Author
कर्तृत्वाच्या उंचीवर असूनही माणूसपण जपणारी
मा. सुप्रिया सुरेंद्र देवस्थळी
Indian Civil Accounts Service (ICAS)

काही भेटी गोंगाट न करता मनात घर करतात. कोणताही गाजावाजा न होता, त्या आपल्याला अंतर्मुख करतात. मा. सुप्रिया सुरेंद्र देवस्थळी मॅडम यांच्याशी झालेला संवाद माझ्यासाठी नेमकाच असा शांत पण खोल अनुभव ठरला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कुठेही दिखावा नाही, पण प्रत्येक शब्दामागे अनुभवाची आणि आत्मविश्वासाची ताकद आहे.
दिल्लीसारख्या व्यापक प्रशासकीय व्यवस्थेत Joint Controller General of Accounts (PFMS विभाग) या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असतानाही त्यांच्या बोलण्यात सहजता होती, वागण्यात मोकळेपणा होता. मोठं पद, मोठी जबाबदारी - पण त्यापेक्षा मोठं माणूसपण जपणारी ही व्यक्ती म्हणून त्या अधिक ठळकपणे जाणवल्या. त्यामुळेच 'आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६' हा सन्मान त्यांच्या कार्याला आणि विचारांना योग्य वाटतो.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'करिअर कट्टा' अंतर्गत घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नांची मालिका नव्हती. तो अनुभवांचा, आत्मपरीक्षणाचा आणि आजच्या पिढीला भिडणाऱ्या प्रश्नांचा संवाद होता. तरुणांच्या मनात चाललेली घालमेल, सतत स्वतःशी होणारी तुलना, यश-अपयशाच्या दरम्यानचा ताण या सगळ्यांवर त्यांनी अतिशय संयमाने आणि आपुलकीने भाष्य केलं.
फिटनेसच्या संदर्भात त्यांनी मांडलेली भूमिका विशेष भावून गेली. फिटनेस म्हणजे केवळ व्यायाम किंवा आहार नव्हे; तो स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा, शिस्त पाळण्याचा आणि मन स्थिर ठेवण्याचा प्रवास आहे, असं त्या म्हणाल्या. 'वेळ नाही' असं म्हणणं सोपं असतं, पण स्वतः साठी थोडा वेळ काढणं ही स्वतःवरची सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे - हे त्यांच्या अनुभवातून आलेलं विधान होतं.
UPSC विषयी बोलताना त्या अधिकच जवळच्या वाटल्या. ही परीक्षा फक्त अभ्यास तपासत नाही, तर उमेदवाराची मानसिक ताकदही पाहते, असं त्यांनी स्पष्ट केलं. तयारीदरम्यान येणारी असुरक्षितता, अपयशाची भीती, समाजाच्या अपेक्षा या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या सहज स्वीकारल्या की ऐकणाऱ्याला दिलासा मिळतो. 'Intensity पेक्षा Consistency महत्त्वाची आहे' हा त्यांचा मंत्र आजही मनात घोळत राहतो.
कौशल्यविकासावर त्यांनी दिलेला भर अत्यंत वास्तववादी होता. केवळ पदवी किंवा गुण पुरेसे नसतात; स्वतःला ओळखणं, नव्या कौशल्यांकडे खुलेपणाने पाहणं आणि बदल स्वीकारण्याची तयारी ठेवणं हाच खरा विकास आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
पालकत्वाचा विषय निघाल्यावर मात्र त्यांच्या शब्दांत आईची हळुवार जाणीव उमटली. मुलांना फक्त संरक्षण नको असतं, तर विश्वास आणि स्वातंत्र्य हवं असतं, हे त्यांनी फार साध्या उदाहरणातून सांगितलं. 'आई, तू नेहमी आमच्यासोबत असशील, तर आम्ही ळपवशशिपवशर्षी कधी होणार?' हा त्यांच्या मुलींचा प्रश्न ऐकताना पालकत्वाचा अर्थ किती खोल आहे, हे जाणवतं.
व्यस्त करिअर असूनही कुटुंबासाठी वेळ काढण्याचा त्यांचा आग्रह मनाला भिडणारा होता. पैसा, पद, प्रतिष्ठा पुन्हा मिळू शकते; पण मुलांचं बालपण परत येत नाही हा अनुभवातून आलेला विचार दीर्घकाळ लक्षात राहतो.
डिजिटल युगात ज्येष्ठ पिढीला भेडसावणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी दाखवलेली समजूतदार भूमिका त्यांच्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवते. तंत्रज्ञानात पुढे असलेल्या तरुणांनी मागे राहिलेल्यांचा हात पकडणं ही जबाबदारी आहे, असा त्यांचा विचार खूप महत्त्वाचा वाटला.
स्टार्टअप संस्कृतीबाबत बोलताना त्यांनी उद्योजकतेचा मानवी पैलू अधोरेखित केला. व्यवसाय म्हणजे फक्त नफा नव्हे, तर समस्या सोडवणं, रोजगार निर्माण करणं आणि समाजाला काहीतरी परत देणं हाच यशाचा खरा अर्थ आहे, असं त्या म्हणाल्या.
संवादाच्या शेवटी त्यांनी दिलेला संदेश अत्यंत साधा पण प्रभावी होता स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्न मोठी पाहा, अपयश आलं तरी थांबू नका आणि सातत्य सोडू नका. मेहनतीला आयुष्य कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही, हा त्यांचा ठाम विश्वास आहे.
'आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६' हा सन्मान केवळ एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा नाही; तो एका विचारशील,
संवेदनशील आणि समाजाला दिशा देणाऱ्या स्त्रीचा सन्मान आहे. मा. सुप्रिया देवस्थळी मॅडम अधिकारी म्हणूनच नव्हे, तर मार्गदर्शक, आई आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून अनेक मनांवर ठसा उमटवतात.
ही मुलाखत माझ्यासाठी केवळ लेखनाचा विषय नव्हता ती स्वतःकडे नव्याने पाहण्याची, थोडं थांबून विचार करण्याची आणि अधिक सजग माणूस होण्याची एक शांत भेट होती.