करिअर कट्टा उपक्रमाच्या वार्षिक नियोजनातला अत्यंत महत्त्वाचा महिना म्हणजे जुलै महिना. जगातल्या सगळ्यात जास्त तरुणांची लोकसंख्या असणाऱ्या देशासाठी या महिन्यातील 'आंतरराष्ट्रीय कौशल्य दिन' हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंटचा फायदा देशाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सद्यस्थितीला उच्च शिक्षणामध्ये अनेक सकारात्मक परिवर्तनाचे प्रयोग केले जात आहेत. पण या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थी प्रवेशाच्या बाबतीमध्ये एक शिथिलता किंवा मरगळ घेऊनच आलेली आहे असं वाटतं. पण ही मरगळ आपल्या सर्वांना झटकावीच लागेल आणि या तरुणांच्या माध्यमातून राष्ट्रातील समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक म्हणून असणारे सर्व प्रयत्न हे अत्यंत प्रामाणिकपणे करावे लागतील. करिअर कट्टाच्या वतीने सातत्याने गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांसाठी केले जात आहेत. करिअर संसद हा त्यातीलच एक अभिनव आणि अत्यंत विद्यार्थीप्रिय होत असणारा एक प्रयोग आहे. सातत्याने गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण करून राज्यस्तरीय अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत महाराष्ट्राच्या शैक्षणिक सांस्कृतिक अभिसरणाबरोबरच कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, औद्योगीकरणांमध्ये होत असणारे नाविन्यपूर्ण प्रयोग या सर्व बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करिअर संसदेच्या माध्यमातून केला जात असतो.
यावर्षी १५ जुलै रोजी करिअर संसदेचा शपथविधी आहे. 'जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त' याचं आयोजन केलं जातं. राज्यामध्ये साधारणत २०० महाविद्यालयाने करिअर संसदेची स्थापना ही वेळेपूर्वी केलेली आहे पाऊस आणि इतर काही कारणांमुळे काही महाविद्यालय येत्या काही दिवसांमध्ये आपल्या संसदेची स्थापन करून विद्यार्थ्यांना या प्रवाहामध्ये घेऊन येतील. १७२ दिवसांच्या अत्यंत नियोजनबद्ध कृती आराखड्याचा शुभारंभ २५ जुलैपासून सुरु होत आहे. १५ जुलै ला शपथविधी घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण आणि १७२ दिवसांच्या या उपक्रमानंतर ३ जानेवारी रोजी याचा होणारा समारोप हा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल असं वाटतं.
उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी प्रवेशाच्या बाबतीमध्ये आलेली मरगळ जर झटकून टाकायची असेल तर, आपल्याला काही नवीन प्रयोग करावे लागतील. यावर सातत्याने गेले एक ते दीड वर्षापासून चाललेल्या करिअर कट्टाच्या वेगवेगळ्या बैठका आणि संशोधनाच्या माध्यमातून काही प्रयोग महाराष्ट्रामध्ये आपण करत आहोत. त्यातला एक प्रयोग म्हणजे महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या स्टार्टअप कंपनी आपण निर्माण करत आहोत. दोनशे विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षक यांच्या एकत्रित समन्वयातून महाराष्ट्रातील सोलर एनर्जी किंवा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताच्या माध्यमातून महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनवण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने ठेवलेले आहे. या ६५% ऊर्जा निर्मिती अपारंपारिक स्त्रोतांतून करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या उद्दिष्टाला हातभार लावण्याचा दृष्टिकोनातून आणि या उद्दिष्ट पूर्ततेच्या मार्गावर असणाऱ्या अनेक उद्योजकीय संधीचा फायदा तरुणांना व्हावा या उद्देशाने 'सूर्य सेवा ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी आकारास येत आहे. १५ जुलै रोजी राज्याचे उद्योग मंत्री यांच्या साक्षीने या कंपनीचा शुभारंभ होऊ घातलेला आहे. या कंपनीच्या माध्यमातून देश पातळीवर एक मोठं अत्यंत चांगलं तरुणांचं उद्योजकीय मॉडल उभा करण्याचा प्रयत्न करिअर कट्टा करीत आहे. करिअर कट्टा फक्त याच ठिकाणी थांबत नसून, बऱ्याच वेळेला आपण परकीय विद्यापीठांचा दाखला देत असतो की, याकंपन्यांच्या मध्ये विद्यार्थी कंपनी स्थापन करतात आणि त्यांच्यामध्ये प्राध्यापक रिसर्चर म्हणून स्टेकहोल्डर असतात. कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट त्यांच्यामध्ये सहभागी असते आणि यातून आपल्या विद्यार्थ्यांचे स्टार्टअप यशस्वी झाल्यानंतर संस्था देखील आर्थिक लाभार्थी तर असतेच पण त्याबरोबर या ठिकाणी समाजामध्ये फार मोठे योगदान या माध्यमातून देत असतात. मुळातच महाराष्ट्रातल्या सर्व शैक्षणिक व्यवस्थेचा विचार करता नफा न मिळवण्याच्या उद्देशाने तयार झालेले हे सर्व घटक आहेत या सर्व आस्थापना आहेत. पण हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्यांदा करतो आहे.
महाराष्ट्रातल्या १०० महाविद्यालयामध्ये स्टार्टअप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी को वर्किंग स्पेस तयार केले जाणार आहेत त्याचं धोरण हे या ठिकाणी जळगाव मध्ये झालेल्या राज्यस्तरीय करिअर कट्टाच्या जिल्हा समन्वयक आणि प्राचार्य प्रवर्तक यांच्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलेला आहे. आणि हे शंभर महाविद्यालयांमधलं को वर्किंग स्पेस हे महाराष्ट्रातल्या मातीमध्ये तरुणांना उद्योजकीय कौशल्य वाढीस लागावीत आणि त्यांच्यासमोर काही चांगले उदाहरण निर्माण व्हावेत यासाठी काम करेल असा विश्वास वाटतो.
करिअर कट्टाच्या वतीने महाविद्यालय आणि करिअर संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या प्रत्येक उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. 'सूर्य सेवा ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी असेल, १०० महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात येणार को वर्किंग स्पेस च नेटवर्क असेल किंवा करिअर संसदेची स्थापना असेल या प्रत्येक उपक्रमांच्या पाठीमागे असणारी एकमेव प्रेरणा म्हणजे 'युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी' उपक्रम राबवले जातात या सर्वांचा आढावा आपल्यासमोर मांडत असताना अत्यंत आनंद होतो आहे.
या अंकाचे निमंत्रित संपादक सन्माननिय डॉ. चेतन शेलोटकर (असिस्टंट कमांडंट, CRPF, गृह मंत्रालय, भारत सरकार) हे आहेत तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक आणि अभ्यासक यांच्या मार्गदर्शनपर लेखांचा समावेश करण्यात आला असून, विद्यार्थी, युवा वर्ग आणि वाचकांसाठी हा अंक ज्ञान, प्रेरणा आणि करिअरविषयक दिशादर्शनाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरेल, असा आमचा विश्वास आहे. राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे सर यांनी 'उच्च शिक्षण विभागांमध्ये करिअर कट्टाच्या वतीने आयोजित उपक्रम' या विषयावर उच्च शिक्षणातील विविध उपक्रम, त्यांचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील योगदान याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे.
सन्माननीय डॉ. रवींद्र साठे सर (सभापती, राज्यमंत्री दर्जा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई) यांनी 'मधमाशी पालनासाठी मध केंद्र योजना' या विषयावर शासनाच्या विविध योजनांची माहिती, स्वयंरोजगाराच्या संधी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या मधमाशी पालन व्यवसायाचे महत्त्व प्रभावीपणे उलगडून सांगितले आहे.
माननीय डॉ. तुषाबा शिंदे (IRPS) यांनी 'ग्रीन जॉब्स पर्यावरणपूरक करिअरच्या नव्या संधी' या लेखातून पर्यावरण संवर्धनासोबतच भविष्यातील रोजगाराच्या नव्या दिशा विद्यार्थ्यांसमोर मांडल्या आहेत. बदलत्या काळात हरित अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या करिअरच्या संधींचा वेध घेणारा हा लेख निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
मा. राजीव नंदकर सर (अतिरिक्त जिल्हाधिकारी, यशदा, पुणे) यांचा 'युवकांमधील नितीमुल्ये' हा लेख आहे तसेच, माननीय प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर सर यांचा 'जागतिक युवा कौशल्य दिन व करिअर संसद शपथविधी' हा लेख युवकांमध्ये कौशल्य विकास, नेतृत्वगुण, लोकशाही मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणारा आहे.
मा. मिथिला दळवी मॅडम यांनी 'जे फॉर जेलस' या लेखातून भावनिक बुद्धिमत्ता, आत्मपरीक्षण आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्व विकासाचा अत्यंत समर्पक वेध घेतला आहे. तर मा. सागर बाबर यांनी 'तुमच्या मोबाईलमध्ये लपलेला नवा कर्मचारी' या लेखातून AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोबाईलच्या प्रभावी उपयोगाची नवी दृष्टी दिली आहे.
मा. संकेत मुनोत यांनी 'आरोग्य विमा नावाचा जादूगार' या लेखाद्वारे आरोग्य विम्याचे महत्त्व, त्याची आवश्यकता आणि प्रत्येक कुटुंबासाठी त्याचे उपयुक्त पैलू अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत.
मा. प्राचार्य डॉ संजय अस्वले यांचा 'स्टार्टअप आणि इन्क्युबेशनद्वारे युवा उद्योजक घडविण्यासाठी करिअर कट्टाचा राज्यव्यापी उपक्रम' हा लेख आहे. 'करिअर कट्टा: जीवन समृद्ध करणारा प्रवास' या लेखातून रामेश्वर मोरे यांनी करिअर कट्टाच्या उपक्रमांचा युवकांच्या जीवनावर झालेला सकारात्मक परिणाम प्रभावी शब्दांत मांडला आहे. तसेच सानिया शेख हिचा 'करिअर कट्टा : स्वप्नांना दिशा देणाऱ्या माझ्या आयुष्यातील दोन वर्षांचा सुवर्ण प्रवास' हा अभिप्रायपर लेख करिअर कट्टामुळे घडलेल्यावैयक्तिक परिवर्तनाची प्रेरणादायी साक्ष देतो. याशिवाय प्रा. संदेश कासार सर यांनी तयार केलेली ज्ञानवर्धक प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणारी आणि अभ्यासाला पूरक ठरणारी आहे.
हा अंक अधिकाधिक माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि संग्रही ठेवण्याजोगा व्हावा, या उद्देशाने संपादकीय मंडळाने अत्यंत मनःपूर्वक आणि समर्पित भावनेने परिश्रम घेतले आहेत. या निमित्ताने संपादकीय मंडळातील सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो.
या अंकासाठी आपल्या अत्यंत व्यस्त दिनचर्येतून अमूल्य वेळ देऊन दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण लेख प्रदान करणाऱ्या सर्व मान्यवर लेखक, अधिकारी, तज्ज्ञ आणि सहकाऱ्यांप्रती आम्ही मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या बहुमोल योगदानामुळे हा अंक अधिक समृद्ध झाला आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
'करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी' हे मासिक विद्यार्थी आणि युवकांसाठी केवळ एक मासिक नसून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे, कौशल्यांना बळ देणारे आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा देणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा ज्ञानप्रवास अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण होत राहील, असा आम्हाला विश्वास आहे. या अंकाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया, सूचना आणि अभिप्रायांचे आम्ही सदैव मनापासून स्वागत करू. आपल्या मौल्यवान सूचना आमच्या पुढील वाटचालीसाठी नवी दिशा देतील, असा विश्वास व्यक्त करून, येथेच थांबतो.
धन्यवाद !
जय हिंद, जय महाराष्ट्र!