Author
ग्रामीण मातीतील स्वप्नं, शिक्षणाच्या प्रकाशात फुलवणारी सावित्री
मा. डॉ. ज्योती जोशी
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, गणेशखिंड

एखादा पुरस्कार एखाद्या व्यक्तीच्या हातात दिला जातो, पण तो प्रत्यक्षात तिच्या संपूर्ण प्रवासाला सन्मान देत असतो. डॉ. ज्योती जोशी यांच्या बाबतीत आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ हा केवळ गौरव नव्हता, तर ग्रामीण मातीतील स्वप्नांपासून ते शिक्षणाच्या माध्यमातून समाजबदल घडवण्यापर्यंतच्या त्यांच्या शांत, सातत्यपूर्ण प्रवासाची पावती होती. हा प्रवास फारसा गाजावाजा न करणारा असला, तरी अनेक स्त्रियांच्या आयुष्यात आत्मविश्वासाचा उजेड पेरणारा आहे.
ग्रामीण तालुक्यातील मर्यादित शैक्षणिक सुविधांमध्ये शिक्षण घेताना आलेल्या अडचणी, पुढील शिक्षणासाठी पुण्यात केलेला संघर्ष, नोकरी सांभाळत पीएच.डी. पूर्ण करतानाचा संयम या सगळ्या टप्प्यांतून डॉ. ज्योती जोशी यांची जिद्द ठळकपणे दिसून येते. आज त्या पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे अध्यापन करत असताना विद्याथ्याँशी असलेला त्यांचा संवाद हा केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित नसून, आयुष्य घडवणारा आहे.
करिअर कट्टा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत झालेल्या संवादात त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास अत्यंत साधेपणाने उलगडला. ज्ञान हे एकतफी देण्याचं साधन नसून, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सतत चालणारी देवाण-घेवाण आहे, असं त्या ठामपणे मानतात. हाच दृष्टिकोन त्यांच्या अध्यापनात आणि संशोधनातही दिसून येतो.
त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू होता झोपडपट्टीतील महिलांचा कौशल्यविकास आणि त्यामधील स्वयंसेवी संस्थांची भूमिका. क्षेत्रकार्य करताना त्यांनी जवळून पाहिलं की अनेक महिला केवळ संधीअभावी मागे राहतात. शिवणकाम, भरतकाम, पार्लर प्रशिक्षण यांसारख्या कौशल्यांमुळे या महिलांना उत्पन्नाचा मार्ग मिळतो, आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद मिळते. विशेष म्हणजे पीएच.डी. पूर्ण झाल्यानंतरही डॉ. जोशी यांचा या महिलांशी संपर्क तुटलेला नाही. काही महिलांनी स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू केले, हे पाहताना त्यांना संशोधनाचं खरं फलित मिळाल्याचं समाधान वाटतं.

महिला सक्षमीकरणात स्वयंसेवी संस्थांचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं त्या अधोरेखित करतात. मात्र त्यासाठी योग्य समन्वय, निधीचा प्रभावी वापर आणि महिलांचा विश्वास जिंकणं तितकंच महत्त्वाचं आहे. संघभावना आणि परस्पर सहकार्याशिवाय सामाजिक बदल शक्य नाही, हा निष्कर्ष त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आलेला आहे.
शिक्षणाविषयी बोलताना डॉ. जोशी पारंपरिक चौकटींपलीकडचा दृष्टिकोन मांडतात. 'फक्त पाठ्यपुस्तकांवर अवलंबून राहून चालणार नाही,' असं त्या स्पष्ट सांगतात. कौशल्याधारित शिक्षण, डिजिटल साधनांचा वापर आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२० मधील बहुविषयक संधी विद्याथ्यर्थ्यांनी आत्मसात कराव्यात, असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या मते शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नसून, आयुष्यभर साथ देणारं भांडवल आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणं ही त्यांची शांतपणे सुरू असलेली सामाजिक बांधिलकी आहे. 'शिकायची खरी इच्छा दिसली की मदत आपोआप होते,' असं त्या सहजपणे सांगतात, विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर नव्हे, तर स्वावलंबी आणि संवेदनशील नागरिक बनवणं हेच शिक्षणाचं अंतिम ध्येय असल्याचं त्या मानतात.
स्त्री म्हणून करिअर, शिक्षण आणि कुटुंब यांचा समतोल साधताना येणाऱ्या अडचणींबद्दल त्या अत्यंत प्रामाणिकपणे बोलतात. स्वतःवरचा विश्वास, ठाम निर्णयक्षमता आणि मानसिक ताकद असेल तर कोणतीही अडचण पार करता येते, असा त्यांचा अनुभवसिद्ध संदेश विशेषतः तरुण मुलींसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील मुलींनी संधी कमी आहेत असं मानू नये; जिद्द आणि सातत्य असेल तर मार्ग नक्कीच सापडतो, हा त्यांचा ठाम विश्वास आहे.
'आधुनिक सावित्री म्हणजे स्वतःच्या पायावर उभी राहणारी, स्वतःला घडवणारी आणि मिळालेल्या संधींचं सोनं करणारी स्त्री,' अशी डॉ. ज्योती जोशी यांची स्पष्ट व्याख्या आहे. सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेला शिक्षणाचा दिवा आज अनेक स्त्रियांच्या आयुष्यात उजेड देतो आहे, आणि त्या उजेडात स्वतःचा वाटा उचलणाऱ्या स्त्रियांपैकीच एक महत्त्वाचं नाव म्हणजे - डॉ. ज्योती जोशी.
हा पुरस्कार त्या कृतज्ञतेने करिअर कट्टाला अर्पण करतात आणि युवकांना आवाहन करतात 'तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे; ते घडवताना समाजालाही सोबत घ्या.'
त्यांचा संपूर्ण प्रवास पाहिला की जाणवतं शिक्षण जेव्हा संवेदनशील मनाशी जोडले जातं, तेव्हा ते केवळ व्यक्तीच नाही, तर संपूर्ण समाज घडवतं.