Author
युवकांसाठी अध्ययन, भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता कौशल्ये
मा. डॉ. राजीव नंदकर
अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक, यशदा, पुणे

आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांना यश मिळवण्यासाठी केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसते. विशेषतः स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असणाऱ्या युवकांना त्यांची बुद्धिमत्ता बहुआयामी विकसित करावी लागते, अध्ययन बुद्धिमत्ता (Cognitive Intelligence), भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) आणि सामाजिक बुद्धिमत्ता (Social Intelligence) ह्या तीन बुद्धिमत्ता युवकांना केवळ परीक्षेत नव्हे, तर संपूर्ण जीवनात यशस्वी बनवतात. अध्ययन बुद्धिमत्ता माहितीचे आकलन आणि विश्लेषण करण्यात मदत करते, भावनिक बुद्धिमत्ता स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचे व्यवस्थापन शिकवते, तर सामाजिक बुद्धिमत्ता परस्पर संबंध आणि सामाजिक जबाबदाऱ्या हाताळण्यात सक्षम बनवते. या तिन्ही बुद्धिमत्ताचा समन्वय युवकांना अपयशाच्या भौतीपासून मुक्त करून, सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यास प्रेरित करतो आणि यशाकडे मार्गस्थ करतो. ही तीन कौशल्ये विकसित केल्याने युवक स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातही संतुलित राहतात. या लेखात या तीन बुद्धिमत्तांचे संदर्भात विस्ताराने विश्लेषण केलेले आहे.
अध्ययन बुद्धिमत्ताः ज्ञान आत्मसात करण्याची कला
स्मृति क्षमता हीच बुद्धिमत्ता आहे असा गैरसमज केल्याने अनेक लोक स्पर्धेत मागे राहून जात असतात. स्पर्धा परीक्षा ही फक्त तुमची बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता किती आहे, फक्त याची चाचपणी करत नाही तर तुमचे समर्पण किती आहे याचीही चाचपणी करतात. अध्ययन बुद्धिमत्ता ही मुख्यतः स्मृति केंद्राशी जुळी निगडीत असली तरी मेंदूतील इतर भाग आणि केंद्रे कशा प्रकारे एकमेकांशी विविध विद्युत रासायनिक मेळ साधतात यावरही अध्ययन बुद्धिमत्ता बऱ्याच अंशी अवलंबून असते. अध्ययन बुद्धिमतेत समाविष्ट असलेले आकलन कौशल्य हे ज्ञान संपादनाची प्राथमिक पायरी आहे. आकलन कौशल्य हे माहिती साठवणे, तिचे वर्गीकरण करून मूर्त आणि अमूर्त स्वरूप ओळखणे याबाबत आहे. मात्र युवकांनी खोलवर अभ्यास करून हे कौशल्य वृद्धिंगत केले पाहिजे.
विश्लेषणात्मक क्षमता ही आपल्या समोर येणारी अनावश्यक माहिती वगळण्यात मदत करते. आजच्या माहितीच्या युगात, मेंदू अनावश्यक घटना साठवतो, ज्यामुळे विचार आणि भावना प्रभावित होतात. त्यामुळे युवकांनी विश्लेषण करूनच निर्णय घ्यायला हवा. तार्किक कौशल्य हे जीवनात समस्या सोडविण्यात आधारभूत आहे. त्यामुळे हे विकसित करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण, सखोल अभ्यास आणि सराव आवश्यक असतो.
माहितीचा अर्थ लावणे हे सोशल मीडियाच्या माहितीच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जे समोर आले आहे ते वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासायला हवे. निर्णय घेण्याची क्षमता ही ज्ञान, अनुभव आणि दृष्टिकोनावर आधारित आहे. जेवढी निर्णय क्षमता मजबूत तेवढा युवक अधिक परिपक्व होत असतो. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात विवेकपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. समस्या सोडवणे कौशल्य हे विषय ज्ञानापासून सुरू होते. सामान्य मानसिक क्षमता आजूबाजूच्या घटनांचे विश्लेषण करून निष्कर्ष काढणे याबाबत आहे. मूलभूत संख्या अर्थ लावणे हे दैनंदिन आकडेमोड आहे मात्र ती जीवन उपयोगीही असते.
भावनिक बुद्धिमत्ताः भावनांचे संतुलन आणि व्यवस्थापन
भावनिक बुद्धिमत्ता ही अलीकडच्या काही काळात प्रचारात आणि प्रसारात आलेली संज्ञा आहे. मात्र भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेने आता अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त केले आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही विचार करणाऱ्या मन आणि भावनिक मन याच्याशी संबंधित आहे. मन एखाद्या बाबीला कसा प्रतिसाद देतो याबाबतचा अभ्यास या विषयात केला जातो. भावनांचे योग्य संतुलन आणि व्यवस्थापन साधून जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनविण्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेचा वापर होतो. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे फक्त भावना नियंत्रण नाही तर त्या योग्य रीतीने प्रवाहित करणे होय. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या भावना समजणे आले तरी मात्र त्या पुढे जावून इतरांच्या भावनांना समजण्याचे कौशल्य भावनिक बुद्धिमत्तेत अंतर्भूत होते. भावनिक बुद्धिमत्तेच्या आधारे समस्या आणि अडचणी यांना आपण कसा प्रतिसाद देणार ते ठरते.
भावनिक बुद्धिमत्ता ही तणावपूर्ण प्रवासातही युवकांना कायम संयमी आणि स्थिर ठेवते. त्यामुळे युवक हे भावनिक दृष्ट्या मजबूत असायला हवेत. भावनेच्या आधारे निर्णय घेण्यापेक्षा विचाराच्या आधारे निर्णय घेणे आवश्यक ठरते. स्पर्धा परीक्षा सुरू करण्याचा निर्णय भावनिक दबावाने नव्हे, तर वस्तुनिष्ठ अभ्यासाने घ्यावा लागतो. प्रतिसाद भावनेच्या आधारे न देता वैचारिक मनाच्या आधारे घ्यावा लागतो. प्रलोभनांना विचारपूर्वक सामोरे जाणे अभ्यास सुसह्य करते. मात्र यासाठी युवकांची भावनिक बुद्धिमत्ता अधिक उत्तम लागते.
इतरांच्या भावना समजून घेणे हे कोणत्याही संवादात मध्यवर्ती ठेवावे लागते. भावनांवर नियंत्रण हे भीती, दुःख, राग, आनंद, तिरस्कार, आश्चर्य इत्यादी भावना हाताळणे यावर ठरत असते. भावना योग्य पद्धतीने प्रवाहित करणे युवकांना जमायला हवे. भावनिक स्थिरता हे ध्येय स्मरणात ठेवून युवकांनी अपयशातही खंबीर उभे राहणे आवश्यक आहे. युवकांच्या ठायी तर समानुभूती असायला हवी. समानभूती हे दुसऱ्याच्या स्तरावर जाऊन भावना समजणे याच्याशी निगडीत आहे. भावनांचा आवेग हाताळणे हे युवकांनी संयमाने ठरायला हवे. भावनांच्या आहारी न जाणे हे यामुळे युवक स्थिर आणि संयमी होतात. स्व प्रेरणा ही कायम भावनांतून जिज्ञासा निर्माण करते.
सामाजिक बुद्धिमत्ताः समाजाभिमुख विकास
सामाजिक बुद्धिमत्ता युवकांना समाजाचा जबाबदार घटक बनवत असते. त्यामुळे सामाजिक बुद्धिमत्तेवर युवकांचे विशेष लक्ष असायला हवे. सामाजिक बुद्धिमत्ता ही युवकांना अधिक समाजभिमुख बनवते. परस्पर सहकार्य हे माहिती आणि साहित्याचे आदान-प्रदान करण्यासाठी अनिवार्य असते. युवकांचा संवाद इतरांशी चांगला असेल तर त्यातून हे ज्ञान प्रसार तर होतोच मात्र त्यामुळे तणाव कमी होतो. आंतरवैयक्तिक संबंध हे नेटवर्किंगसाठी महत्वाचे असतात तसेच असे संबंध एकटेपणा टाळतात त्यामुळे युवक यांनी आंतरवैयक्तिक संबंध अधिक दृढ व मजबूत करायला हवेत.
सामाजिक संघर्ष व्यवस्थापन हे युवकांचे स्वतःशी, पालकांशी, समाजाशी संघर्ष हाताळणे, काटकसरीने समस्या सोडवणे याच्याशी निगडीत असते. सामाजिक बांधिलकी युवकांनी वेळोवेळी जपायला हवी. त्यांनी सण-उत्सवात सक्रिय सहभाग घेवून अधिक समाजभिमुख व्हावे. सामाजिक वचनबद्धता हे नैतिकता राखणे बाबतचे महत्वाची अशी बाब आहे त्यामुळे युवकांनी दिलेल्या आश्वासन प्रमाणे त्यांचे वर्तन ठेवावे. चांगल्या गोष्टीचे समर्थन हे विवेकपूर्ण विचाराने करणे आवश्यक आहे त्यासाठी वाईट गोष्टी टाळायला युवकांनी शिकून घ्यावे. चढ-उतार हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तो संयमाने हाताळणे आवश्यक आहे. सांस्कृतिक अभिमुखता हे युवकांना वैचारिक मजबुती देते तर सामाजिक समानुभूती हे दुसऱ्याच्या भावना अधिक खोलवर समजणेसाठी मदत करत असते.

स्पर्धा परीक्षेत यश मिळिवण्यासाठी सामाजिक बुद्धिमत्ता ही अभ्यास बुद्धिमत्ता इतकी आवश्यक आहे. परस्पर सहकार्य, संवाद कौशल्ये आणि आंतरवैयक्तिक संबंध यामुळे विद्यार्थी ज्ञान आणि प्रेरणा मिळवतो, तर संघर्ष व्यवस्थापन आणि संयम यशाचा मार्ग प्रशस्त करतात. सामाजिक बांधिलकी आणि बच्चनबद्धता व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करतात, तर चांगल्या गोष्टींचे समर्थन आणि सांस्कृतिक अभिमुखता विचारांना व्यापकता देतात. समानुभूतीमुळे संवेदनशीलता वाढते, जी निर्णायक ठरते.
युवकांसाठी अध्ययन, भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता ही कौशल्ये परस्पर पूरक आहेत. अध्ययन बुद्धिमत्ता अभ्यासाला गती देते, भावनिक बुद्धिमत्ता स्थिरता, तर सामाजिक बुद्धिमत्ता नेटवर्किंग आणि जबाबदारी शिकवते. स्पर्धा परीक्षेत ही कौशल्ये आत्मसात केल्याने युवक यशस्वी होतात आणि जीवनात संतुलित राहतात. ही कौशल्ये विकसित करण्यासाठी सराव, ध्यान, संवाद आणि समानुभूती आवश्यक असते त्यामुळे युवकांना केवळ परीक्षा नव्हे, तर समाजात आणि जीवनातही यश मिळते.