महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'करिअर कट्टा' या उपक्रमाअंतर्गत भारती विद्यापीठ विधी महाविद्यालय, सांगली येथील प्राचार्या पूजा नरवाडकर यांची ही प्रेरणादायी मुलाखत घेण्यात आली. आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाबरोबरच जीवनातील संघर्ष, शिक्षणाविषयीची भूमिका आणि महिला सक्षमीकरणाविषयीचे विचार मांडले.
आधुनिक सावित्री पुरस्कार स्वीकारताना प्राचार्या पूजा नरवाडकर यांनी हा सन्मान केवळ वैयक्तिक यशाचा नसून सामाजिक जबाबदारीचा असल्याचे स्पष्ट केले. 'आधुनिक सावित्री' ही संकल्पना स्वतःच्या प्रगतीपुरती मर्यादित नसून समाजातील इतरांसाठीही मार्गदर्शक ठरण्याची प्रेरणा देणारी आहे. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आणि कार्याचा हा आधुनिक अविष्कार असल्याचे त्या मानतात. सावित्रीबाई फुले या महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजसुधारणेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या महान समाजसुधारक होत्या. त्यांच्या काळातील संघर्ष आजही प्रेरणादायी आहेत. आजच्या आधुनिक काळात महिलांना अधिक संधी मिळत असल्या तरी सावित्रीबाईच्या त्यागाची जाणीव ठेवून समाजासाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे प्राचार्या नरवाडकर सांगतात.
व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक आयुष्य यामध्ये समतोल राखणे हे मोठे आव्हान असते. या प्रवासात आई-वडील, पती आणि मुलांचा मिळणारा पाठिंबा अत्यंत मोलाचा ठरतो. घर आणि कार्यक्षेत्र या दोन्ही ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केल्यास समतोल साधता येतो, असे त्या ठामपणे सांगतात.
शिक्षकाचे खरे यश हे विद्यार्थ्यांच्या यशात दडलेले असते. स्वतःच्या विद्यार्थिनी ज्योती प्रताप दरेकर या आज जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत असल्याचे उदाहरण देत त्या शिक्षकाच्या प्रभावाचे महत्त्व अधोरेखित करतात. विद्यार्थी आयुष्यभर शिक्षकांचे मार्गदर्शन लक्षात ठेवतात, हेच शिक्षकासाठी खरे समाधान आहे.
पदवी मिळवणे हा शिक्षणाचा अंतिम उद्देश नसून त्या ज्ञानाचा योग्य वापर करून स्वतःचे आणि समाजाचे जीवन समृद्ध करणे महत्त्वाचे आहे. योग्य शिक्षणमार्गाची निवड आणि कौशल्यविकास यावर त्या भर देतात. स्वतः वकिली न करता अध्यापन क्षेत्र निवडून अनेक सक्षम वकील घडवण्याचा निर्णय त्यांनी याच विचारातून घेतला.
१९९८ सालच्या तुलनेत आजचे विद्यार्थी अधिक डिजिटल झाले आहेत. पूर्वी प्रत्यक्ष संवाद अधिक होता, तर आज संवाद तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होतो. तरीही विद्याथ्यर्थ्यांची संवेदनशीलता कमी झालेली नसून ती व्यक्त होण्याची पद्धत बदलली आहे. तंत्रज्ञानामुळे ज्ञानसंपादन सोपे झाले असले तरी वैयक्तिक संवादाची गरज कायम असल्याचे त्या सांगतात.
ग्रामीण भागातही आता ज्ञानस्रोत सहज उपलब्ध होत असल्याने शहरी-ग्रामीण दरी कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागात वैयक्तिक मार्गदर्शन आणि भावनिक नाते अधिक दृढ असल्याचे निरीक्षण त्या नोंदवतात.
इंग्रजी भाषेला घाबरू नये, असा सल्ला देताना त्या स्वतःचा अनुभव सांगतात. सातत्याने वाचन आणि सराव केल्यामुळे त्यांच्या इंग्रजी भाषेतील संवादकौशल्यात मोठी सुधारणा झाली. इंग्रजी ही विचारशक्ती विकसित करणारी भाषा असल्याचे त्या मानतात.
अडचणी आल्या तरी कधीही थांबण्याचा विचार केला नाही. सातत्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक संगत-कुटुंब, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी साहित्य-यामुळे प्रत्येक अडबळ्यावर मात करता येते, असे त्या सांगतात.
पुणे विद्यापीठातील सुवर्णपदकांसह अनेक पुरस्कार त्यांच्या अभ्यासू वृत्तीची साक्ष देतात. प्रामाणिक अभ्यास, आत्मविश्वास आणि सकारात्मक मानसिकता हेच यशाचे सूत्र असल्याचे त्या नमूद करतात.
स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखणे हे करिअर निवडीसाठी अत्यंत आवश्यक आहे. संभ्रम असल्यास करिअर समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा, असे त्या विद्यार्थ्यांना सुचवतात.
क्रिमिनॉलॉजी आणि मानवाधिकार या विषयांत त्यांनी दोन एल.एल.एम. पदव्या पूर्ण केल्या. सुरुवातीच्या अडचणींवर मात करून स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा हा प्रवास असल्याचे त्या सांगतात.
प्राचार्या पूजा नरवाडकर 'सबलिकरण' आणि 'सक्षमीकरण' यातील फरक स्पष्ट करतात. खरे सक्षमीकरण म्हणजे अंतर्गत नेतृत्वगुण, कौशल्ये आणि आत्मनिर्भरता विकसित करून समाजासाठी योगदान देणे होय.
आजही अनेक महिला पितृसत्ताक मानसिकतेमुळे विविध अडचणींना सामोऱ्या जात आहेत. शासनाच्या योजना आणि स्वयंसेवी संस्थांचा प्रभावी वापर करून महिला सक्षमीकरण कसे साधता येईल, यावर त्यांचे संशोधन केंद्रित आहे.
लिंगभेदापलीकडे जाऊन प्रत्येकाला माणूस म्हणून पाहा. हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवा, समाजासाठी प्रामाणिकपणे काम केल्यास वैयक्तिक यश आपोआप प्राप्त होते, हा प्रेरणादायी संदेश प्राचार्या पूजा नरवाडकर यांनी दिला.