Author
गुणवत्तेचा, चिकाटीचा आणि सातत्याचा आदर्श नमुना
मा. डॉ. प्रज्ञा प्रभू
प्राचार्या, क. जे. सोमैया कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, मुंबई

शिक्षण, संशोधन, प्रशासन आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वाच्या क्षेत्रात गेली साडेतीन दशके अखंड कार्यरत असलेल्या के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, विद्या परिसर, मुंबई येथील प्राचार्या डॉ. प्रज्ञा जे. प्रभू यांना 'आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६' जाहीर झाला आहे. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची, स्त्री शिक्षणाच्या मूल्यांची आणि समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेची आधुनिक काळातील सशक्त अभिव्यक्ती आहे. स्त्री शिक्षण, नेतृत्व विकास, गुणवत्ता संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना दिला जाणारा हा पुरस्कार डॉ. प्रज्ञा प्रभू यांच्या कार्यप्रवासाला पूर्णतः न्याय देणारा आहे.
डॉ. प्रज्ञा प्रभू यांचा शैक्षणिक प्रवास हा गुणवत्तेचा, चिकाटीचा आणि सातत्याचा आदर्श नमुना आहे. मुंबई विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेतले. Analytical Chemistry या विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आणि पुढे पीएच. डी. पदवी संपादन केली. त्यांचे शिक्षण केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता विज्ञानाकडे पाहण्याचा चिकित्सक दृष्टिकोन, संशोधनाची ओढ आणि अचूकतेची शिस्त यांचा पाया याच काळात भक्कम झाला. हीच मूल्ये पुढे त्यांच्या अध्यापन, संशोधन आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये सातत्याने प्रतिबिंबित होत राहिली.
आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात त्यांनी लेक्चरर म्हणून केली. वर्गात शिकवताना केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे हा त्यांचा उद्देश कधीच नव्हता. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी रुजवणे, प्रश्न विचारण्याची सवय लावणे आणि ज्ञानाचा व्यवहार्य उपयोग शिकवणे हे त्यांचे मुख्य ध्येय राहिले. कालांतराने त्यांनी विभागीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या, प्रशासकीय कामकाजात सक्रिय सहभाग घेतला आणि नेतृत्त्वगुण अधिक प्रगल्भ होत गेले. हा प्रवास अखेरीस त्यांना प्राचार्य पदापर्यंत घेऊन गेला. मात्र पद बदलले तरी शिक्षक म्हणून असलेली त्यांची ओळख, विद्यार्थी-केंद्रित दृष्टी आणि मूल्यनिष्ठ भूमिका कधीही बदलली नाही.
प्राचार्या म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रज्ञा प्रभू यांनी कॉलेजच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीपूर्ण आणि ठोस निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजने गुणवत्ता, नवकल्पना आणि तंत्रज्ञान या तिन्ही आघाड्यांवर लक्षणीय प्रगती केली. कॉलेजला ISO 9001:2015 प्रमाणपत्र मिळवून देणे ही गुणवत्ता व्यवस्थापनाच्या दिशेने टाकलेली महत्त्वाची पायरी ठरली. त्याचप्रमाणे भविष्यातील शैक्षणिक गरजा ओळखून २०३५ पर्यंत स्वायत्त दर्जा प्राप्त करण्याची दिशा निश्चित करण्यात आली.
कोविड-१९ महामारीचा काळ शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत आव्हानात्मक होता; मात्र याच काळात डॉ. प्रज्ञा प्रभू यांचे नेतृत्व विशेषत्वाने अधोरेखित झाले. अत्यंत कमी कालावधीत कॉलेजमध्ये व्हच्र्युअल शिक्षण व्यवस्था प्रभावीपणे उभी करण्यात आली. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, ई-कंटेंट निर्मिती, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी समुपदेशन यांचा समन्वय साधत त्यांनी शिक्षणाची अखंडता टिकवून ठेवली. या उल्लेखनीय कामगिरीसाठी कॉलेजला 'महामारीत व्हच्र्युअल ज्ञानप्रसारात उत्कृष्ट कामगिरी' आणि 'महाराष्ट्रातील टॉप अँड प्रॉमिसिंग डिग्री कॉलेज ऑफ द इयर २०२१' हे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.
अभ्यासक्रम सुधारणा हा त्यांच्या कार्यकाळातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. Outcome Based Education (OBE) आणि Learning Outcomes Based Curriculum Framework (LOCF) यांची प्रभावी अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांचे केवळ गुण नव्हे, तर त्यांची कौशल्ये, क्षमता आणि रोजगारयोग्यता वाढवण्यावर भर देण्यात आला. या अंतर्गत कॉलेजमध्ये ३२ प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. NPTEL चे सक्रिय केंद्र म्हणून कॉलेजचा विकास झाला, विदेशी विद्यापीठांशी क्रेडिट ट्रान्सफर व्यवस्था सुरू झाली आणि विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर अतिरिक्त क्रेडिट्स दर्शविण्याची अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आली, जी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील संधी वाढवणारी ठरली.
शिक्षणाबरोबरच संशोधन हे डॉ. प्रज्ञा प्रभू यांच्या कार्यजीवनाचे महत्त्वाचे अंग राहिले आहे. Synthetic Organic Chemistry या क्षेत्रात त्या पीएच. डी. मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पूर्ण केली आहे, पाच विद्यार्थी सध्या नोंदणीकृत आहेत आणि तीन विद्याथ्यर्थ्यांनी M.Sc. by Research पूर्ण केले आहे. त्यांचे पंचवीस संशोधन लेख आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. UGC आणि मुंबई विद्यापीठाकडून माइनर रिसर्च प्रोजेक्ट्स प्राप्त झाले असून Royal Society of Chemistry मार्फत पुस्तक अध्याय प्रकाशित झाला आहे. याशिवाय दोन पेटंट्स त्यांच्या नावावर नोंदले गेले आहेत.
प्रशासकीय क्षेत्रात त्यांनी IQAC समन्वयक म्हणून जवळपास दहा वर्षे काम केले. या काळात गुणवत्ता आश्वासन, अॅकॅडमीक ऑडिट्स आणि धोरणात्मक नियोजन यावर विशेष भर देण्यात आला. त्यांनी चार वर्षे व्हाइस प्रिन्सिपल म्हणूनही जबाबदारी सांभाळली. NAAC पीअर टीम सदस्य म्हणून अनेक कॉलेजांना भेटी देऊन त्यांनी मार्गदर्शन केले. मुंबई विद्यापीठात पेपर सेटर, मॉडरेटर, परीक्षा अध्यक्ष तसेच कुलगुरू नामांकित सदस्य म्हणून त्यांनी विविध समित्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
राष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक FDP, कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून योगदान दिले आहे. NEP २०२०, OBE, Bloom's Taxonomy, RBPT, ICT Tools, Moodle, Flip Class यांसारख्या विषयांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. IISER पुणे, HBCSE, BASE तसेच विविध महाविद्यालयांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. International Junior Science Olympiad साठी प्री-डिपार्चर कॅम्प आणि OCSC चे मुख्य समन्वयक म्हणूनही त्यांनी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
कॉलेजमध्ये गुणवत्तेची संस्कृती निर्माण करणे हे डॉ. प्रज्ञा प्रभू यांचे प्रमुख ध्येय राहिले आहे. UGC Quality Mandate अंतर्गत सुधारणा, NAAC मार्गदर्शक तत्त्वांनुसार पंचेतीस धोरणांची निर्मिती, ARRIA अंतर्गत Institute Innovation Council ची स्थापना आणि उत्तर अमेरिकन अलुम्नी चॅप्टरची सुरुवात हे सर्व त्यांच्या दूरदृष्टीचे परिणाम आहेत.
'आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६' मिळाल्याबद्दल त्या नम्रपणे सांगतात की, हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून त्यांच्या संपूर्ण टीमचा, विद्यार्थ्यांचा आणि संस्थेच्या सामूहिक प्रयत्नांचा आहे. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांप्रमाणे मुलींच्या शिक्षणासाठी, नेतृत्व विकासासाठी आणि सामाजिक समतेसाठी अधिक काम करण्याची प्रेरणा हा पुरस्कार त्यांना देतो.
भविष्यात NEP २०२० ची पूर्ण अंमलबजावणी करणे, संशोधनाला अधिक चालना देणे, उद्योग भागीदारी वाढवणे आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे आहेत. डॉ. प्रज्ञा जे. प्रभू यांचा हा प्रवास प्रत्येक शिक्षक, प्रशासक आणि विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असून टीमवर्क, सातत्यपूर्ण शिक्षण आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचा समन्वय साधणारी त्यांची कारकीर्द आधुनिक सावित्रीच्या विचारांना खऱ्या अर्थाने पुढे नेणारी आहे. या यशस्वी शिक्षिका, संशोधक आणि प्रशासकाला 'आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६' साठी मनःपूर्वक अभिनंदन.