Author
उच्च शिक्षण विभागामध्ये करिअर कट्टाकडून संपन्न झालेले उपक्रम
मा. डॉ. शरयू ब. तायवाडे
प्राचार्या, तायवाडे कॉलेज ,महादुला कोराडी

राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (२३-२४ जानेवारी)

श्री शिवाजी संस्था अमरावती संचालित श्री शिवाजी महाविद्यालय व करिअर कट्टाच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाविद्यालय अमरावती येथे २३ आणि २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे भव्य आयोजन करण्यात आले देशभरातील पदवी पदव्युत्तर व संशोधन स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी हे व्यासपीठ नवोपक्रम संशोधन स्टार्ट-अप व उद्योजकतेच्या संकल्पनांना दिशा देण्यासाठी महत्त्वाचे ठरले. या राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचा उद्देश विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना व्यासपीठ संशोधनाला दिशा आणि नवोपक्रमांना संधी देणे हाच या राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या आयोजनामागचा उद्देश होता. या राष्ट्रीय विद्यार्थी परीषदेअंतर्गत तांत्रीक सत्र, पोस्टर सादरीकरण, मॉडेल्स प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात कृषी, तंत्रज्ञान, आरोग्य, पर्यावरण, कृत्रिम बुदधीमत्ता, डेटा सायन्स, जैवतंत्रज्ञान, नवीकरणीय उर्जा व सामाजिक नवोपक्रम अशा विविध विषयावर देशभरातील विद्यार्थानी सादरीकरण केले. या महत्वपूर्ण शैक्षणिक संशोधन उपक्रमात देशभरातील ४०० पेक्षा ज्यास्त युवा वैज्ञानिक सहभागी झाले.

मधुरक्रांती (१९ जानेवारी)

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने मधुर समन्वय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण प्रकल्पासंदर्भात महत्वाचा असा सामंजस्य करार दिनांक १९ जानेवारी २०२६ ला करण्यात आला. या माध्यमातून मधुरक्रांतीच्या उपक्रमाला सुरवात झाली आहे. या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ तसेच कृषी क्षेत्रातील महत्वपूर्ण क्रांतीची सुरवात होणार आहे. या उपक्रमाच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली असून यात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गीतांजली बावीस्कर, सह मुख्य कार्यकारी आधिकारी मा. रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी

अधिकारी मा. नित्यानंद पाटील, करिअर कट्टाच्या वतीने मुंबई विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. अतुल साळुंखे, विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. दीपा वर्मा आणि सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे यांचा समावेश आहे.

राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा (२०२५-२६)

दरवर्षी करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि जी महाविद्यालये आणि इतर सन्माननीय पदाधिकारी विविध समित्यांमध्ये काम करतात त्यांना यामार्फत सन्मानित करण्यात येते. पाहता पाहता या उपक्रमाला सुरुवात होऊन पाच वर्षे होत आहेत त्याचप्रमाणे करिअर कट्टा परिवार सुद्धा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे आणि या वर्षातील जी स्पर्धा आयोजित करण्यात आली, ती अतिशय पारदर्शक नियमांच्या अधीन राहून करण्यात आली आहे. याकरिता प्रत्येक महाविद्यालयाला करिअर कट्टा पोर्टलला आपल्या लॉगिन मधून महाविद्यालयीन आणि वैयक्तिक स्पर्धेसाठी फॉर्म भरायचा होता आणि विशेष म्हणजे जी प्रश्नावली तयार करण्यात आली होती त्यामध्येच आपली पात्रता ठरविण्याची योग्य प्रणाली अंमलात आणलेली होती. त्यामुळे पात्र महाविद्यालय आणि समन्वयक या स्पर्धेकरिता सामोरे गेलेत आणि इतरांना आपण कुठे कमी पडलो याची जाणीव झाली.

वर्धापन दिन करिअर कट्टा

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा उपक्रम महाराष्ट्रातील युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता सुरू करण्यात आलेली २०२१ मधील ही चळवळ आज पाच वर्षाचा टप्पा पूर्ण करते आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. चांदा ते बांदा या उक्तीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम विद्यार्थी जोडण्यास शक्य होईल तेवढे प्रयत्न सर्वांच्या सहकार्यातून आणि अथक प्रयत्नातून करीत आहे. हा पाच वर्षाच्या प्रवासादरम्यान झालेल्या कामाचा आलेख पाहता अवर्णनीय असे कामाचे पैलू आपल्या समोर मांडताना आनंद होत आहे. यामध्ये वर्षभरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठीची धोरणे निश्चिती कार्यशाळा, बारामती येथे संपन्न होणारे राज्यस्तरीय संसद अधिवेशन, विभागाच्या होणाऱ्या सभा, विद्यार्थी संवाद कार्यशाळा, "नजरेसमोर राष्ट्र हृदयात महाराष्ट्र" दिल्ली उपक्रम, स्टार्ट-अप समिट या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सर्जनशिलतेला चालना देणारी रील स्पर्धा असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या करिअर सोबतच व्यक्तिमत्वाला नवी दिशा देणारे आहे.

या उपक्रमाचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे आणि करिअर कट्टा ऑफिसची संपूर्ण टीम यांचे अतिशय मोलाचे योगदान या उपक्रमाच्या वाढीस लागले आहे. जिथे विचारांना आणि कामाला स्थगिती आल्यासारखे वाटते तिथे करिअर कट्टा नवनवीन संकल्पनासह नवीन उपक्रम घेवून आपल्यासमोर येत आहे. यातील विद्यार्थी संवाद उपक्रम संपूर्ण महाराष्ट्राला जोडण्यास अत्यंत पूरक ठरला आहे. "युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी", हे ब्रीद वाक्य घेवून यशस्वितेकडे वाटचाल करीत पाच वर्षाचा टप्पा पूर्ण करतांना अनेकांचे करिअर यातून घडले हे अभिमानाने सांगावेसे वाटते.