोनचा गैरवापर, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती युद्ध, आर्थिक गुन्हे, संघटित गुन्हेगारी आणि सीमापार दहशतवाद यांसारखी नवी आव्हाने देशासमोर उभी आहेत. त्यामुळे आधुनिक वर्दीधारी अधिकारी केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असून चालत नाही. त्याच्याकडे तांत्रिक ज्ञान, डिजिटल कौशल्य, सायबर सुरक्षेची समज, डेटा विश्लेषणाची क्षमता आणि बदलत्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे तितकेच आवश्यक झाले आहे. आजची वर्दी अधिक ज्ञानाधारित, तंत्रज्ञानसंपन्न आणि व्यावसायिक होत आहे.

वर्दीचे खरे सौंदर्य

वर्दीचे खरे सौंदर्य तिच्या त्यागात आहे. सीमेवर पहारा देणारा जवान... पूरग्रस्त भागात नागरिकांचे प्राण वाचवणारा अधिकारी... दहशतवाद्यांविरुद्ध लढणारा कमांडो... दुर्गम भागात लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी काम करणारा जवान... हे सर्व राष्ट्रसेवेची सर्वोच्च उदाहरणे आहेत. त्यांच्या जीवनातून कर्तव्य, शिस्त, निःस्वार्थ सेवा आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित होते. म्हणूनच वर्दी समाजात केवळ आदरच निर्माण करत नाही, तर विश्वासही निर्माण करते.

वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाने...

वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाने केवळ भरतीची तयारी न करता स्वतःला सर्वांगीण घडविण्याचा संकल्प केला पाहिजे. नियमित व्यायाम, धावणे, संतुलित आहार, व्यसनमुक्त जीवनशैली, सातत्यपूर्ण अभ्यास, भारतीय संविधान, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडींचे सखोल ज्ञान, मानसिक स्थैर्य, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सकारात्मक दृष्टीकोन यांची जोपासना करणे अत्यावश्यक आहे. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकणे आणि नव्या जोमाने पुन्हा प्रयत्न करणे, हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आजच्या तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत; परंतु त्या स्वप्नांसाठीस्वतःला घडविण्याची तयारीही ठेवली पाहिजे. स्वामी विवेकानंद यांचे शब्द आजही प्रत्येक तरुणासाठी दीपस्तंभ आहेत 'उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.'

समाज आणि शासनाची भूमिका

या प्रवासात केवळ तरुणांचीच नव्हे, तर समाज आणि शासनाचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक क्रीडा सुविधा, पारदर्शक भरती प्रक्रिया, अद्ययावत प्रशिक्षण व्यवस्था, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. नागरिकांनीही कायद्याचा आदर करणे, राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे आणि वर्दीधारी दलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली सामाजिक जबाबदारी समजली पाहिजे.

वर्दीचे स्वप्न हे केवळ नोकरीचे स्वप्न नाही; ते राष्ट्रसेवेच्या संकल्पाचे स्वप्न आहे. या स्वप्नाला मेहनत, शिस्त, प्रामाणिकपणा, चारित्र्य आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड मिळाली, तर यश निश्चित मिळते. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशी स्वप्ने पाहणारे आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अथक परिश्रम करणारे तरुण हीच देशाची खरी ताकद आहेत.

बदलत्या काळातील वर्दी

आजच्या काळात वर्दीला आणखी एका नव्या लढाईचा सामना करावा लागत आहे. सायबर हल्ले, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती युद्ध, संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद यांसारख्या नव्या आव्हानांनी राष्ट्रीय सुरक्षेचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे आजचा तरुण केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असून चालणार नाही; तो बुद्धिमान, तांत्रिकदृष्ट्या प्रगत, संवेदनशील आणि संविधाननिष्ठ असणेही तितकेच आवश्यक आहे.

दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो युवक महाराष्ट्र पोलीस, भारतीय सेना, भारतीय नौदल, भारतीय वायुदल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CRPF, BSF, CISF, ITBP, SSB, Assam Rifles) तसेच इतर विविध सुरक्षा सेवांमध्ये भरती होण्यासाठी अर्ज करतात. या आकर्षणामागे अनेक कारणे आहेत. राष्ट्रसेवेची तीव्र भावना, समाजातील मान-सन्मान, शिस्तबद्ध आणि अर्थपूर्ण जीवन, कुटुंबाला आर्थिक स्थैर्य, नेतृत्व विकसित करण्याची संधी, आणि संकटाच्या काळात समाजाच्या मदतीला धावून जाण्याचा अभिमान. वर्दी व्यक्तीला केवळ ओळख देत नाही; ती त्याला समाजाप्रती जबाबदार नागरिक बनवते.

स्वप्नामागील कठोर वास्तव

मात्र या स्वप्नाचा प्रवास अत्यंत खडतर आहे. एका जागेसाठी हजारो उमेदवार स्पर्धा करतात. लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी, कागदपत्रांची पडताळणी आणि इतर सर्व निवड प्रक्रिया पार कराव्या लागतात. अनेक तरुण ग्रामीण भागातून येतात. आर्थिक मर्यादा, अपुरी प्रशिक्षण साधने, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा सामना करत ते आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात. विदर्भातील एखादा शेतकऱ्याचा मुलगा, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी, कोकणातील तरुण किंवा पश्चिम महाराष्ट्रातील एखादा खेळाडू 'प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो; पण स्वप्न मात्र एकच असते' वर्दी मिळवायची आणि राष्ट्रसेवा करायची. अनेकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळत नाही. काही जण दोन, तीन किंवा त्याहून अधिक वेळा अपयशी ठरतात. परंतु जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर ते पुन्हा उभे राहतात आणि नव्या जोमाने प्रयत्न सुरू करतात. यशाचा खरा पाया हाच असतो.

वर्दी म्हणजे त्याग

वर्दी परिधान केल्यानंतर जीवन पूर्णपणे बदलते. कधी हिमालयातील गोठवणारी थंडी, कधी राजस्थानचे प्रखर ऊन, कधी ईशान्य भारतातील दुर्गम डोंगर, तर कधी नक्षलग्रस्त जंगलांतील मोहिमा देश जिथे कर्तव्य बजावण्याची जबाबदारी सोपवेल, तिथे कोणतीही तक्रार न करता उभे राहणे, हाच वर्दीचा धर्म असतो. दिवाळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा, कुटुंबातील समारंभ किंवा मुलांचे वाढदिवस - अनेक आनंदाचे क्षण ड्युटीमुळे चुकतात. अनेकदा जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचवावे लागतात. पूर, भूकंप, दुर्घटना किंवा दहशतवादी हल्ला कोणतेही संकट असो, वर्दीधारी दल सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचतात. म्हणूनच वर्दी ही अधिकाराचे नव्हे, तर त्याग, कर्तव्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे.दिवाळीच्या रात्री घरात दिवे लागलेले असतात; पण सीमेवरचा जवान अंधारात पहारा देत असतो. मला वाटतं, सीमेवर जो तिरंगा फडकतो तो तिथल्या हवेनी फडकत नाही तर आपल्या घरादारापासून कोसो दूर मातृभूमीच्या रक्षणासाठी तिथे तैनात असणाऱ्या त्या बहादुर जवानांच्या श्वासाने तिथला तिरंगा फडकतो. यालाच त्याग म्हणतात.

बदलते सुरक्षा वातावरण

आजच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पूर्वीच्या पारंपरिक युद्धांबरोबरच आज देशासमोर सायबर गुन्हे, ड्रोनचा गैरवापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), माहिती युद्ध (Information Warfare), आर्थिक गुन्हे, सोशल मीडियावरील दिशाभूल, संघटित गुन्हेगारी आणि सीमापार दहशतवाद यांसारखी नवी आव्हाने उभी आहेत. त्यामुळे आजच्या तरुणाने केवळ धावण्याचा सराव करून चालणार नाही. त्याला भारतीय संविधान, कायदे, संगणक, सायबर सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञान, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि बदलत्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता आत्मसात करावी लागेल. आजचा जवान किंवा पोलीस अधिकारी हा केवळ शस्त्र हाताळणारा नसतो; तो तंत्रज्ञानाचा जाणकार, समाजाशी प्रभावी संवाद साधणारा आणि संकटाच्या काळात नेतृत्व करणारा राष्ट्ररक्षक असतो.

अपयश म्हणजे शेवट नव्हे

या प्रवासात अपयश अनेकदा येते. कधी कट-ऑफपेक्षा एक-दोन गुण कमी पडतात. कधी धावण्याची वेळ काही सेकंदांनी वाढते. कधी वैद्यकीय तपासणीत अडथळे निर्माणहोतात. काहींना दोन-तीन वर्षे सातत्याने प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा वेळी समाजातील काही लोक सहज म्हणतात 'आता दुसरी नोकरी शोध.' परंतु ज्या तरुणाच्या मनात वर्दीचे खरे स्वप्न असते, तो अपयशाला शेवट समजत नाही. तो स्वतःच्या चुका शोधतो. स्वतःला अधिक सक्षम बनवतो. आणि पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरतो. 'हीच शिवरायांच्या मावळ्यांची परंपरा आहे पराभव स्वीकारायचा नाही; तर त्यातून विजयाचा मार्ग शोधायचा.'

यशासाठी सर्वांगीण तयारी आवश्यक

वर्दी मिळिवण्यासाठी केवळ शारीरिक तयारी पुरेशी नसते. नियमित व्यायाम, संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, सातत्यपूर्ण अभ्यास, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक विचारसरणी यांची सांगड घालावी लागते. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास, भूगोल, भारतीय संविधान आणि चालू घडामोडींचा अभ्यास तितकाच महत्त्वाचा असतो. प्रत्येक अपयशातून शिकत पुढे जाणे आणि स्वतःवर अढळ विश्वास ठेवणे, हेच यशाचे खरे रहस्य आहे.

महाराष्ट्रातील लाखो ग्रामीण व मध्यमवर्गीय तरुणांसाठी 'खाकी वर्दी' (पोलीस) हे केवळ एक पद नसून, सन्मान आणि सुरक्षित भविष्याचे प्रतीक आहे. मात्र, भरमसाठ अर्ज, अपुरी पदे, वाढती बेरोजगारी आणि बेरोजगारीचे वाढते प्रमाण यामुळे या स्वप्नांचे वास्तवात रूपांतर होणे अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. विदर्भातील कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा असो, मराठवाड्यातील दुष्काळाशी झुंजणारी कन्या असो, कोकणातील साध्या घरातील युवक असो किंवा पुणे-मुंबईतील स्पर्धात्मक वातावरणात वाढलेला विद्यार्थी असो प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो; पण ध्येय एकच असते वर्दीपर्यंत पोहोचायचे.

वर्दीचे आकर्षण आणि स्वप्नांचा पायाः

शाळा किंवा महाविद्यालयीन जीवनापासूनच, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात खाकी वर्दीबद्दल एक विशेष आकर्षण असते. खेळातील प्राविण्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्त या गुणांना योग्य दिशा देऊन सरकारी नोकरी मिळवण्याचा हा सर्वात थेट मार्ग मानला जातो. बारावी किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर, कोणताही मोठा खर्च न करता, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर वर्दी मिळवणे हे प्रत्येक तरुण-तरुणीचे ध्येय असते.

वास्तवातील भीषणता (संघर्ष आणि आव्हाने):

अफाट स्पर्धा आणि अपुरी पदेः मागील काही वर्षांतील आकडेवारी पाहिली तर, सुमारे १५ ते १७ हजार रिक्त जागांसाठी तब्बल १७ ते १८ लाखाहून अधिक तरुण अर्ज करतात. म्हणजेच एका जागेसाठी हजारो उमेदवारांमध्ये स्पर्धा होते. यातूनच तीव्रचुरस निर्माण होते. आर्थिक व सामाजिक ताणः ग्रामीण भागातून शहरात (उदा. पुणे, छत्रपती संभाजीनगर) स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येणाऱ्या मुलांना अनेकदा खाण्या-पिण्याची आणि राहण्याची हेळसांड सहन करावी लागते. अनेक कुटुंबांना मुलांच्या तयारीसाठी कर्ज काढावे लागते. वेळापत्रकाचा अभाव आणि अनिश्चितताः बऱ्याचदा शासनाकडून भरती प्रक्रियेचे नियोजन वेळेत होत नाही. परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या जातात, ज्यामुळे उमेदवारांमध्ये नैराश्य आणि चिंतेचे वातावरण निर्माण होते. मानसिक आरोग्य आणि टोकाची पावलेः सततच्या अपयशामुळे आणि वाढत्या वयामुळे तरुणांचे मानसिक खच्चीकरण होते. अपयशाचा सामना न करू शकल्यामुळे अनेकदा टोकाची पावले उचलण्याच्या अत्यंत दुर्दैवी घटना समोर येतात. संधी आणि सद्यस्थितीः सध्याच्या पात्रता निकषांनुसार, भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी (Physical Efficiency Test) आणि लेखी परीक्षा (मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान) यांचा समावेश असतो. कष्टाच्या जोरावर हे यश मिळवून अनेक तरुण पोलीस उपनिरीक्षक (PSI) किंवा पोलीस शिपाई बनून आपले भविष्य घडवत आहेत. तरुणांचे स्वप्न आणि वास्तव यातील दरी मिटवण्यासाठी शासनस्तरावर रिक्त पदांची नियमितपणे व पारदर्शक पद्धतीने भरती होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, केवळ पोलीस भरतीवर अवलंबून न राहता, तरुणांनी इतर कौशल्य आधारित रोजगाराच्या संधींचाही विचार करणे काळाची गरज आहे.

वर्दी मिळाल्यानंतरची खरी परीक्षा

मात्र वर्दी मिळणे म्हणजे संघर्ष संपणे नव्हे. उलट, एका नव्या जबाबदारीची सुरुवात असते. सीमेवर तैनात असलेला जवान असो, शहरात कायदा व सुव्यवस्था राखणारा पोलीस अधिकारी असो किंवा नैसर्गिक आपत्तीत जीव धोक्यात घालून मदत करणारा जवान असो त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा कर्तव्याचा असतो. अनेकदा सण-उत्सव, कौटुंबिक समारंभ, मुलांचा वाढदिवस किंवा आई-वडिलांच्या आजारपणाच्या काळातही त्यांना ड्युटीवर राहावे लागते. हा त्याग अनेकांना दिसत नाही; पण याच त्यागामुळे सामान्य नागरिक सुरक्षितपणे आपले जीवन जगू शकतात.

आजच्या तरुणांसाठी काळाची हाक

आज भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या प्रवासात महाराष्ट्रातील तरुणांवर मोठी जबाबदारी आहे. देशाला केवळ नोकरी करणारे कर्मचारी नकोत; तर चारित्र्यसंपन्न, शिस्तप्रिय, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि राष्ट्रनिष्ठ अधिकारी व जवान हवेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना स्वराज्यासाठी घडवले. आज प्रत्येक तरुणाने स्वतःला राष्ट्रसेवेसाठी घडवले पाहिजे.

भारताचा इतिहास हा शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा इतिहास आहे. ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. वर्दीचे स्वप्न पाहणे ही अभिमानाची गोष्ट आहे; परंतु त्या स्वप्नाला कठोर परिश्रम, शिस्त, चारित्र्य, ज्ञान, तांत्रिक कौशल्य आणि निःस्वार्थ सेवाभाव यांची जोड देणे आवश्यक आहे. वर्दी ही सत्ता मिळिवण्याचा मार्ग नाही; ती लोकांचा विश्वास जिंकण्याचा मार्ग आहे. ती अधिकारांची नव्हे, तर कर्तव्यांची आठवण करून देते. ती केवळ व्यक्तीला बदलत नाही, तर समाजात सुरक्षितता, शिस्त आणि विश्वास निर्माण करते. आज भारत 'विकसित भारत २०४७' या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. या प्रवासात राष्ट्रप्रेमी, तांत्रिकदृष्ट्या सक्षम, नैतिक मूल्यांनी समृद्ध आणि संविधाननिष्ठ वर्दीधारी युवक-युवतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल

कर्तृत्वच वर्दीचा सन्मान वाढवते. वर्दी माणसाला मोठे करत नाही; माणूस आपल्या कर्तृत्वाने वर्दीचा सन्मान वाढवतो. आज मैदानावर गाळलेला प्रत्येक घामाचा थेंब उद्या खांद्यावरील स्टार, छातीवरील बॅज आणि देशवासीयांच्या सलामीत रूपांतरित होतो. म्हणूनच प्रत्येक तरुणाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे 'मी वर्दी मिळवण्यासाठी धावत आहे की राष्ट्रसेवेसाठी स्वतःला घडवत आहे?' या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तरच त्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल. कारण वर्दी ही अंगावर घालण्याची वस्तू नाही; ती मनात जपायची जबाबदारी आहे आणि ज्या दिवशी मनात राष्ट्रप्रेम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभावना जागृत होते, त्या दिवशीच खरा सैनिक, खरा पोलीस आणि खरा राष्ट्ररक्षक जन्माला येतो. शेवटी एवढेच.. मोठी स्वप्ने पहा, आव्हाने स्वीकारा, ध्येय पूर्ण करा आणि सचोटीने राष्ट्राची सेवा करा.

"राहें ले ही जाएँगी मंज़िल तक, हौसला रख। कभी सुना है कि अँधेरे ने, सवेरा होने ना दिया।।"

जय हिंद ! जय महाराष्ट्र !