Author
शांत आवाजात मोठे विचार मांडणारी नेतृत्वकथा
मा. डॉ. करूणा गोकर्ण
प्राचार्या, सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई

कधी कधी काही माणसं भेटतात ज्यांच्याशी संवाद साधताना किंवा ज्यांचा प्रवास ऐकताना मन नकळत म्हणतं, 'हे फक्त यश नाही, ही मूल्यांची वाटचाल आहे. डॉ. करुणा गोकर्ण यांचा प्रवास असाच मनाला भिडणारा आहे. सेंट झेवियर कॉलेज, मुंबई यांच्या प्राचार्या आणि 'आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६'च्या सन्मानार्थी म्हणून त्यांचा गौरव पाहताना एक गोष्ट प्रकषनि जाणवते - हा सन्मान केवळ एका पदाचा नाही, तर शिक्षणावर विश्वास ठेवून समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्या वृत्तीचा आहे.
सावित्रीबाई फुले यांचं नाव घेताच संघर्ष, धैर्य आणि समाजबदलाची जाणीव मनात उभी राहते. डॉ. करुणा गोकर्ण या पुरस्काराकडे त्याच भावनेने पाहतात नम्रतेने, कृतज्ञतेने आणि अधिक जबाबदारीने. त्यांच्या बोलण्यात सतत जाणवते ते एक साधं पण ठाम मत, शिक्षण म्हणजे केवळ पदवी किंवा गुणांची शर्यत नाही; शिक्षण म्हणजे विचार करण्याची ताकद, प्रश्न विचारण्याचं धैर्य आणि स्वतःचा आवाज ओळखण्याची क्षमता.
सुमारे तीस वर्षांपूर्वी सेंट झेवियर कॉलेजमध्ये सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधणारी, त्यांच्या प्रश्नांमध्ये रमणारी ही शिक्षिका हळूहळू विभागप्रमुख, उपप्राचार्या (अकॅडेमिक्स), IQAC संचालक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) नोडल अधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत आज प्राचार्य पदापर्यंत पोहोचली. या साऱ्या प्रवासात चिकाटी, प्रामाणिकपणा, मेहनत आणि आत्मविश्वास हेच आपलं खरं भांडवल आहे,
असं त्या अगदी साधेपणाने सांगतात. प्रशासकीय कामकाजाची धावपळ असली तरी संशोधनाशी असलेलं त्यांचं नातं कधीच तुटलेलं नाही. क्षयरोग आणि कर्करोग यांसारख्या गंभीर विषयांवरील त्यांचं संशोधन केवळ शैक्षणिक चौकटीत अडकलेलं नाही; त्यामागे समाजासाठी काहीतरी देण्याची तळमळ आहे. पीएच. डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या त्यांना केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न ठेवता, विचारांच्या पातळीवर समृद्ध होण्यासाठी प्रवृत्त करतात.
आज शिक्षणाचं विश्व तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदलत आहे. डॉ. गोकर्ण तंत्रज्ञानाचं महत्त्व नाकारत नाहीत; उलट, त्याचा अर्थपूर्ण वापर व्हावा यावर त्या ठाम आहेत. मात्र 'झटपट उत्तर' देणाऱ्या सवयीमुळे विद्यार्थ्यांची संयमशक्ती आणि चिकित्सक विचार कमी होत असल्याची खंत त्यांच्या शब्दांतून जाणवते. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा डिजिटल साधनं मदतनीस असू शकतात, पण स्वतःचा विचार, मानवी बुद्धिमत्ता आणि नैतिकतेची जागा ती कधीच घेऊ शकत नाही हा मुद्दा त्या स्पष्टपणे मांडतात.
काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधण्याबाबत त्यांचा दृष्टिकोन अत्यंत वास्तववादी आहे. विशेषतः महिलांसाठी हा समतोल साधणं अवघड असतं, हे त्या मान्य करतात. मात्र अनुभव, शिस्त आणि प्राधान्यक्रम ठरवण्याची सवय यातून तो साधता येतो, असा त्यांचा विश्वास आहे. स्त्रियांनी स्वावलंबी व्हावं, आत्मविश्वास ठेवावा आणि स्वतःबरोबर इतर स्त्रियांचाही हात धरून पुढे जावं हा संदेश त्यांच्या प्रत्येक उत्तरातून उमटत्तो.
अपयशाबद्दल बोलताना त्यांच्या शब्दांत निराशा नाही, तर शिकवण असते. अपयश माणसाला अधिक परिपक्व करतं, संयम शिकवतं आणि पुढील वाटचालीसाठी तयार करतं, असं त्या शांतपणे सांगतात. संशोधन असो वा आयुष्य चुका स्वीकारून, त्यातून शिकत पुढे जाणं हीच खरी जिद्द.
विद्यार्थ्यांविषयी बोलताना त्या आजच्या पिढीकडे आशेने पाहतात. हो, विचलनं वाढली आहेत; पण योग्य मार्गदर्शन, मेंटॉरिंग आणि करिअर काउन्सेलिंग मिळालं तर हीच पिढी अधिक फोकस्ड आणि सक्षम ठरू शकते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. संघभावना, सहकार्य आणि एकमेकांच्या यशात आनंद मानणं हीच नेतृत्वाची खरी ओळख असल्याचं त्या आवर्जून सांगतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. आजीवन शिक्षण, कौशल्यविकास, संशोधन आणि
समाजाशी जोडलेलं शिक्षण या मूल्यांवर सेंट झेवियर कॉलेज अनेक वर्षांपासून काम करत असल्याचा त्यांना अभिमान आहे.
भविष्यात कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा मिळावा, ही आकांक्षा त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवते. डॉ. करुणा गोकर्ण यांची 'आधुनिक सावित्री'ची व्याख्या साधी पण अर्थपूर्ण आहे. स्वतः सक्षम असलेली, निर्णयक्षम आणि इतरांच्या आयुष्यात उजेड निर्माण करणारी स्त्री. सावित्रीबाई फुलेंच्या त्यागामुळे आजच्या महिलांना ज्या संधी मिळतात, त्याचं भान ठेवून पुढे जाणं हीच खरी कृतज्ञता असल्याचं त्या मानतात.
'आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६' हा त्यांच्या प्रवासाचा शेवट नाही, तर पुढील वाटचालीचा नवा संकल्प आहे. शिक्षणातून माणूस घडावा, विचार जागा व्हावा आणि समाज अधिक संवेदनशील व्हावा हीच या संपूर्ण प्रवासामागची खरी प्रेरणा आहे.