महाराष्ट्राच्या मातीत सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची दारे उघडली, तरी त्याच समाजात आजही 'मासिक पाळी' या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल हजारो वर्षांपासूनचे मौन पाळले जाते. हे मौन तोडण्याचे धाडस करणाऱ्या आणि हजारो मुलींच्या आयुष्यात आरोग्याचा प्रकाश पोहोचवणाऱ्या आधुनिक सावित्री म्हणजे स्नेहल चौधरी कदम, 'क्षितिज' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले 'ब्लीड द सायलन्स' हे अभियान आज एक चळवळ बनले आहे. त्यांच्या या प्रवासाचा, संघर्षांचा आणि यशाचा हा सखोल वेध.
स्नेहलताईची पार्श्वभूमी एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची होती. मुंबईत एका मोठ्या कंपनीत काम करताना त्यांचे आयुष्य सुरक्षित आणि आलबेल होते. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात नेहमी अस्वस्थता होती की हे काम केवळ स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी आहे, समाजाचे काय? ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या समोर आल्यावर त्यांना जाणीव झाली की शहरी सोयी-सुविधा तिथे स्वप्नासारख्या आहेत. मासिक पाळीच्या विषयावर त्यांनी काम सुरू केले कारण त्यांनी स्वतः पाहिले होते की अनेक मुली या कारणामुळे शाळा सोडतात. ज्या वयात मुलींनी उडायला हवे, त्या वयात त्या एका नैसर्गिक बदलामुळे स्वतःला बंदिस्त करतात. हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ झाले आणि तिथूनच 'क्षितिज' च्या प्रवासाला खरी सुरुवात झाली.
'ब्लीड द सायलन्स' हे नाव अतिशय प्रभावी आहे. रक्ताच्या (Bleed) विषयावर पाळले जाणारे मौन (Silence) फोडणे हाच यामागचा उद्देश होता. सुरुवातीला ग्रामीण भागात किंवा आदिवासी पाड्यांवर जाऊन महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या नजरही मिळवत नव्हत्या. 'पाळी' हा शब्द उच्चारताच त्या तिथून निघून जायच्या. लोकांना वाटायचे की हा 'अशुद्ध' विषय आहे. काही ठिकाणी तर त्यांना प्रवेश नाकारला गेला. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून सांगितले की मासिक पाळी हा आजार नाही, तर जीवनाची सुरुवात आहे. जेव्हा लोकांना पटले की हे त्यांच्या मुलींच्या आरोग्यासाठी आहे, तेव्हा हळूहळू बदलाची लाट सुरू झाली.
या अभियानात अनेक उपक्रम राबवले गेले. सुरुवातीला आर्थिक परिस्थितीमुळे कपडा वापरणाऱ्या महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून मोफत सॅनिटरी पॅड्सचे वितरण केले. शाळांमध्ये वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन्स बसवल्या, जेणेकरून पॅड्स मिळणे सोपे होईल आणि वापरलेल्या पॅडची शास्त्रीय विल्हेवाट लावता येईल. तसेच मासिक पाळीच्या काळात मुलींना विश्रांती आणि स्वच्छतेसाठी शाळांमध्ये स्वतंत्र 'आनंदी रूम' विकसित केल्या.
समाजात मासिक पाळीला 'फक्त स्त्रियांचा विषय' मानले जाते, पण स्नेहलताईंनी यात पुरुषांचाही सहभाग घेतला. जोपर्यंत घरातील पुरुष बाप, भाऊ किंवा नवरा हा विषय समजून घेत नाहीत, तोपर्यंत स्त्रीला सन्मान मिळणार नाही. कार्यशाळांमध्ये पुरुषांना बोलावून त्यांना विचारले की जर तुमची मुलगी वेदनेत असेल तर तुम्ही तिला का दूर ठेवता ? या प्रवासात त्यांच्या पती आणि कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यांनी कधी थांबवले नाही, उलट पूर्ण पाठिंबा दिला. आज अनेक पुरुष 'पीरियड फ्रेंडली' बनले आहेत, हे त्यांचे मोठे यश आहे.
आदिवासी भागातील काम अत्यंत गुंतागुंतीचे होते. तिथे जुन्या प्रथा आणि अंधश्रद्धा अधिक होत्या. एका गावात मुलींना पाळीच्या काळात घराबाहेर पडक्या खोलीत राहावे लागायचे, जिथे पाऊस, थंडी आणि सापांची भीती असायची. तिथे 'आनंदी रूम'ची संकल्पना राबवली आणि लोकांना समजावले की हे रक्त अशुद्ध नाही. आज तिथल्या मुली सॅनिटरी पॅड्स वापरतात आणि उघडपणे बोलतात. 'क्षितिज'ने गेल्या काही वर्षांत लाखो महिलांशी संवाद साधला आहे. हा आकडा नाही, तर बदललेल्या मानसिकतेचा पुरावा आहे.
त्यांना महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार, लोकमत पुरस्कार आणि इतर सन्मान मिळाले आहेत. हे पुरस्कार कष्टाची पावती असतात, पण सोबत जबाबदारीही घेऊन येतात. सावित्रीबाईनी शिक्षणासाठी दगड-शेण सोसले, त्याच मातीतली वारसदार म्हणून त्या आपले कर्तव्य बजावत आहेत. हे सन्मान त्यांना सांगतात की अजून खूप काम बाकी आहे.
आजच्या तरुण पिढीला, विशेषतः समाजसेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना त्यांचा संदेश आहेः स्वतःवर विश्वास ठेवा. समाज काय म्हणेल याचा विचार केला तर कधीच पुढे जाता येणार नाही. शिक्षण म्हणजे पदवी नव्हे, तर स्वतःच्या शरीराचा आणि हक्कांचा आदर करणे. तरुणींनी सामाजिक टॅबू तोडण्यासाठी पुढे यावे. तुम्ही ओझे नाही, शक्ती आहात. बदल एका दिवसात येत नाही, पण सातत्य ठेवले तर नक्की येतो.
स्नेहल चौधरी कदम यांनी सॉफ्टवेअर कोडमधून बाहेर पडून मानवी संवेदनांचा कोड उलगडला आहे. त्यांनी केवळ पॅड्स बाटले नाहीत, तर महिलांना आत्मसन्मान परत मिळवून दिला. ग्रामीण महाराष्ट्रातील मुलींच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आत्मविश्वास दिसतो. त्यांच्या या तेजस्वी प्रवासाला मिळालेला सन्मान हा एक मानाचा मुजरा आहे.
स्नेहलताईच्या शब्दांतः
'जिथे लाज होती तिथे शब्द आले,
जिथे भीती होती तिथे बळ आले.
रक्ताला दिला सन्मानाचा दर्जा,
आयुष्याला मिळाला नवा आवाज!'