महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्ठा उपक्रमांतर्गत आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ ने सन्मानित झालेल्या प्रा. रजनी शिखरे यांची मुलाखत ही केवळ एका यशस्वी शिक्षणतज्ज्ञाची कहाणी नाही, तर ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्री-शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि मूल्याधिष्ठित नेतृत्व यांचा सखोल आलेख आहे. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन मानत त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा दीप प्रज्वलित केला. प्रशासन, अध्यापन, संशोधन आणि समाजकार्य या चारही पातळ्यांवर त्यांनी निर्माण केलेला प्रभाव हा 'आधुनिक सावित्री' या सन्मानाला पूर्णपणे सार्थ ठरवतो.
प्रा. रजनी शिखरे यांनी २००४ साली बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त व ग्रामीण भागातील आर. बी. अड्डूल महाविद्यालय, गेवराई येथे प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्या काळातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती. मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मर्यादित होता आणि महाविद्यालयात मुलींची संख्या खूपच कमी होती. अशा परिस्थितीत त्यांनी हिंदी विषयाच्या अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांशी भावनिक नाते निर्माण करत शिक्षणाला जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केवळ वर्गात शिकवण देणे एवढ्यावर न थांबता विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या, विशेषतः मुलींमधील भीती, संकोच आणि न्यूनगंड दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
२०१७ साली त्या प्रभारी प्राचार्य झाल्या आणि २०२० मध्ये पूर्णवेळ प्राचार्य म्हणून नियुक्त झाल्या. त्या काळात त्या महाविद्यालयातील एकमेव वरिष्ठ महिला प्राध्यापक होत्या. पुरुषप्रधान प्रशासकीय रचनेतही त्यांनी आत्मविश्वास, कार्यक्षमता आणि समन्वयाच्या बळावर स्वतःचे स्थान निर्माण केले.
त्यांच्या नेतृत्वाखाली मुलींच्या प्रवेशात लक्षणीय वाढ झाली. सुमारे ३० टक्क्यांवर असलेले प्रमाण हळूहळू वाढत गेले. शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि सर्वांगीण विकास यांवर भर देत त्यांनी महाविद्यालयाची NAAC श्रेणी इ+ वरून थेट अ++ पर्यंत नेली. ग्रामीण भागातील महाविद्यालयासाठी ही कामगिरी अत्यंत अभिमानास्पद ठरली. यानंतर बालभीम महाविद्यालयात बदली झाल्यानंतरही त्यांनी तेथेही प्रशासकीय व शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करत NAAC अ श्रेणी प्राप्त करून दिली.
प्रा. रजनी शिखरे यांच्या कार्यकाळात महाविद्यालयात शैक्षणिक विस्ताराला नवे आयाम मिळाले, अल्पावधीतच त्यांनी एम. एस्सी. केमिस्ट्री, एम. कॉम., एम. ए. राज्यशास्त्र हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले. यासोबतच दोन संशोधन केंद्रांची स्थापना करून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती निर्माण केली. त्यांच्या मते शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता समाजासाठी उपयुक्त संशोधनाकडे नेणारे असावे.
ग्रामीण भागातील मुलींना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पोषक वातावरण मिळावे या उद्देशाने त्यांनी मुलींचे वसतिगृह सुरू केले. सुरुवातीला केवळ २२ मुलींनी प्रवेश घेतला होता. मात्र 'दत्तक पालकत्व' या अभिनव संकल्पनेतून शिक्षक व कर्मचारी यांनी एका-एका मुलीची जबाबदारी स्वीकारली. या आर्थिक व भावनिक आधारामुळे वसतिगृहातील मुलींची संख्या ६२ पर्यंत बाढली. वसतिगृहात शिस्त, अभ्यासाचे वातावरण, खेळ, सांस्कृतिक उपक्रम यांचा समतोल साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल वापरावर मर्यादा ठेवून केवळ वॉर्डनकडे आपत्कालीन संपर्कासाठी मोबाईलची व्यवस्था करण्यात आली.
प्रा. रजनी शिखरे यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. बंजारा आदिवासी समाजात जाऊन त्यांनी-मुलींचे शिक्षणाबाबत जागृती, कन्या भृणहत्या विरोधी प्रबोधन, बालविवाह विरोधी संदेश यासाठी सातत्याने कार्य केले. कोविड-१९ काळात त्यांनी महाविद्यालय, विद्यार्थी व स्थानिक समाजाच्या सहभागातून आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिरे आयोजित केली. संकटाच्या काळात समाजासोबत उभे राहणे हीच खरी शिक्षणाची कसोटी आहे, असा त्यांचा विश्वास आहे.
त्यांचे नेतृत्व तत्त्वज्ञान, संघभावना, पारदर्शकता आणि समता यांवर आधारित आहे. त्या कोणताही पक्षपात न करता सर्व कर्मचाऱ्यांना समान संधी देतात. त्यांच्या मते, नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हे, तर मार्गदर्शन, समजून घेणे आणि जबाबदारी स्वीकारणे होय. विद्यार्थ्यांशी, विशेषतः मुलींशी, त्या आईसारखे नाते जपतात. त्यामुळे विद्यार्थिनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधतात. प्रा. रजनी शिखरे यांच्या मते ऑफलाइन शिक्षण हे विद्याथ्यांच्या भावनिक व सामाजिक विकासासाठी अधिक उपयुक्त आहे. ऑनलाइन शिक्षणात मानवी संवादाची उणीव भासते. संशोधन हे केवळ पदोन्नतीसाठी नसून समाजाशी निगडित, गुणवत्तापूर्ण आणि आवडीवर आधारित असावे, असे त्या ठामपणे सांगतात. त्यांनी आतापर्यंत तीन पीएच. डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
कायदा शिक्षणाऐवजी हिंदी विषय व अध्यापनाची निवड हा त्यांचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. साहित्य व भाषा माणसाला अधिक संवेदनशील, विचारशील आणि जबाबदार बनवतात, असा त्यांचा विश्वास आहे. सावित्री, जिजाऊ, फातिमा, अहिल्याबाई होळकर या महान स्त्री व्यक्तिमत्त्वांकडून त्या सतत प्रेरणा घेतात.
प्रा. रजनी शिखरे यांनी अत्यंत स्पष्ट आणि प्रेरणादायी संदेश दिला, प्रत्येक मुलगी ही सक्षम आहे, ती कोणापेक्षा कमी
नाही, आत्मविश्वास, सातत्य आणि कष्ट यशाची गुरुकिल्ली आहेत, सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा, स्पष्ट ध्येय ठेवा आणि
त्यासाठी सातत्याने प्रयत्न करा, अडचणी आल्या तरी स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिले.
प्रा. रजनी शिखरे यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा आलेख नसून तो ग्रामीण महाराष्ट्रातील शेकडो मुलींच्या जीवनात घडवलेला सकारात्मक बदल आहे. अध्यापन, प्रशासन, संशोधन आणि समाजकार्य या सर्व क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान हे मूल्याधिष्ठित आणि दूरदृष्टीपूर्ण आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थात्मक गुणवत्ता वाढली, मुलींच्या शिक्षणाला सुरक्षित दिशा मिळाली आणि समाजात परिवर्तनाची जाणीव निर्माण झाली.
आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ हा त्यांच्या कार्याचा गौरव तर आहेच, पण तो समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक शिक्षणतज्ज्ञासाठी प्रेरणास्त्रोत ठरतो. प्रा. रजनी शिखरे यांचे कार्य हे आजच्या तरुण पिढीसाठी 'शिक्षण म्हणजे समाज घडवण्याची प्रक्रिया' याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.