एका छोट्याशा तालुक्यातील विद्यार्थिनीपासून राज्य समन्वयक विद्यार्थी होईपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
माझ्या आयुष्यात जर एखाद्या उपक्रमाने सर्वात मोठा बदल घडवून आणला असेल, तर तो म्हणजे करिअर कट्टा. दोन वर्षांपूर्वी या उपक्रमाबद्दल मला काहीच माहिती नव्हती. करिअर कट्टा म्हणजे काय, इथे काय शिकायला मिळतं, विद्यार्थ्यांना याचा नेमका काय फायदा होतो, हे मला माहीत नव्हतं. पण आज मागे वळून पाहताना अभिमानाने सांगू शकते की, करिअर कट्टाने मला फक्त संधी दिली नाही, तर माझ्या व्यक्तिमत्त्वाला नवी ओळख, आत्मविश्वास आणि आयुष्याला एक नवी दिशा दिली.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमात माझी सर्वप्रथम कायदे व शिस्त पालन मंत्री म्हणून निवड झाली. ही संधी मला आमच्या जिल्हा समन्वयक ममता पळसपगर मॅडम यांनी दिली. त्या क्षणापासून माझ्या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाची सुरुवात झाली.
करिअर कट्ट्याच्या नियमित बैठकींना उपस्थित राहायला सुरुवात केली आणि प्रत्येक बैठकीत काहीतरी नवीन शिकायला मिळू लागले. मा. यशवंत शितोळे सर यांच्या मार्गदर्शनातून स्टेजवर आत्मविश्वासाने कसे बोलायचे, लोकांशी प्रभावी संवाद कसा साधायचा, नेतृत्व कसे करायचे, वेळेचे नियोजन कसे करायचे आणि समाजासाठी काम करण्याची जबाबदारी कशी घ्यायची, हे शिकायला मिळाले. प्रत्येक रविवार माझ्यासाठी शिकण्याचा आणि स्वतःला घडवण्याचा दिवस बनला.
सुरुवातीला मला वाटायचं की मी हे सगळं करू शकेन का? पण माझ्यावर विश्वास ठेवणारे मार्गदर्शक आणि माझी साथ देणारी टीम यांच्यामुळे माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत गेला. मी प्रत्येक बैठक, प्रत्येक उपक्रम आणि प्रत्येकटास्क मनापासून पूर्ण करू लागले. याच सातत्यामुळे मला अनेक नवीन संधी मिळत गेल्या.
या दोन वर्षांच्या प्रवासात मला अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. चांदूर रेल्वे येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला, जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली, विविध अधिकारी, उद्योजक, वकील, शेतकरी आणि समाजातील प्रेरणादायी व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. प्रत्येक अनुभवाने माझ्या ज्ञानात भर पडली आणि माझा आत्मविश्वास अधिक मजबूत झाला.
यानंतर आम्हाला बारामती येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तेथे विविध वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आणि मार्गदर्शक यांच्याशी संवाद साधता आला. कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन आधुनिक शेतीविषयी माहिती मिळाली. त्या भेटीने माझा विचार करण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला.
माझ्या कामाची दखल घेत १५ जुलै २०२५ रोजी माझी मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. ही माझ्यासाठी आयुष्यातील अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. मुख्यमंत्री म्हणून माझ्या टीमसोबत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले. समाजोपयोगी उपक्रम, जनजागृती अभियान, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, माहिती संकलन आणि नेतृत्व विकास यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतला. मराठवाड्यात पूरग्रस्त झालेल्या नागरिकांसाठी मदत निधी संकलन करून सामाजिक बांधिलकीही जपली.
मुख्यमंत्री म्हणून निवड होण्यापूर्वीच माझी विभागीय समन्वयक म्हणून निवड झाली. या जबाबदारीअंतर्गत मला पाच जिल्ह्यांतील करिअर कट्टाच्या उपक्रमांचा समन्वयसाधण्याची संधी मिळाली. ही जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी होती.
करिअर कट्टामध्ये सुरू असलेल्या ९० दिवसांच्या उपक्रमामध्ये मी नियमित सहभाग घेतला. पुस्तक वाचन, दैनंदिन उपक्रम, कॅमेरा ऑन करून बैठकींमध्ये सहभाग, संवादकौशल्य आणि सातत्यपूर्ण काम यामुळे माझी निवड दिल्ली अभ्यासदौऱ्यासाठी झाली. एका छोट्याशा तालुक्यातील विद्यार्थिनी म्हणून दिल्लीला जाण्याची संधी मिळेल, असा मी कधीच विचार केला नव्हता. त्यामुळे माझ्या निवडीची बातमी ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला.
दिल्लीमध्ये देशातील अनेक वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि प्रेरणादायी व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. गुरुग्राम येथे सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी चेतन शेलोटकार सर यांची भेट घेण्याचा योग आला. विविध कार्यालयांना भेटी दिल्या, अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेल्या मित्र-मैत्रिणींसोबत आयुष्यभर टिकणारी मैत्री झाली. दिल्ली अभ्यासदौऱ्यादरम्यान किरण पाटील मॅडम आणि योगिता चौधरी मॅडम यांनी मला दिलेले मार्गदर्शन, सहकार्य आणि आपुलकी माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील.
मा. यशवंत शितोळे सरांनी माझ्यावर विश्वास ठेवून नोव्हेंबर महिन्याच्या मासिकामध्ये माझा लेख आणि माझ्याद्वारे घेतलेली मुलाखत प्रकाशित केली. मला डॉ. सुवर्णा ओगले-शिंदे मॅडम यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. माझ्यासारख्या विद्यार्थिनीचा लेख आणि मुलाखत मासिकामध्ये प्रकाशित होणे, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण होता.
दिल्लीहून परतल्यानंतर माझा उत्साह आणखी वाढला. मी प्रत्येक टास्क, पुस्तक वाचन, दैनंदिन उपक्रम आणि बैठकींमध्ये सातत्य ठेवले. प्रामाणिकपणे आणि मनापासून काम केल्यामुळे मला अनेक जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळाली. या प्रवासात मला अनेक उल्लेखनीय यश आणि सन्मान मिळाले. प्रत्येक यशाने मला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा दिली.
यानंतर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अविस्मरणीय क्षण आला. माझी राज्य समन्वयक विद्यार्थी म्हणून निवड झाली. दोन वर्षांपूर्वी करिअर कट्टा म्हणजे काय हेही माहीत नसलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थिनीची आज राज्यस्तरावर विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडझाली, ही माझ्यासाठी शब्दांत व्यक्त न करता येणारी भावना आहे. हा सन्मान माझ्या एकटीचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मार्गदर्शकाचा आणि माझ्या संपूर्ण टीमचा आहे.
यावेळचा बारामतीचा माझा प्रवास अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला. या दौऱ्यात मला 'आधुनिक सावित्री' या उपक्रमासाठी अक्षदा मोंडकर मॅडम यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी झालेल्या संवादातून महिला सक्षमीकरण, नेतृत्व आणि सामाजिक कार्याबद्दल अनेक प्रेरणादायी विचार जाणून घेता आले. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत मोलाचा ठरला. राज्य समन्वयक होण्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील टॉप ५ विद्यार्थी म्हणून रु. २५,००० च्या गौरवासाठी झालेली निवड हा क्षण माझ्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होता.
आज मी ज्या ठिकाणी उभी आहे, त्यामागे अनेक व्यक्तींचे मोलाचे मार्गदर्शन आहे. करिअर कद्याचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे सर, जिल्हा समन्वयक ममता पळसपगर मॅडम, आमचे प्राचार्य प्रवर्तक तळवणकर सर, रंजना जिवणे मॅडम, रेखा मंग्गीरवार मॅडम, किरण पाटील मॅडम आणि योगिता चौधरी मॅडम यांनी प्रत्येक टप्प्यावर माझ्यावर विश्वास ठेवला, योग्य मार्गदर्शन केले आणि मला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या विश्वासामुळेच मला मुख्यमंत्री, दिल्ली अभ्यासदौरा आणि पुढे राज्य समन्वयक विद्यार्थी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी त्यांची मनापासून ऋणी आहे.
या दोन वर्षांत मला असंख्य अनुभव, अनेक आठवणी, नवे मित्र, उत्तम मार्गदर्शक आणि आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारे धडे मिळाले. करिअर कट्टाने मला केवळ नेतृत्व शिकवले नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले. मोठी स्वप्ने पाहायला शिकवले. समाजासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. आज माझ्या आयुष्यात जो आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि नेतृत्व दिसते, त्याची पायाभरणी करिअर कट्टानेच केली आहे.
करिअर कट्टा माझ्यासाठी फक्त एक उपक्रम नाही; तो माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारा, माझ्या स्वप्नांना उंच भरारी देणारा आणि एका छोट्याशा तालुक्यातील विद्यार्थिनीला राज्यस्तरावर स्वतःची ओळख निर्माण करून देणारा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि प्रेरणादायी प्रवास आहे. हा प्रवास मी आयुष्यभर अभिमानाने जपेन.
धन्यवाद !