Author
जे फॉर जेलसी
मा. मिथिला दळवी
भावनिक बुद्धिमत्ता ट्रेनर

कोणत्या भावना कठीण, अवघड वाटतात यावर आम्ही आपल्या करिअर कट्टाच्या 'इक्यू क्लब' मध्ये बोलत होतो. राग, भीती, अन्क्झायटी असे वेगवेगळे पर्याय समोर आले आणि मग कुणीतरी म्हणालं.. जेलसी.... मत्सर, असूया. आणि सगळ्यांचच मत पडलं हो हो जेलसी. मत्सर हे प्रकरणच फार बदनाम. वाईट म्हणून कायमचा शिक्का बसलेली ही भावना.

प्रत्येकाला वाटतं या भावनेशी आपला संबंधच आला नाही तर फारच उत्तम. पण आपण सगळेच सहजपणे भाषा कशी वापरतो पाहा.. 'तिला नं फार जेलसी आहे अमुकची', 'तमुकचं झालं प्रमोशन पण त्याचं नाही झालं ना! सारखी टांग अडवत असतो तो.. जेलस झाला आहे फार'.. असं विश्लेषण आपण येता-जाता सरसकट ऐकत असतो. मत्सराचा रंग सापडत जातात कुठेना कुठे.

या मत्सराची एक गंमत असते.. दुसऱ्याला मत्सर वाटतोय हे आपल्याला पटकन कळतं. पण आपल्याला स्वतःला मत्सर वाटतोय हे नाही कळत. ते बहुतेक इतरांनाच जास्त कळतं आपल्यापेक्षा !! मत्सर वाटण्याची हीच खासियत आहे. कोणी स्पष्टपणे बोलत नाही, पण वातावरणात भरून राहिलेला मत्सर आपल्याला नेहमीच कळतो. जाणवतो. कसा? कुणाचं तरी वागणं विचित्र असतं, असहकाराचं असतं, खोडा घालणारं असतं, कुणीतरी लागट, बोचरं, उपरोधानं बोलतं. कोणाचातरी तिरकेपणा घायाळ करतो, आणि मग आपल्याला एकदम लख्ख प्रकाश पडतो, अरे ती व्यक्ती तर मत्सरापोटी हे करतेय. बस मग आपल्याला एकदम 'युरेका!'च होतं. दुसऱ्याला आपल्याबद्दल मत्सर वाटतोय हे कळलं की काही क्षण चक्क बरं वाटतं. आणि मग तो लाखमोलाचा प्रश्न पडतो, की मी आता त्या व्यक्तीशी कसं वागायचं? आणि आपल्याला एखाद्याचा मत्सर वाटतोय हे बऱ्याचदा आपल्याला पटकन कळत नाही आणि तो पर्यंत आपण काहीतरी विचित्र वागून गेलेलो असतो तोवर.

मत्सर वाटतो म्हणजे नेमकं काय वाटतं? त्यात ही दोन प्रकार आहेत. हेवा (एन्व्ही) आणि जेलसी (मत्सर, असूया). दोन्हीच्या अर्थात फरक आहे. आपल्यासाठी काही तरी फार मोलाचं प्रिय असं असतं. आणि नेमकं ते आपल्याकडे नसतं आणि दुसऱ्या कुणाकडे तरी असतं. इथे मला हेवा वाटतो. उदाहरणार्थ मला मुलींचे रेशमी, मुलायम, लांब केस फार आवडतात, माझे केस नेमके आखूड आणि कुरळे आणि रखरखीत असतात, ते कसे मॅनेज करायचे असा मला कायम प्रश्न असतो आणि माझी खास मैत्रीण अक्षताचे केस अगदी तसेच असतात जसे मला हवे असतात. मला अक्षताच्या केसांचा, अक्षताचा हेवा वाटतो.

मला ऑफिस जॉईन केल्यावर पाच वर्षांनी पहिलं प्रमोशन मिळालेलं असतं. राघवला जॉईन केल्यावर पहिल्याच वर्षी प्रमोशन मिळतं, मला राघवचा हेवा वाटतो. सोहम इतका छान सहलींना जातो, सोबत त्याची पार्टनर असते, त्यांचे झक्कास फोटो तो इन्स्टाग्रामवर टाकतो, फार भारी वाटतं ते फोटो पाहताना.. मला ही हवे आहेत माझे असे फोटो पार्टनरसोबतचे फोटो इन्स्टावर पोस्ट करायला.. पण नाही आहे सध्यातरी मला ते शक्य, याने मला सोहमचा हेवा वाटतो.

मग त्या छान छान युट्यूबर्स मुली.. गोड दिसतात, कायमच फ्रेश असतात, घरं छान राखतात, स्वयंपाक उत्तम करतात, आणि त्यांच्या घरचे पण त्यांना अगदी समजून घेणारे असतात. आणि त्यांचे चॅनेल चक्क मॉनिटाइझ ही झालेले असतात. मी किती ही ठरवलं ना तरी यातलं बहुतेक काही जमतच नाही.. आपल्यातल्या प्रत्येकाकडे हेवा वाटायची यादी असते.

जेलसीचं प्रकरण जरा भारीच अधिक बोचरं असतं. माझ्यासाठी काहीतरी फार महत्वाचं प्रिय असं आहे आणि मला न मिळता ते दुसऱ्याला मिळतं आहे म्हणून मला ते गमावण्याची भीती आहे आणि मी ते गमावतो आहे म्हणून मला अतिशय राग हीयेतो आहे. याचं साधं उदाहरण म्हणजे प्रेमाचे त्रिकोण. किंवा मला मिळायला हवं होतं ते प्रमोशन मला न मिळता दुसऱ्यालाच मिळतं. यात राग, भीती आणि काहीतरी प्रिय, हवंहवसं असणं हे सगळंच येतं. हे रसायनच जबरं. म्हणूनच हाताळायला आणखी कठीण. आणि बघायला गेलं तर भीती बऱ्याचदा आपल्याला कुठेतरी दडून राहायला सुचवत असते आणि राग उघड-उघड तीव्र स्वरुपात व्यक्त होत असतो. या दोन्ही भावना फार भिन्न प्रकारे व्यक्त होतात आणि म्हणून त्यांचा सामना करणं हा अनुभव शरीर आणि मनासाठी फार विपरित असतो. जेलसी पोटी जी ओढाताण होते, तिची मुळं इथे असतात. जो जेलस असतो त्याची कुचंबणा नेहमीच जास्त असते.

मग करायचं काय या जेलसीचं ? पहिलं म्हणजे मला राग येतोय, मला भीती वाटतेय आणि मला एखादी गोष्ट, नातं अगदी हवं हवंसं आहे, आणि ते माझ्या हातंन निसटतंय याचा राग येतोय, आणि त्या नात्याशिवाय, गोष्टीशिवायच्या माझ्या आयुष्याची मला कल्पना करता येत नाहीय, त्याची भीती वाटते आहे, हे स्वतःशी मान्य करणं. आपण या लेखमालेत सातत्याने पाहतो आहोत की भावना ओळखणं आणि आणि त्या स्वतःशी मान्य करणे याने भावनेची तीव्रता काही अंशी कमी होते. म्हणून भावना ओळखणं अगदी महत्वाचं. जेलसीच्या बाबतीत खूपदा ही भावना पटकन कळत नाही, पण राग भीती यांची साथ धरत धरत गेलं की सरावाने जेलसीपर्यंत पोहोचता येतं.

आता एकदा भावना कळली की मग तिच्या व्यवस्थापनाचा विचार करता येतो. मुळात प्रत्येक गोष्ट जी मला हवी आहे ती मिळेलच असं नाही आणि एखादी गोष्ट मिळण्या न मिळण्याने माझी आयुष्यभरासाठी योग्यता ठरत नाही. हा कळीचा मुद्दा.

कुणाच्या तरी विचित्र वागण्यातून त्याला माझ्याबद्दल जेलस वाटतंय, हे जेव्हा कळतं तेव्हा काय करायचं? चक्क थोडं जागृक राहायचं. थोडं सुरक्षित अंतर ठेवायचं त्या व्यक्तीपासून. आणि एक गोष्टीची तर कायमच खूणगाठ बांधायची की ज्याला जेलस वाटतं आहे, त्याची आतून फार ओढाताण होते, त्यामुळे दुसऱ्याला माझ्याबद्दल जेलस वाटत असेल तर त्या जेलसीचा तोच जास्त बळी असतो. त्या मानाने मी जास्त सुरक्षित असते / असतो. हे गणित जमू लागलं की दुसऱ्याला आपल्याबद्दल वाटणाऱ्या जेलसीची बोच कमी होऊ शकते.

कधी कधी जेलसीला योग्य प्रकारे वळण लावता आलं तर त्यातून काही चांगलं ही हाती लागू शकतं. म्हणजे मला ऑफिस मध्ये या वेळी प्रमोशन नाही मिळालंय, दुसऱ्या कुणाला तरी मिळालंय, तर मी माझ्यातल्या कमी पडणाऱ्या गोष्टी शोधू शकते, त्यावर काम करु शकते. स्वतःमध्ये बदल घडवून आणायचे प्रयत्न करु शकते. यातून माझ्यात काहीतरी सकारात्मक घडू शकतं.

ही भावना कटू, दाहक, बोचरी आहे, पण तिला कुठल्या दिशेने न्यायचं हा पर्याय माझ्या ही हातात आहे.