मा. डॉ. रेखा मग्गीरवार, प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती. त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक, सामाजिक आणि पर्यावरणीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव विद्यार्थिनींसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला. डॉ. रेखा मणिरवार या वनस्पतीशास्त्राच्या (Botany) क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्या अमरावती गार्डन क्लबच्या सचिव म्हणूनही पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांचे कार्य केवळ अध्यापनापुरते मर्यादित नसून, समाजोपयोगी उपक्रम, विद्यार्थ्यांच्या समुपदेशन आणि पर्यावरण जागृतीमध्येही त्यांची सक्रिय भूमिका आहे.
डॉ. रेखा मग्गिरवार गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून १९८७ साली बी. एस्सी. पूर्ण केली. त्याच काळात त्यांचे लग्न झाले. लग्नानंतरही शिक्षण थांबवण्याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. समाजातील पारंपरिक दबाव असूनही त्यांनी लग्नानंतर दहा वर्षांत कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि शिक्षण यांचा समतोल साधत M.Sc., M.Phil., Ph.D., B.Ed. या पदव्या प्राप्त केल्या. २००३ साली त्यांनी NET/SET परीक्षा उत्तीर्ण केली.
हा कालखंड अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. लमानंतरच्या काळात अनेकदा शिक्षण थांबवण्याची सक्ती होते, पण डॉ. रेखा यांनी अडचणींवर मात करून शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. त्यांच्या या प्रवासातून दिसते की, महिलांना कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक जीवन यांचा समतोल साधता येतो, फक्त जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वास आवश्यक आहे.
शैक्षणिक पदव्या पूर्ण केल्यानंतर डॉ. रेखा यांनी विविध महाविद्यालयांमध्ये अध्यापन सुरू केले. सुरुवातीला फिक्स पे आणि तासिका तत्त्वावर त्यांनी काम केले. अमरावती आणि मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथेही त्यांना अध्यापनाची संधी मिळाली. या सर्व अनुभवांनी त्यांना समृद्ध केले. विविध विद्यार्थ्यांशी, सहकाऱ्यांशी आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रत्येक अनुभवातून त्यांनी काही ना काही शिकले,
सध्या त्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे वनस्पतीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हा महाविद्यालय NAAC द्वारे अ+ ग्रेड प्राप्त असून, NIRF २०२५ मध्ये देशातील ९३ व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन केले आहे. वनस्पतीशास्त्र हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी पदवीपासून ते आजपर्यंत याच क्षेत्रात करिअर केले आहे.
डॉ. रेखा मणिरवार केवळ अध्यापनातच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनातही सक्रिय आहेत. अमरावती गार्डन क्लबच्या सचिव म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबविले. फुलांच्या लागवडी, संरक्षण, बोन्साय निर्मिती, शेवंती लागवड आणि संरक्षण यासंबंधी कार्यशाळा आयोजित केल्या. उदाहरणार्थ, २०२३ साली शेवंती लागवड आणि संरक्षण विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले.
क्लबच्या माध्यमातून ते वृक्ष पालकत्व अभियान राबवतात. अमरावती महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागासोबत मिळून वृक्ष संरक्षणाचे काम करतात. ऑनलाइन माध्यमातूनही त्यांनी शेकडो बागप्रेमींना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे अमरावतीत पर्यावरण जागृती वाढली आहे.
मुलाखतीत डॉ. रेखा यांनी सांगितले, 'माझा हा प्रवास संपूर्ण आयुष्याचा आरसा आहे. लग्नानंतरच्या दहा वर्षांत मी शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल साधला. अडचणी येतात, पण जिद्द आणि इच्छाशक्तीने त्या मात करता येतात. स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि योग्य मार्गदर्शन स्वीकारा-यश नक्कीच मिळते.' त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले की, पारंपरिक जबाबदाऱ्या आणि करिअर यांचा समतोल साधता येतो. शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. अडचणींना सामोरे जाण्याची क्षमता प्रत्येकात असते, फक्त ती जागृत करावी लागते.
भारतात महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत असले तरी अजूनही अडचणी आहेत. ग्रामीण भागात, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक दबावामुळे अनेक मुली शिक्षण सोडतात. अशा वेळी डॉ. रेखा यांसारख्या व्यक्तींचे जीवन एक आदर्श आहे. त्यांनी दाखवून दिले की, शिक्षणाने स्वावलंबन येते आणि समाजात योगदान देता येते.