काही माणसं भेटत नाहीत, अनुभवली जातात. बोलताना त्यांच्या शब्दांपेक्षा डोळ्यांतला शांत ठामपणा अधिक बोलका असतो. नांदेडमधील ज्येष्ठ डॉक्टर, कवयित्री आणि समाजाशी संवेदनशील नातं जपणाऱ्या डॉ. वृषालीताई किन्हाळकर यांचं व्यक्तिमत्त्व असंच आहे. त्या स्वतःबद्दल फारसं बोलत नाहीत, पण त्यांच्या कामामागची संवेदना आपल्याला आपोआप स्पर्श करून जाते.
आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे, पण त्याहून मोठी आहे ती जबाबदारीची जाणीव. 'हा पुरस्कार माझ्यासाठी नाही,' असं त्या सहज म्हणतात, 'तो त्या मुलींसाठी आहे ज्या जन्माआधीच हरवल्या.'
सावित्रीबाई फुले यांचं नाव घेताना त्यांच्या आवाजात कृतज्ञतेची हलकी कंपने जाणवतात. शिक्षणामुळेच स्त्रीला स्वतःचं मत मांडता आलं, स्वतःचं आयुष्य घडवता आलं, असं त्या सांगतात. 'शिक्षण नसतं, तर आपण इथे बोलतही नसतो,' हे वाक्य त्या अत्यंत साधेपणानं उच्चारतात पण त्याचा अर्थ खोलवर भिडतो.
डॉक्टर होण्यामागे त्यांची आई होती. तो काळ सोपा नव्हता. अभ्यास, जबाबदाऱ्या, आणि समाजाच्या अपेक्षा-सगळं सांभाळत त्या पुढे गेल्या. पण वैद्यकीय प्रॅक्टिस करताना जे वास्तव समोर आलं, ते अधिक कठोर होतं. मुलगी जन्माला आली म्हणून रुग्णालयाकडे पाठ फिरवणारी माणसं, अल्ट्रासाऊंडनंतर गर्भपाताची मागणी करणारी कुटुंबं हे सगळं पाहून गप्प बसणं त्यांना जमलंच नाही.
स्त्री भ्रूणहत्येविरोधात उभं राहणं म्हणजे स्वतःच्याच व्यवसायाला धोका पत्करणं. रुग्ण कमी झाले, टीका झाली, पण त्यांनी माणूसपणाची बाजू सोडली नाही. 'मुलगी आणि मुलगा यात फरक करणं मला डॉक्टर म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून मान्य नव्हतं,' असं त्या शांतपणे सांगतात.
आरोग्याविषयी बोलताना त्यांचा दृष्टिकोन नेहमीच सर्वांगीण असतो. आजार नसणं म्हणजे आरोग्य नाही, असं त्या ठामपणे सांगतात. मन, शरीर, नातेसंबंध आणि आत्मिक शांतताप या सगळ्यांचा समतोल म्हणजे खरं आरोग्य. विशेषतः पन्नाशीनंतर महिलांनी आपल्या शरीराकडे भीतीनं नाही, तर समजून घेण्याच्या नजरेनं पाहावं, हा त्यांचा आग्रह असतो.
डॉ. वृषालीताईच्या कवितांचा उगमही याच अनुभवांतून झाला आहे. 'वेदन' हा त्यांचा कवितासंग्रह केवळ दुःखाबद्दल नाही; तो भावनांना शब्द देण्याचा प्रयत्न आहे. त्या म्हणतात, 'बेदना म्हणजे रडणं नव्हे, तर आत जे आहे ते बाहेर येणं.' कधी त्या वेदना आनंदाच्या असतात, कधी अपूर्णतेच्या पण त्या मोकळ्या होतात.
आजच्या तरुणांनी डॉक्टर होण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारावा, असं त्या सुचवतात आपण माणसांच्या बेदना ऐकू शकतो का? कारण आज डॉक्टर असणं म्हणजे केवळ औषध देणं नाही; अविश्वास, अपेक्षा आणि अपयश यांचं ओझंही पेलणं आहे.
संवादाबद्दल त्या फार साधं पण महत्त्वाचं वाक्य म्हणतात- 'अनेक जखमा शब्दांअभावी होतात.' नीट ऐकलं, नीट बोललं, तर अनेक ताण आपोआप कमी होतात. आयुष्याकडे पाहताना त्या कबीरांची आठवण करून देतात गरजा मर्यादित ठेवल्या, तर समाधान आपोआप मिळतं.
आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ स्वीकारताना त्यांनी तो पुरस्कार त्यांच्या एकमेव मुलीला आणि गर्भातच संपलेल्या असंख्य मुलींना अर्पण केला. त्या क्षणी त्यांचा संपूर्ण प्रवास एका वाक्यात सामावतो.
डॉ. वृषालीताई किन्हाळकर म्हणजे केवळ एक नाव नाही, त्या म्हणजे ऐकण्याची क्षमता, उभं राहण्याचं धैर्य आणि वेदनांना माणूसपण देणारी शांत ताकद.