Author
पदव्या नाही, दृष्टी घडवणारा प्रवास
मा. डॉ. स्मिता वंजारी
प्राचार्या, क. जे. सोमैया कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, मुंबई

काही संवाद फक्त प्रश्न-उत्तरांपुरते मर्यादित राहत नाहीत; ते नकळत आपल्याला अंतर्मुख करतात. शिक्षण म्हणजे नेमकं काय, स्त्रीसक्षमीकरण म्हणजे केवळ घोषणा की प्रत्यक्ष कृती, आणि यश म्हणजे फक्त पदं की समाजासाठी उभं राहणं-असे अनेक प्रश्न मनात रुंजी घालू लागतात. अशीच एक विचारप्रवर्तक भेट म्हणजे आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ प्राप्त डॉ. स्मिता वंजारी यांच्याशी झालेला संवाद.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत ही मुलाखत घेण्यात आली.
डॉ. स्मिता वंजारी यांचा शैक्षणिक प्रवास हा कुठल्याही ठरावीक चौकटीत बसणारा नाही. मुंबईतील के.सी. कॉलेजमध्ये शिक्षण घेत त्यांनी इंग्रजी साहित्य विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. विवाहानंतर नागपूर येथे स्थलांतर झालं, मात्र शिक्षणाचा ध्यास तसूभरही कमी झाला नाही. २००९ मध्ये बी.एड. व एम.एड. सन्मानासह पूर्ण करत त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःची पक्की पायाभरणी केली. पुढे २०१७ मध्ये शिक्षणशास्त्र विषयात पीएच. डी. आणि त्यानंतर इंग्रजी साहित्य विषयात दुसरी पीएच. डी. पूर्ण करत त्यांनी संशोधन क्षेत्रातही आपला ठसा उमटवला.
सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. वंजारी या केवळ अध्यापनापुरत्या मर्यादित नाहीत. अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्ष म्हणून त्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतात. शिक्षण आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रांचा अनुभव असल्यामुळे निर्णय घेताना त्या मानवी पैलूला प्राधान्य देतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या म्हणून महिला गटातून सर्वाधिक मते मिळवून निवडून येणे हा त्यांच्या नेतृत्वक्षमतेचा ठळक पुरावा आहे. या भूमिकेतून त्या विद्यार्थी प्रश्न, शिष्यवृत्ती, परीक्षा व्यवस्था आणि धोरणनिर्मितीमध्ये सक्रिय सहभाग घेतात.

महिला शिक्षणाबाबत त्यांची भूमिका ठाम आहे. सावित्रीबाई फुले यांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातही आज अनेक मुली अजूनही संधींपासून दूर आहेत, ही जाणीव त्या सातत्याने व्यक्त करतात. शिक्षणासोबतच आत्मविश्वास, योग्य मार्गदर्शन आणि स्वप्न पाहण्याचं धाडस हे घटक तितकेच महत्त्वाचे असल्याचं त्या अधोरेखित करतात.
इंग्रजी भाषेबाबत बोलताना त्या अतिशय संतुलित मत मांडतात. मातृभाषेचा अभिमान जपत इंग्रजी ही संवादाची आणि संधींची भाषा म्हणून शिकली पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. इंग्रजी येणं म्हणजेच बुद्धिमत्ता, हा गैरसमज त्या ठामपणे नाकारतात. विशेषतः ग्रामीण विद्याथ्यांनी भीती न बाळगता हळूहळू, सातत्याने भाषेचा सराव करावा, असा त्यांचा सल्ला आहे.
काम आणि कुटुंब यांचा समतोल साधण्याबाबत त्या यशाचं श्रेय आपल्या कुटुंबाला देतात. पती, सासू आणि मुलांचा आधार असल्यामुळेच हा प्रवास शक्य झाल्याचं त्या नम्रपणे सांगतात. 'सगळं एकदम जमत नाही, पण प्राधान्य ठरवलं की मार्ग सापडतो,' हे त्यांचं साधं पण खोल वाक्य खूप काही सांगून जातं.
आधुनिक सावित्री पुरस्कार स्वीकारताना डॉ. स्मिता वंजारी यांनी हा सन्मान आपल्या सासूबाई डॉ. सुहासिनी वंजारी, पती आणि कुटुंबाला समर्पित केला. हा पुरस्कार म्हणजे वैयक्तिक यशापेक्षा जबाबदारी अधिक असल्याची जाणीव त्यांच्या शब्दांतून स्पष्ट होते.
डॉ. स्मिता वंजारी यांचा प्रवास हा पदव्या, पदे आणि पुरस्कारांपुरता मर्यादित नाही. तो शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी बदलणारा, स्त्रीच्या क्षमतेवर विश्वास निर्माण करणारा आणि युवकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आहे. म्हणूनच आधुनिक सावित्री पुरस्कार हा केवळ गौरव नाही, तर त्यांच्या कार्याचा नैसर्गिक परिणाम आहे.