Author
आधुनिक सावित्री- स्त्री शक्तीचा ऊर्जादायी प्रवास
प्रणोती येलाजा शितोळे
सचिव, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'करिअर कट्टा' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत 'आधुनिक सावित्री' हे विशेष प्रेरणादायी मुलाखत सत्र आयोजित करण्यात आले. हा उपक्रम महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि प्रेरणादायी व्यक्तींशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देतो. या सत्राचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींना शिक्षण, संशोधन, व्यावसायिक करिअर, सामाजिक भान, पर्यावरण संवर्धन आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलन याचाबत मार्गदर्शन मिळावे हा होता.
'आधुनिक सावित्री' हे शीर्षक अत्यंत अर्थपूर्ण आहे. आजच्या काळातही अनेक महिलांना समाजातील पारंपरिक भूमिका, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक आव्हानांमध्ये संघर्ष करावा लागतो. 'आधुनिक सावित्री' ही संकल्पना अशाच महिलांच्या जीवनातून साकार होते, ज्या शिक्षण, करिअर आणि समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःला आणि इतरांना प्रेरणा देतात.
सावित्रीबाई संयम आणि सहनशीलता यांचं मूर्तिमंत स्वरूप। सावित्रीबाईंच्या नावाने पुरस्कार द्यायचं हा विचार ज्या वेळेला मनात आला, त्यावेळेला त्यांनी दिलेल्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे नेणाऱ्या तुमच्या-माझ्यासारख्या अनेक मैत्रिणी डोळ्यासमोर आल्या. ज्यांना सावित्रीबाईनी शिक्षणाचा वसा दिला, विचारांचा वारसा दिला आणि सर्वांसोबत पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली.
२०२१ पासून सुरू झालेल्या या आधुनिक सावित्री पुरस्कार सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी मला महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून मिळाली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, साहित्यिक, संशोधन या आणि यासारख्या इतर विषयांवर स्वतः सोबतच समाजासाठी काम करणाऱ्या स्त्रीशक्तीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराच्या निमित्ताने आजवर ज्या ज्या स्त्रीशक्तींना मी भेटले, त्यांचे आयुष्य म्हणजे आपल्या सर्वांसाठी निश्चितच एक ज्ञानाचा दिवा आहे. हा ज्ञानाचा दिवा स्वतःसोबतच इतरांचे आयुष्य प्रकाशमान करतो.
यावर्षीच्या आधुनिक सावित्रीची मुलाखत घेत असताना आलेला अतिशय सुहृद अनुभव म्हणजे माझ्यासोबत करिअर कडूयाच्या दिल्ली वॉरियर्समध्ये असणाऱ्या विद्यार्थिनी ! याआधी कोरोनादरम्यान विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आधुनिक युगातील हिरकणी, व्यावसायिक आणि आधुनिक सावित्री यांची मुलाखत मी घेतली होती. त्यातून आयुष्य समृद्ध करणारा आणि आयुष्याला नवीन दिशा देणारा अनुभव मला भेटला होता. यावर्षीचा अनुभव देखील अगदी तसाच आहे आणि यावरील सोबत असणाऱ्या सर्व विद्यायिनीं मैत्रिणींच्या प्रतिक्रिया देखिल तितक्याच बोलक्या आहेत.
लैंगिक शिक्षण आणि आणि भावना समजून घेण्याचं महत्त्व सांगणाऱ्या मिथिला मॅडम, पैसा कमावण्यापेक्षा तो मॅनेज करणे किती महत्त्वाचा आहे हे सांगणाऱ्या डिम्पल मॅडम, स्त्री जन्मासाठी पुढाकार घेणाऱ्या आणि तिचं मन कविता स्वरूपात मांडणाऱ्या वृषाली ताई, स्त्री बाबतीतला अतिशय संवेदनशील विषय मासिक पाळी याविषयी कार्यरत असणाऱ्या स्नेहल मॅडम, रंगांच्या दुनियेत रमणाऱ्या सुवर्णरहा मॅडम, दुर्गम भागात काम करणाऱ्या संध्या मॅडम या सर्वांनी तर आयुष्याचा एक वेगळा मंत्रच आम्हाला दिला. सोबतच शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या स्मिता वंजारी मॅडम, अश्विनी देवस्थळी मॅडम, डॉ. प्रज्ञा प्रभू मॅडम, पूजा नरवाडकर मॅडम, डॉ. रजनी शिखरे मॅडम, वर्षा वैद्य मॅडम, डॉ. रेखा मग्गीरवार मॅडम, डॉ. ज्योती जोशी मॅडम ममता पळसपगार मॅडम यांनी जे काही योगदान दिलेला आहे ते अमूल्य असं आहे.
प्रत्येक मुलीची शिक्षणाची तळमळ समजून घेऊन तिचा आयुष्य तिने सक्षम आणि सार्थ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या या सर्व आधुनिक सावित्रींना माझा मानाचा मुजरा!
या सर्व प्रवासात सातत्याने माझ्यासोबत असणारे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. यशवंत शितोळे या सर्व सावित्रींसोबत समन्वयाचे काम करणाऱ्या मा. किरण पाटील मॅडम, ऑनलाईन चालणाऱ्या मुलाखतींसाठी तांत्रिक सहाय्य पुरवणाऱ्या अमृता पाटील मॅडम आणि अश्विनी गायकवाड मॅडम, चैत्रा राऊत मॅडम आणि करिअर कट्ठाच्या दिल्ली वॉरियर्सच्या सर्व मैत्रिणींचे तसेच डिझाईनिंगचे काम करणारे मा. इंद्रजीत खाडे सर या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
मला आशा आहे की, या सर्व आधुनिक सावित्रीच्या लेखांमधून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल ती प्रेरणा तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल आणि तुमचे आयुष्य समृद्ध करेल.
अनावधानाने काही गोष्टी राहिल्या असल्यास त्यासाठी क्षमस्व!