Author
पैशांवर नव्हे, भविष्यावर प्रभुत्व मिळवणारी आर्थिक सावित्री
मा. डिंपल मित्तल
तज्ज्ञ मार्गदर्शक, आर्थिक साक्षरता

पैसे कमावणं अनेकांना जमतं, पण पैशांशी शहाणपणाचं नातं जोडायला शिकवणं ही फार थोड्यांची ताकद असते. डिंपल मित्तल या नावामागे आकड्यांपेक्षा आधी एक विचार उभा राहतो आर्थिक स्वातंत्र्याचा, आत्मविश्वासाचा आणि निर्णयक्षमतेचा. आर्थिक साक्षरतेसारख्या विषयाला त्यांनी केवळ ज्ञानाची चौकट दिली नाही, तर त्याला माणुसकीची, संवेदनशीलतेची आणि अनुभवांची जोड दिली. म्हणूनच त्या केवळ फायनान्स तज्ज्ञ न राहता, हजारो तरुणांसाठी आर्थिक आयुष्याची दिशा दाखवणाऱ्या मार्गदर्शक ठरल्या आहेत.
कॉलेजच्या दिवसांत पहिल्या पगारासोबत आलेला गोंधळ "पैसे कसे सांभाळायचे?" हा साधा पण कुठेच न शिकवला जाणारा प्रश्नच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. जे ज्ञान आपल्याला वेळेवर मिळालं नाही, ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं, या ठाम विचारातून डिंपल मित्तल यांचा आर्थिक साक्षरतेचा प्रवास सुरू झाला.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी कार्यशाळा, वेबिनार आणि संवाद सत्रांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी, पालक आणि व्यावसायिकांपर्यंत आर्थिक साक्षरतेचा संदेश पोहोचवला. आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ हा त्यांच्या कार्याचा गौरव असला, तरी तो त्यांच्यासाठी केवळ वैयक्तिक सन्मान नाही तो एक सामाजिक जबाबदारीचा स्वीकार आहे.
डिंपल मित्तल ठामपणे सांगतात,
'श्रीमंत होणं वेगळं आणि संपन्न होणं वेगळं. खरा संपन्नपणा तेव्हाच येतो, जेव्हा पैसे तुमच्यासाठी काम करायला लागतात.' हा विचारच त्यांच्या संपूर्ण कार्याचा केंद्रबिंदू आहे.
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त जास्त कमाई नव्हे, तर योग्य नियोजन, शिस्तबद्ध बचत आणि सुरक्षित गुंतवणूक. शेअर बाजार म्हणजेच फायनान्स, हा गैरसमज दूर करत त्यांनी म्युच्युअल फंड, विमा, निवृत्ती नियोजन, आपत्कालीन निधी यासारख्या विषयांना सर्वसामान्यांच्या आयुष्यात स्थान दिलं.
पुरस्कार स्वीकारताना मात्र त्यांच्या डोळ्यांत आनंदाइतकंच एक वेगळंच भावविश्व होतं. हा पुरस्कार त्यांनी आपल्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या स्त्रियांना आईला आणि मुलीला समर्पित केला.
ज्या आईनं स्वतःच्या स्वप्नांना कदाचित शब्द देता आले नाहीत, पण मुलीच्या स्वप्नांवर मात्र निखळ विश्वास ठेवला, ती आई डिंपल मित्तल यांच्या दृष्टीने पहिली आधुनिक सावित्री आहे. संस्कार, कष्ट आणि आत्मविश्वासाचं बळ देत तिनं आपल्या मुलीला स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आणि मुलगी-भविष्याचं प्रतीक. उद्याच्या सक्षम भारताचं स्वप्न. ङ्गमाझी मुलगी आर्थिकदृष्ट्या सजग, स्वतंत्र निर्णय घेणारी आणि आत्मनिर्भर स्त्री व्हावी, ही इच्छा व्यक्त करताना डिंपल मित्तल सांगतात की, आर्थिक साक्षरता ही पुढच्या पिढीसाठी संघर्ष नव्हे, तर सहज मिळणारा वारसा असायला हवा.
आईकडून मिळालेल्या मूल्यांवर उभं राहून, मुलीसाठी अधिक सुरक्षित आणि सशक्त भविष्य घडवण्याचा हा प्रवास म्हणजेच डिंपल मित्तल यांची खरी ओळख आहे. त्यामुळे हा पुरस्कार केवळ गौरव न राहता, तो बनतो स्त्रीशक्तीच्या तीन पिढ्यांना जोडणारा एक जिवंत धागा.
शिस्त, सातत्य आणि जिद्द हेच त्यांच्या यशाचं गमक आहे. लग्न, शिक्षण आणि करिअर एकत्र सांभाळताना आलेल्या अडचणींनी त्यांना थांबवलं नाही, उलट अधिक सक्षम केलं. आज त्या तरुणांना एकच संदेश देतात-आर्थिक साक्षरता आजपासून सुरू केली, तर उद्याचं आयुष्य अधिक सुरक्षित आणि तणावमुक्त होऊ शकतं.
डिंपल मित्तल यांचा प्रवास सांगतो की, खरा बदल मोठ्या घोषणांनी नाही, तर रोज घेतलेल्या छोट्या, शहाण्या निर्णयांनी घडतो आणि जेव्हा ज्ञानाला माणुसकीची जोड मिळते, तेव्हा ते समाज बदलण्याची ताकद ठेवतं.