Author
निमंत्रित संपादकीय
मा. रवींद्र माधव साठे
सभापती, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ (राज्यमंत्री दर्जा)

करिअर कट्टा च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त, निमंत्रित संपादक म्हणून माझ्या या उपक्रमाला मनापासून हार्दिक शुभेच्छा..!

पाच वर्षांचा हा प्रवास म्हणजे तरुणाईच्या स्वप्नांना पंख देणारा, करिअरच्या वाटचालीला दिशा दाखवणारा आणि आत्मविश्वास जागवणारा ज्ञानयज्ञ ठरला आहे.

करिअर कट्टा हे केवळ एक व्यासपीठ नाही, तर विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि संधी यांना जोडणारा दीपस्तंभ आहे. या उपक्रमाने असंख्य तरुणांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेण्याची आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची प्रेरणा दिली आहे.

पुढील वाटचालीत करिअर कट्टा अधिकाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि यशाची ऊर्जा देत राहो, हीच सदिच्छा !

करिअर कट्टासमवेत सामंजस्य करारः महाराष्ट्रात मधुक्रांतीच्या दिशेने वाटचाल..

मधमाशी हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक. यावर आधारित असलेला मध उद्योग हा कुटीरोद्योगाचा एक भाग आहे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सन २०१७ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्यासाठी घोषणा केली व या दृष्टीने प्रयत्नाचा एक भाग म्हणून हनी मिशन मधुक्रांती या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली.

मधमाशीपालन उद्योग हा एक महत्त्वाचा व्यवसाय असून त्यामध्ये मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत. आज देशात आणि राज्यात केंद्र व राज्य शासन मध उद्योगाच्या विविध योजनांची आखणी व अमलबजावणी करीत आहे. महाराष्ट्र शासनाने मध उद्योगासाठी सुमारे २०२३-२४ च्या अर्थ संकल्पात १६ कोटींची तरतूद केली. शेतकरी, शेतमजूर, फळ बागायतदार, आदिवासी, जंगल व दऱ्याखोऱ्यातील गावकरी या सर्वांसाठी मध योजनेचा लाभ यामुळे घेता येणार आहे. महाराष्ट्रात राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालयाच्यावतीने मधमाशीपालनास गती देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या मधमाश्यांच्या वसाहती वाढविणे व मध व्यवसाय हा एक प्रमुख व्यवसाय म्हणून पुढे आणणे यासाठी मंडळाने 'मधाचे गाव' ही संकल्पना सन २०२२ पासून राबविण्यास सुरुवात केली. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात मधाचे गाव 'माघर' हे देशातील पहिले गाव घोषित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील 'पाटगाव' हे दुसरे मधाचे गाव म्हणून उदयास आले. अमरावती जिल्ह्यातील आमझरी तालुका चिखलदरा या ठिकाणीही आग्या मधमाशांचे वास्तव्य असलेले मधाचे गाव तयार होत आहे. राज्यात मधमाशीपालन व्यवसाय करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव व्हावे यासाठी मंडळाचा प्रयत्न आहे. या योजनेत पहिल्या टप्यात दहा गांवाची निवड झाली आहे. यांत भंडारवाडी-नांदेड, शेलमोहा परभणी, काकडदाना-हिंगोली, बोरझर नंदुरबार, उडदवणे आहिल्यानगर, चाकोरे-नाशिक, साळोशी-सातारा, घोलवड पालघर, सिंधी विहीर वर्षा, आमझरी-अमरावती या गावाचा समावेश आहे.

महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. राज्यात सन १९४६ सालापासून तत्कालीन खादी व ग्रामोद्योग समितीच्या माध्यमातून महाबळेश्वर येथे प्रथम आधुनिक मधमाशीपालनाला सुरुवात झाली. पुढे खादी मंडळाच्या वतीने महाबळेश्वर येथे स्वतंत्र मध संचालनालय काम करत आहे. या संचालनालयाच्यावतीने राज्यातील मध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी मधकेंद्र योजना चालू आहे. संपूर्ण राज्यभर जिल्हास्तरीय मधपाळ प्रशिक्षण, जनजागृती मेळावे, प्रशिक्षकाची यंत्रणा, संशोधन व नियंत्रण हे खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने केले जात आहे. राज्यामध्ये प्रथमच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर महाविद्यालयीन पदवी शिक्षणामध्ये देखील विविध कौशल्याभिमुख प्रशिक्षणाचा समावेश करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठासहित राज्यातील अनेक विद्यापीठांनी मधुमक्षिका पालनाचा अभ्यासक्रम हा दोन क्रेडिटसाठी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक हा अभ्यासक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने वर्गामध्ये शिकवत आहेत पण या वर्गामध्ये शिकवलेल्या ज्ञानाला प्रात्यक्षिकाची जोड मिळाल्यास विद्यार्थी किंवा लाभार्थी यांचा प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्याकडे कल वाढेल, असा विश्वास वाटतो. त्यामुळे राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण देणारे शिक्षक आणि खादी ग्रामउद्योग विभागाच्या तज्ञ प्रशिक्षकांची यंत्रणा यांच्यामध्ये योग्य समन्वय निर्माण होईल व त्यासाठी एक स्वतंत्र अशी संयुक्त यंत्रणा किंवा उपक्रम सुरू झाला तर एक अत्यंत चांगले सकारात्मक वातावरण मध उत्पादन क्षेत्रामध्ये होईल आणि हजारो बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. त्याच पद्धतीने शेती उत्पन्न वाढीसाठी देखील याचा अत्यंत सकारात्मक फायदा होईल. या पार्श्वभूमीवर राज्य व खादी ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र शासन व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच सामंजस्य करार करण्यात आला.

'महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मधुर समन्वय' या नावाने हा उपक्रम राबविण्याची संकल्पना आहे, मधाचा गोडवा, त्याचा औषधी उपयोग, त्याची असणारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि या माध्यमातून उत्पन्न वाढीचा एक महत्त्वाचा मिळणारा स्रोत या सर्वांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजेच 'मधुर समन्वय' होय. खादी ग्रामोद्योग व करिअर कट्टा यांच्या मधुर समन्वयातून महाराष्ट्राचे नाव मध उत्पादन प्रक्रियेमध्ये प्रगतीपथावर जाईल असा आम्हास विश्वास आहे.

राज्यात पश्चिम घाट माथ्यामध्ये येणारे २२ जिल्हे तसेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये असणारी महत्त्वाची गावे ज्या ठिकाणी मधुमक्षिका पालन शक्य आहे. अशा ३५७ पैकी शंभर तालुक्यामध्ये सदर उपक्रम राबवण्याची अत्यंत गरज आहे. मधुमक्षिका पालनाचा फायदा हा शेती उत्पन्न वाढीसाठीसुद्धा होत असतो. हे नैसर्गिक चक्र उपक्रम वृद्धीसाठी देखील अत्यंत आवश्यक आहे. उपक्रमाची आवश्यकता अधोरेखित करत असताना, राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे होत असणारे आमुलाग्र बदल देखील विचारात घेणे गरजेचे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवत असताना मधुमक्षिका पालनाचे महत्त्व विचारात घेऊन मुंबई विद्यापीठासहित अनेक विद्यापीठानी मधुमक्षिका पालनाच्या अभ्यासक्रमाचा समावेश विद्यार्थ्यांसाठीच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमामध्ये दोन क्रेडिटसाठी केलेला आहे. हा अभ्यासक्रम राबवण्यासाठी महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागाचे जे प्राध्यापक कार्यरत आहेत त्यांना प्रात्यक्षिक देऊन या उपक्रमाला पर्यायाने विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीला गती व दिशा देण्याच्या उद्देशाने सदर प्रस्तावाची आवश्यकता आहे.

या उपक्रमांतर्गत करिअर कट्टाच्यावतीने राज्यातील सर्व प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व इत्तर प्रशिक्षक यांच्यामध्ये समन्वय साधून खादी ग्रामोद्योग मंडळाच्या तज्ज्ञ प्रशिक्षकाच्या सहकार्याने प्रशिक्षित करण्याचे काम केले जाईल. प्राध्यापकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुरेसे प्रात्यक्षिक उपलब्ध व्हावे या उद्देशाने व्यावसायिक, सामाजिक उत्तरदायित्व निधी सी. एस. आर. च्या माध्यमातून राज्यामध्ये प्रत्येकी २५ पेटींचे १०० मध संकलन केंद्र / प्रशिक्षण केंद्र महाविद्यालयाच्या धर्तीवर उभारण्यात येतील. याचा उपयोग हा महाविद्यालयीन तरुणाबरोबरच इतर लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देखील करण्यात येईल. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कार्यरत असणारे सर्व प्राध्यापक व खादी ग्रामोद्योग मंडळाचे प्रशिक्षक याच्या सहकार्याने करिअर कट्टाच्या समन्वयाने मधाच्या उत्पादनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकनाचा विचार करून विकसित करण्यासाठी सातत्यपूर्ण सशोधन केले जाईल.

हा सामजस्य करार होण्यासाठी करिअर कट्टाचे मा. यशवंत शितोळे, प्रा. अतुल साळुंखे, डॉ. दीपा वर्मा, प्रा. अजित दिघे या सर्वांची मोलाची मदत झाली.

करिअर कट्टाच्या साहाय्याने महाराष्ट्रात मधक्रांतीचे एक पाऊल टाकण्यात आले आहे. या सामंजस्य करारामुळे राज्यात मधपाळ प्रशिक्षण, मधमाशीविषयी सर्वसामान्य नागरिकांचे प्रबोधन, मधुवन निर्मिती, पीक उत्पादनात वाढ असे अनेक लाभमिळतील. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालयातील युवक या सर्वांचा यात सहभाग असेल. या उपक्रमास मनापासून शुभेच्छा।