महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शिक्षण, संशोधन आणि सामाजिक कार्याच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रा. ममता पळसपगार यांचा जीवनप्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे (जि. अमरावती) येथे गणित विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या ममता मॅडम यांना नुकताच आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ जाहीर झाला. हा सन्मान त्यांच्या कठोर परिश्रमांची, जिद्दीची आणि समाजाभिमुख कार्याची ओळख आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून येऊनही त्यांनी शिक्षण, संशोधन, साहित्य आणि सामाजिक उपक्रमांमध्ये घडवलेला प्रवास अनेक तरुणींसाठी मार्गदर्शक ठरतो आहे.
हा पुरस्कार सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दिला जातो, जो महिलांच्या शिक्षण आणि सशक्तीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांना प्रदान केला जातो. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, बातमी ऐकल्यावर मनात अपार आनंद झाला. मागील वर्षी बारामती येथे झालेल्या अधिवेशनात हा पुरस्कार पाहिला होता आणि तेव्हा मनात इच्छा निर्माण झाली होती की, आयुष्यात असा क्षण यावा. आज तो प्रत्यक्षात आला आहे, हे स्वप्नवत वाटते. जिल्हा समन्वयक म्हणून राबवलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमुळेच हा पुरस्कार मिळाला, असे त्या नम्रतेने म्हणाल्या.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा त्यांच्या प्रवासावर खोलवर प्रभाव आहे. सावित्रीबाईच्या संघर्ष आणि धाडसातून प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याचे बळ मिळते. आपण सर्व सावित्रींच्या लेकी आहोत आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यात
स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल असा क्षण यायला हवा. त्यांचा शिक्षणप्रवास ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून सुरू झाला. सोयी-सुविधा नव्हत्या, पण शिक्षणाचे महत्त्व घरात होते. बारावीपर्यंत इंजिनिअरिंगचे स्वप्न होते, पण काही कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. मात्र त्यांनी हार मानली नाही आणि श्री शिवाजी सायन्स कॉलेज, अकोट येथे बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. तेथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक चुमडे सरांचे मार्गदर्शन मिळाले. पहिल्या सेमिस्टरमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने त्यांनी कठोर शब्दांत सुनावले होते. त्या क्षणी व्यथित झाल्या, पण त्यातून अभ्यासाची योग्य पद्धत, उत्तर मांडणीची शिस्त आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोन शिकल्या.
चुमडे सरांची कठोरता त्यांच्या यशाची पहिली पायरी ठरली. पुढील सेमिस्टरमध्ये सातत्य आणि शिस्त आणून त्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात रसायनशास्त्रात दुसरा क्रमांक मिळवला आणि सुवर्णपदक पटकावले. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थिनीसाठी हा गौरवास्पद क्षण होता. यामुळे आत्मविश्वास वाढला आणि कठोर परिश्रमाने कुठेही पोहोचता येते, हा विश्वास दृढ झाला.
पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी गणिताकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था (VMV), अमरावती येथे एम.एस्सी. (गणित) केले. ही संस्था यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवणारे तीर्थक्षेत्र आहे, असे त्या म्हणतात. मापारी सर आणि नाकाडे सरांचे मार्गदर्शन लाभले. नेट-सेट परीक्षेची तयारी विदर्भात राहूनच केली. सातत्य, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास यावर भर दिला. २०१७ मध्ये एम.एस्सी. पूर्ण होताच २०१८ मध्ये नेट आणि सेट दोन्ही उत्तीर्ण केल्या. या अनुभवातून त्या सांगतात की, वेळ वाया घालवू नये. एक-दोन प्रयत्नांत क्षमता ओळखावी आणि योग्य दिशेने सतत प्रयत्न करावेत.
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी २०१९ मध्ये त्या राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. सुरुवातीला विद्यार्थ्यांसारख्याच दिसणाऱ्या तरुण प्राध्यापिकेला वर्ग सांभाळणे आव्हानात्मक होते. भीतीही वाटायची. मात्र बी.एस्सी. आणि एम.एस्सी. मध्ये विकसित झालेल्या संवादकौशल्यांमुळे त्या यशस्वी झाल्या. मूलतत्त्वे समजल्याशिवाय पुढे न जाणे हा त्यांचा नियम आहे. बेसिक क्लिअर असेल तर कोणताही विषय अवघड वाटत नाही.
अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर त्यांचा भर आहे. गॅदरिंग, युथ फेस्टिव्हल, एनएसएस यात सक्रिय सहभाग आणि नेतृत्व घेतले. विद्याथ्यांनी पुस्तकापुरते मर्यादित न राहता क्रिडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांतून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असा दृष्टिकोन आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थी आत्मविश्वासाने बोलू लागले आणि सुप्त गुण ओळखू लागले. विद्यार्थ्यांच्या यशात योगदान देणे हे त्यांचे खरे समाधान आहे.
सध्या त्यांची पीएच.डी. अंतिम टप्प्यात आहे. संशोधन विषय 'स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी' आणि युनिव्हर्सच्या मॉडेल्सशी संबंधित आहे. विद्यमान मॉडल्समधून नवीन गुणधर्म शोधण्याचा प्रयत्न आहे. संशोधन केवळ 'डॉ.' साठी नव्हे, तर समाजाला आणि विज्ञानाला नवीन देण्यासाठी असावे, असा विश्वास आहे.
गणिताच्या प्राध्यापिका असूनही त्यांना साहित्याची आवड आहे. 'तरुणाईचा गोंधळ' हे पुस्तक प्रकाशित झाले असून वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे पुस्तक तरुणांच्या संभ्रम, स्वप्ने आणि वास्तवाचे चित्रण करते. करिअर कट्टा उपक्रम आणि आपल्या राजीव नंदकर सरांच्या प्रेरणेतून लेखनाला सुरुवात झाली. दररोज लिहिण्याची सवय लागली आणि साहित्यात
यश मिळवले. अल्पकालात एम.एस्सी., नेट-सेट, प्राध्यापककी, पीएच.डी. आणि आधुनिक सावित्री पुरस्कार मिळवणारा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. ग्रामीण मुलींनी योग्य संधी आणि जिद्द असेल तर सर्व क्षेत्रांत यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध केले.
प्रा. ममता पळसपगार यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील मुलींसाठी दीपस्तंभ आहे. सावित्रीबाईच्या विचारांना कृतीतून श्रद्धांजली वाहिली आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्ने थांबवू नयेत, कारण परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाने प्रत्येक स्वप्न साकार होते, असा संदेश त्यांचा जीवनप्रवास देतो.